मतिमंद मुलांना ‘नवजीवन’ (शाळा)

7
85
carasole

‘नवजीवन शाळा’ सांगलीमध्ये मतिमंद मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी गेली तीस वर्षें कार्यरत आहे. मतिमंदांसाठी शिक्षण असते याबाबत समाज अनभिज्ञ होता. अशा काळात संस्थेची स्थापना झाली. मतिमंद मूल शिकून करणार काय, असा विचार करणा-या समाजात मतिमंदांच्या शिक्षणाचे बीज रोवणे हे खडतर आव्हान होते. ते आव्हान मानसशास्त्राच्या प्राध्यापक रेवती हातकणंगलेकर यांनी स्वीकारले. त्यांनी समाजाने दुर्लक्षलेल्या मतिमंदांच्या जीवनात त्यांच्यासाठी खास शाळा सुरू करून आशेचा किरण दाखवला.

पालक त्यांचे मतिमंद मूल घरापासून बाजूला जातेय, त्याच्यामुळे होणारा मानसिक त्रास थोडा कमी होईल म्हणून त्याला सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच शाळेत पाठवत असतात. उलट, शाळेचे काम शाळेत येणा-या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांच्यातील कलागुणांना, खेळकौशल्यांना वाव मिळावा, त्यांना कौशल्याधारित प्रशिक्षणावर भर देऊन आर्थिक स्वावलंबी बनवावे या हेतूने अविरतपणे सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबर शाळेचा गुणात्मक विकास व्हावा यासाठी नवजीवन शाळेने सांस्कृतिक, क्रीडात्मक, शैक्षणिक-प्रशैक्षणिक उपक्रम राबवले आहेत.

नवजीवन शाळेत शिक्षकांना मतिमंद विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक व सामाजिक विकास साधण्यासाठी ‘विशेष शिक्षणा’चे प्रशिक्षण देऊन अध्यापनासाठी भरती केले जाते. मुलांमध्ये असलेली अंगभूत कौशल्ये ओळखून त्यांना चालना देता यावी, प्रत्येक मुलावर लक्ष केंद्रित करता यावे, यासाठी ‘नवजीवन शाळे’ने पन्नास मुलांची मर्यादा ठरवली आहे. शाळेत केजी ते अठरा वर्षांपर्यंतची मुले शिक्षण घेतात. मतिमंद मुलांना प्रत्येक गोष्ट दाखवावी लागते. ती प्रत्यक्ष अनुभवाद्वारे त्यांच्या मनावर ठसवावी लागते. त्यामुळे ‘नवजीवन शाळे’त ऑडियो-व्हिडियोचा वापर बराच केला जातो. ‘नवजीवन शाळे’च्या संचालक रेवती हातकणंगलेकर सांगतात, “मतिमंद शाळेत येणारे प्रत्येक मूल वेगळे असते. त्याची बौद्धिक क्षमता वेगळी असते. त्या मुलांमध्ये सगळे गुण असतात, फक्त शिक्षकाला ते शोधता आले पाहिजेत.”

नवजीवन शाळेने अठरा वर्षें शाळेत शिकल्यानंतर पुढे काय करायचे? पालकांच्या पश्चात त्या मुलांचे काय होणार? या प्रश्नांना उत्तर शोधले आहे. मतिमंदांना केवळ समाजाची सहानुभूती नको. त्यांना समाजाने त्यांच्यातील एक मानावे, यासाठी भाषिक सुधारणेसह स्वयंरोजगाराचे व्यावसायिक प्रशिक्षणही दिले जाते. मतिमंद मुले निसर्गाशी जवळीक छान साधतात. त्यामुळे त्यांना निसर्गाच्या सान्निध्यात शेतीचे काम शिकवले जाते. त्यांना गॅरेजमधील साधीसोपी कामे (उदा. नट्स बसवणे) शिकवली जातात. त्यांना दुकानामध्ये सेल्समन म्हणून किंवा हिशोबलेखनाची कामे करता यावीत यासाठी प्रशिक्षित केले जाते. मुलांना राख्या बनवण्याचे व विकण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी त्यांना शाळेकडून राखी बनवण्याचे साहित्य उपलब्ध करून दिले जाते. राख्यांच्या विक्रीतून येणारी रक्कम त्यांच्या खात्यावर जमा केली जाते. राखी बनवणे हा शाळेचा एक उपक्रमच झाला आहे. दिवाळीत पणत्या-मेणबत्त्या बनवणे, भाजी निवडणे, कागदी फुलांचे बुके तयार करणे असे काही उपक्रम नवजीवन शाळेत सुरू आहेत. मुलांना उद्यानविद्या, रोपवाटिका तयार करणे याचे प्रशिक्षण दिले जाते. काही मुलांना त्या निमित्ताने घरबसल्या व्यवसायाचे साधन उपलब्ध झाले आहे. ‘नवजीवन शाळे’त शिक्षण घेतलेले काही विद्यार्थी स्वयंरोजगार सुरू करून कुटुंबाला हातभार लावत आहेत; तसेच, काही जण नोकरदारही आहेत. ते शाळेला आवर्जून पुन:पुन्हा भेट देतात, त्यांच्या शाळेचे व त्यांना घडवणा-या शिक्षकांचे ऋण मान्य करतात.

