मनोहर तल्हार यांच्यामधील माणूस शोधताना

_ManoharTalhar_1.jpg

मनोहर तल्हार यांची ‘माणूस’ ही कादंबरी नागपूर विद्यापीठात बी.ए.च्या पहिल्या वर्षाला लागली आणि ती अश्लील आहे अशी ओरड होताच लागलीच अभ्यासक्रमातून काढूनही टाकली गेली. त्या संदर्भात ‘विदर्भ साहित्य संघा’त ‘माणूस’वर एक परिसंवाद घेण्यात आला. त्या निमित्ताने मनोहर तल्हार हे नाव वाचनात आले. उद्धव शेळके यांच्या ‘धग’ सोबतच मनोहर तल्हार यांच्या ‘माणूस’ या कादंबरीचाही उल्लेख वैदर्भीय कादंबरीचा विचार करताना होत असे. गंमत अशी, की ‘माणूस’वर ज्या कारणाने अश्लीलतेचा आरोप झाला होता तसे संदर्भ असलेल्या काही कादंबऱ्या (‘रथचक्र’, ‘गारंबीचा बापू’ इत्यादी) विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात लागल्या आणि त्या मराठीच्या प्राध्यापकांनी बिनबोभाट शिकवल्यासुद्धा! तल्हार हा माणूस कमालीचा दुर्दैवी आहे आणि दुर्दैवाने त्यांची पाठ अखेरपर्यंत सोडली नाही. अर्थात हे सगळे जाणवले तेव्हा मी त्यांच्या जवळ गेलो होतो, आमच्यात मैत्रभाव निर्माण झाला होता.

माझी ‘प्रवाह’ ही कादंबरी ‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळा’च्या अनुदान योजनेत प्रकाशित झाली होती. त्या कादंबरीची प्रत भेट म्हणून देण्यासाठी ‘धनवटे नॅशनल कॉलेज’चे प्राचार्य या.वा. वडस्कर यांच्याकडे गेलो. त्यानंतर मधून मधून त्यांच्या भेटी होऊ लागल्या. अशातच त्यांनी ‘धनवटे नॅशनल कॉलेज’च्या परिसरात अखिल भारतीय पातळीवर मराठी जनसाहित्य संमेलनाचे आयोजन करण्याचे ठरवले होते. जनसाहित्याची संकल्पना त्यांनी त्यांच्या लेखनातून तात्त्विक पातळीवर मांडण्याचा प्रयत्न केला होता. त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष म्हणून अमृता प्रीतम येणार होत्या. त्यांच्यासोबत इमरोज, ख्वाजा अहमद अब्बास यांच्यासारखी मोठी माणसेही येणार होती. वडस्करांनी साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचे संपादक म्हणून मनोहर तल्हार यांच्याकडे जबाबदारी दिली आणि त्यांचा साहाय्यक संपादक म्हणून त्यांनी माझी नियुक्ती केली. मी मनोहर तल्हार यांना भेटण्यास त्यांच्या घरी पहिल्यांदा वडस्करांच्या सूचनेवरून गेलो.

मनोहर तल्हार रवींद्रनगरला राहत होते. त्यांचे घर साधे होते. एक हॉल, लाकडी सोफा. समोर गोदरेजची दोन लोखंडी कपाटे. कपाटाच्या बाजूला लाकडी टेबलावर ठेवलेला टी.व्ही. बाजूला पडदा लावून हॉलचे पार्टिशन केलेले. पडद्यापलीकडे स्वयंपाकघर. हॉलमध्ये खिडकीशी लागून लोखंडी पलंग. पलंगावर त्यांची बैठक असायची. ते तेथेच बसले होते. त्या पहिल्या भेटीत आमच्या गप्पा झाल्या. साहित्यावर एकूण साहित्यविषयक पर्यावरणावर आणि जनसाहित्य संमेलनाच्या निमित्ताने निघणाऱ्या स्मरणिकेवर. ती केवळ स्मरणिका न ठरता एक चांगला साहित्यविषयक विशेषांक व्हावा यावरही. पहिल्या भेटीत जाणवले, ते तल्हार यांचे साधेपण.

त्यांच्या-माझ्या भेटी वाढत गेल्या. त्यांच्याकडे वरचेवर जाणे होऊ लागले. मी त्यांचे फारसे काही वाचलेले नव्हते; पण नंतर मात्र जाणीवपूर्वक त्यांचे सगळे साहित्य वाचून काढले. विशेषतः त्यांच्या कथा आणि कादंबऱ्या.

