मनश्री सोमण – अंधारवाटेवरील दीपस्तंभ

3
63
carasole

जन्मत: अंध असलेल्या मनश्री सोमणची बोटे हार्मोनियम-सिंथेसायझरवर सराईतासारखी चालतात! ती त्या जोडीला गाऊ लागली, की ऐकणारा मनुष्य मंत्रमुग्ध होऊन जातो. गाणे हा मनश्रीचा श्वास आहे. ती कला हे तिचे वैशिष्ट्य तर आहेच, मात्र ती आत्मसात करताना मनश्रीने स्वतःच्या अंपगत्वावर केलेली मात आदर्शवत आहे. तिचा दुर्दम्य आत्मविश्वास तिला वयाच्‍या चोवीसाव्‍या वर्षातच मोठेपण प्राप्त करून देणारा ठरला आहे.

मनश्री इतरही काही शारीरिक व्यंगे घेऊन जन्माला आली. मात्र तिच्या ठायी असलेल्या तल्लख बुद्धिमत्ता, हुशारी व नवीन शिकण्याची आवड अशा गुणांनी त्या उणिवा भरून काढल्या आहेत. तिने सातव्या इयत्तेत असतानाच ‘बालश्री’ पुरस्कारापर्यंत गरुडझेप घेतली!

मनश्रीचा जन्म झाला तेव्हा तिच्या डोळ्यांची व मेंदूची वाढ नीट झालेली नव्हती. तिचा ओठ फाटलेला होता. तिच्या पाठीचे मणके व्यवस्थित सांधले गेलेले नव्हते. मनश्रीला त्या परिस्थितीतही चांगले घडवावे म्हणून तिच्या आई अनिता सोमण यांनी कंबर कसली. मनश्री अंध असल्यामुळे ती न रांगता सरळ बसू लागली. अनिता यांनी तिला वेगवेगळ्या प्रयत्नांनी चालण्यास शिकवले. त्यांनी मनश्रीला नर्सरीमध्ये घालून शाळेतील प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या अभ्यासाची तयारी करून घेतली. त्यांना सर्वसामान्य मुलांच्या शाळेत दिव्यांग मुलांना प्रवेश मिळतो ते माहीत नव्हते. त्यामुळे त्या मनश्रीला सायनमधील दृष्टिहीनांच्या शाळेत घेऊन गेल्या; पण तेथील अव्यवस्था, त्वचाविकार झालेली छोटी-छोटी मुले पाहून त्या गहिवरल्या. त्यांचे मन मनश्रीला त्या शाळेत घालण्यास धजेना.

मनश्री जिज्ञासू व चुणचुणीत होती. तिला एका शाळेत नेण्यायआधी तेथे तिचा इंटरव्ह्यु होणार असल्याचे सांगितले गेले. तिचे आईवडील शाळेच्या मुख्याध्यापकांशी बोलत होते. तेव्हा मनश्रीने विचारले, ”इंटरव्ह्यु माझा आहे. मात्र मला तर कोणीच काही विचारत नाहीये!” मुख्याध्यापकांनी मनश्री बुद्धिमान असल्याचे हेरले. त्यांनी तिच्या पालकांना मनश्रीला सर्वसामान्य मुलांच्या शाळेत प्रवेश मिळू शकतो, असे सांगत दृष्टिहीनांसाठी काम करणाऱ्या ‘नॅब’ (नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड) या संस्थेची माहिती दिली.

अनिता यांची मोठी मुलगी यशश्री कॉन्व्हेंट शाळेत होती. पण त्या शाळेने ‘इतर मुलांच्या विकासावर परिणाम नको’ म्हणून मनश्रीला दाखल करून घेण्यास नकार दिला. अनिता सोमण यांनी बोरिवलीतील ‘सुविद्यालय’ या मराठी माध्यमाच्या सर्वसामान्य मुलांच्या शाळेत मनश्रीला प्रवेश मिळवून दिला. त्या शाळेचाही मनश्रीसारख्या विद्यार्थिनीला प्रवेश देण्याचा पहिलाच अनुभव होता. त्यांनी मनश्रीची शिशुवर्गातील आणि बालवर्गातील प्रगती आणि ती इतर सर्वसामान्य मुलांसोबत कसे शिकते त्याचे निरीक्षण करण्याचे ठरवले. त्यानंतर तिला तिच्या प्रगतीप्रमाणे एकेक इयत्ता प्रवेश देण्यात येईल असा निर्णय घेतला. मात्र मनश्रीला तशी अडचण आलीच नाही. तिने पहिल्याच वर्षी संस्कृत पठण, श्लोक पठण, बालगीते यांसारख्या तोंडी स्पर्धांमध्ये शाळेला बक्षिसे मिळवून दिली. त्यामुळे मनश्रीबरोबर तिच्या शिक्षकांना व अनिता सोमण यांना आत्मविश्वास लाभला. ती पाचवीपर्यंत शिकत असताना तिच्या परीक्षांना लेखनिक म्हणून शाळेच्या शिपाई जायच्या. मनश्रीला ‘सुविद्यालय’ शाळेतील शिक्षक-विद्यार्थ्यांकडून भरभरून प्रेम मिळाले. तिने तिचे दहावीपर्यंतचे शिक्षण ‘सुविद्यालय’मध्ये पूर्ण केले.

