प्रा.भालचंद्र माधव उदगावकर यांचे वर्णन समाजाचे भान असणारा वैज्ञानिक असे करणे योग्य ठरेल. उदगावकर 14 सप्टेंबर 1927 रोजी जन्मले. ते दादरच्या महापालिका शाळेत आणि नंतर राजा शिवाजी महाविद्यालयात शिकले. मॅट्रिकला ते बोर्डात पहिले आले होते. नंतर ते एमएस्सीलाही मुंबई विद्यापीठात पहिले आले. उदगावकरांचे नाव ‘इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’च्या श्रेयनामावलीत भाभा, वि.वा. नारळीकर (जयंत नारळीकर यांचे वडील), एम.जी.के.मेनन अशा दिग्गजांबरोबर झळकत आले आहे. उदगावकर यांचे वडील माधवराव उदगावकर हे बाबासाहेब जयकर अध्यक्ष असलेल्या ‘श्रद्धानंद महिलाश्रमा’चे कार्यवाह आणि संस्थापक सदस्य होते. उदगावकर यांना समाजसेवेचे बाळकडू असे घरातून लाभले होते.
त्यांनी त्यांना एमएस्सी झाल्यावर घरच्या ओढगस्तीमुळे स्टेट बँकेत नोकरी करावी असा सल्ला मिळाला होता. पण तेवढ्यात ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ची जाहिरात आली. त्यांनी तेथे अर्ज केला. खुद्द डॉ. होमी भाभा यांनी त्यांची मुलाखत घेतली व त्यांची निवड केली. उदगावकर यांनी सैद्धांतिक भौतिकशास्त्रात एवढे मूलभूत काम केले, की ते होमी भाभा यांचे उजवे हात बनले. उदगावकर यांनी परदेशातील अनेक नोबेलविजेत्या शास्त्रज्ञांबरोबर काम केले आणि नाव व प्रतिष्ठा मिळवली.
त्यांचे लक्ष त्यांच्या संस्थेचा फायदा विज्ञानशिक्षण, विज्ञानशिक्षक व विद्यार्थी यांना कसा करून देता येईल याकडे असे. त्यांनी रुईया, रुपारेल, झेवियर, एल्फिन्स्टन यांसारख्या महाविद्यालयांतील हुशार मुलांना ‘टीआयएफआर’मध्ये आठवड्यातून एकदा बोलावून त्यांना शास्त्रज्ञांबरोबर चर्चा करण्याची संधी मिळवून दिली. त्यातून तयार झालेला अभय अष्टेकर यांच्यासारखा विद्यार्थी जगप्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ बनून गेला आहे. ते मुंबईच्या महाविद्यालयांतील भौतिकशास्त्राच्या प्राध्यापकांना आठवड्यातून एकदा बोलावून त्यांच्या शंकांचे निरसन करत. मधू दंडवते यांच्यासारखे प्राध्यापक त्यांचे सिद्धार्थ महाविद्यालयातील विद्यार्थी होते. मुंबई विद्यापीठ जरी 1875 साली सुरू झाले असले तरी तेथे भौतिकशास्त्राचा विभाग नव्हता. उदगावकर यांनी ती जबाबदारी ‘टीआयएफआर’ने घ्यावी यासाठी जंग जंग पछाडले. सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश असलेले प्र.बा. गजेंद्रगडकर नंतर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू झाले. त्यांना सांगूनही ते काम जमले नाही. अखेर, तो विभाग उदगावकर यांच्याच प्रयत्नांनी मुंबई विद्यापीठात एकशेपंधरा वर्षांनी म्हणजे 1972 साली स्थापन झाला.
त्यांची विज्ञानशिक्षणाबद्दलची दृष्टी विशाल होती. ती केवळ बी एस्सी, एम एस्सी, पीएच डी असे पदवीप्राप्त विद्यार्थी तयार करण्यापुरती मर्यादित नव्हती. त्यांनी सातवी ते नववीच्या मुलांसाठीही ‘बॉम्बे असोसिएशन फॉर सायन्स एज्युकेशन’ (बेस) ही संस्था स्थापन करून त्या संस्थेतर्फे विज्ञान प्रदर्शने घेण्यास सुरुवात केली. ती प्रदर्शने देशाच्या सर्व भागांत सुरू झाली. उदगावकर हे भारतभर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये शाळाशाळांत होत असलेल्या विज्ञान प्रदर्शनांचे उद्गाते आहेत. ही मराठी माणसांसाठी रास्त अभिमानाची गोष्ट होय. त्यांनी मुंबईतील म्युनिसिपल शाळांमध्येही विज्ञानशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यात वि.गो. कुलकर्णी, यशपाल ही मंडळी सामील झाली होती. त्यातूनच पुढे ‘होमी भाभा विज्ञान शिक्षण संस्था’ सुरू झाली.