मनोहर तल्हार आणि मी – आमच्यात एका पिढीचे अंतर. त्यांची मोठी मुलगी माझ्यापेक्षा मोठी होती. पण वयाचा अडसर कोठे येणार नाही अशा प्रकारे आमच्यात मैत्री निर्माण झाली आणि त्या मैत्रीचा कणा होता आमची साहित्यविषयक भूक व तळमळ. लेखनावर परिश्रम घेण्याची त्या माणसाची जिद्द व काटेकोरपणा या गोष्टी त्यावेळी माझ्या लक्षात आल्या. तल्हार यांनी मला सुचवले, की मीही ‘जनसाहित्य संमेलना’च्या निमित्ताने प्रकाशित होणाऱ्या विशेषांकात एखादी कथा द्यावी म्हणून मी एक कथा त्यांना वाचण्यास भीतभीतच दिली. ती वाचून त्यांनी त्यातील शक्यता, सुटलेल्या जागा आणि फसलेल्या बाबी बारकाईने माझ्या लक्षात आणून देऊन माझ्याकडून ती कथा तीनचार वेळा लिहून घेतली. त्यातून माझी ‘डोह’ ही कथा जन्माला आली. मी माझ्या लेखक म्हणून जडणघडणीत ती कथा महत्त्वाची मानतो. त्यानंतर मला साहित्याकडे सूक्ष्मपणे पाहण्याची, अनुभवाच्या सगळ्या शक्यता तपासून पाहण्याची सवयच लागली. तेही त्यांचे लेखन मला वाचण्यास देऊन त्यावरील माझी प्रतिक्रिया अजमावून पाहत. विचारांची ती देवाणघेवाण मोलाची होती.

तल्हार यांचा जन्म वलगावचा. वलगाव हे अमरावतीला लागून असलेले खेडे. वाढत्या शहरीकरणात वलगाव हे अमरावतीचे उपनगर झाले आहे. त्यांचे वडील शिवणकाम करणारे. आई कष्टकरी बाई. घरातील कामाचा भार उचलणारी. तल्हार आणि दोन भाऊ. तल्हार सगळ्यात मोठे. वलगाव हे बारा बलुतेदारांचे गाव. सगळ्या जातिधर्माची माणसे तेथे राहत. तो काळ जसा स्वातंत्र्यप्राप्तीसाठी चाललेल्या संघर्षाचा होता, तसाच भारत-पाकिस्तान यांच्या धार्मिक उन्मादाचाही होता. तशा उन्मादापासून सर्वसामान्य माणसांचे रक्षण करण्यासाठी म्हणून तल्हार यांच्या वडिलांनी-मारोतराव तल्हार यांनी शीख धर्म स्वीकारला होता. ते शिखांसारखी दाढी, पगडी आणि हातात नंगी तलवार घेऊन रात्री-अपरात्री वस्तीतून फिरायचे. प्रसंगी टवाळखोरांना चोपही द्यायचे. त्यामुळे त्यांचा दरारा गावात निर्माण झाला होता. त्यांचा त्या वेशातील फोटो तल्हार यांच्या घरी हॉलमध्ये लावलेला असायचा.

तल्हार यांनी ‘माणूस’ ही कादंबरी लिहिली, तेव्हा त्यांनी त्यातील शंकर या मुख्य व्यक्तिरेखेची बांधणी त्यांच्या वडिलांना समोर ठेवून केली होती. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील सगळे पैलू त्यात ओतले होते. ‘माणूस’मध्ये शेवटी एका अपघातात शंकरचे पाय गुडघ्यापासून कापले जातात आणि तो कायमचा अपंग होतो. तल्हार यांनी ‘माणूस’ लिहिली तेव्हा ते विक्रीकर विभागात नोकरीला होते. ‘माणूस’1963 मध्ये प्रकाशित झाली. तल्हार यांची बदली नागपूरहून मुंबईला 1967 मध्ये झाली. ते मुंबईला खामगावच्या रेल्वे स्टेशनवरून जाणार होते. त्यांचे वडील खांद्यावर मुलाचे सामान घेऊन रेल्वे स्टेशनवर येण्यास निघाले. ते रेल्वे रूळ ओलांडताना आगगाडीखाली आले आणि त्यांच्या शरीराचे तीन तुकडे झाले! तल्हार यांना त्या घटनेचा जबर मानसिक धक्का बसला. त्यांनी शंकरच्या निमित्ताने जणू त्यांच्या वडिलांची नियतीच ‘माणूस’मध्ये मांडून ठेवली होती! त्यामुळे ते त्या अपघाताला कारणीभूत आहेत या अपराधी भावनेने त्यांची झोप उडाली. त्यांनी जणू लेखनसंन्यास घेतला. तोपर्यंत त्यांची तीनचार पुस्तके प्रकाशित झाली होती. लेखक म्हणून नावलौकिक मिळू लागला होता आणि तशातच ती घटना घडली होती. ते लेखनापासून दूर 1973 पर्यंत होते. त्याचा परिणाम अर्थातच त्यांच्या लेखनावर विपरीत असाच झाला.