मनश्रीच्या जडणघडणीत ‘नॅब’ या संस्थेची मदत झाली असल्याचे अनिता सोमण सांगतात. अनिता यांनी मनश्री सर्वसामान्य मुलांसारखी शिकू शकते, वावरू शकते हे पाहून अंध मुलांसाठी ‘नॅब’मध्ये असलेला दीड महिन्याचा पॅरा प्रोफेशनल कोर्स केला. त्या कोर्सचा मनश्रीला घडवण्यात मोठा हातभार लागला. मनश्री पहिली-दुसरीला असताना ‘नॅब’ची शिक्षिका मनश्रीला शिकवण्यासाठी येत असे. ती मनश्रीकडून श्लोक पठण करून घेत असे. मनश्रीला काडेपेटीच्या काड्या, आईस्क्रीमच्या काड्या, मण्यांची पाटी यांच्या साह्याने गणित शिकवले जाई. तिचे पाठांतर चांगले होते. पाढे तोंडपाठ होते. तिला एकदा शिकवलेले चटकन ध्यानात येई.

मनश्री ‘नॅब’च्या कॅम्पमध्ये मल्लखांब शिकली. ती ‘नॅब’कडून चर्नी रोड येथील बालभवनात आयोजित केल्या जाणाऱ्या सुटीतील कॅम्पमध्ये भाग घेई. ती ‘बालभवन’च्या स्टेज शोमध्ये नाटक, नृत्य, गाणे अशा कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे सभाधीट बनली. तिला संस्थेतर्फे ट्रेकिंगला गेल्यामुळे त्याचीही आवड निर्माण झाली.

मनश्री बिनधास्त वॉटर स्कीट करते. उत्कृष्ट कॅरम खेळते. ती औरंगाबादमधील ‘हेडगेवार हॉस्पिटल’मधील पेशंटसाठी मॅरेथॉनमध्ये धावते. मनश्रीचा ‘मुंबई महानगरपालिके’कडून निवडल्या गेलेल्या नऊ दुर्गांमध्ये समावेश करण्यात आला होता. तिचा ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदे’कडून सत्कार करण्यात आला आहे. तिने ‘बोर्नव्हिटा कॉन्फिडन्स चॅम्पियन’मध्ये भाग घेतला होता. स्वकर्तृत्वाने माणसे जोडून दुसऱ्याला आनंद वाटणारी मनश्री सध्या जर्मन भाषा शिकत आहे. कम्प्युटर आणि जर्मन शिकण्यात तिची मैत्रीण पूर्वी जंगम ही तिची प्रेरणा असल्याचे ती सांगते. मनश्री मोबाईल, कम्प्यूटर, लॅपटॉप चांगल्या रीतीने हाताळते. तिला पेंटिंगचीही आवड आहे. तिने लोकरीपासून गणपती बनवला आहे. मनश्रीने गणेशोत्सवानिमित्त सुमित पाटीलने दुर्लक्षित घटकांना एकत्र करून २०१६ साली राबवलेल्या उपक्रमात घरातील भांड्यांपासून गणपती साकारला होता.

मनश्रीला नेहमी नव्या गोष्‍टी शिकाव्या असे वाटत असते. त्‍याचे उदाहरण नमूद करावेसे वाटते. मनश्रीच्या शाळेत पर्यावरणावर आधारित पिकनिक जाणार होती. मनश्रीने पिकनिकला जाण्याची इच्छा व्यक्त केली. शिक्षक म्हणाले, “आम्ही तर तेथे पाहणार आहोत, तू पाहू शकणार नाहीस.” मनश्री उत्तरली, “मी पाहू शकले नाही तरी तेथे दिली जाणारी माहिती ऐकून स्पर्शज्ञानाने मी जाणू शकते,” शिक्षक निरुत्तर झाले. माणसाला मुळातच शिकण्याची आवड असली, की तो सगळ्यावर मात करून यश मिळवतोच, याचे उदाहरण म्हणजे मनश्री होय.

