बाबुराव अर्नाळकरांच्या रहस्यकथांचे गारुड

3
180
_Baburao_Arnalkar_1.jpg

काही लेखक-कवींनी मराठी साहित्यविश्वात चमत्कार वाटावा असे काम करून, त्यांचे नाव त्या त्या साहित्यप्रकाराशी कायमचे जोडून ठेवले आहे. तसे, रहस्यकथाकार म्हटले की बाबुराव अर्नाळकर यांचे नाव तोंडात येते. बाबुरावांनी मराठी आद्य रहस्यकथा-कादंबरी लिहिली. त्यांनी उण्यापुऱ्या चाळीस वर्षांत एक हजार चारशेसत्तरच्या वर रहस्यकथा लिहिल्या! त्यांनी इंग्रजी पुस्तकांवरून स्फूर्ती घेऊन, त्यावर मराठी मातीत/संस्कृतीत रूजणाऱ्या रहस्यकथा लिहिल्या. त्यांनी ‘झुंजारराव’, ‘काळा पहाड’, ‘धनंजय’ अशी काल्पनिक पात्रे निर्माण केली. ती लोकांना इतकी आवडली, की प्रसिद्ध चित्रपट निर्माते व्ही. शांताराम यांनी ‘धनंजय’ नावाचा चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला, तर प्रसिद्ध संगीतकार सी. रामचंद्र (चितळकर) यांनी बाबुरावांच्या ‘धनंजय’वर चित्रपट निर्माण केला व त्यामध्ये स्वत:च काम केले. मात्र तो चित्रपट सपशेल आपटला.

बाबुरावांचे निधन १९९६च्या जुलैमध्ये झाले. ते आजारपणाची शेवटची काही वर्षें सोडली तर सतत लिहीत होते. त्यांनी रहस्यकथांव्यतिरिक्त मराठी नाटके, ललित कथा, निबंध वगैरे प्रकार हाताळले. पण ते फार कोणाला माहीत नाही; ना कोणी त्यांचे ते साहित्य वाचले. त्यामुळे त्यांच्या लिखित पुस्तकांची संख्या आणखी वाढते.

मराठी मुले साधारणपणे १९५०च्या आजुबाजूची दोन-तीन दशके या काळात शाळेत शिकून वाचू लागली, की बाबुरावांच्या न्यूजप्रिंटवर छापलेल्या रहस्यकथांत रमून जात आणि ‘धनंजय’, ‘काळा पहाड’ या काल्पनिक हेर-नायकांच्या गूढ, अद्भुत जगात हरवून जात. त्यांना गुन्हेगारी मनाचा परिचय होई व चांगल्या मूल्यांचा संस्कार होई. त्या कथांची मुलांकडून पारायणे होत. मग ती पुस्तके त्यांच्या मित्रांमध्ये फिरू लागत.

मराठी वाङ्मयात रहस्यकथांना मान व किंमत नव्हती, वि.स. खांडेकरांनी तर तशा प्रकाराला साहित्य म्हणण्यालाच विरोध केला होता. पण आचार्य अत्र्यांनी बाबुरावांचे कौतुक केले आहे. त्यांनी असा माणूस साहित्यसंमेलनाचा अध्यक्ष व्हावा असे उद्गार काढले होते.

बाबुरावांचे एक चाहते (फॅन) विभाकर कर्वे यांचे नुकतेच निधन झाले. ते कल्याणला राहत. त्यांच्याकडे बाबुरावांच्या सर्व पुस्तकांचा संग्रह आहे. बरीच पुस्तके त्यांची तोंडपाठ होती. त्यांनी बाबुरावांचे चरित्र लिहिण्याचा प्रयत्न केला, पण तो यशस्वी झाला नाही. विभाकर कर्वे यांनी बाबुरावांचे गिनिज बुकमध्ये नाव येण्यासाठी प्रयत्न केले. बाबुराव स्वत: प्रसिद्धीविषयी उदासीन होते. ते त्यांच्या लिखाणाच्या कामात मग्न असत. विभाकर कर्वे यांनी स्वत: होऊन ‘गिनिज बुक ऑफ बुक रेकॉर्ड’चा फॉर्म व माहिती पाठवली. साहजिकच, त्यांचे गिनिज बुकमध्ये नाव आले. ब्रिटिश सरकारने त्यांचे कर्तृत्व बघून त्यांना कुलाब्याला घरासाठी व लेखनासाठी जमीन ऑफर केली होती, पण बाबुरावांनी तिचा स्वीकार केला नाही. बाबुराव अर्नाळकरांना पुस्तकांचे मानधन कधी मिळे-कधी काही मिळत नसे, पण त्यांनी त्याची पर्वा केली नाही. त्यांना त्यांची पुस्तके बाजारात येतात- वाचकांपर्यंत जातात यामध्ये समाधान असे. ते व्यावहारिक गरजांसाठी नोकरी करत असत.