मनोहर तल्हार यांचा वाङ्मयीन पिंड ज्या काळात घडला गेला, तो काळ (म्हणजे 1950 च्या पुढील साहित्याच्या बहारीचा होता. खूप काही चांगले त्या काळात लिहिले जात होते. अमरावतीतही साहित्यविश्वात चैतन्याचे आणि उमेदीचे वातावरण होते. कथाकार शांताराम हे त्या पिढीचे आदर्श होते आणि ‘सत्यकथा’-‘प्रतिष्ठान’कडून लेखक घडवले जात होते. अमरावतीत उद्धव शेळके, मधुकर केचे, सुरेश भट, तुळशीराम काजे, शरच्चंद्र सिन्हा, राम शेवाळकर आणि त्यांच्या थोडे पुढे वसंत आबाजी डहाके, प्रभाकर सिरास, वामन तेलंग, प्रभा गणोरकर अशी मंडळी धडपडत होती. ती मंडळी नंतर त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात मोठी झाली. मनोहर तल्हार हे त्यांतीलच एक, पण तल्हार यांच्यावर वाङ्मयीन संस्कार झाला तो नवसाहित्याच्या आधीच्या साहित्याचा. फार फार तर वामन कृष्ण चोरघडे यांच्यापर्यंतचा. त्यांच्या प्रतिभेची नाळ ही खांडेकरी युगाशी आणि प्रकृतीशी अधिक जवळचे नाते सांगते. तल्हार यांना आधुनिक नवसाहित्याची प्रकृती समजून घेता आली नाही. याला कारण कदाचित तल्हार यांचे कामाचे क्षेत्र असू शकेल. ते विक्रीकरासारख्या साहित्यापासून शेकडो मैल दूर असलेल्या क्षेत्राशी पोटापाण्याच्या निमित्ताने बांधले गेले होते. त्यामुळे कदाचित त्यांच्या बाबतीत ते घडले असावे. पण असे सगळे असूनही त्यांनी त्यांच्या कुवतीने आणि आस्थेने लेखनसातत्य राखून ठेवले.

तल्हार यांच्या लेखनाचे सरळ दोन भाग पडतात. पहिला भाग त्यांच्या ग्रामीण किंवा ग्रामसदृश्य लेखनाचा आणि दुसरा भाग नागरी लेखनाचा. त्यांनी लिहिलेली ‘बयनाबाई’ ही पहिली ग्रामीण कथा. तशी त्यांची पहिली कथा म्हणजे ‘न खुपसणारा खंजीर’ ही सांगता येईल. पण ती कथा त्यांच्या वाङ्मयीन प्रवासातील नगण्य होय. त्यावर प्रभाव होता बाबुराव अर्नाळकरांच्या रहस्यकथेचा. त्यांची वाढ ज्या दिशेने झाली त्या दिशेची पूर्वखूण म्हणून ‘बयनाबाई’ हीच पहिली कथा मानता येईल. तल्हार कथालेखन करण्यापूर्वी चित्रपट समीक्षा लिहीत होते. त्यांच्या काही कथा त्या क्षेत्रातील माणसांचे चित्रण करणाऱ्या असल्याचे दिसून येते. विशेषतः त्यांची ‘अप्रिया’ ही कादंबरी. त्यांना त्या क्षेत्राचे आकर्षण होते. पण त्यांनी त्या क्षेत्रातील माणसांच्या जगण्यातील ताणतणाव, संघर्ष जवळून पाहिले नव्हते. ते शक्यही नव्हते. म्हणून ते लेखन काहीसे वरवरचे झाले. ते त्या अनुभवविश्वाच्या खोलात शिरले असते तर हिंदीतील ‘मुढे चाँद चाहिए’ ही सुरेंद्र वर्मा यांची गाजलेली कादंबरी त्या वेगळ्या अनुभवविश्वाचे दर्शन घडवून जी उंची गाठते ती उंची, ते यश त्यांच्या प्रकृतीच्या लेखनाला कदाचित मिळू शकले असते; मात्र त्यांना लेखनातून माणसांना रक्तबंबाळ करायचे नव्हते, त्यांच्या आयुष्याचे आडवेउभे काप मांडायचे नव्हते, तर त्यांनी त्यांच्या लेखनाच्या मुळाशी ठरवलेले या संदर्भातील सूत्र होते माणसांमधील भावनिक प्रेमाचे. त्यांना Platonic Love चे महत्त्व पटवून द्यायचे होते. त्यामुळे वासनेने धुंद झालेली, बेभान झालेली आणि त्यांच्या परिणामांना जीवनाच्या आकांताने भिडणारी माणसे उभी करण्याची त्यांची क्षमता असूनही ते ती व्यक्त करू शकले नाहीत.

