मराठीप्रेमी पालक महासंघाची निर्मिती मराठी शाळांचा आणि पालकांचा आवाज एकसंध करण्यासाठी झाली. ‘मराठी अभ्यास केंद्र’ आणि ऐंशी वर्षांचा इतिहास असलेली, महाराष्ट्रातील नावाजलेली मराठी शाळा ‘डी. एस. हायस्कूल’ यांच्या संयुक्त विद्यमाने 23 आणि 24 डिसेंबर 2017 रोजी डी. एस. हायस्कूलच्या संकुलात पालकांचे ऐतिहासिक एकीकरण झाले. ‘मराठी अभ्यास केंद्र’ गेली पंधरा वर्षें सातत्याने मराठी भाषेसंदर्भातील विविध मुद्यांवर काम करते, त्यांपैकी एक मुद्दा मराठी शाळांच्या संवर्धनाचा आहे. ‘मराठीप्रेमी पालक महासंमेलन’ या नावाने साजरा झालेला तो सोहळा महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासात प्रथमच होत होता. संमेलनाच्या आरंभी संदेश विद्यालय, विक्रोळी यांच्या मुलांनी समूहगीते सादर केली. त्यानंतर, ‘मराठी अभ्यास केंद्रा’चे अध्यक्ष दीपक पवार असे म्हणाले, की पालकांनी मुलांना मराठी शाळेत घालण्याचा त्यांचा निर्णय चुकीचा नाही हे मनात पक्के करावे. राज्यात अनेक शाळा गुणवत्तापूर्ण आणि मातृभाषेतील दर्जेदार शिक्षण देणार्या आहेत, पण त्यांची बेटे झाली असून, ती जोडण्याचे काम सर्वांना मिळून करायचे आहे. शिक्षणव्यवस्थेत पालक ही शक्ती सक्रिय म्हणून समोर आली पाहिजे. त्याच मुद्याला अनुसरून मराठी शाळांमध्ये पालकांनी त्यांच्या मुलांना पाठवावे यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासनाचा शालेय शिक्षण विभाग यांनी पालक प्रबोधनाच्या कार्यशाळा आयोजित कराव्या, त्यांत शिक्षणतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ यांना समुपदेशनासाठी बोलावावे. त्याकरता लोकांशी संपर्काची जबाबदारी स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यावर सोपवावी असा ठराव मांडण्यात आला.
संमेलनाला उद्घाटक म्हणून हर्षल विभांडिक या चौतीस वर्षीय तरुणाचे नाव लाभले. त्याने धुळे जिल्ह्यातील हजारांहून अधिक शाळा स्वखर्च आणि लोकसहभाग यांतून डिजिटल केल्या आहेत. तो अमेरिका रिटर्न तरुण आहे. तो पालकांशी आणि उपस्थितांशी मनमोकळेपणाने बोलला. लोकसहभागातून शाळा डिजिटल झाल्या आणि गाव शाळेत आले, अकाउंटेबिलिटीची भावना गावातील लोकांमध्ये, पालकांमध्ये बळावली असे तो म्हणाला. त्याने गावातील शिक्षणाचे वातावरण आणि पालकांच्या मानसिकतेचे वर्णन रंजकपणे सांगितले. त्याने म्हटले, की हे पालकांचे एकीकरण ही एक सकारात्मक सुरुवात आहे. यातून मोठा लढा उभा राहील!
‘मातृभाषेतून शिक्षण आणि पालकांशी संवाद’ या सत्रात नामदेव माळी आणि मिलिंद चिंदरकर बोलले. पालकांनी शाळांकडे विचार करायला लावणारे प्रश्न मुलांना विचारण्याचा हट्ट धरला पाहिजे. मुलांकडून दैनंदिनी लिहिण्यासारखे उपक्रम आवर्जून करून घेतले पाहिजेत असे नामदेव माळी म्हणाले. मिलिंद चिंदरकर यांनी धड्याखालील प्रश्न हे निरुपयोगी असल्याचे सांगताना मुलांची शोधक वृत्ती सक्षम करतील अशा गप्पा पालकांनी ठरवून मुलांशी मारल्या पाहिजेत असे बजावले. त्यांनी ‘घोका आणि ओका’ यापेक्षा प्रात्यक्षिकातून शिक्षणावर भर अधिक द्यायला हवा असे मत व्यक्त केले. सत्राचे अध्यक्ष रविंद्र धनक यांनी ‘अकाउंटेबिलिटी’ महत्त्वाची असून पालक हा सक्रिय घटक व्हायला हवा असे प्रतिपादन केले. म्हणूनच इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे गुणवत्ता मूल्यमापन करावे. इंग्रजी माध्यमाच्या शाळा म्हणजे चांगले शिक्षण हा गैरसमज दूर करण्याची सुरुवात तेथून होईल. मराठी शाळा डिजिटल करत असताना केवळ संख्यावाढ हा निकष न ठेवता त्या शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण कसे दिले जाईल याचा विचार करावा. त्यासाठी ठोस कार्यक्रम हाती घ्यावा अशा प्रकारचा ठराव मांडण्यात आला.