मनश्रीने शिक्षणाव्यतिरिक्त स्वत:च्या आनंदासाठी काहीतरी करावे म्हणून अनिता यांनी तिला अस्मिता कुलकर्णी यांच्याकडे सिंथेसायझर हे वाद्य शिकण्यास पाठवले. मनश्री सिंथेसायझर शिकताना इतर मुलांबरोबर गाणे गुणगुणायची. त्यामुळे अस्मिता कुलकर्णी यांनी तिला गाणे शिकण्याचा सल्ला दिला. तोपर्यंत मनश्रीच्या फाटलेल्या ओठाचे ऑपरेशन झाले होते. मनश्री तिसऱ्या इयत्तेत असल्यापासून गाणे शिकत आहे. तिने चौथीत असताना सलील कुलकर्णी यांच्या ‘नक्षत्रांचे देणे’ या कार्यक्रमात सहभाग घेतला. ती मानसी देसाई यांच्याकडे शास्त्रीय संगीत, तर सुचित्रा भागवत व माधव भागवत यांच्याकडून २०१५ पासून ग़ज़ल गायनाचे धडे घेत आहे.

मनश्रीने जिद्दीने आणि कणखर स्वभावाने यशाची नवनवीन क्षितिजे ओलांडत अनेक पुरस्कार मिळवले. ती सातवीला असताना राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्याकडून मिळालेला ‘बालश्री’ हा त्यातील एक मानाचा पुरस्कार. मनश्रीने बालश्रीच्या वेळी राष्ट्रपती अब्दुल कलामांसमोर राग ‘दुर्गा’ सादर केला. तेव्हा त्यांनी कार्यक्रम संपल्‍यानंतर तिला शाबासकी देत, ‘फिर कब आओगी दिल्ली’ असा सहजच प्रश्न केला. त्यावर, मनश्रीने “आऊंगी ‘पद्मश्री’ लेने,” असे हजरजबाबी उत्तर दिले. तिची ती प्रतिक्रिया तिच्या आशावादी दृष्टिकोनाची साक्ष आहे.

मनश्रीची स्फूर्तिदायी कहाणी सुमेध वडावाला यांनी ‘मनश्री’ या कादंबरीतून जगासमोर मांडली आहे. मनश्रीने ती कादंबरी तिच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेल्या ‘सुविद्यालय’ शाळेला अर्पण केली आहे.

मनश्री मुंबईत बोरिवली येथे राहते. तिच्या मुलाखतीचे व गाण्यांचे कार्यक्रम अनेक ठिकाणी होत असतात. मनश्रीने ‘सेंट झेवियर्स कॉलेज’मधून ‘एशियन इंडियन कल्चर’ या विषयातून पदवी मिळवली आहे. ती एलआयसी एजंट म्हणून सध्या काम करते.

मनश्री सोमण – 022 28938313, 022 28943948

– वृंदा राकेश परब

About Post Author

Previous articleतेलवण विधी
Next articleशुल्बसूत्रे
वृंदा राणे-परब मुंबईत गोरेगाव येथे राहतात. या दहा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. त्‍यांनी मराठी विषयातून एम ए पदवी मिळवली आहे. त्‍यांनी ‘दै. वृत्तमानस’, 'पुढारी', 'मुंबई तरुण भारत', 'मी मराठी' या वर्तमानपत्रात मुद्रितशोधक पदावर काम केले. त्यांनी 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम'मध्‍ये काही काळ उपसंपादक पदावर काम केले. सध्या त्या 'थिंक महाराष्ट्र'सोबत मुक्त पत्रकार म्हणून जोडलेल्या आहेत. 7506995754

3 COMMENTS

  1. काय लिहू, लिहायला शब्दच नाहीत
    काय लिहू, लिहायला शब्दच नाहीत. मनस्वीला पुढील कार्यासाठी उत्तमोत्तम शुभेच्छ

  2. मनश्री,सर्व वाचुन खरच मन…
    मनश्री,सर्व वाचुन खरच मन भरून आलं,खुप
    कौतुक वाटलं.तुझ्या पालकांचंही श्रेय खुप आहे,तुला
    घङवण्यात.शुभेच्छा

Comments are closed.