मल्हार यांच्या वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वातील मला जाणवलेली एक गोष्ट म्हणजे त्यांचा अश्लील म्हणवणाऱ्या साहित्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन. वासनेचे विविधांगी पदर आणि त्यांचा जगण्याच्या मुळाशी मांडला गेलेला उच्छाद या प्रकारचे लेखन तल्हार यांना फारसे भावत नव्हते. तसेच व्यंगार्थाच्या लक्षणेच्या अंगाने जाणारेही लेखन (कमल देसाई यांच्या लघुकादंबऱ्या किंवा जी.ए. कुलकर्णी यांच्या त्या प्रकृतीच्या कथा) त्यांना फारसे भावत नव्हते. त्यांनी त्यांचे लेखनविषय आणि त्यांची आविष्कारशैली जवळजवळ ठरवून टाकली होती. ते त्याच्या बाहेर जाण्यास तयार नव्हते; पण गंमत म्हणजे त्यांची ‘माणूस’ ही कादंबरी या सगळ्यांच्या पुढे चार पावले जाऊन उभी राहते. कारण तो त्यांच्या आयुष्यातील अस्सल अनुभव होता. त्या अनुभवाचे नाते त्यांच्या जगण्या-भोगण्याशी होते. ते नाते पुढे फार कमी प्रमाणात व्यक्त झालेले आहे.

वैदर्भीय कादंबरीच्या इतिहासात ‘माणूस’ आणि ‘धग’ या दोन कादंबऱ्या अजरामर आहेत. त्या दोन्ही कादंबऱ्यांवर मराठी वाचकांनी-जाणकार समीक्षकांनी भरभरून प्रेम केले आहे.

तल्हार यांनी ‘माणूस’ नंतर जे लेखन केले (विशेषतः कादंबरीलेखन) त्यात विषयाच्या आणि कलाकृतीच्या पातळीवर त्यांना फार पुढे जाता आलेले नाही. त्यांचे ‘अप्रिया’, ‘अफलातून’, ‘शुक्रथेंब’ किंवा ‘अशरीरी’ हे लेखन वाचक वाचतो तेव्हा त्या लेखनाची कळत नकळत ‘माणूस’शी तुलना होते. कलावंताने त्यांच्या कारकिर्दीतील मोठा पल्ला गाठल्यानंतर त्याला फार पुढे जाता येत नाही. पण वाचकांची अपेक्षा लेखकाने किमान त्या पातळीवर तरी टिकावे अशी असते. तल्हार ती पूर्ण करू शकले नाहीत. त्यांनी त्यांच्या प्रतिभाधर्माशी नाते सांगणारे जे विषय नव्हते अशा विषयांवर ते लेखन केले. त्यांनी त्यांच्याजवळ असलेला ऐवज मात्र  सर्जनाच्या पातळीवर कधीच तपासून पाहिला नाही.

त्यांच्याजवळचा तो ऐवज अस्सल होता. त्यांच्या वडिलांनी सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी शीख धर्म स्वीकारला आणि हातात नंगी तलवार घेऊन ते रात्री गावात फेरफटका मारायचे, हा अनुभव मराठी साहित्याला नवीन आहे. त्यातील पदर आणि शक्यता तपासून पाहता एक मोठा आव्हानात्मक पट सर्जनशील लेखक म्हणून त्यांच्या हाताशी होता. दुसरा ऐवज म्हणजे त्यांनी सेवानिवृत्तीपर्यंत भारत सरकारच्या विक्रीकर विभागात नोकरी केली आणि तेथून ते विक्रीकर अधिकारी म्हणून निवृत्त झाले. त्यांनी त्यांची हयात त्या क्षेत्रात घालवूनही आणि तेथील लाल फितशाही आणि ताणेबाणे जवळून पाहिले तरी त्यांच्या एकाही कथेत त्या क्षेत्रातील साधा उच्चारही येत नाही. मी त्यांना हे विषय सुचवत होतो, पण त्यांच्या मनाने त्या विषयांना स्पर्शही केला नाही. त्याच्या संदर्भातील आणखी दुर्दैवी गोष्ट म्हणजे ते नोकरीतून निवृत्त झाले! त्यांनी निवृत्तीनंतर फारसे लेखन केले नाही. त्यांचे ‘कॅन्सल’, ‘दुजा शोक वाहे’ आणि ‘दुरान्वय’ हे तीन कथासंग्रह अनुक्रमे मॅजेस्टिक, साकेत आणि स्वरूप या प्रकाश संस्थांतर्फे प्रकाशित झाले, पण त्यात अपवादभूत एखादी कथा वगळली तर सगळ्या कथा बऱ्याच आधीच्या आहेत. लेखनातून असे मनाने दूर जाणे त्यांच्या कौटुंबिक कारणांमुळेही घडले असावे.

