मराठी साहित्य मंडळ, बार्शी

(स्थापना 1961, नोंदणी 1972)

बार्शीच्या ‘मराठी साहित्य मंडळा’ने बार्शीकरांच्या साहित्यिक, सामाजिक-सांस्कृतिक, जीवनात महत्त्वाचे स्थान मिळवलेले आहे. मंडळाचे नाव साहित्य मंडळ असले तरी मंडळाचे क्षेत्र केवळ साहित्यापुरते मर्यादित नाही. बार्शीकरांना नव्या-जुन्या विचारांची ओळख करून द्यावी, परिसरात विचारस्वातंत्र्याची बूज राखली जावी, स्थानिक कलावंतांच्या वाढीला संधी मिळवून द्यावी, जीवनातील लहानमोठ्या गोष्टींतील सौंदर्य जाणण्याचे व आनंद मिळवण्याचे कसब अंगी बाणावे यासाठी ‘मराठी साहित्य मंडळ’ काम करते. म्हणून त्याला मुक्त विद्यापीठाचे स्वरूप आले आहे.

दिनुभाऊ सुलाखे, पन्नालाल सुराणा, द.बा. हाडगे आणि अॅड. दगडे हे एकत्र आले आणि त्यांनी 1961 साली ‘मराठी साहित्य मंडळ’ नावाची संस्था स्थापन केली. संस्थेचे अध्यक्षपद बार्शी नगरपालिकेच्या माजी अध्यक्ष प्रभाताई झाडबुके यांच्यावर सोपवले गेले. संस्था पब्लिक ट्रस्ट अॅक्टखाली नोंदवली गेली आहे. त्यानिमित्ताने मंडळाची घटना तयार झाली. कार्यकारी मंडळ, विश्वस्त मंडळ, सल्लागार मंडळ अशा साहाय्यकारी समित्या तयार करण्यात आल्या. कार्यकारी मंडळाची निवड दर दोन वर्षांनी होऊ लागली. मंडळाचे विविध कार्य कार्यकर्त्यांचा उत्साह, जिद्द, चिकाटी, वक्तशीरपणा, सर्वसंग्राहक वृत्ती यांतून वाढू लागले.

व्याख्याने, परिसंवाद, कथाकथन, एकपात्री प्रयोग, संगीतसभा, सहली, संमेलने, प्रदर्शने, विविध स्पर्धा, गुणीजनांचा सत्कार, व्हिडिओ कॅसेट्स आदी दर्जेदार विविध कार्यक्रमांची दीपमाळच मंडळाने सादर केली. मंडळात ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, विदग्ध साहित्य, लोकसाहित्य आदींवर व्यासंगपूर्ण व्याख्याने तर झालीच; शिवाय, अनेक सामाजिक विषयांवर व्याख्याने दिली गेली. मंडळाने ईश्वर हटाव, स्वामी विवेकानंद, श्री छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्राची संरक्षण व्यवस्था, अंदाजपत्रक, पाण्याचा प्रश्न, रशियातील दुसरी क्रांती. वाढता हिंदुत्ववाद, गिर्यारोहण अशा अनेक विषयांवर प्रबोधन केले. त्यामुळे बार्शीत सतत जागृत वातावरण राहिले. बार्शी हे सामाजिक-सांस्कृतिक दृष्ट्या चळवळे शहर म्हणून नोंदले जाऊ लागले. कार्यक्रमाच्या विविध व वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपामुळे आणि सभास्थानी निर्माण केलेल्या प्रसन्न वातावरणामुळे मंडळाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणे हे श्रोत्यांनाही गौरवपूर्ण वाटू लागले.

महाराष्ट्रातील बहुतेक सर्व क्षेत्रांतील नामवंत व मान्यवर व्यक्तींची व्याख्याने त्या साहित्य मंडळाच्या व्यासपीठावरून झालेली आहेत. बाबासाहेब पुरंदरे, व.दि. कुळकर्णी, शिवाजीराव भोसले, पु.भा. भावे, वसंत कानेटकर, स.ग. मालशे, ग.प्र. प्रधान, नानासाहेब गोरे, एस.एम. जोशी, आचार्य अत्रे, प्राचार्य नरहर कुरुंदकर, बाळासाहेब भारदे, सेतु माधवराव पगडी, इंग्रजी कवी निस्सीम इझिकेल, दत्ता बाळ, कवी अनिल, प्रा. भोगीशयन, पी.जी. पाटील, मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती नाईक, चंद्रशेखर धर्माधिकारी, माधव गडकरी, ग.वा. बेहरे, आनंद यादव, अनिल बर्वे, गंगाधर मोरजे, गंगाधर गाडगीळ, अजित वाडेकर, चंदू बोर्डे ही काही ठळक नावे.

