मधु मंगेश कर्णिक : रिता न होणारा मधुघट

carasole

कोकणातील ‘करुळ’ या खेड्यात जन्मलेल्या आणि आपल्या कार्यकर्तृत्वाचा झेंडा अवघ्या महाराष्ट्रात नव्हे तर थेट दिल्लीपर्यंत फडकावणा-या मधु मंगेश यांची जीवनकहाणी रोचक, रंजक आणि स्नेहाची आहे. ‘ममक’, ‘मधुभाई’ ही कोकणवासियांनी ठेवलेली त्यांची लाडकी नावे. मधुभाईदेखील ते लाडलेपण आवडीने जपतात व अंगावर शाल पांघरून सर्वत्र आपुलकीने वावरतात. मधु मंगेश यांचा जन्म 28 एप्रिल 1931 चा. ते 80 वर्षांचे होऊन गेले, त्यानंतर त्यांनी काही सार्वजनिक जबाबदा-या सोडल्या, पण त्यांचा कार्योत्साह अदम्य आहे.

मधु मंगेश यांनी शिक्षण आणि नोकरी यांच्या निमित्ताने गाव सोडले, पण गावाशी संबंध मात्र कायम ठेवला. त्यांच्या नोकरीचा प्रवास 1952 साली एस्.टी.तून सुरू झाला. तेथपासून ते गोवा शासनाचे प्रकाशन अधिकारी, महाराष्ट्राचे साहाय्यक प्रसिद्धी संचालक, मुख्यमंत्र्यांचे प्रसिद्धी अधिकारी, महाराष्ट्र लघुउद्योग विकास मंडळाचे महाव्यवस्थापक अशी विविध पदे भूषवून त्यांनी वयाच्या पन्नाशीत, 1983 साली नोकरीला रामराम ठोकला आणि लेखन व साहित्यिक कार्य यासाठी स्वतःला समर्पित केले.

त्यांनी ‘माहीमची खाडी’, ‘भाकरी आणि फूल’, ‘जुईली’, ‘सनद’, ‘कातळ’, ‘वारुळ’,’ देवकी’, ‘सूर्यफूल’, ‘संधिकाल’, ‘निरभ्र’ अशा दहा कादंब-या लिहिल्या. ‘माहीमच्या खाडी’ने मधु मंगेशांचे नाव मराठी साहित्यात ठळक केले. ‘कोकणी गं वस्ती’, ‘पारधी’, ‘तोरण’, ‘भुईचाफा’, ‘कमळण’, ‘कॅलिफोर्नियात कोकण’, ‘गावाकडच्या गजाली’, ‘झुंबर’, ‘केवडा’, ‘मनस्विनी’, ‘काळवीट’, ‘दरवळ’ इत्यादी चाळीस कथासंग्रह; ‘गावठाण’, ‘मुलुख’, ‘जिवाभावाचा गोवा’, ‘सोबत’, ‘नैॠत्येकडील वारा’ हे ललित लेखसंग्रह; ‘लागेबांधे’, ‘अबीर गुलाल’ ही व्यक्तिचित्रे; ‘देवकी’, ‘केला तुका झाला माका’ ही नाटके; ‘दूत पर्जन्याचा’ हे चरित्र; ‘शाळेबाहेरील सवंगडी’, ‘जगन्नाथ’ आणि ‘कंपनी’ हे बालकथासंग्रह आणि अलिकडेच प्रसिध्द झालेले ‘स्मृती जागर’, ‘मातीचा वास’, ‘हृदयंगम’ हे वेचक लेखन अशी त्यांची प्रचंड आणि समृध्द ग्रंथसंपदा आहे. या बहुप्रसव लेखकाने ‘पतितपावन’ व ‘निर्माल्य’ या चित्रपटांसाठी संवाद व गीते लिहिली; तर ‘भाकरी आणि फूल’, ‘जुईली’, ‘रानमाणूस’, ‘सांगाती’ या दूरदर्शन मालिका लिहिल्या. आकाशवाणीसाठी अनेक नभोनाट्ये व श्रुतिका लिहिल्या. ‘गोमंतक’, ‘पुढारी’, ‘साधना’, ‘तरुण-भारत (सांज)’, ‘मनोहर’ या नियतकालिकांतून स्तंभलेखनही केले.