बाबुरावांनी गांधी-नेहरूंची भाषणे ऐकून स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली. त्यांत ते पकडले गेले. त्यांना अठरा महिन्यांची शिक्षा झाली. घरी आई-बहिणी बाबुरावांच्यावर अवलंबून होत्या. त्यांचे हाल झाले. मात्र त्यांना तुरुंगातून सुटल्यावर योगायोगाने जीवनध्येय सापडले. ते रहस्यकथांच्या वाटेवर चालत राहिले.

बाबुराव अर्नाळकरांच्या रहस्यकथा पौगंडावस्थेतील विशिष्ट वयातच मोहिनी घालत, मग विसरल्या जात. परंतु चित्रकार सतीश भावसार यांचे तसे झाले नाही. ते बाबुरावांच्या रहस्यकथांनी भारलेले राहिले. त्यांनी कर्वे यांना जमले नाही, ते केले. त्यांनी अर्नाळकरांचे उपलब्ध चरित्र व त्यांच्या कादंबऱ्या व अन्य माहिती एका ग्रंथात संकलित केली आहे. त्याचे दणदणीत मोठे पुस्तक तयार झाले आहे. भावसार साहित्यविश्वात नावाजलेले ‘मुखपृष्ठ चित्रकार’ आहेत. त्यांनी सुमारे पाच हजार पुस्तकांची मुखपृष्ठे चितारली आहेत. त्यांनी शालेय वयात बाबुरावांचे ‘सुवर्णकारांचे रहस्य’ हे पुस्तक प्रथम वाचले होते. भावसार यांनी त्यांच्या चारशेच्यावर कादंबऱ्या वाचल्या आहेत. भावसार बाबुरावांची माहिती गेली चार वर्षें गोळा करत होते. त्यांनी विभाकर कर्वे यांच्या भेटी घेतल्या. बाबुरावांची मोठी कन्या पुष्पा हिची भेट घेतली. बाबुराव अर्नाळकरांनी स्वत:चे आत्मचरित्र लिहिण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांची मजल छापील पंचवीस पानांपुढे गेली नाही. भावसार यांनी ‘वैतरणेच्या काठावरून’ ही त्या आत्मचरित्राची पाने त्यांच्या कन्येकडून मिळवली.

भावसार सांगू लागले, “‘डिटेक्टिव्ह रामराव’, ‘धनंजय’, ‘सुदर्शन’, ‘फु मांचू’ यांसारखे सुमारे शंभर मानसपुत्र बाबुराव अर्नाळकरांनी त्यांच्या रहस्यकथांमधून जन्माला घातले आहेत. त्यांतील जास्त नावाजले गेलेले म्हणजे ‘झुंजार’, ‘काळा पहाड’. मी १९८६ मध्ये पुण्याहून चित्रकलेचे पदवी शिक्षण घेऊन पुढील वाटचालीसाठी मुंबईत आलो. पुस्तकांची व चित्रकलेशी संबंधित कामे कालांतराने मिळत गेली. आयुष्य स्थिरावत गेले. पण कामाच्या त्या धबडग्यातही बाबुराव अर्नाळकरांच्या लेखनाने मला घातलेली मोहिनी काही केल्या उतरायला तयारच नव्हती.

“मी लहानपणापासूनच बाबुराव अर्नाळकरांची पुस्तके वाचत होतो. मुंबईत आल्यानंतर त्यांची पुस्तके मिळवून ती वाचण्याचा सपाटा आणखी वाढला. त्यांना प्रत्यक्षात भेटण्याचा योग मला आला नाही. मात्र बाबुराव अर्नाळकरांच्या पिढीतील कोणी व्यक्ती भेटली, की मी हमखास त्यांच्याकडे बाबुरावांच्या पुस्तकांचा विषय काढायचो. मग ते गृहस्थ त्या पुस्तकांच्या आठवणीत रंगून जायचे. कोणाकडे बाबुरावांच्या रहस्यकथांची दोनशे पुस्तके संग्रही असायची, तर कोणाकडे चाळीस. पण त्यांनी ती निगुतीने जपून ठेवलेली असायची. त्यांतील एखादा तो अर्नाळकरांना कसा भेटला, त्यांच्याशी काय बोललो, याच्या आठवणी सांगण्यात रंगून जायचा. मी बाबुरावांविषयी जी जी माहिती मिळेल ती गोळा करत होतो. तो ध्यासच लागला होता.