‘व्यक्तिमत्त्व विकासात पालक व शिक्षक यांची भूमिका’ सांगताना आय.पी.एच.चे डॉ. अरुण नाईक यांनी पालकांशी खुलेपणाने गप्पा मारल्या. पालकांनी भाषेबद्दलचे गैरसमज बाजूला सारले पाहिजेत असे ते म्हणाले. मातृभाषेतून शिक्षणाचा विचारप्रक्रियेवर सकारात्मक परिणाम कसा होतो हे समजावतानाच मुलांना विकासासाठी मोकळेपणा द्यायला हवा व चुकण्याची भीती देणे टाळायला हवे हेही त्यांनी सांगितले.
‘गुणवत्तापूर्ण शिक्षण, सर्वांसाठी’ या सत्रात रेणू दांडेकर यांनी त्यांच्या चिखलगाव, दापोली येथील शाळेत राबवले जाणारे विविध प्रयोग आणि उपक्रम सांगितले. त्या भाषेमुळे शिक्षक आणि मुले यांच्यामध्ये निर्माण होणारा संवाद महत्त्वाचा असल्याचे म्हणाल्या. कोल्हापूरच्या ‘सृजन आनंद विद्यालया’च्या सुचिता पडळकर यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणपद्धतींची उदाहरणे उपस्थितांना सांगितली व इतर शाळांनीही ती राबवावी असे आवाहन केले. पुण्यातील ग्राममंगल शाळेच्या आदिती नातू यांनी आदिवासी भागात मुलांच्या शिक्षणासाठी केलेले प्रयत्न तपशीलपूर्वक मांडले. ‘मराठी माध्यमातील यशवंतांच्या यशोगाथा’ हे त्या नंतरचे सत्र होते. त्यामध्ये कबड्डीपटू मीनल जाधव, वृत्तनिवेदक नम्रता वागळे, अभिनेता अंगद म्हसकर, जागतिक कंपनीत काम करणारा अभियंता तसेच एक तरुण नाट्यदिग्दर्शक वैभव पटवर्धन, नामांकित डॉक्टर सुमीत शिंदे, राज्यशासनात सहाय्यक आयुक्त असलेल्या स्वाती थोरात व प्रसिद्ध रेडिओ जॉकी रश्मी वारंग ही व्यक्तिमत्त्वे सहभागी झाली. त्यांचे मराठीमुळे कोठेच अडले नाही, उलट मराठी माध्यमाचा नेहमी फायदाच झाला असे सर्वांचेच म्हणणे होते. इंग्रजी भाषेच्या अडचणी योग्य ते प्रयत्न केल्यास येत नाहीत किंवा त्यांच्यावर सहज मात करता येते असेही ते म्हणाले. मातृभाषेतून शिकल्याने व्यक्त होण्याची क्षमता टिकून राहते असे वैभव पटवर्धन म्हणाले तर मातृभाषेतून शिकल्याने दुणावणार्या आत्मविश्वासाबद्दल डॉ. सुमीत शिंदे यांनी आनंद व्यक्त केला. अंगद म्हसकर, रश्मी वारंग यांनी त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मराठी शाळेचा पर्याय निवडून प्रत्यक्ष उदाहरण समोर ठेवले, तसेच अंगद म्हसकर व नम्रता वागळे यांनी मराठीतून शिकल्याने प्राप्त होणार्या शब्दसंपत्तीचाही दाखला दिला. स्वाती थोरात यांनी मातृभाषेतून शिकल्याने मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांवर पकड उत्तम साधता येते हे आग्रहाने नमूद केले तर मीनल जाधव यांनी शाळा सोडल्यानंतरही शाळा, संस्कृती यांच्याशी टिकून राहणारे नाते हे मराठी माध्यमाचे महत्त्वाचे यश असल्याचे सांगितले. महाराष्ट्र शासनाने सद्यस्थिती विचारात घेऊन मराठी शाळांच्या स्थितीचा अहवाल मांडणारी श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी, शासनाने महाराष्ट्रातील मराठी माध्यमाची एकही शाळा बंद पडणार नाही यासाठी ठोस भूमिका घ्यावी, उलट, तेराशे शाळा बंद करण्याचा निर्णय तात्काळ स्थगित करावा, मराठी शाळांचा तडकाफडकी रद्द केलेला बृहद्आराखडा पुन्हा लागू करून ग्रामीण महाराष्ट्रातील आणि दुर्गम/सीमावर्ती भागातील अनुदानित मराठी शाळांच्या स्थापनेचा मार्ग मोकळा करावा, स्वयंअर्थसहाय्यित शाळांना मान्यता देताना मागेल त्याला इंग्रजी शाळा हे धोरण तात्काळ थांबवावे. शाळांच्या बृहद्आराखड्याचा विचार करताना इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या संख्येवर निर्बंध आणावेत, मराठी माध्यमाच्या शाळांचे वेतनेतर अनुदान सुरू करावे आणि ते वेळेवर द्यावे, वेतनेतर अनुदान किमान पंधरा टक्के असावे, राहिलेले अनुदान 31 मार्च 2018 च्या आत द्यावे अशा प्रकारचे ठराव मांडण्यात आले.
दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमाने दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली. ते महाराष्ट्र विद्यालय (गोरेगाव) आणि मालवणी उत्कर्ष विद्यालय (मालाड) यांनी सादर केले.
‘शालेय जीवनातील भाषा, कला आणि क्रीडासमृद्धी’ या विषयावर लेखिका माधुरी पुरंदरे आणि मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. उदय देशपांडे यांनी खेळातून विकसित होणार्या स्वभावगुणांविषयी सांगितले तर माधुरी पुरंदरे यांनी वाचन, संवाद व निरीक्षण या गुणांच्या ऱ्हासाविषयी चिंता व्यक्त केली. मातृभाषेतील शिक्षण आणि आई म्हणून माझी भूमिका या सत्रात प्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमीत, मीना कर्णिक, रेखा ठाकूर, शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोर्हे आणि शुभदा चौकर या सहभागी झाल्या. त्यांनी आई म्हणून त्यांच्या मुलांना मराठी शाळेत घालण्यामागील त्यांची भूमिका प्रभावीपणे मांडली. त्यांनी पालकांना जाणीवपूर्वक मराठी शाळा निवडाव्यात असे आवाहनही केले. हेमांगी जोशी यांनी मराठी शाळांपुढील आव्हाने आणि नाविन्यपूर्ण उपाय या सत्रात शिक्षणहक्क कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी मांडल्या, तर मारुती म्हात्रे यांनी शासनाची मराठी शाळांप्रतीची चुकीची धोरणे अधोरेखित केली. भाऊसाहेब चासकर यांनी तळमळीने शिक्षकाच्या दृष्टिकोनातून त्या विषयावर भाष्य केले तर सुबोध केंभावी यांनी पालक नवनवीन तंत्रज्ञान वापरून मुलांच्या शिक्षणात कशी भूमिका बजावू शकतील ते सांगितले.
राजकीय पक्षांच्या निवडक प्रतिनिधींचा सहभाग असलेल्या सत्रात, त्यांना ‘मराठी शाळांसाठी ते काय करणार?’ हा प्रश्न केला गेला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील, भाजपाच्या कांता नलावडे, शिवसेनेतर्फे मनिषा कायंडे, आणि पत्रकार प्रतिमा जोशी यांनी त्यांची त्यांची भूमिका सविस्तरपणे मांडली. त्या सर्वांनीच मराठी शाळांच्या संवर्धनासाठी, त्यांना गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन समस्त पालकांना व आयोजकांना दिले. ‘झी २४ तास’चे वृत्तनिवेदक अजित चव्हाण यांनी त्या राजकीय मंडळींना बोलते केले. दिवसभराच्या चर्चेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या; तसेच, खाजगी अनुदानित मराठी शाळांमधील शिक्षकांवर बिगरशैक्षणिक कामाचा पडणारा बोजा कमी करावा, शाळांचे कंपनीकरण करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, कॉर्पोरेट कंपन्या गुंतवणूक करणार असतील तर ती मराठी माध्यमाच्या शाळांमध्येच करणे अनिवार्य करावे, सीबीएसई-आयसीएसई; तसेच, इंटरनॅशनल बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी ही पहिली भाषा म्हणून पहिली ते दहावीपर्यंत अनिवार्यपणे शिकवली जावी- त्यात कुचराई करणाऱ्या शाळांना जबर दंड ठोठवावा – त्यांची मान्यता रद्द करणे यांसारखी निर्णायक कारवाई करावी, शासनाने मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये होणाऱ्या प्रयोगांच्या आदानप्रदानासाठी सहकार्य करावे, मात्र त्या पुढाकाराला इव्हेंटचे/सोहळ्याचे रूप येणार नाही याची दक्षता घ्यावी अशा प्रकारच्या ठरावांचा विचार करण्यात आला. मॅक्सिन बर्न्सन महासंमेलनाला दोन्ही दिवस उपस्थित होत्या. त्या समारोपाच्या अध्यक्ष होत्या. त्या मूळच्या अमेरिकन.
