बोर्डाची परीक्षा – गणिताची भीती!

0
39

शालेय विद्यार्थ्यांना गणिताची भीती का वाटते? त्यांना गणिताचा अभ्यास नकोसा का वाटतो? त्यांना परीक्षेत गणितात नापासच होणार, याची खात्री का वाटते? त्यांच्यात न्यूनगंड का निर्माण होतो? प्रश्न अनेक पण उत्तर एकच. गणिताचा पाया कच्चा असतो म्हणून!
गणिताचा पाया म्हणजे नक्की काय? आणि तो कच्चा म्हणजे काय?

नववीच्या/दहावीच्या मुलांनी केलेली ही काही उदाहरणे :-

1. सत्तावन्न ही संख्या अंकात 75 अशी लिहिली.
2. 321 आणि 198 मधील मोठी संख्या 198.
3. 2+11+13 ही बेरीज करताना 2 च्या पुढे 11 बोटे मोजली त्यानंतर 13 बोटे. हातापायांची बोटे मोजून झाली तरीही उत्तर येईना.
4. 8×2=…. 4 का 16 हे खात्रीपूर्वक सांगता आले नाही.

5.              71
                 – 8
             ——-
              = 77

6. 13 × 0=13, 13+0=0

                   4
7.        2 )  98
               –   8
           ———
                 90       

                8
8.             19
            ×    2
            ——-
           = 101

9. 100 – 36 ही वजाबाकी कशी केली पाहा.            

          9
          100
       –  36
      ——–
          660
 
काय? धक्का बसला? विश्वास नाही बसत? माझाही नसता बसला. पण गेली दहा वर्षें मला स्वतःला असे अनेक धक्कादायक अनुभव सतत येत आहेत. हे अनुभव कोणी दिले? नववी-दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी. विद्यार्थी कोणते? पुणेमुंबईसारख्या मोठ्या शहरात शिकणारे. त्यांचे पालक? बरेचसे सुशिक्षित आणि आर्थिक दृष्ट्या स्थिरावलेले. त्यांच्या शाळा? अत्यंत नावाजलेल्या; शिवाय, क्लासला जाणारे ते विद्यार्थी!

सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे, त्यांच्या पालकांना वाटते, की त्यांची मुले घाईगडबडीमुळे ‘सिली मिस्टेक्स’ करतात. पण ती त्यांची फारच चुकीची समजूत आहे. अशा वेळी सर्वांनाच ओरडून सांगावेसे वाटते, की घाई गडबडीमुळे झालेल्या या ‘सिली मिस्टेक्स’ नाहीत. त्या तर गणितातील मूलभूत चुका. मुले फक्त आकडेमोड करताना चुकत नाहीत तर आकडेमोड करण्याची पद्धतही चुकतात. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या गणितांतील काही मूलभूत संकल्पना, तोच तर गणिताचा पाया! विद्यार्थ्यांचा गणिताचा पाया एवढा कच्चा का? आणि कशामुळे? मुले गणित करताना नेमके काय चुकतात? कशा भयंकर (हो! भयंकरच) चुका करतात ती बहुतांश पालकांना ते माहीतच नसते.

बालकाच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास करायचे नाही! परीक्षेतील मूल्यांकनाचा आराखडा शासनाने ठरवला आहे!

कोणताही विद्यार्थी त्या आराखड्यानुसार पास होतोच! त्यामुळे काही विद्यार्थी अप्रगत राहतात. ते अप्रगत विद्यार्थी नववी/दहावीत येतात. नववी/दहावीची अभ्यासक्रमाची काठिण्यपातळी आठवीच्या अभ्यासक्रमापेक्षा उच्च आहे. त्यांना नववीचा अभ्यास झेपत नाही, असे विद्यार्थी कसेबसे दहावीत पोचतात. मात्र काही शाळा दहावीच्या निकालाकडे लक्ष ठेवत नववीतच काही मुलांना नापास करतात. पालक पण नववीत नापास झालेल्या त्यांच्या मुलाचे नाव शाळेतून काढतात आणि एखाद्या क्लासमधून दहावीचा अभ्यास सुरू करतात. असे हे सर्वच विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला बसायला सज्ज होतात!

