Home व्यक्ती आदरांजली बाळकोबा भावे – विनोबांचे अनुज

बाळकोबा भावे – विनोबांचे अनुज

बाळकोबा हे विनोबा भावे यांचे धाकटे बंधू. त्यांचे औपचारिक शिक्षण इयत्ता पाचवीपर्यंतच झाले होते. ते गांधीजींच्या उरळी कांचन या निसर्गोपचार आश्रमाचे शिल्पकार म्हणून त्यांचा लौकीक मोठा आहे. त्यांनी ब्रह्मसूत्र व पातंजल योगदर्शन यांसारख्या ग्रंथांचे संपादन केले आहे. त्यांनी त्यांतील अनावश्यक भाग वगळला व ग्रंथाचा नवा आशय प्रतिपादित केला. त्यांनी गीतेवरही विस्तृत भाष्य लिहिले आहे. बाळकोबांनी गांधीजी आणि विनोबा यांच्या तत्त्वज्ञानाचे स्वतंत्र आकलन मांडले आहे. त्यांनी ‘अभंग व्रते’ या शीर्षकाने विस्तृत ग्रंथ लिहिला. गांधीजींची एकादश व्रते आणि विनोबांनी त्यावर लिहिलेले पद्यबद्ध निरुपण हा त्या ग्रंथाचा विषय आहे. त्या त्यांच्या संकीर्ण लेखनात मुख्यत्वेकरून आरोग्य, निसर्गोपचारविषयक चिंतन, आठवणी आणि मुख्य म्हणजे त्यांचा रसरशीत पत्रव्यवहार आहे. बाळकोबा यांचे सारे लेखन हिंदी व गुजराती भाषांत आहे. त्यांनी मराठीतून अतिशय अल्प व गौण वाटाव्या अशा विषयांवर लेखन केले आहे. त्यांना शिल्प आणि संगीत या कलांत गती होती. त्या शिक्षणासाठी त्यांना बडोदा येथे पाठवण्यात आले होते. त्यांनी संगीत आणि मृद्कला यांचा अभ्यास केला; मातीचे पुतळे तयार करण्याची विद्या आत्मसात केली.

बाळकोबा यांचा जन्म त्यांच्या आजोळी, जमखंडी नावाच्या कर्नाटकातील संस्थानात, 18 जून 1900 रोजी झाला. बाळकृष्णाला विनोबांच्या विद्वत्तेचे आकर्षण आणि त्यांच्या वैराग्याचे अध्ययन करावेसे वाटे. त्यांना विनोबांकडे जाऊन गीता शिकावी अशी इच्छा होती, पण त्यांना तो योग लाभला नाही. विनोबा युवावस्थेत गृहत्याग करून गांधी आश्रमात गेले होते. बाळकोबाही त्यांच्या पाठोपाठ निघाले, मात्र विनोबांनी त्यांना माघारी पाठवले. ते घरी तीन वर्षे थांबले, मग त्यांनी गांधीजींशी थेट पत्रव्यवहार केला आणि ते आश्रमात पोचले ! तेव्हा ते एकोणीस वर्षांचे होते. त्यांचा आश्रमात कटाक्ष सर्वांनी वेळेवर हजर राहवे, कामचुकारपणा करू नये यावर असे. ती शिस्त बाळकोबा यांच्या स्वत:वरही कठोरपणे लागू होई. त्यांची अवस्था आहार कमी आणि परिश्रम अधिक अशी होती. त्यामुळे ते बहुधा आजारी पडू लागले. पुढे, त्यांना क्षयाने गाठले. गांधीजींनी बाळकोबांना उपचारार्थ थंड हवेच्या ठिकाणी पाठवले. त्यांची यथायोग्य व्यवस्था सेवाश्रमात स्वतंत्र कुटी उभारून केली. गांधीजींनी स्वत: बाळकोबांची शुश्रूषा सेवाग्रामला केली.

गांधीजी निसर्गोपचाराचे महत्त्व जाणत होते. त्यांचे प्रयत्न त्या कार्याला गती मिळावी या दिशेने अखंड चालू होते. ते सेवाग्रामहून पुण्याला आले. त्यांनी सोबत बाळकोबांना घेतले. पुण्यानजीक उरळी कांचन येथे कुटी उभारून त्यांच्या तेथे राहण्याची योजना आखली. गांधीजींना उरळी कांचनचे स्थान भावले. गांधीजींनी निसर्गोपचार आश्रमाची स्थापना 1946 साली करून त्याची जबाबदारी बाळकोबांवर सोपवली. मणिभाई देसाई आणि बाळकोबा यांनी त्यांचे आयुष्य निसर्गोपचार आश्रम संस्थेच्या उत्कर्षाकामी समर्पित केले.

बाळकोबा यांचे उरळी कांचन येथील निसर्गोपचार केंद्रात मोठे सेवाकार्य झाले. गांधीजींनी डॉ. जस्‍ट यांचे ‘रिटर्न टू द नेचर’ हे पुस्‍तक वाचले. या पुस्‍तकामुळे त्‍यांनी पाणी व मातीचे प्रयोग केले. त्‍यांना हवे तसे परिणाम दिसून आले व त्यामुळे ते आनंदित झाले. भारतात परतल्‍यावर त्‍यांनी ग्रामसफाई आणि निसर्गोपचार या विषयात लक्ष घातले. स्‍वातंत्र्यलढ्याच्‍या धुमश्‍चक्रीत त्‍यांना सवड मिळाली नसली तरी त्‍यांचे या विषयावरील चिंतन सतत सुरू असे. ते आणि वल्‍लभभाई पटेल 1946 साली तीन महिन्‍यांसाठी पुणे येथील डॉ. दिनशा मेहता यांच्‍या निसर्गोपचार केंद्रात उपचारार्थ थांबले होते.

