भाजीपाल्याचे वाळवण – शेतकऱ्यासाठी वरदान

carasole

वैभव तिडके, डॉ. शीतल सोमाणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘सोलर कंडक्शन ड्रायर’ हे भाजीपाला वाळवून तो टिकवून ठेवण्याचे साधन विकसित केले आहे. भाजीपाला आणि अन्नधान्य खराब होऊन वाया खूप जाते. त्यासाठी ते साठवून ठेवण्याचे किफायतशीर साधन आहे ते. भाजीपाला टिकवता आला तर मध्यम आणि लहान शेतकऱ्याला दिलासा मिळेल अशा विचाराने प्रेरित होऊन वैभवने ते काम साधले.

वैभवने मुंबईच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी’(ICT) मधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. त्याच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या ‘सायन्स फॉर सोसायटी’ या संस्थेत डॉ. शीतल सोमाणी, डॉ.शीतल मुंडे, स्वप्नील कोकाटे, गोपाल तिवारी, शंतनू पाठक, आदित्य कुलकर्णी आणि गणेश भेरे हे तेवढेच सक्षम असे त्याचे सहकारी आहेत. शीतल सोमाणी आणि शीतल मुंडे या दोघी शिक्षणाने वैद्यकीय डॉक्टर आहेत, तर बाकीचे सदस्य इंजिनीयर.

वैभव तिडके मूळचा बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईचा. त्याला विज्ञान आणि भोवतालची परिस्थिती यांची सांगड घालून वेगवेगळे प्रयोग करण्यास महाविद्यालयीन काळापासून आवडे. तो मुंबईत अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना, त्याने त्याच्या मित्रांच्या मदतीने संयुक्त राष्ट्र संघाच्या स्पर्धेत ‘solar pond dryer’ हा प्रकल्प सादर केला. जगातील एकशेदहा देशांमधून सादर झालेल्या प्रकल्पांत त्याचा प्रकल्प पहिल्या दहांत निवडला गेला. त्याला बारा लाख रुपयांचा पुरस्कारही मिळाला! त्याच प्रकल्पासाठी त्याला पुन्हा 2008 मध्ये ‘Agilent Engineering And Technical Award’ मिळाले. त्यामधून वैभवला विविध स्पर्धांची आणि जागतिक व्यासपीठाची ओळख झाली. त्यानंतर त्याने  त्याच्या इन्स्टिट्यूटच्या वार्षिक तंत्रप्रदर्शनात ‘घरगुती कुकरची क्षमता वाढवणे’ आणि ‘मानवी ऊर्जेवर चालणारे दिवे’ असे दोन प्रयोग सादर केले. त्या उपक्रमांदरम्यान त्याला समविचारी काही सहकारी भेटले. त्यांच्या आणि त्याच्या बीड जिल्ह्यातील काही उच्चशिक्षित मित्र-मैत्रिणींच्या सहकार्याने त्याने 2008 मध्ये ‘सायन्स फॉर सोसायटी’ (एस फॉर एस ) ही संस्था स्थापन केली. ती संस्था शेतमाल टिकवून ठेवण्यासाठी सौर ऊर्जेवर चालणारे वेगवेगळ्या प्रकारचे ‘ड्रायर’ विकसित करत आहे. सामाजिक भान हे समान सूत्र त्या मित्रमंडळींच्या सर्व उपक्रमांमागे आहे. ‘सोलर कंडक्शन ड्रायर’ने 2013 मध्ये साठ हजार अमेरिकी डॉलर्सचे ‘Dell Social Innovation Challenge Award’ पटकावले आहे. जगातील एकशेदहा देशांचा सहभाग असलेल्या त्या स्पर्धेत, आशियाई देशाला पहिल्यांदाच तो पुरस्कार मिळाला. नंतर, उपकरणाला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