रेवती हातकणंगलेकर यांनी कोल्हापूरच्या ‘राजाराम महाविद्यालया’तून क्लिनिकल सायकॉलॉजीमध्ये एम.ए. केले आहे. त्यांनी ज्या विषयामध्ये डिग्री घेऊ त्यामध्येच काम करण्याचे ठरवले होते. त्या प्रथम ‘कृपामयी मेंटल हॉस्पिटल’मध्ये डॉ. बी. एन. डेबसिकदार यांच्याबरोबर सायकॉलॉजिस्ट म्हणून काम करू लागल्या. त्यांना मतिमंद पाल्यांची समस्या त्या वेळी जाणवली. काही पालक त्यांच्या मतिमंद मुलांशी फटकून वागायचे. ऐंशीच्या दशकात मतिमंद मुलांच्या शिक्षणाची सांगलीत कोणतीच सुविधा उपलब्ध नव्हती. तेव्हा रेवती यांनी पुढाकार घेतला. त्यांनी पुण्याला ‘कामायणी प्रशिक्षण संशोधन सोसायटी’मध्ये विशेष मुलांच्या शिक्षणासाठीचा एक वर्षाचा कोर्स केला. त्यांनी २६ जून १९८६ रोजी ‘नवजीवन मतिमंद मुलांच्या शाळे’ची स्थापना केली. उद्दिष्ट – मतिमंद मुलांच्या समाजातील दुर्लक्षित घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे. रेवती यांनी त्यांच्या घरातून मुलांना शिकवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला दहा मुले शिकण्यास होती. रेवती यांनी त्यांच्या कार्याची सुरुवात मुलांचा अभ्यासक्रम तयार करणे, त्यांना स्वच्छतेविषयी माहिती देणे, त्यांना स्वत:चे काम स्वत: करण्यास लावून स्वावलंबी होण्यास मदत करणे (जसे – दात घासणे, कपडे परिधान करणे, चप्पल, बूट घालणे, अंघोळ करणे) यापासून केली. त्यांनी दुसरीकडे जयसिंगपूर कल्याण महाविद्यालयात मानसशास्त्राची प्राध्यापक म्हणून कामास सुरुवात केली. रेवती सकाळी साडेसात ते दुपारी साडेबारापर्यंत कॉलेजमध्ये शिकवत व उरलेला संध्याकाळपर्यंतचा वेळ मतिमंद मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करत. त्यांनी कॉलेजमधून मिळणा-या पगारातून शाळेचे काम सुरू ठेवले. रेवती यांचे काम पाहून लोकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले व त्या तऱ्हेने लोक स्वत:हून शाळेशी जोडले गेले.

