भीमाशंकर कठारे मराठी उद्यमशीलतेसाठी चार दशके!

-udyogshree-bhimashankar-kathare

‘उद्योजकता म्हणजे काय रे भाऊ?’ अशी मानसिकता मराठी भाषिकांची पन्नासएक वर्षांपूर्वी होती. व्यापार-उदीम हे मराठी माणसाचे काम नाही, ते रक्तात असावे लागते अशी लोकधारणा पक्की होती. कित्येक मराठी पिढ्या शिक्षण, नोकरी, लग्न, संसार, परंपरा या पंचकडीत जगत राहिल्या. काळाप्रमाणे फार मोठा बदल घडून आला असे म्हणणे धारिष्ट्याचे ठरेल, पण मला डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे वाक्य आठवते. ते वाक्य मराठी माणसाला अगदी फीट बसते. “चांगल्या पगाराच्या नोकरीसाठी शिकत राहणे ही मानसिकता पालक आणि पाल्य यांच्यात जोपर्यंत आहे, तोपर्यंत नोकरच जन्माला येणार!”

नाही म्हटले तरी, बहुसंख्य मराठी मंडळी नोकरीपेशातील असल्याने त्यांची आर्थिक साक्षरता नोकरी, बदली, प्रमोशन, इन्क्रिमेंट, बोनस अशी मर्यादित दिसून येते. त्याउलट गुजराती, जैन, मारवाडी, पंजाबी, कच्छी लोकांची आर्थिक साक्षरता ‘बाजारपेठेशी लेनदेन’पर्यंत असते. म्हणून त्यांचे लोण देशभर पसरले आहे. आधुनिक युग हे आर्थिक आहे, वेगवान आहे. तेव्हा ते कसे- आपण कसे याचा विचार करत बसू नये. काळानुरूप बदलावे ना! 

उद्योजकता विकासाचे महत्त्व मला तरी कोठे माहीत होते? मी सर्वसाधारण कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबात आई-बापाविना वाढलेला पोरगा. मी शिंप्याचे काम करून जगणाऱ्या चुलत्याच्या घरात आजीसोबत राहत होतो. गाव होते आळंद – कर्नाटकातील. आजी चौथीत असताना वारली. माझा मायेचा आधार तुटला. मला समाज, नातेसंबंध असे कोणी माहीतच नव्हते. मला कोणी विचारत नव्हते. मी रडतखडत, शिंपीकाम करत सातवी पास झालो, ते वर्गातील देशपांडे या सहविद्यार्थ्याच्या वह्या-पुस्तकांवर. चुलत्याने दवाखान्यातील नोकरी माझ्याकरता आणली. माझे शिक्षणाचे एक वर्ष फुकट गेले. ‘नोकरी कर किंवा तुझे तू बघ’ असे मला सांगण्यात आले. मी स्वावलंबी होण्याचा प्रयत्न गावातच केला, मात्र जमले नाही. शेवटी निदान मॅट्रिक व्हावे म्हणून मी गाव सोडून पुण्यात आलो. माझे वय चौदा वर्षांचे त्या वेळी होते. गावातील रामदासी यांच्या ओळखीने दिवसा काम, रात्री शाळा सुरू झाली. गावात काय, पुण्यात काय, पोटाचे हाल होते. तशी माझी चारएक वर्षें गेली, म्हणजे खाली जमीन वर आकाश. तेच माझे मायबाप होते. मी चांगल्या कामाच्या शोधात असताना, 1960 साली पुण्याच्या डेक्कन जिमखान्यावर निळुभाऊ लिमये यांच्या ‘पूनम हॉटेल’मध्ये काम मला मिळाले. माझी कोणत्याही कामाची तयारी होती. मला लॉज, मेस यांमध्ये मॅनेजरच्या मदतनीसाचे काम दिले गेले. खरे सांगतो, तेव्हापासून मला पोटभर जेवण मिळू लागले! मी तेथे पूर्ण एक तप काम केले, पदवीधर झालो, जर्नालिझम केले. तेव्हापासून, मी वृत्तपत्रात लेखन करत आहे. मला सहवास निळूभाऊंकडे येणाऱ्या बड्या मंडळींचा मिळत होता. माझ्या ऐन मिसरुड  फुटण्याच्या वयात ‘पूनम’मधील ‘समाजवादी’ वातावरणाचे, तेथील मंडळींचे संस्कार माझ्यावर झाले. एरवी, संस्कार मुलांना आई-वडील, आप्त, समाज यांच्याकडून -udyogshree-anka-मिळतात, पण ते माझ्या नशिबात नव्हते. भविष्यात कपड्यांना टाके मारण्याऐवजी शब्दांचे टाके घालण्याचा योग होता ना! हे झाले ‘मी’चे माझ्याविषयीचे सांगणे.  