तल्हार यांनी साठी गाठली आणि त्यांच्या स्वभावात वैराग्य, नैराश्य जाणवू लागले. ते काहीसे त्यांच्या कौटुंबिक कारणांनी होते; ती फार गंभीर अशी बाब होती असे नव्हे व त्याच वेळी त्यांना गुडघ्याचा त्रास होऊ लागला. पण त्याहीपेक्षा त्यांनी स्वतःला साहित्यविश्वापासूनच तोडून घेतले. घरी येणारा ‘ललित’चा अंकही बंद केला. ते घरी बसून राहू लागले. ते मध्यंतरी त्यांच्या धाकट्या मुलीकडे अडचण असल्यामुळे राहण्यास गेले आणि परिणाम म्हणून त्यांचे लेखन-वाचन पुरते थांबलेच.

त्यांना जे मिळाले ते त्यांच्या लेखनाच्या तुलनेत पुरेसे न्याय देणारे नाही, त्यांना ‘विदर्भ साहित्य संमेलना’च्या अध्यक्षपदापासून कितीतरी वर्षें दूर ठेवले गेले होते. त्यांच्या पिढीचे भट, शेळके, केचे, द.भि. कुलकर्णी, गंगाधर पानतावणे, भाऊ मांडवकर ही मंडळी त्यांच्या वयाच्या पन्नास-पंचावन्नच्या दरम्यानच त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले होते. मी 1995 साली आंभोरा येथे होणाऱ्या सत्तेचाळीसाव्या ‘विदर्भ साहित्य संमेलना’च्या अध्यक्षपदाचा मान त्यांना मिळावा म्हणून प्रयत्न केले. त्यांना यशही आले, पण उद्घाटन सत्र संपले आणि ऐन संमेलनात वैऱ्यासारखा पाऊस कोसळू लागला. जानेवारी महिन्यात तसा पाऊस अनपेक्षित होता; संमेलन पावसाने धुऊन नेले. संमेलन दुसऱ्या दिवशी गुंडाळावे लागले. त्यांना संमेलनाध्यक्ष म्हणून संमेलनात पुरेसे वावरता आले नाही ही दुखरी बोच त्यांना होती. तीच गोष्ट त्यांच्या ‘माणूस’ या कादंबरीवरील चित्रपटाच्या संदर्भातही घडली. कादंबरीवर चित्रपट निघावा असे निळू फुले यांच्यापासून अनेकांना वाटत होते. स्मिता तळवलकर आणि संजय सूरकर यांनी नाना पाटेकर यांना घेऊन त्यावर मराठी चित्रपट काढण्याचा प्रयत्न सुरू केला; पण अनेक चित्रपटांच्या जन्मकाळी जी विघ्ने येतात तशीच विघ्ने त्याही वेळी आली. शेवटी, त्यातील सायकल रिक्षा हा प्रकार कालबाह्य झाला, त्या सबबीवर तो चित्रपट थांबला! झी सिनेमाच्या ‘पिंपळपान’ या मालिकेत मात्र त्यावर चंद्रकांत कुलकर्णी यांनी चोवीस भागांत मालिका तयार केली होती.