त्यांची हजेरी निवडक दिवाळी अंकांत असतेच असते; त्याहीपेक्षा त्यांची सदैव हजेरी असते ती ‘कोकण मराठी साहित्य परिषद’ या त्यांनी स्थापन केलेल्या साहित्य चळवळीमार्फत सातत्याने होणा-या अनेक कार्यक्रमांना व सभा-संमेलनांना. तेथे हा माणूस राजकीय पुढा-यासारखा जनसंपर्क जपत चौफेर वावरत असतो, पण त्यांचे वैशिष्ट्य असे की त्यांचे वागणे-बोलणे पारदर्शी असते व त्यातून निव्वळ स्नेह पाझरतो. त्यामध्ये राजनीतीचे व्यवहारचातुर्य नसते. ते म्हणतात, की ‘मला वाईट माणसे भेटलीच नाहीत.’ स्वाभाविकच आहे, कारण चांगुलपणास तोच गुण येऊन भिडणार. त्यांना ‘कोमसाप’चे व्रत मिळाले आणि त्यांचे जीवनच भरून गेले!

मधु मंगेशांना 1990 साली रत्नागिरी येथे झालेल्या चौसष्टाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला आणि नियोजनबध्द कामाचा भरपूर अनुभव पाठीशी असलेल्या मधु मंगेशांनी अवघे कोकण पिंजून काढले. साहित्याविषयीचे अनेक कार्यक्रम घेतले आणि त्याचवेळी ‘कोमसाप’ची स्थापनाही केली! महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात अशी स्वतंत्र साहित्य संस्था आहे, मग उत्तमोत्तम साहित्यिक देणा-या कोकणात ती का नको? या विचारातून एक सुंदर प्रवाही चळवळ निर्माण झाली. सध्या बावन्नाहून अधिक शाखा असलेल्या ‘कोमसाप’तर्फे जागोजागी संमेलने, कथा, काव्यवाचन, चर्चा-वादविवाद इत्यादी कार्यक्रम होत असतात. किंबहुना ती एकच साहित्य संस्था इतकी कार्यशील आहे.

‘कोमसाप’चे वार्षिक संमेलन हे मुख्य कार्यालयात म्हणजे मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकात होते. महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवीच्या स्मारकाची तुतारी फुंकली ती ‘ममक’ यांनीच! तो त्यांच्या जीवनातील मानबिंदू आहे. मालगुंड येथे केशवसुतांचे सुंदर स्मारक उभारण्यासाठी ‘ममक’ यांनी अपार कष्ट घेतले आणि स्वत:चे अवघे ‘गुडविल’ कामी लावले. महाराष्ट्रातील पंचाहत्तर नामवंत कवींची माहिती, फोटो आणि एक उत्कृष्ट कविता असे त्या स्मारकाचे कल्पक स्वरूप आहे. पंचाहत्तर लाख रुपयांचे हे देखणे संकुल आहे. महाराष्ट्रातील अवश्य भेट द्यावी अशी जी साहित्यिक-सांस्कृतिक ठिकाणे आहेत, त्यात मालगुंडचा नंबर वरचा लागेल. त्यामुळे गणपतीपुळ्याला आलेला प्रवासी तेथे हमखास येतोच.

‘कोमसाप’ची संमेलने गोवा, बेळगाव अशी महाराष्ट्राबाहेरही झाली. ‘कोमसाप’चे उत्तम नेटवर्क हे मधु मंगेशांच्या कष्टांचे फळ. त्यांचा जनसंपर्क अफाट आहे. ‘कोमसाप’ची बांधणी तशी व्यक्तिकेंद्री म्हणजे मधु मंगेश यांच्या भोवतीच गुंफली गेलेली आहे, परंतु मधु मंगेश त्यात अनेक माणसांना गुंतवून घेत असतात. त्यामध्ये भाई शेट्ये या माजी सनदी अधिका-यापासून अशोक बागवे, महेश केळुस्करांपर्यंतचे मनस्वी कवी अशा अनेकांचा समावेश होतो. कोकणातील गावोगावी तर त्यांनी हक्काचे शिलेदार निर्माण केले आहेत, ते निव्वळ प्रेमाने.