काही चांगले साथी-मित्र त्या सगळ्या ‘एकला चलो रे’च्या प्रवासात मिळाले. एकाच्या ओळखीने मुंबईत ‘लघुउद्योग महामंडळा’च्या सेवेत 1972 अखेर रुजू झालो. तेथून मी उद्योजकतेकडे ओढला गेलो. तेथे मला ‘लघुउद्योग’ मासिक संपादनाचे काम मिळाले. उद्योजकांचा सहवास मिळत गेला. मला त्यांची व्यक्तिमत्त्वे व नोकरदारांची व्यक्तिमत्त्वे यांतील फरक जाणवू लागला. खऱ्या उद्योजकांचा शब्द म्हणजे एक प्रकारे धनादेश असतो. तसेच, ते स्वयंभू असतात. त्यांची एक जीवनशैली असते. ते लोकांना रोजगार देणारे, शासनाला कररूपाने धन देणारे असतात. एकूणच, मी उद्योजकीय व्यक्तिमत्त्वाकडे आकर्षित होत गेलो. त्यासंबंधी वाचन, चिंतन, लेखन सुरू केले. त्याच काळात ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये कार्यरत असलेले दिनकर गांगल यांनी मला ‘नवे उद्योजक’ लिहिण्याची संधी दिली. तेव्हापासून मी मुंबईतील बहुतांश वृत्तपत्रांतून ‘यशोगाथा’ लिहिलेल्या आहेत. विशेषकरून त्या वेळच्या दूरदर्शनच्या ‘कामगार विश्व’ सदरात सलग दहा वर्षें उद्योजकांच्या मुलाखती घेतल्या आणि कुमार केतकर यांच्या प्रोत्साहनामुळे दैनिक ‘लोकसत्ता’मध्ये दहा वर्षांत सहाशे यशोगाथा लिहिल्या. अशा प्रकारे उद्योजकांच्या सहवासात राहून राहून माझ्या अंगात उद्योजकता भिनत गेली. महामंडळाचे वातावरण त्या वेळी मला पोषक नव्हते. मी तेथे झिजून वा गंजून संपण्यापेक्षा महामंडळातील सेवेचा राजीनामा दिला. त्या वेळी माझी पत्नी शासकीय सेवेत होती. तो मोठा दिलासा होता. दोन मुले शाळेत जाणारी होती आणि मी मात्र मराठी उद्योजकता विकासासाठी ‘उद्योगश्री प्रकाशन’ व मराठी उद्योजकांचा ‘सन्मान सोहळा’ सुरू केला. त्यासाठी निमशासकीय नोकरी सोडली. तो वेडेपणाच होता, कारण ती माझी पॅशन होती! एका गोष्टीचे मला आश्चर्य वाटते. तसे माझे नशीब खडतर, खडकाळ वाटेवरचे असूनही माझ्यात उद्योजकीय श्रीमंती कोठून आली असावी? ‘बाष्प इंडस्ट्रीज’चे बापू पाटील म्हणतात, “नोकरीचा राजीनामा देऊन एकहाती उद्योजकता विकासासाठी देशात कार्यरत असणारी भीमाशंकर कठारे ही एकमेव व्यक्ती असेल!”