साहित्य मंडळातर्फे बार्शी शहरातील प्रशालेतून एस.एस.सी. परीक्षेत मराठी विषयात जास्त गुण मिळवणार्याा पहिल्या तीन विद्यार्थ्यांना पारितोषिके दिली जातात. मंडळातर्फे सहली आयोजित केल्या जातात. बाबासाहेब पुरंदरे यांच्यासमवेत रायगड-प्रतापगड-सज्जनगड ही सहल सफल झाली. निरा-नरसिंगपूर, उजनी, तेरणा, रामलिंग, कपिलधार, महाबळेश्वर, गणपतीपुळे, गोवा आदी लहानमोठ्या सहली काढल्या गेल्या. ग्रंथप्रदर्शने भरवली गेली. पॉप्युलर बुक डेपो, वसंत बुक डेपो यांचे सहकार्य मिळवले. पुस्तक प्रकाशनापूर्वी वाचनशिबिरे भरवली गेली.

साहित्य मंडळाने सामाजिक प्रबोधनाच्या कार्यात ‘एक गाव एक पाणवठा’ ही प्रचारमोहीम हाती घेतली. बार्शी-तुळजापूर समता दिंडी-पदयात्रा मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष प्राचार्य चंद्रकांत मोरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली. साहित्य मंडळाने मोरवी पूरग्रस्तांना आर्थिक मदत पाठवली; भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी नजीकच्या ‘धोत्रे’ या गावी जाऊन सैनिकांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली; उत्तर सीमा समजावून सांगण्याचा कार्यक्रम राबवला; दुष्काळात ज्वारीचे वाटप केले… अशी अनेक कामे करून साहित्य मंडळाने सामाजिक जबाबदारीची जाण जागत ठेवली.

मंडळाची नाट्यशाखा आहे. त्या शाखेतर्फे ‘वल्लभपूरची दंतकथा’ व ‘पिंकी आणि मेमसाहेब’ ही नाटके ‘महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सवा’त सादर केली गेली. कलाकारांनी पारितोषिके पटकावली. नाट्यशिबिरांना मंडळाच्या नाट्यकर्मींना पाठवले गेले.

मंडळाने ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’चे 54 वे अधिवेशन 1980 मध्ये उत्साहाने व कार्यक्षमतेने पार पाडले. विचारवंत गं.बा. सरदार हे संमेलनाचे अध्यक्ष होते. संमेलनाचे उद्घाटक डॉ. शिवराम कारंथ हे होते. अमराठी व्यक्तीने मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात करावी व इतर भाषकांचा संमेलनात गौरव करावा ही प्रथा या मंडळाने सुरू केली. संमेलनात कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. संमेलनाची स्मृती म्हणून साहित्य संमेलन स्मृती व्याख्यानमाला सुरू करण्यात आली. ग्रामोपाध्ये (पणजी), आ.ह. साळुंखे, सरोजिनी वैद्य, गंगाधर मोरजे, पन्नालाल सुराणा आदींनी ही मालिका गुंफली; साहित्य मंडळाने त्या मालेत झालेली काही व्याख्याने पुस्तकरूपाने प्रसिद्ध करून ती मंडळाच्या सभासदांना विनामूल्य उपलब्ध करून दिली. ‘महाराष्ट्रातील संतांचे कार्य’ या विषयावर पंडितचर्चा आयोजित करण्यात आली होती. त्या चर्चेसाठी स.रा. गाडगीळ, यशवंत मनोहर, नरेंद्र कुंटे, गं.बा. सरदार आदी मंडळी आली. ती चर्चा ‘समाजप्रबोधन’ या महाराष्ट्रातील वैचारिक नियतकालिकाने स्वतंत्र अंक काढून प्रकाशित केली.

निबंधवाचनासारख्या वैचारिक उच्च दर्जा व संशोधक वृत्तीच्या कार्यास सुरुवात केली गेली ती ‘कविता होते कशी’ या प्रा. वसंत पापळकर यांच्या निबंधाने! ती चर्चा गो.म. कुळकर्णी (पुणे) यांच्या नेतृत्वाखाली झाली.

बार्शीला ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ झाल्यावर संस्थेची आर्थिक परिस्थिती चांगली झाली. त्यातून मराठी साहित्य मंडळ व महिला मंडळ या दोन्ही मंडळांची सामायिक मालकीची वास्तू बार्शीतील महाद्वार रस्त्यावर उभारण्यात आली. दिलीप सोपल यांनी त्यांच्या आमदारनिधी कोट्यातून त्या वास्तूलगत अभ्यासिका बांधून दिली. ती वास्तू ‘कथले सभागृह’ या नावाने ख्यातनाम झाली आहे.

साहित्य मंडळाने बार्शीच्या जनमानसात एक विशिष्ट स्थान मिळवले आहे.

– चंद्रकांत मोरे

About Post Author