‘महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळा’चे अध्यक्षपद, ‘राज्य मराठी विकास संस्थे’चे अतिरिक्त संचालकपद ते भूषवत आहेत. त्याशिवाय ‘कोकण कला अकादमी’, ‘नाथ पै वनराई ट्रस्ट’ यांचे संस्थापक म्हणून ‘ममक’ यांचे नाव घेतले जाते. त्यांनी त्यांच्या गावाकडे करुळला ‘करुळ ज्ञानप्रबोधिनी हायस्कूल’ सुरू केले. तेथे ते मुलांच्यात रमतात. लाभसेटवार पुरस्कार (पाच लाख), दमाणी पुरस्कार, पद्मश्री विखेपाटील पुरस्कार असे अनेक वजनदार साहित्यिक पुरस्कार मधुभाईंच्या पारड्यात केव्हाच जमा झाले आहेत! तर अनेक राज्य पुरस्कार, पाठ्यपुस्तकात लेख असेही सन्मान त्यांना लाभले आहेत.

महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्ताने 1 मे 2010 रोजी दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील नामवंतांचा सत्कार झाला. त्यात एक सत्कारमूर्ती होते मधु मंगेश कर्णिक आणि त्यांच्या सोबतची सन्मानित अन्य मंडळी होती सचिन तेंडुलकर, नाना पाटेकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, यशवंत देव वगैरे.

पत्नी शुभदा आणि एक मुलगी – एक मुलगा हा त्यांचा संसार.

मधु मंगेश आपल्याला अनेक ठिकाणी भेटतात. अगदी दिवाळी अंक, पाठ्यपुस्तकांपासून ते सभा संमेलनात. त्यांचा उत्साह अदम्य असतो. पंधरा वर्षांपूर्वी हृदय शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते अधिक कार्यक्षम बनले असे ते स्वत:च सांगतात व त्याचे श्रेय नितू मांडके या सर्जनना देतात.

तुमच्या यशाचे गमक कोणते? असा प्रश्न मी त्यांना विचारला तेव्हा त्यांनी त्यांचे हापूस आंब्याप्रमाणे असणारे हास्य केले, आम्रवृक्षाप्रमाणे अनेकांना प्रेमाची सावली देणा-या मधु मंगेशांचे बोलणे मधुर-रसाळ व निर्मळ आहे. ते म्हणाले, की ”मला जन्मत: लाभलेली सृजनात्मक ऊर्जा मी गेली साठ वर्षे साहित्यात वापरली. समाजाकडून ऊर्जा घेणे व समाजाला ती परत करणे हाच माझा प्रयत्न असतो.”

-प्रा. सुहास बारटक्के

लेखन सहाय्य :सरोज जोशी

About Post Author

3 COMMENTS

 1. THERE IS A GARDEN IN
  THERE IS A GARDEN IN AMBERNATH DIST. THANE
  “PADMASHRI MADHU MANGESH KARNIK SAHITYA UDYAN'”

  HI MAHARASHTRATIL PAHILE BAG ASEL JI EKHADYA LEKHAKHACHYA NAVAVAR AASLELI. TI SUDHHA LEKHAKH HAYAT AASATANA .AKADA ABET DYAVI ASHI HIO BAG.

 2. अंबरनाथ येथे मधु मंगेश कर्णिक
  अंबरनाथ येथे मधु मंगेश कर्णिक यांचे नावाने एक साहित्य ऊद्यान आहे।
  अप्रतिम कल्पना।।।

 3. ‘ म म क ‘ आपल्या
  ‘ म म क ‘ आपल्या साहित्यकृतीतून वाचकांना
  नितांत सुंदर कोकणाची सफर घडवून आणतात .

Comments are closed.