‘उद्योगश्री’ दिवाळी अंकाचा जन्म ऑक्टोबर 1983 ला झाला. मी तेव्हापासून ते आतापर्यंत बिझी आहे; बिझनेस‘फॅन’ झालो आहे.

-udyogshree-ankaमी ‘उद्योगश्री’ अंक सलग छत्तीस वर्षें प्रकाशित केला. त्या वेळी घेतलेल्या मुलाखतींमधून उद्योजकांची समाज, मीडिया यांच्याबद्दल नाराजी दिसायची- “कठारे, आम्हाला कोण विचारतोय? राबायचे, इतरांना रोजगार द्यायचा, शासनाला कररूपाने पैसे द्यायचे आणि सत्कार, कौतुक कोणाचे तर सेलिब्रिटींचे.” ती खंत मला जाचक वाटली. त्या वेळचा समाज श्रमसंस्कृतीकडे पाठ फिरवत असल्याचे ते लक्षण नाही का! त्याकरता मी ‘उद्योगश्री गौरव सन्मान सोहळा’ सुरू केला. सन्मानाचे रौप्य महोत्सवी वर्ष होऊन गेले. मी दोनशेनव्वदाहून अधिक उद्यमींचा गौरव केला आहे. त्यात छप्पन महिलांचा समावेश आहे. माझी नऊ पुस्तके औद्योगिक विषयावर प्रकाशित झाली आहेत- विशेषतः ‘उद्योजकता आणि आध्यात्मिकता’ हे पुस्तक नावाजले गेले. त्याला पुरस्कारही मिळाले. सन्मानासाठी दिग्गज मंडळींची निवड समिती कार्यरत आहे. सुभाष दांडेकर हे गेली पंचवीस वर्षें त्या समितीचे अध्यक्ष होते. सदस्य म्हणून मधू मंगेश कर्णिक, कुमार केतकर, केसरी पाटील, एकनाथ ठाकूर, प्रेमाताई पुरव, नरेश राऊत यांचे सहकार्य लाभले. ती नावे म्हणजे ‘उद्योगश्री’चे बळ ठरले. त्या जोरावर माझी वाटचाल तेजोमय झाली.

हे ही लेख वाचा- 
मिस्टर बिडी – किसनलाल सारडा
द.रा. पेंडसे- आर्थिक उदारीकरणाचा उद्गाता
जगन्नाथराव खापरे – ध्यास द्राक्षमाल निर्यातीचा!

 

जातीचे उद्योजक स्वत:च्या, त्यांच्या कुटुंबाच्या व देशाच्या विकासाचे धनी असतात. मला पीटर ड्रकर यांचे वाक्य आठवते. “संधीचा महत्तम वापर करणारी, प्रसंगी धोका पत्करून विकासाची नवी वाट शोधणारी व्यक्ती म्हणजे उद्योजक होय.” एकेकाळी मी स्वतः नोकरी मागणारा तरुण होतो. मी माझ्या मुलांना मेडिकल दुकानाची लाईन दिली; चार-एक लोकांना नोकरी दिली. महाराष्ट्र उद्योजकतेच्या अभावी मागे आहे, याची जाणीव मराठी माणसाला झालेली आहे. ‘उद्योगश्री’ने ती खंत प्रथम चार दशकांपूर्वी अधोरेखित केली. मी त्याची नोंद येथे करतो.

संगीताला भक्ती पावली, की त्याचे भजन होते…
पाण्यात भक्ती ओतली की त्याचे तीर्थ होते…

तसेच, उद्योगाला साधनेची जोड मिळाली, तर लक्ष्मी प्रसन्न होते… 

– भीमाशंकर कठारे 9967233429
udyogshree@rediffmail.com

About Post Author

2 COMMENTS

Comments are closed.