मदतीचा इतिहास

     'न्यू यॉर्क टाइम्स'चं सध्या सगळयांत गाजणारं बेस्ट सेलर पुस्तक आहे – कॅथरिन स्टॉकेटचं 'द हेल्प.' परवा, एका मैत्रिणीनं हे पुस्तक वाचून त्याची ओळख करून दिली आणि त्याबद्दल बोलताना कितीतरी गोष्टी मनात उलगडत गेल्या.

     कॅथरिन स्टॉकेटचं पुस्तक म्हणजे बराक ओबामाच्या कारकिर्दीचं जणू सांस्कृतिक फळ आहे. कादंबरीची सुरुवात होते १९६२ सालच्या मिसिसिपी राज्यातल्या जॅक्सन गावात गो-या लोकांच्या घरात कामं करणा-या काळया बायका – या कामवाल्या बायका म्हणजे 'हेल्प'. म्हणून पुस्तकाचं नाव 'द हेल्प'.

     भारतात ज्याप्रमाणे उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांच्यात सांस्कृतिक अंतर आहे, तशीच वेगळ्या प्रकारची सांस्कृतिक फारकत अमेरिकेत आहे. उत्तरेकडची, किना-यालगतची राज्यं अधिक लिबरल, त्यातल्या त्यात कमी वंशवादी आणि थोडी डाव्या मतांकडे झुकलेली; तर अमेरिकन साऊथ, जिथं मिसिसिपी, टेक्सस, फ्लोरिडा, व्हर्जिनिआ सारखी राज्यं आहेत, यांना त्यांच्या वंशवादी इतिहासामुळेच 'रेडनेक' स्टेट्स असं म्हणतात.

     अशा १९६२च्या मिसिसिपीत एक गोरी, ग्रॅज्युएट, नोकरीच्या शोधात घरी आलेली मुलगी आपली लिहिती नजर या घरकाम करणा-या काळ्या बायकांवर वळवते आणि त्या तीन आवाजांतून स्कीटर म्हणजे ती गोरी मुलगी, एबलीन आणि बंडखोर मिनी, द हेल्प उलगडत जाते. त्याचे काही भाग वाचताना अंगावर शहारा आला आणि भारतात असा इतिहास अभ्यासपूर्वक लिहिला जायला हवा असं वाटायला लागलं.

     अमेरिकेत 'घरकामाला मदत' अतिशय महाग आहे. सध्याच्या अमेरिकेत दक्षिण अमेरिकेतील देशांमधून आलेल्या हिस्पॅनिक बायका या कामात सतत दिसून येतात. याचं एक सिंडरेला प्रतिबिंब जे लो च्या 'मेड इन मॅनहटन' या सिनेमात पडलेलं होतं. पूर्वापार काळ्यांनी म्हणजे आफ्रिकन अमेरिकन्सनी जी कामं केली ते क्षेत्र आता कमी पैशांत काम करणा-या 'हिस्पॅनिक्स'नी काबीज केलं आहे. म्हणूनच हिस्पॅनिक्स आणि आफ्रिकन अमेरिकन्स यांच्या दरम्यानही वांशिक ताण दिसतो.

     न्यू यॉर्कसारख्या शहरात तर कोलंबियासारख्या आयव्ही लीगमध्ये शिकणा-या विद्यार्थिनीदेखील बेबी सिटिंग करतात आणि अती श्रीमंत लोकांची घरकामं करून पैसे कमावतात. 'नॅनी डायरीज'सारख्या सिनेमात हे चित्र दिसतं किंवा न्यू यॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये दुपारी फिरायला गेलं की विविध वांशिक गटांच्या 'नॅन्या' मुलांना बाबागाड्यांत घालून गप्पा मारताना दिसतात. एकूण, 'घरकामात मदत' ही सोय, आता यंत्रं असली तरी जगभर सर्वांना हवीशी वाटू लागली आहे. मात्र या 'हेल्प'शी आपण कसे वागतो? भारतातदेखील मध्यमवर्गीय घरांत ज्या 'मोलकरणी' किंवा 'कामवाल्या बाया' असतात त्यांच्याशी वागताना आपणदेखील 'वंशवादी' वागतो का? हा प्रश्न मात्र कायम छळतो, कारण कितीही नाकारलं तरी उत्तर होकारार्थी येतं.

     महिला राजसत्ता आंदोलनाच्या भीम रास्करांशी बोलताना मात्र त्यांनी या विषयाचे दुसरे पैलूही उलगडून दाखवले. ते म्हणाले, 'कामवाल्या बायका आणि गृहिणी हे फक्त 'पैशांचं नातं' नसतं. त्यात इतक्या भावना आणि सोयींचं राजकारण असतं की इतर असंघटित क्षेत्रात जशी युनिअन बांधता येते तशी कामवाल्या बायकांची युनिअन बांधणं कठीण जातं.' मोलकरीण आणि घरमालकीण यांच्यातलं काळंपांढरं राजकारण रास्कर नाकारतात. त्यांचं हे अनुमान मला महत्त्वाचं वाटतं.