‘गरज’ ही शोधांची जननी असते, पण ‘एस फॉर एस’च्या उपक्रमांमागे, सामाजिक ‘उत्तरदायित्व’ ही प्रेरणा आहे. ‘अंबाजोगाई येथील आठवडी बाजारात भाजीविक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांकडील शिल्लक राहिलेला भाजीपाला फुकट जात असे. हंगामात मोठ्या प्रमाणावर पिकणाऱ्या त्या भाज्या हंगाम संपल्यावर देखील उपलब्ध होऊ शकतील, हया विचाराने ‘सोलर ड्रायर’ विकसित करण्याची प्रेरणा मिळाली’ असे शीतल सोमाणी यांनी सांगितले.

भाज्या आणि अन्नधान्य टिकवण्यासाठी ‘ड्रायर’ त्या आधी देखील बनवले गेले आहेत, पण ‘पूर्णपणे शाश्वत ऊर्जेचा वापर, वजनाने हलका आणि सर्वसामान्यांना परवडण्याजोगा’ हया वेगळेपणामुळे ‘एस फॉर एस’ने विकसित केलेल्या ‘ड्रायर’ची नोंद जागतिक स्तरावर घेतली गेली आहे. छत्तीस चौरस फुटांचा ‘सोलर ड्रायर’ छोट्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. त्यामध्ये फळे, भाज्या, मासे असे नाशवंत पदार्थ एक ते दोन दिवसांत वाळवता येतात. त्यामुळे त्यांचे ‘शेल्फ लाईफ’ एक वर्षापर्यंत वाढू शकते. एका वेळी बारा ते चौदा किलो पदार्थ त्यामध्ये वाळवता येतात. त्यातील वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे पदार्थांचा रंग, वास आणि पौष्टिक तत्त्व सुरक्षित राहतात. विजेची जोडणी नसल्यामुळे, तो एका ठिकाणाहून दुसरीकडे सहज हलवता येतो. देखभालीचा खर्च शून्य आहे. तो ‘ड्रायर’ अतिरिक्त शेतमाल साठवण्याच्या उद्देशाने बनवला असला, तरी मोड आलेली कडधान्ये, मसाले, पोहे, रवा यांसारखे पदार्थ टिकवण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. जास्त प्रमाणात भाज्या, मोड आलेली कडधान्ये एकदाच साठवून ठेवल्याने नोकरदार महिलांच्या वेळेची बचतही होऊ शकते. वाळवलेल्या भाज्या आणि कडधान्ये अर्धा ते एक तास गरम पाण्यात ठेवल्यावर नेहमीसारखी शिजवता येतात.

घरगुती वापरासाठी, ‘एस फॉर एस’ने चार चौरस फुटांचा ‘ड्रायर’ बनवला आहे अशी माहिती शीतल यांनी दिली. ‘संयुक्त राष्ट्र संघाचा पर्यावरण पूरक कार्यक्रम, युनेस्को, यूएस एड, टेक्सास युनिव्हर्सिटी(अमेरिका), बिल अँड मिलिंडा गेट्स फाउंडेशन, डेल फाउंडेशन, एजीलंट टेक्नोलॉजी’ यांची या उपकरणाला मान्यता मिळाली आहे. संस्थेने त्याची पेटंट नोंदणी केली आहे.

‘सायन्स फॉर सोसायटी’ हया संस्थेने नाविन्यपूर्ण आणखी काही संशोधन केले आहे. ‘हल्दी-टेक’ उपकरणाच्या मदतीने हळद साफ करणे, धुणे आणि वाळवून त्याची पूड करणे ही काही दिवस चालणारी प्रक्रिया केवळ एका दिवसात करण्याची किमया साधते. ‘मोबाईल बेस्ड हेल्थ केअर’ उपकरणाच्या मदतीने शासनाला, दुर्गम भागातील गर्भवती महिलांना आरोग्य सेवा चांगल्या प्रकारे देता येणार आहे, तर ‘रेडिएशन’ आणि रसायन यांपासून दंत-चिकित्सकाचे संरक्षण करण्यासाठी ‘डेंटल एक्सरे’ उपयोगी ठरणार आहे. त्याशिवाय डाळी आणि अन्नधान्य यांसाठी ‘पोस्ट हार्वेस्टिंग ड्रायर’, ‘केअर मदर कीट’, पाणी-शुद्धिकरणाची प्रक्रिया करणारे, शालेय स्तरावर चाचणी झालेले, ‘अल्ट्रा हेल्थ वॉटर फन स्टेशन’ अशी काही उपकरणे ‘एस फॉर एस’ने विकसित केली आहेत.