“२०१२ मधील गोष्ट असेल. मुंबईतील प्रभादेवी येथे ‘लोकवाङ्मय गृह’ या प्रकाशनसंस्थेच्या कार्यालयात गेलो होतो. तेथे अरुण शेवते, प्रकाश विश्वासराव व मी गप्पा मारत बसलो होतो. ‘लोकवाङ्मय गृह’च्या एका कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल बोलणे चालू होते. त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा कोणाला बोलावायचे असा विषय निघाला. मी चटकन बोलून गेलो, की बाबुराव अर्नाळकर आज असते तर मी त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले असते. माझे ते उद्गार ऐकून विश्वासराव व शेवते यांना आश्चर्य वाटले. मग मी त्या दोघांना बाबुराव अर्नाळकरांबद्दल माझ्याकडे जी जी माहिती होती ती सांगत राहिलो. बाबुराव अर्नाळकर या विषयाने मला पछाडले आहे, हे लक्षात येताच विश्वासरावांनी मला त्या विषयावर पुस्तक लिहिण्यास सांगितले व त्यासाठी एक वर्षाची मुदतही दिली. मला ते सारे अकल्पित होते. ‘लोकवाङ‌्मय गृह’ने हा प्रकल्प सुचवल्यानंतरची पुढील तीन वर्षें माझ्याकडे अर्नाळकरांविषयी पुरेशी माहिती जमा होऊ शकली नाही. त्यांनी कालांतराने अर्नाळकरांवरील मोठ्या पृष्ठसंख्येचे पुस्तक छापणे शक्य नाही असे कळवले. पण ‘राजहंस’च्या दिलीप माजगावकरांनी तो विषय उचलला आणि संपादक सदानंद बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘निवडक बाबुराव अर्नाळकर’ या पुस्तकाला आकार येत गेला.”

_Baburao_Arnalkar_2.jpgबाबुरावांचा जन्म ९ जून १९०६ रोजी मुंबईला झाला. ते मूळ ठाणे जिल्ह्यातील वसई तालुक्यातील अर्नाळा गावचे. त्यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या आधी ब्रिटिश सरकारात ‘रिक्रुटमेंट अधिकारी’ म्हणून नोकरी केली. त्यांचे इंग्रजी चांगले होते. त्यांनी महायुद्ध संपल्यावर चष्म्याचे दुकान काढून व्यवसाय सुरू केला.

त्या वेळी गिरगावात प्रिटिंग प्रेस बरेच होते, पण त्या मानाने लिहिणारे लोक कमी होते. गिरगावात गायवाडीमध्ये लेखक व अभिनेते बबन प्रभू यांच्या वडिलांचा प्रिटिंग प्रेस होता. ते बाबुराव अर्नाळकरांचे मित्र होते. त्यांनी प्रेसला काम कमी असल्यामुळे बाबुरावांना पुस्तक लिहिण्याची विनंती केली. बाबुरावांनी एका इंग्रजी रहस्यकथेचे मराठी भाषांतर केले, त्याचे नाव होते ‘चौकटची राणी’! प्रभू यांनी त्या पुस्तकाच्या एक हजार प्रती छापल्या. त्यांनी बेकार मुलांना हातगाडीवर पुस्तके ठेवून, वेगवेगळ्या भागांत जाऊन पुस्तके विकण्याची व्यवस्था केली. रहस्यकथा हा प्रकार उत्कंठावर्धक असल्यामुळे वाचकांनी तो उचलला व त्यांनीच अर्नाळकरांच्या पुस्तकांची तोंडी प्रसिद्धी केली. त्यांचे पुस्तक असे ‘व्हायरल’ झाले. मग प्रभू यांनी पुस्तकाच्या आणखी प्रती पुन्हा छापल्या. अशा तऱ्हेने, सुरुवातीच्या दोन-चार महिन्यांत पाच हजार पुस्तके विकली गेली! बाबुरावांना लिहिण्याचा हुरूप आला. ते दर महिन्याला रहस्यकथांची दोन-तीन पुस्तके लिहू लागले. प्रत्येक पुस्तक सत्तर-ऐंशी पानांचे असे. आस्ते आस्ते, त्यांनी काल्पनिक पात्रे निर्माण केली. त्यांचा तो उपक्रम कितीतरी वर्षें चालू होता. त्यांना उपजत वाटावी अशी लेखनऊर्मी होती. पुढे त्यांनी लेखनिक ठेवला. बाबुराव भराभर बोलत, त्यामध्ये बदल/खाडाखोड नसे. त्यांचा मजकूर सांगण्याचा वेग अफाट होता, पण वाक्यांत कधी बदल करावा लागत नसे असे लेखनिकाने नमूद करून ठेवले आहे. बाबुरावांचे भाऊ मधुकर अर्नाळकर यांनीही बाबुरावांपासून स्फूर्ती घेऊन रहस्यकथा लिहिल्या.