मॅक्सिन बर्न्सन फलटण येथे मराठी शाळा चालवतात. त्यांचा शिक्षण, संस्कृती याबद्दलचा अभ्यास ऐकताना सगळे मंत्रमुग्ध झाले. त्यांनी जगातील विविध देशांची उदाहरणे दिली. त्यांनी इंग्रजी ही भाषा म्हणून महत्त्वाची असली तरी तिचा माध्यम म्हणून अट्टाहास करणे कसे चुकीचे आहे हेही सांगितले. मराठी भाषेचे अस्तित्व मराठी शाळांच्या अस्तित्वावर अवलंबून आहे हे लक्षात घेऊन मराठी भाषा विभागात मराठी शाळांसाठी काम करण्याकरता स्वतंत्र उपविभाग असावा, त्यासाठी ‘मराठी अभ्यास केंद्रा’ने दिलेला प्रस्ताव विनाविलंब सुरू करावा, मुंबई महानगरपालिकेने मराठी शाळा बंद करण्याचा आणि इंटरनॅशनल बोर्डाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा, मराठी शाळांना लागू असलेले सर्व नियम-अटी अनिवार्यपणे इंग्रजी शाळांनाही लागू करावेत असे ठराव करण्यात आले.
महासंमेलनाचा समारोप झाला असला तरी ही नांदी आहे हे संमेलन समन्वयक वीणा सानेकर यांनी नमूद केले. त्या नांदीला मूर्त रूप देत वीणा सानेकर यांच्या अध्यक्षतेखाली पालक महासंघाची घोषणा तेथे केली गेली. महासंघाद्वारे राज्यभरातील पालकांचे एकीकरण होईल व विविध आघाड्यांवर मातृभाषा शिक्षण आणि मराठी शाळांसाठी काम केले जाईल असे घोषित झाले. संमेलन प्रत्यक्ष उपस्थितीसोबतच इंटरनेटच्या माध्यमातून हजारो लोकांपर्यंत पोचवले गेले. त्यामुळे तो उपक्रम व्यापक झाला.
मराठीप्रेमी पालक महासंमेलन हे शिक्षक, पालक आणि मराठी शाळा यांना एकत्र बांधून ठेवणारा धागा ठरला. गोंड्याचे फूल जसे एका धाग्यात बांधताना त्याचा केशरी रंग धाग्यास सोडून जाते, तसा पालकांचा, शिक्षकांचा आणि मराठी शाळांच्या सर्वांगीण विकासाचा मोहक रंग ‘मराठी अभ्यास केंद्रा’च्या ठरावाच्या धाग्याने जोडण्यात आला. महासंमेलनात अनेक नवनवीन विषयांवर चर्चा झाल्या, सत्रे रंगली, एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात चालू असलेल्या संमेलनात विषय मात्र एकच केंद्रस्थानी राहिला तो म्हणजे मातृभाषेतून शिक्षण आणि मराठी प्रयोगशील शाळांची उपयुक्तता. संपूर्ण संमेलनादरम्यान एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे येणारा प्रत्येक जण अनुभवसमृद्ध होऊन घरी परतला. त्यांतील काही जण संघटितही झाले. त्यांच्या नवनवीन कल्पनांचा सर्वत्र विकासासाठी कसा उपयोग होईल याचा विचार झाला. म्हणजे सत्रांची उपयुक्तता वैयक्तिक आयुष्यात उतरवण्याचे फार मोठे कसब संमेलनाने साधले. संमेलनात जी ग्रंथदालने होती ती मोहक होती. सर्वत्र नव्या पुस्तकांचा सुगंध आणि त्यासोबत नवीन आशयाची आणि नव्या धाटणीची पुस्तकं खुणावत होती. बाजारात सहसा उपलब्ध नसलेली बरीचशी पुस्तके त्या निमित्ताने पाहण्यास मिळाली. एकूणच, पालक महासंमेलन ही नुसत्या चर्चेचा विषय न ठरता अनुभवाची शिदोरी होण्याचे काम महासंमेलनाने केले. आता ती शिदोरी, पक्वानांचा साज घेऊन किती जणांना नवचैतन्य देते ते पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
– सौरभ नाईक