रेवती सांगतात, “आम्ही लोकांना सांगायचो, शाळेचे काम बघा, मुलांमध्ये होणारी प्रगती बघा आणि मग तुम्ही पैसे द्या. त्या वेळी लोकांनी यथाशक्ती दिलेले पाच रुपये, दहा रुपये, जशी मदत मिळेल तशी स्वीकारली. माझे वडील साहित्यिक, समीक्षक प्रा. म. द. हातकणंगलेकर यांच्यामुळेदेखील बरेच शिक्षित लोक, सामाजिक कार्यकर्ते या शैक्षणिक कार्यात सामील झाले. ‘नवजीवन’च्या स्थापनेनंतर चौदा वर्षांनी लोकांच्या मदतीने सांगलीला शाळेसाठी एक एकरची जमीन विकत घेतली. त्यावर पाच वर्ग व ग्रंथालय असलेली इमारत बांधली. ग्रंथालयात वाचनासाठी साडेचारशे पुस्तके उपलब्ध आहेत. शाळेचे काम सुरळीत सुरू आहे. ‘नवजीवन’ची धुरा दहा कर्मचा-यांनी मिळून खांद्यावर घेतली आहे. ते मुलांमध्ये मिसळून काम करतात. ‘नवजीवन’ शाळेचा वार्षिक खर्च साधारण दहा लाखांच्या घरात आहे. देणग्यांवर शाळेचा आर्थिक भार सावरला गेला आहे. पु. ल. देशपांडे प्रतिष्ठान, साखर कारखाने, मुख्यमंत्री निधीतून शाळेसाठी मदत मिळते. शिवाय, मित्रमैत्रिणीदेखील सामाजिक भावनेतून निधीसंकलनाचे कार्य करतात. कर्नाटकचे श्री. लाड यांनी पाच लाखांची, तर पुण्याच्या सुनंदा पाटील यांनी चार लाखांची देणगी शाळेला दिली आहे. त्यांनी केलेल्या मदतीमुळेच आज ‘नवजीवन’ भक्कमपणे पाय रोवून उभी आहे.”

‘नवजीवन’ला त्यांच्या कामाचा गौरव म्हणून तीस वर्षांच्या प्रवासात पंचवीसएक पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये ‘रामकमल सिन्हा सुवर्णपदक – १९९५’, ‘शिवलीला कलामंच पुरस्कार १९९६-९७’, वसंतराव नाईक कृषी प्रतिष्ठानचा ‘समाजसेवा पुरस्कार १९९९-२०००’, ‘जनसेवा पुरस्कार २००१-२००२, अपंगसेवा केंद्राकडून मिळणारा ‘अपंगमित्र पुरस्कार-२००३’, ‘सदाभाऊ गोसावी आदर्श शिक्षणसंस्था पुरस्कार – २००८’ यांसारख्या पुरस्कारांचा समावेश आहे.

संचालक – रेवती हातकणंगलेकर
नवजीवन शाळा,
जुना बुधगाव रस्‍ता, रेल्‍वे गेटजवळ,
संभाजीनगर, सांगली – 416 416
(०२३३) – २३२१४८३१0, २३२१४८३
navjeevan.sangli@rediffmail.com

– वृंदा राकेश परब

About Post Author

7 COMMENTS

 1. खुपच सुंदर काम आहे .आज ना
  खुपच सुंदर काम आहे .आज ना ऊद्या ही मुले समाजाच्या मुख्य प्रवाहात आल्याशिवाय राहणार नाही. संस्थेस खुप खुप शुभेच्छा!

 2. आपले कार्य अतुलनीय आहे !

  आपले कार्य अतुलनीय आहे !
  आपणासारख्या सामाजिक बांधीलकी जपणाऱ्या उदात्तपणे सेवाव्रतींमुळेच ही भावी पिढी ताठ मानेने उभी राहणार आहेत !
  Proud of you !

 3. माझा मुलगा तेजस नवजीवन शाळा…
  माझा मुलगा तेजस नवजीवन शाळा औरगाबाद येथेआहे त्याचे मतिमंद टक्के 65/आहे तो शाळा मध्ये रोज जातो त्याची चागली सुदरना झाली आहे 3वषा पासुन शाळा मध्ये जातो

 4. Mazi mulgi 14 years chi ahe…
  Mazi mulgi 14 years chi ahe tila ajun spast bolta yet nahi v that sathi daily speech therapy milnestav mi tila nivasi matimand school madhe thevu echito tari ashi shala please such a.aplya karyas mazya shubecha.

 5. मॅडम मी मतिमंद मुलांसाठी…
  मॅडम मी मतिमंद मुलांसाठी वस्तू विकत घेतली तर कोणती देऊ

 6. खूप गौरवास्पद कार्य आहे. या…
  खूप गौरवास्पद कार्य आहे. या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात येण्याची संधी आपण दिली आहे.

Comments are closed.