‘सायन्स फॉर सोसायटी’चा प्रत्येक सदस्य वेगवेगळी भूमिका पार पाडतो. उदाहरणार्थ, ‘डेंटल एक्सरे’ विकसित करत असताना, डॉ.शीतल सोमाणीला तिचा कल ‘बिझनेस आणि मार्केटिंग’ क्षेत्राकडे जास्त असल्याचे जाणवले. ती आता व्यवसाय व्यवस्थापनाचे शिक्षण घेऊन, ‘एस फॉर एस’ची व्यावसायिक धुरा सांभाळते. डॉ.शीतल मुंडे यांच्यावर संस्थेच्या प्रकल्पांचा सामाजिक परिणाम लक्षात घेऊन, सामाजिक दृष्ट्या ते अधिक परिणामकारक कसे करता येतील, या बाबत अभ्यास करण्याची जबाबदारी आहे. गोपाल तिवारी हे औरंगाबादमध्ये राहून ‘व्यवसाय आणि अभियांत्रिकी’ शाखा सांभाळतात. स्वप्नील कोकाटे, शंतनू पाठक आणि आदित्य कुलकर्णी यांच्याकडे ‘इनोव्हेशन’ची, तर गणेश भेरे यांच्याकडे ‘विश्लेषणाची’ जबाबदारी आहे. शासकीय तसेच खासगी संस्थांनी दिलेल्या आर्थिक पाठबळाबरोबर शाश्वत ऊर्जा क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या पुण्याच्या ‘आरती’ या संस्थेच्या प्रमुख, डॉ. प्रियदर्शिनी कर्वे यांचे मार्गदर्शन ‘सायन्स फॉर सोसायटी’च्या वाटचालीत मोलाचे ठरले आहे असे शीतल सोमाणी यांनी सांगितले.

भारतात समस्यांची विविधता व गुंतागुंतहीआहे, त्याचबरोबर नैसर्गिक साधनसामुग्रीची मुबलकताही आहे. विज्ञान आणि सामाजिक संवेदना यांचा मिलाफ साधून, समस्यांचे निवारण करण्यासाठी साधनांचा योग्य वापर केला, तर खऱ्या अर्थाने प्रगती समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत झिरपेल. ‘सायन्स फॉर सोसायटी’ हया संस्थेच्या सदस्यांची तीच धडपड आहे!

उच्च शिक्षण म्हणजे लठ्ठ पगाराची नोकरी आणि सुखासीन जीवन, हाच प्रगतीचा मंत्र असताना, शाश्वत ऊर्जेच्या मदतीने सर्वसामान्यांचे जीवन सुखकर करण्याची हया उद्यमशील तरुणांची कामगिरी आश्वासक आहे!

– राजश्री आगाशे

About Post Author

2 COMMENTS

  1. सर आपल्याला प्रथम मानचा मुजरी
    सर आपल्याला प्रथम मानाचा मुजरा. आपले संशोधन हे शेतक-यांसाठी एक अनमोल ठेवा आहे. मला सोलर डायर पाहिजे असल्यास कोणाला संपर्क करावा? त्याची किमंत काय? माझा मो. नं. ९४२२२३४३३४

  2. Salute to New concept sir .go
    Salute to New concept sir. Go ahead. God is with you. mob…no…9960086700

Comments are closed.