     शायनी आहुजा प्रकरणानंतर कामवाल्या बायकांच्या संघटनेच्या एक ताई मला भेटल्या होत्या. पुण्यात, तथाकथित उच्चवर्णीय घरात घरातली पुरूष मंडळी तरुण कामवाल्या बायकांवर कशी नजर टाकतात याचं अंगावर काटा आणणारं वर्णन त्यांनी केलं होतं. जातींचा, सामाजिक वास्तवाचा विचार करताना महानगरीय वास्तवातले हे 'वर्ग' आम्ही कधी नीट तपासून बघणार आहोत? की 'मार्केट', 'डिमांड', ‘लोकसंख्येमुळे होणारा स्वस्त श्रमांचा पुरवठा’ यांमुळे आता, 'मोलकरीण' या वर्गाला जणू काही खारीज करूनही आमच्या स्त्रीवादी विचारांची जोपासना आम्ही करू शकतो अशी परिस्थिती आहे? की ऐशीच्या दशकातली स्त्रीमुक्ती चळवळ नामशेष झाली तसा घरकाम करणा-या या बायकांमधला राजकीय इंटरेस्ट कमी झाला आहे का?

     मी टिली ओल्सन या माझ्या लाडक्या अमेरिकन कथाकार बाईचं 'सायलेन्सेस' हे पुस्तक वाचत होते. ज्या स्त्री अगर पुरूष लेखकांना लिहायला वेळ मिळाला त्यांना आयुष्यात कुणीतरी घरकामाला मदत केली होती याबद्दल टिलीनं लिहिलंय. पुरूष लेखकांना त्यांच्या बायकांनी, काही लेखिकांना त्यांच्या मैत्रिणींनी, मोलकरणींनी जी मदत केली – त्या मदतीमुळेच त्यांना लेखन शक्य झालं हे टिलीनं दाखवून दिलंय.

     गर्ट्रयुड स्टाईनची मैत्रीण, जेराल्ड मॅनली हॉपकिन्सची बायको अशा अनेक उदाहरणांतून हे घरगुती कामाच्या मदतीचं राजकारण टिली उलगडून दाखवते.

     मात्र केवळ काळ्या-पांढ-या रंगांच्या बायनरी राजकारणापलीकडे 'मदतीचं' हे नातं जातं आणि म्हणून त्याला तपासणं, त्यातल्या fairness च्या कल्पना जाणणं, त्या बारीक तळटिपेसारख्या अध्याहृत न धरता त्या स्पष्टपणे सांगण्याची ताकद असणं हे आवश्यक आणि महत्त्वाचं आहे.

     आपल्या अंतरंगातला वर्गवाद उलगडून, आमच्या मुलाला भरवणारी, सांभाळणारी मुलगी जेव्हा आमच्या बाथरूममधला साबण वापरते तेव्हा येणारा संताप आम्हाला कधी दिसणार? त्याचं विश्लेषण आम्ही कधी करणार? एवढंच मला विचारायचंय.

     'द हेल्प'मध्ये स्कीटरच्या आईला आपण या काळ्या नोकरांशी वाईट वागतोय हेच कळत नाही; 'घरच्यासारखंच तर वागवतोय आम्ही त्यांना' असं तिला मनोमनी वाटत असतं – पण वस्तुस्थिती तशी नसते. आम्हीही आमच्या डोळ्यांना स्वच्छ करून कार्पेटखाली दडपलेली आमची अ-मानुष दुखरी जागा वर कधी आणणार?

     अमेरिकन वंशवाद म्हणजे खोल रुतलेली, न सुटलेली निरगाठ आहे. कॅथरिन स्टॉकेटनं 'द हेल्प' लिहून एकोणिसशेसाठच्या दशकातला ठसठसता वंशवाद आपल्या पुढ्यात आणलाय. लक्षात घ्या, हे सारं रोझापार्क, डॉ. किंग या सा-यांनंतरचं जग आहे. अजून किती वर्षं लागतील आपल्याला आपल्या भवतालातल्या अशा जातीय, वंशवादी इतिहासाला नोंदवायला? कोण लिहील घरातल्या बाजूला ठेवलेल्या फुटक्या कपांचा इतिहास? किंवा कुणबिणींच्या नजरेतून कोण सोलून काढील पेशवाईची राजवस्त्रं?

ज्ञानदा देशपांडे
dnyanada_d@yahoo.com
भ्रमणध्वनी : 9320233467

About Post Author