गांधीजींनी ‘ऑल इंडिया नेचर क्‍युअर फाउंडेशन’ची स्‍थापना 1 जानेवारी 1946 रोजी पुणे येथे केली. गांधीजींनी हा आश्रम खेड्यात‍ नेण्‍याविषयीची त्यांची इच्‍छा ‘हरिजन’ मासिकातून प्रदर्शित केली. बाळकोबांनी उरळी कांचन या खेड्याचा (त्‍या काळातील) परिचय करून दिला होता. गांधीजी बाळकोबा आणि अन्‍य साथीदारांसमवेत उरळी कांचनला 22 मार्च 1946 रोजी आले. उरळी कांचन येथे तो दिवस दरवर्षी उत्‍सवासारखा साजरा केला जातो. गांधीजींच्‍या समवेत चरखा संघ, कस्‍तुरबा ट्रस्‍ट वगैरे संस्‍थांमधील जवळपास दीडशे कार्यकर्ते हजर होते. बाळकोबांसाठी निवासस्‍थान व अन्‍य भवनांची निर्मिती तेथे करण्‍यात आली. आश्रमात गोशाळा व शेतीही होती. बाळकोबांनी निसर्गोपचार केंद्राकरता मदत गोळा करण्‍यासाठी खूप प्रयत्‍न केले. ते महाराष्‍ट्रासह देशविदेशांत हिंडले. त्‍यांच्‍या परिश्रमामुळे संस्‍थेला आर्थिक बळकटी लाभली. बाळकोबांना उच्‍चविद्याविभूषित कृष्‍णचंद्र अग्रवाल यांची साथ लाभली. तो आश्रम खूप प्रगतिपथावर आहे.

बाळकोबांची मूळ वृत्ती साधकाची होती. त्यांच्या निसर्गोपचाराच्या प्रत्यक्ष कार्यात आणि ते ती कामे ज्यांच्या मार्फत करवून घेणार होते त्या त्यांच्या सहकाऱ्यांशी साधलेल्या व्यवहारात बाळकोबांची विनम्रता, सरलता, प्रेमभाव, सत्यनिष्ठा यांसारखे गुण व्यक्त होतात. त्यांचा विश्वास संकल्पशक्तीवर होता. त्यांनी गीतेचे अध्ययन आत्मबलाने केले. गीता वाचताना ज्या ज्या शंका त्यांच्या मनात उभ्या राहिल्या त्यांचे निरसन त्यांना ब्रह्मसूत्र, शांकरभाष्य या ग्रंथांत करून घेता आले. त्यांनी गीता, योगसूत्र, ब्रह्मसूत्र यांसारख्या महान ग्रंथांच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून ती तत्त्वे आत्मसात केली होती. त्यांना त्या भाष्यातील कित्येक भागांच्या वाचनादरम्यान भावावस्थेचा, म्हणजे समस्त चराचर सृष्टीत ईश्वरदर्शनाचा अनुभव येऊ लागला. त्यांनी तत्त्‍वज्ञान विषयाचे त्यांच्या पद्धतीने चिंतन व मांडणी केली आहे.

छगनलाल जोशी म्हणतात, “गांधीजी बाळकोबांना मूर्तिकलेच्या विशेष अभ्यासासाठी लंडनच्या स्कूल ऑफ आर्ट्समध्ये पाठवण्याचा विचार करत होते. पण बाळकोबा तर आश्रमाच्या वातावरणात ओतप्रोत होऊन गेले होते ! त्यांनी सूतकताई, पिंजण या कलांतही कौशल्य संपादन केले होते. बाळकोबा यांचे योगदान होतकरू आणि प्रखर देशभक्तांना खादीविद्येचे प्रशिक्षण देण्यासाठी प्रत्यक्षाप्रत्यक्ष स्वरूपाचे होते.”

बाळकोबा यांचा सतार या वाद्यावर चांगला अधिकार होता. त्यांनी आश्रमीय भगिनींना, विशेषकरून कुसुमबेन अदाणी आणि राधाबेन यांना वादनाचे प्रशिक्षण दिले होते. गांधीजी एका पत्रात लिहितात, “बाळकृष्ण (बाळकोबा) ही भगवंताने मला अर्पिलेली महान भेट आहे. ते पुष्पासारखे निर्दोष आहेत. मला मातेसारखे जपतात.” तर आचार्य विनोबा म्हणतात, “बाळकोबा हे माझे अनुज आहेत. वयात माझ्यापेक्षा पाच वर्षांनी लहान आहेत. त्यांच्याहून तीन वर्षांनी लहान एक बंधू आहेत, शिवाजी. त्या दोघांची जीवने परमार्थ-परायण आहेत. असे बंधू लाभल्यामुळे मी स्वत:ला धन्य मानतो.”

बाळकोबांना पक्षाघात 1980 मध्ये झाला. त्यांचे उजवे शरीर बधिर झाले. त्यामुळे पत्रलेखनात अडचण निर्माण झाली. त्यांच्याकडून अखेरचे पत्र महेंद्रकुमार गोयंका यांना 14 जुलै 1980 रोजी प्राप्त झाले आहे. बाळकोबांचा मृत्यू 27 ऑगस्ट 1981 रोजी ओढवला.

– विश्वास पाटील 9767487483 / 9403848907 vishwaspatil52@gmail.com
(मराठी संशोधन पत्रिका – ऑक्टोबर-नोव्हेंबर-डिसेंबर 2019 वरून उद्धृत, संपादित-संस्कारित)

About Post Author

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version