दहावीच्या पाठयपुस्तकातील अशी अनेक गणिते आहेत, की ज्यांच्या एक/दोन पायऱ्या या खास दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत. पुढील सर्व पायऱ्या पाचवी ते सातवी किंवा त्याहूनही खालील इयत्तांच्या अभ्यासक्रमांवर आधारित आहेत. त्यामुळे दहावीच्या एक-दोन पायऱ्या समजून घेतल्यावर, मुलांना खरे तर दहावी गणितात पास होणे, अगदी सोपे व्हायला पाहिजे. पण तसे होत नाही. मुलांना सातवीपर्यंतच्या गणिताच्या अभ्यासक्रमातील, अगदी सोपा भागसुद्धा येत नाही. त्यामुळे दहावीचे गणित येत नाही म्हणून मुले गणितात नापास होतात.

पाचवी ते सातवीला शिकवणारे शिक्षक डी.एड. झालेले असतात. गणित हा विषय त्यांचा बारावीला असतोच असे नाही. त्यामुळे त्यांच्यात गणित विषयाबद्दल काही कमतरता असू शकते. त्यांना गणित विषय शिकवण्यासाठी त्रास होऊ शकतो, पण तरीही त्यांना पाचवी ते सातवीच्या मुलांना गणित शिकवावेच लागते. सहाजिकच, विद्यार्थ्यांचा गणिताचा पाया कच्चा राहू शकतो.

दहावीचे शिक्षक म्हणतात, आम्ही पाचवी-सहावीचे गणित हेच शिकवत बसलो, तर आमचा अभ्यासक्रम पूर्ण कसा होणार? या सर्वाचा परिणाम? विद्यार्थ्यांच्या गणितातील मूलभूत संकल्पना स्पष्ट होत नाहीत. त्यामुळे त्यांनी केलेली बरीचशी गणिते चुकत जातात आणि ते नापास होतात.

अशा बिकट परिस्थितीत विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत गणित विषयात पास व्हायचेच असते आणि शाळा, बोर्ड, पालक यांना काहीही करून, मुलांना पास करायचेच असते आणि म्हणून सर्वजण विविध उपाय करत असतात. काही पालक औषधांच्या जाहिराती वाचतात, मित्र-मंडळींशी चर्चा करतात. कोणी काय, कोणी काय सुचवतात. मग तसे उपचार करून बघतात. काही पालक अमूक क्लास- तमूक क्लास अशी धावाधाव सुरू करतात. विद्यार्थी कॉपी करण्यासाठी विविध मार्ग शोधतात.

शाळा त्यांच्या हातात असलेले अंतर्गत गुण भरभरून वाटणे, शाळेत शुभेच्छा सोहळा आयोजित करणे, मुलांना परीक्षा केंद्रावर औक्षण करणे, कॉपी करणाऱ्या मुलांकडे दुर्लक्ष करणे. असे उपाय शाळा करते.

बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक सात/आठ महिने अगोदर जाहीर करणे, गणिताच्या पेपरला दोन दिवस आधी सुटी मिळेल असे वेळापत्रक आखणे, प्रश्नपत्रिका सोपी काढणे, पाठयपुस्तकातील पन्नास टक्के प्रश्न जसेच्या तसे घालणे, प्रश्नपत्रिकेत विकल्पासह सर्वच प्रश्न घालणे, उत्तरपत्रिका फार सोपी तपासणे, मुलांनी केलेल्या चुकांकडे दुर्लक्ष करणे, प्रत्येक पायरीला गुण देणे, प्रश्नपत्रिकेतील एखादा प्रश्न चुकीचा विचारला गेला असल्यास त्याचे सर्वच गुण देणे, गणित व विज्ञान एकत्रित पास करणे, ग्रेस गुण देणे शासन किंवा बोर्ड करते.

असे एक ना अनेक उपाय, गोपनीय पण सत्य! हे सगळे उपाय म्हणजे वरवरची मलमपट्टी. पण त्यामुळे बरीचशी मुले बोर्डाच्या परीक्षेत गणितात पास होतात हे सत्य, पण त्या विद्यार्थ्यांचे गणित सुधारत नाहीच. गणितात नापास होण्याचे मूळ कारण शोधले जात नाही म्हणून त्यावर योग्य उपचार होत नाहीत. अशा विविध उपायांनी विद्यार्थ्याला गणिताच्या पेपरात सत्तर टक्के गुण मिळाले, तरी त्याला बऱ्यापैकी गणित येते असे म्हणायचे धाडस होत नाही. म्हणूनच गणित सुधारण्यासाठी, गणितात खरेच पास होण्यासाठी, ‘गणिताचा पाया भक्कम करणे’ हा एकमेव उपाय आहे, अन्य कोणता उपाय होऊ शकत नाही.

– मनीषा लिमये

About Post Author