त्यांनी ते विद्यापीठ अनुदान मंडळाचे सभासद असताना, काही चांगल्या महाविद्यालयांना स्वायत्तता द्यावी म्हणून 1975 च्या सुमारास मागणी केली. त्याची फळे गेल्या दहा वर्षांपासून दिसून येत आहेत. त्या चळवळीचे नेतेही उदगावकरच. उदगावकर नियोजन मंडळावरही सल्लागार म्हणून काम करत. ते तेथेही शिक्षण आणि संशोधन यासंबंधीचा मुद्दा लावून धरत.
उदगावकर यांच्या प्रेरणेने मुंबईची ‘होमी भाभा विज्ञान शिक्षण संस्था’, भुवनेश्वरची ‘भौतिक संशोधन संस्था’ आणि मुंबई विद्यापीठातील इन्स्ट्रुमेण्टेशन विभाग या संस्था सुरू झाल्या. पंडित नेहरूंच्या विचारांनी भारावलेली पिढी देशाच्या भविष्यकालीन मुलांसाठी शैक्षणिक संस्था उघडण्यात मग्न राहिल्याने त्यांनी त्यांचे संशोधन थांबवले. त्यामुळेच भाभा, यशपाल, मेनन, उदगावकर, पी.एम. भार्गव ही माणसे नोबेल पुरस्कारापासून वंचित राहिली. पण त्याची खंत त्या माणसांना नव्हती. ते त्यांच्या सार्वजनिक कामाच्या मस्तीत मश्गुल होते.
उदगावकर बर्ट्रांड रसेल यांनी स्थापन केलेल्या ‘पग्वाश समिती’चे सभासद वीस वर्षें होते. ती समिती जगात अणुयुद्ध होऊ नये म्हणून स्थापन झाली होती. समितीचे 1980 पासून अध्यक्ष होते प्रा.रॉटबेल्ट. त्यांना ते अमेरिकाधार्जिणे असल्याने ‘तुम्ही जागतिक संस्थेचे अध्यक्ष आहात’ हे भान आणून देण्याचे काम उदगावकर करत. त्या समितीस तिच्या कामाबद्दल 1995 सालचा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला. त्यातील अर्धा वाटा अध्यक्षांचा आणि अर्धा वाटा समितीचा होता. समिती सदस्य म्हणून उदगावकर तो पुरस्कार घेण्यासाठी ओस्लोला गेले होते. पण ते नोबेल पुरस्काराचे अंशत: मानकरी आहेत हे त्यांनी त्यांच्या तोंडून कधी कोणाला सांगितले नाही.
उदगावकर लोकांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अवलंब करावा, अंधश्रद्ध राहू नये, देशात विज्ञानप्रसार व्हावा म्हणून आयुष्यभर झटले. ते 1982 ते 1991 अशी नऊ वर्षें ‘मराठी विज्ञान परिषदे’चे अध्यक्ष होते. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याने 1987 साली ‘भारत जन-विज्ञान’ जथ्था काढला तेव्हा ते त्या कार्यक्रमाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. ते देशभराच्या सर्व राज्यांतील विज्ञान परिषदांचे सल्लागार होते.
उदगावकर पद्मभूषण, हरी ओम पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित होते. ते प्रसिद्धीपराडमुख होते.
भा.मा. उदगावकर यांना शास्त्रीय संगीताची आवड होती. त्यांच्या पत्नी पद्मा उदगावकर यांनी इतिहास या विषयात पीएच डी केली होती. त्यांचे चिरंजीव जयंत उदगावकर जीवशास्त्रात संशोधन करत असून पूर्वी ते बंगळूरला ‘टी आर एफ आर’मध्ये होते. जयंत पुण्याच्या आयसर या शैक्षणिक संस्थेचे संचालक 2017 सालापासून आहेत.
भा.मा. उदगावकर यांचा मृत्यू 22 डिसेंबर 2014 रोजी मुंबईत झाला. आम्ही अशा ऋषितुल्य माणसाला पाहिले, त्यांच्याबरोबर काम केले हा भाग आमच्या जगण्याला श्रीमंती देऊन गेला!
लोकसत्ता ‘लोकरंग’ रविवार, 28 डिसेंबर 2014 वरून उद्धृत – सुधारित स्वरूपात.
– अ.पां. देशपांडे