मनोरंजनाच्या’ हव्यासापायी माणसांची अपमानजनक थट्टा

0
17

सोनी वाहिनीवर ‘एण्टरटेनमेण्ट के लिए कुछ भी करेगा’ नावाचा रिअॅलिटी (?) शो प्रसारित केला जातो. या कार्यक्रमात वेगवेगळ्या व्‍यक्‍ती आपापली कला सादर करतात. एके दिवशी एक व्‍यक्‍ती सुपरहिरोच्‍या वेशात रंगमंचावर आली. चेहरा गरीब आणि संवेदनाहीन असल्‍यासारखा. (त्‍याला पाहून मला ‘पिपली लाईव्‍ह ’ चित्रपटातील ‘नत्‍था’ ही व्‍यक्तिरेखा आठवली) त्‍या व्‍यक्‍तीने स्‍वतःचे नाव गोनिमॅन असल्‍याचे सांगितले. (खरे नाव सीताराम). काही वेळात सीताराम कर्तब करण्‍यास सज्‍ज झाला. कर्तब कसले; तर काही फूट उंचीवरून तो कार्डबोर्ड पेपरवर उडी घेऊन ते तोडू लागला. मग त्‍याने ‘आपण चमच्‍याने चहा पिण्‍याचा विक्रम करू’ असे सांगत चमच्‍याने चहा पिण्‍यास सुरूवात केली. हे सारेच प्रकार बाळबोध असल्‍याने उपस्थित प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होत होते. अपेक्षेनुसार, तो बाद झाला. त्‍यानंतर अँकरसह परीक्षकांनीही सीतारामची यथेच्‍छ टर उडवली. मग तिथे असलेल्‍या एका अवाढव्‍य व्‍यक्‍तीने त्‍याला उचलून बाहेर काढले. (हाकलले?) 

त्‍या व्‍यक्‍तीकडे भले कोणतीही कला नसेल, पण म्‍हणून त्‍याची अशा प्रकारे अपमानजनक थट्टा उडवणे ही गोष्‍ट असंवेदनशील वाटली. हे सर्व कार्यक्रम चित्रित होण्‍यापूर्वी त्यामध्‍ये सहभागी होऊ इच्छिणार्‍या व्‍यक्‍तींचे ऑडिशन घेतले जाते. याचा अर्थ, आपल्‍या कार्यक्रमात कोणत्‍या व्‍यक्‍तींनी सहभागी व्‍हावे याची कल्‍पना त्‍या वाहिनीला असते. अनेकांना टीव्‍हीवर झळकण्‍याची इच्‍छा असल्‍याने ते अगदी विचित्र अथवा बाळबोध प्रकार सादर करतात. अशा व्‍यक्‍तींसाठी ऑडिशन ही गाळणी असते. तरीही अशा व्‍यक्‍तींना वाहिनीकडून जाणुनबुजून कार्यक्रमात निमंत्रित केले जाते. जर त्‍या व्‍यक्‍तीकडे सादर करण्‍यास कला नाही, तर तो वाहिनीच्या नियम आणि अटींमध्‍ये बसतच नाही, मग त्‍याला कार्यक्रमात बोलावण्‍याचे कारण काय? यामागचा उद्देश स्‍पष्‍ट आहे. त्‍याच्‍या या प्रकारांनी कार्यक्रमात ‘कॉमेडी’ व्‍हावी. हा प्रकार जवळपास प्रत्‍येक ‘रिअॅलिटी शो’मध्‍ये होत असतो. जर वाहिनीला ठाऊक आहे, की अचूक व्‍यक्‍ती सादरीकरण करू शकत नाही, तर तिला वगळण्‍याऐवजी तिची या प्रकारे सगळ्यांसमोर थट्टा करणे माणुसकीच्‍या कोणत्‍या साच्‍यात बसते?

 

मनोरंजनाच्‍या नावाखाली या वाहिन्‍यांनी चालवलेली थेरं पाहताना वीट येतो. मात्र मनोरंजनाचा (न जाणे कोणता) स्‍तर आणि टिआरपी वाढवण्‍यासाठी या वाहिन्‍या कोणत्‍या थराला जाऊन पोचतात याचे हे बोलके उदाहरण आहे. कार्यक्रमात रंगत वाढवायची असेल तर बुद्धी चालवा असे या वाहिन्यांना सांगायला हवे. या प्रकारे इतर व्‍यक्‍तींच्‍या इच्‍छांचा गैरफायदा घेऊन त्‍यांना अपमानित करण्‍याचा वाहिन्यांना कोणताच अधिकार नाही. हे म्‍हणजे आपल्‍या स्‍वार्थासाठी इतरांचा वापर करून घेण्‍यासारखेच आहे. या प्रकाराचा मी निषेध करतो.

 

संपर्क – हेमंत किणी, ज्‍वेलरी डिझायनर, भ्रमणध्वनी – 9819509005,  hemantkini@rediffmail.com 

About Post Author