भाषेचे उत्पादक होऊ !

0
32
images

     भाषा ही इतर लोकांनी करायची काहीतरी गोष्ट आहे, आपण फक्त तिचा वापर करायचा अशी भूमिका लोकांमध्ये अव्यक्त पण सर्वदूर आढळते. भाषेचे उपयोगकर्ते, भोगवटादार असे खूप, पण उत्पादक फार कमी अशी स्थिती आहे.

     भाषेचे ‘उत्पादक’ म्हणजे नवे विचार मांडणारे, नव्या कल्पना रुजवणारे लोक अशी समजूत आहे. बोलणं किंवा केवळ वाचणं-ऐकणं-पाहणं ह्या क्रिया लिहिणं, गाणं किंवा अभिनय करणं ह्यांच्यापेक्षा फारच नगण्य मानल्या जातात आणि आपण जर पहिल्या गटात मोडत असू तर मग आपण भाषेविषयी फार विचार करण्यात वेळ दवडण्याचं काही कारण नाही हा ग्रह दृढ असतो. इथं नोंद करावीशी वाटते ती अशाही उपप्रवाहाची की शब्द, भाषाविचार वगैरे सगळं फावल्या वेळात किंवा हौस म्हणून करावं; आयुष्यातले प्रश्न, चरितार्थ, सामाजिक उलाढाली ह्या जास्त महत्त्वाच्या आहेत, तेव्हा प्राधान्य त्यांना द्यावं, किंबहुना पेशा म्हणून भाषेशी संबंध असणारे लोक काहीसे लाडावलेले, स्वप्नाळू, आयुष्यातल्या कठीण कडांपासून दूर असतात व त्यांनाच हे सर्व करायला जमतं. खरोखर ‘उपप्रवाह’ म्हणावा का इतका हा विचार रूढ आहे.

     माणसाच्या उत्क्रांतीमधे भाषेचं महत्त्व अपार आहे, आणि उत्क्रांतीला पूर्णविराम मिळालेला नसून पृथ्वीवरील सर्व सजीव गट हे उत्क्रांतीच्या पायवाटेवर चालत आयुष्य काढत आहेत. हे दोन मुद्दे लक्षात घेतले तर भाषेविषयीच्या समजुती किती तोकड्या आहेत हे स्पष्ट होईल. काही प्रज्ञा-मानसशास्त्रज्ञांचा दावा तर असा आहे, की माणसाची मातृभाषा ही त्याच्या मेंदूची विचार करण्याची क्षमता आणि दिशा ठरवत असते. पोषण, भवताल वगैरे ओघानं येणार्‍या बाबींबरोबर माणसाची भाषादेखील त्याचा बौद्धिक विकास, त्याची ज्ञान ग्रहण करण्याची पद्धत ठरवत असते. भाषेचा चिकित्सक विचार आणि वापर हा व्यक्तीची प्रगल्भता वाढवतोच; पण त्याचा संबंध मानवी मेंदूच्या उत्क्रांतीशी आहे, आणि म्हणून ढोबळ, सपाट, साचेबद्ध कंटाळलेली भाषा कामचलाऊ कारणानं वापरणं हे इतक्या मुळातून घातक आहे. मराठीच्या जागी हिंदी-इंग्रजी जरी तितक्या जागरुकपणे आलं तरी मेंदूचा धोका टळेल, बहुभाषिकत्व ही मेंदुरचनेची सकारात्मक वाढच आहे. सर्रास दिसतं मात्र असं की मराठी नको तर त्याऐवजी येणारं हिंदी-इंग्रजी हेही तकलादू, ताकपिठं आणि उथळ असतं. भाषा ही संस्कृती आणि समाजजीवन यांच्यापासून अभिन्न असल्यानं अशा उसनवारीच्या पंखांनी नव्या क्षितिजांचा मागोवा घेता येत नाही.

     दोन पूर्वापार, काही संबंध नसणार्‍या शब्दांची जोडी मनात सहज तरळून गेल्यानं जाणवणारे नवे अर्थ अशा परिस्थितीत कधी निर्माणच होऊ शकत नाहीत. आयुष्य आक्रसतं,

     वैचारिक परावलंबित्व येतं, भाषिक पोरकेपण येतं. जगता तर हे असंही येतं, प्रश्न आहे की ते स्वेच्छेनं का असावं?

     भाषेचे उत्पादक बनणं, बरोबरच्या लोकांना तसं बनायला उद्युक्त करणं ही कठीण गोष्ट नाही. रोजच्या वापरातल्या शब्दांच्या मुळाशी जावं, त्यांचे नातेवाईक पर्यायी शब्द-अर्थच्छटा कशा-कुठे येतात ते तपासावं, त्यातली प्रांतिक वैविध्यं समजून घ्यावी, या सगळ्यांबद्दल लोकांशी बोलावं, शब्दांशी खेळावं-यमकं जुळवावी-कोट्या कराव्या-तुटेपर्यंत अर्थ ताणून पाहवा.

     आपण करतो ते काम म्हणजे नक्की काय, रोजचा कामाचा दिवस म्हणजे कोणती क्रियापदं त्यासाठी वापरता येतील, अशा इतर प्रतिमा कोणत्या ह्याची नोंद करून ठेवावी, तिची उजळणी करावी.

     आपल्याला काय वाटत आहे, त्याचं वर्णन नेमकेपणानं, समर्पक शब्द वापरूनच करावं. बोथट, सर्वसमावेशक विशेषणांपेक्षा शब्दचित्रं, सामान्य व्यवहारातल्या म्हणींचा वापर करावा. म्हणी-वाक्प्रचार योग्य तिथं वापरावेत, त्यांच्या कक्षा कशा व कुठे रुंदावता येतील ते पाहावं. वाटलं तर इतर भाषांतल्या भाषांतरित म्हणी वापरुन बघाव्यात. ही एक तमीळ म्हण- ‘सपशेल तोंडावरच आपटायचा हेका पण मिशीत घाण गेलेली चालत नाही.’

     तुम्हाला शब्दांशी खेळायची अशी सवय असली तर समानधर्मी लोक आपसूकच गोळा होतील. ही प्रवृत्ती सहजपणे समाजाभिमुख होईल. सगळ्यांनाच जरा मजा करता येईल.

     आहे त्या परिस्थितीबद्दल औदासीन्य, हतबलता आणि वैफल्य हा आपल्या सगळ्यांचा स्थायिभाव होऊ पाहत आहे. नाकर्तेपणाचं असं आक्रस्ताळं समर्थन आपण खूप केलं, आता थोडा बदल कृतीतून व्हायला हवा.

ऋचा गोडबोले – भ्रमणध्वनी : 9819321852, इमेल rcagodbole@gmail.com

संबंधित लेख –

आकडेवारीचे फुलोरे

ऊस, राजगिरा, साबुदाणा, बटाटा, मिरची

{jcomments on}

About Post Author