त्यांची लेखक म्हणून कारकीर्द संपण्यास आली तेव्हा मी नावारूपाला येत होतो. त्या दिवसांमध्ये आमच्या जवळजवळ दररोज भेटीगाठी होत. ते माझ्या बहुतेक लेखनाचे प्रकाशनपूर्व वाचक राहिलेले आहेत. मला स्वतःला घडवताना त्यांच्या सूचनांचा खूप उपयोग झाला, हे मला कबूल करायला नेहमीच आनंद वाटतो. ते माझे ज्येष्ठ मित्र म्हणून जसे माझ्यासोबत होते तसेच त्यांच्यातील पितृभावही मला कळत-नकळत जाणवत असे. त्या पितृभावात मोकळेपणा होता. आपल्या प्रमाथी कृतींचेही विश्लेषण करण्याइतपत मोकळेपणा त्या मैत्रीत होता. एक प्रसंग आठवतो –

माझी ‘कोंडी’ ही कादंबरी ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ने प्रकाशनार्थ स्वीकारली. त्याबद्दल चर्चा करण्यास अनिल मेहता यांनी मला कोल्हापूरला बोलावले. त्यांच्या संपादक चारुलता पाटील यांच्याशी चर्चा करून कादंबरीचे पुनर्लेखन करावे असे ठरत होते. तल्हारही माझ्यासोबत कोल्हापूरला आले होते. आम्ही मुक्कामाला कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनच्या मागे एका हॉटेलात होतो. सकाळी मी झोपलो असताना माझ्या कपाळावरून कोणीतरी मायेने हात फिरवत आहे असा भास मला झाला. मी झोपेतून जागा होत डोळे उघडून पाहू लागलो तर तल्हार माझ्या कपाळावरून मायेने हात फिरवत होते. त्यांचा तो मायेचा प्रेमाने ओथंबलेला स्पर्श मला त्यांच्या मनातील माझ्या विषयीच्या भावनांविषयी खूप काही सांगून गेला! त्यांच्या -माझ्या मैत्रीतील भावनेचा ओलावा सदैव कायम राहिला आहे.

त्यांच्या स्वभाववैशिष्ट्यांपैकी एक पैलू सांगायचा झाला तर त्यांचा स्वभाव अतिशय भावूक हळवा होता. ते फटकळ आणि स्पष्टवक्ता असे वाटते. कोणी त्यांच्याशी अहंकाराने किंवा हेकटपणाने वागला तर ते त्याला त्याची जागा ताबडतोब दाखवून देत. ते स्वतःकरता काही मागण्यास कधी कोणाच्या दारावर गेले नाहीत. म्हणून ते अनेक व्यावहारिक लाभांपासून वंचित राहिले. त्याची त्यांना कधी खंतही वाचली नाही. त्यांचे सूर ज्यांच्याशी जुळले, त्यांच्यावर त्यांनी मनापासून माया केली. त्यांच्या घरातीलच एक माणूस म्हणून मधुकर तायडे हे एक होते. तायडे दलित आणि तल्हार शिंपी; पण तो जातीय भेद त्यांच्या साध्याभोळ्या घरात त्या काळीही कधी कोणी मानला नाही. उलट रक्ताच्या नात्यापेक्षाही गाढ, अतूट असा मैत्रभाव त्यांच्यात होता. त्या शिवाय त्यांचे जिव्हाळ्याचे मित्र म्हणून जगन वंजारी, प्रभाकर सिरास, उ.रा. गिरी, ज.गो. चव्हाण, मनोहर आपोनारायण, वसंत पेंढारकर, माधव नसकुलावार ही मंडळी होती. त्यांच्याशी मल्हार यांचे मैत्रीचे, जिव्हाळ्याचे संबंध कायम होते. तल्हार त्यांच्या मैत्रभावाविषयी अधिक भावूक होत, त्याचा प्रत्यय उ.रा. गिरी यांचे निधन झाले तेव्हा आला. तल्हार त्यांचा तो मित्र त्यांना असा सोडून गेला या दुःखाने कमालीचे व्याकूळ झाले होते, गदगदून रडत होते. त्यांच्या मित्रपरिवारातील अनेक मित्र आज काळाच्या पडद्याआड गेले. तेव्हा बहुतेक मित्रांच्या जाण्याने ते आतून हलले. व्याकूळ झाले, गदगदून रडले.

चेकॉव्ह, गाय दि मोपासाँ, ओ हेन्री हे त्यांचे आवडते कथाकार. ओ हेन्री या कथाकाराच्या कथांचा शेवट धक्कातंत्राचा वापर करून केलेला असतो. धक्कातंत्राचा प्रभाव तल्हार यांच्या लेखनावर, विशेषतः कथालेखनावर झालेला स्पष्टपणे जाणवतो. तेही तो मान्य करत. त्यांच्या ‘उंबाऱ्या’सारखी कथेत त्यांनी ते धक्कातंत्र किती सहजपणे आणि यशस्वीपणे आत्मसात केले आहे ते जाणवते. त्यांनी त्या प्रयोगाचा अवलंब ‘अफलातून’ या कादंबरीतही केला आहे. वाचक त्यांचे ते लेखन वाचताना आधी सहजपणे पुढे पुढे जातो आणि शेवटाला आला की एकदम सुन्न होतो. तो शेवट जणू त्याच्या अंगावर येतो; पण तो शेवट केवळ वाचकांना धक्का द्यायचा म्हणून अचानक, अतार्किक असा झालेला नसतो, तर तो त्या कथासूत्रातून उत्क्रांत झालेला असतो. कथासूत्रातील काही दुवे वाचकाला मगदुराप्रमाणे तर्कानुसार जुळवून घ्यायचे असतात आणि वाचकांच्या वाट्याला आलेले ते काम तोही सर्जनप्रक्रियेचा एक घटक म्हणून अतिशय आनंदाने पार पाडत असतो. तल्हार यांना भुरळ घालणारे आणखी एक व्यक्तिमत्त्व म्हणजे चार्ली चॅप्लिन. त्यांची जगण्याकडे, जीवनाकडे तिरकसपणे, विडंबनात्मक अंगाने पाहण्याची शैलीही तल्हार यांनी लेखनातून सतत वाहती ठेवली. तल्हार यांचे लेखन वाचताना त्यातून विनोदाचा, तिरकसपणाचा, विडंबनाचा, नर्मविनोदाचा स्तर सतत जाणवत राहतो. कधीकधी, तर संपूर्ण कथा विनोदी अंगाने गेल्यासारखी वाटते आणि शेवटी, अचानक अस्वस्थ करणारा धक्कादायक शेवट पुढ्यात उभा राहतो; वाचक अंतर्मुख होतो. तल्हार यांना तथाकथित विनोदी कथा लिहायची नसतेच. त्यांच्या कथांची जात ‘सटायर’ किंवा ‘ब्लॅक कॉमेडी’च्या जातीची आहे. मध्यंतरी, त्यांनी त्या प्रकृतीच्या काही कथा ‘लोकमत’च्या रविवार पुरवणीत आणि इतरत्र लिहिल्या. त्यांपैकी ‘शिकारी’, ‘गॉडफादर’, ‘विदूषक’, ‘गजर’, ‘मिठ्ठू’ या कथांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल.

तल्हार गद्यलेखनासोबत मधून मधून कविताही लिहीत. साधारणतः कोठलाही लेखक बऱ्याचदा लेखनाची सुरुवात त्याच्या कवितेपासून करतो. पुढे त्याला जाणवते तो व्यक्त होण्याचा खरंच मार्ग आहे का? आणि त्याला कवितेतून पुरेसे व्यक्त होता येत नसेल तर तो मग इतर माध्यमे जवळ करतो. तल्हार त्यांच्या उमेदीच्या काळात त्यांच्या काही मित्रांच्या सहकार्याने केवळ कवितेसाठी असलेले ‘रंग’ नावाचे नियतकालिक प्रसिद्ध करत असत. ‘रंग’मधून प्रभा गणोरकर, सुलभा हेर्लेकर, प्रभाकर सिरास इत्यादी कवींनी कवितालेखन केलेले आहे. तल्हार यांचाही कवी असण्याचा तो काळ होता. ते गद्यलेखनाकडे वळल्यानंतरही त्यांची कविता तिच्या गतीने व्यक्त होत होती. त्यांनी तो कथासंग्रहही प्रकाशित केला. अरुणा ढेरे यांचा ब्लर्ब हे त्या संग्रहाचे वैशिष्ट्य.

या सर्व साधारणतः 2000 च्या आधीच्या गोष्टी. त्या दरम्यान त्यांना ‘दुजा शोक वाहे’ या कथासंग्रहासाठी महाराष्ट्र शासनाचा वाङ्मय पुरस्कार मिळाला. नंतर मात्र ते साहित्यापासून आणि साहित्यव्यवहारापासून हळुहळू दूर जाऊ लागले. त्यांच्या दूर जाण्यामागे जशी त्यांची कौटुंबिक कारणे होती; तशीच, साहित्यव्यवहारातील माणसाला मुळातून उखडून फेकणारे त्या गावाचे राजकारणही कारणीभूत होते. तशा वातावरणात तल्हार रमणे दूरच, पण टिकणेही अशक्य ठरले. त्यांनी स्वतःला त्यांच्या घरात बंदिस्त करून घेतले. त्यांच्या प्रकृतीच्या कुरबुरीही वाढल्या. त्यांना गुडघ्याचा त्रास होऊ लागला; त्यामुळे ते फक्त आणि फक्त घरी बसून राहू लागले. माझेही त्यांच्याकडे जाणे अनियमित झाले. सहज कोणाकडे जाण्याइतका वेळही कोणाच्या हाताशी आता नसतोच, त्यामुळे त्यांच्याकडे जावे तर ते कोठल्यातरी निमित्ताने किंवा दसऱ्याला, दिवाळीला आणि गेल्यावर फार फार तर पंधरा-वीस मिनिटे बोलणे झाले, की बोलण्याचे विषय संपून जात. माझे त्यांच्याकडे जाणे अनियमित झाले ते माझे मला खटकत असे; कधी कधी, अपराधीही वाटत असे. तशा वेळी मधूनच एखादी चक्कर टाकायचोही. ते आणि काकू मागील एका खोलीत बसलेले असत. झोपून झोपणार किती आणि बसून बसणार तरी किती? दोघे येणारा दिवस फक्त पाठीमागे ढकलत राहत.

नागपूरच्या एका वर्तमानपत्राच्या प्रतिनिधीने ‘विदर्भ साहित्य संमेलना’चे निमित्त पुढे करून त्यांची मुलाखत घेतली आणि साहित्य संस्थेने उपेक्षा कशी केली हे त्यांच्या तोंडून वदवून घेतले. पण त्याची दखल मनोहर म्हैसाळकर यांनी घेतली. त्यावर्षी ‘अ.भा. साहित्य संमेलना’चे अध्यक्ष उत्तम कांबळे होते. त्यांना त्यांच्या संमेलनाध्यक्षांच्या निधीतून दहा हजार रुपये अनुदान म्हणून एका वृद्ध साहित्यिकाला द्यायचे होते. त्यांनी त्यासाठी तल्हार यांचे नाव सुचवून त्यांना ते अनुदान मिळवून दिले.

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले नागपूरला आले होते. ते तल्हार यांचे चाहते आणि मित्र. मी त्यांना तल्हार यांच्याकडे घेऊन गेलो. त्यावेळी तल्हार कोत्तापल्ले यांच्या गळ्यात पडून अक्षरशः ढसाढसा रडले. त्यांचे रडणे फार बोलके होते. तल्हार मनाने थकले; तसेच, शरीरानेही थकले होते. मध्येच, त्यांना काही आठवेनासे होई. तशातच, त्यांच्या पत्नी थोड्या दिवसांच्या आजारपणाने गेल्या. तल्हारकाकू साधे फ्रॅक्चरचे निमित्त होऊन दवाखान्यात भरती झाल्या आणि त्यांनी दोन दिवसांत या जगाचा निरोप घेतला. त्यांचेही वय ऐंशीच्या घरात असावे. तल्हार पत्नी गेल्यामुळे अधिकच एकाकी झाले. ते त्यांच्या खोलीत एकटे बसून असायचे किंवा पडून असायचे. त्यांना कोण आले कोण गेले हे फारसे कळत नव्हते. त्यांना भेटण्यास गेलो की जाणवे, मरण येत नाही म्हणून जगणे ओढत दिवस काढण्याचा हा प्रकार आहे. पण मृत्यू तरी कोणाच्या हातात असतो?

तल्हार गेल्याची वार्ता 15 फेब्रुवारी रोजी सकाळी अकराच्या दरम्यान आली. ते या अपेक्षित मृत्यूने सुटले की त्यांनी इतरांची सुटका केली? या जगात तल्हार नाहीत या जाणिवेने काही क्षण अस्वस्थ होतो. त्यांची ‘माणूस’ आणि त्यासोबतची चार-सहा पुस्तके आठवत राहतात. हे जग सोडून गेलेल्या माणसाला त्यापलीकडे आणखी काय हवे असते?

– रवींद्र शोभणे
shobhaner@gmail.com

(ललित, 14 मार्च 2018वरून उद्धृत)

About Post Author

2 COMMENTS

  1. खूप छान लेख .
    वाचणं सुरु…

    खूप छान लेख .

    वाचणं सुरु केलं आणि शेवटपर्यंत वाचत गेलो .तल्हार सराच माणूसपण लिहलं..अप्रतिम.उगाच एखाद्याला हिरो करणं सोडून… जे आहे ते..

  2. खरंच एक संवेदनशील मनाच्या…
    खरंच एक संवेदनशील मनाच्या लेखाबद्दल आणि एकूण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वास्तव दर्शन घडवून आणले.

Comments are closed.