बाबुरावांनी लिहिलेली ‘सतीची समाधी’ कथा ‘मनोरंजन’ मासिकात प्रसिद्ध झाली. ती त्यांची पहिली कथा. नाथ माधवांनी त्या कथेचे कौतुक केले. त्यांचा आवडता रहस्यकथाकार एडगर वॉलेस. त्याच्या शैलीची छाप त्यांच्या लेखनावर दिसते. चित्रकार रघुवीर मुळगावकर यांनी अर्नाळकरांच्या कथानायकांना चित्ररूप दिले. बाबुराव अर्नाळकरांना डोळ्यांचा विकार जडल्याने त्यांचे लेखन १९८८-८९ नंतर बंद झाले. त्यांचा मृत्यू ४ जुलै १९९६ रोजी झाला. त्यांना पाच मुलगे व तीन मुली. त्यांपैकी आता दोन मुली व एक मुलगा हयात आहेत.

बाबुरावांचे चरित्र वाचताना एक गंमत वाटली, की त्यांचे खरे नाव चव्हाण असून त्यांना बाबू या नावाने हाक मारत. ते लिहू लागल्यावर त्याचे झाले बाबुराव व ते अर्नाळ्याचे राहणारे असल्यामुळे त्याचे झाले अर्नाळकर. चित्रपटात जशी आकर्षक नावे घेतात तसाच तो प्रकार. भावसार संपादित ग्रंथात अर्नाळकरांच्या पुस्तकांतील जादू किंवा रहस्य उलगडण्याचा प्रयत्न अनेक नामवंतांनी केला आहे. त्यांतील बहुतेकांनी त्यांच्या बालपणी अर्नाळकरांच्या पुस्तकांनी त्यांना वाचनाची गोडी कशी लावली, त्यांतील रहस्य उलगडताना मजा कशी आली याबद्दल लिहिले आहे. निरंजन घाटे यांनी म्हटले आहे, की बाबुरावांचा कर्तृत्वाचा काळ १९५० ते १९७० पर्यंत असून त्यानंतर ‘स.अ. खाडिलकर आणि कंपनी’च्या नवीन रहस्यकथा आल्या. त्या लोकांना जास्त आवडू लागल्या. साहजिकच बाबुरावांच्या कथा निष्प्रभ झाल्या. खाडिलकरांनी इतरही अनेक लेखकांच्या रहस्यकथा आणल्या. सुहास शिरवळकर, नारायण धारप वगैरे मंडळी पुढे १९७१ पासून पुढे आली. बाबुराव तरीसुद्धा लिहीतच राहिले. त्यांची पुस्तके ‘रम्यकथा प्रकाशन’ छापून प्रकाशित करत. पुढे खाडिलकरांचीही लाट ओसरली. बाबुरावांनी मात्र त्यांचे सातत्य कायम ठेवले. दृष्टी अधू झाली, वृद्धत्व आले तोपर्यंत ते लिहितच राहिले.

गमतीचा भाग म्हणजे एरवी, बाबुरावांचा संत मंडळींत परिचय व उठबस असे. त्यांनी नित्यानंद स्वामी यांचे चरित्र लिहिले आहे. त्यांच्या चर्चा अनेक संतांबरोबर होत असत. त्यांनी इतरही भरपूर लेखन केले. त्यांची राहती इमारत पाडली गेल्यावर त्यांचे साहित्य कोठे व कसे विखुरले गेले याचा थांगपत्ता राहिला नाही. बाबुराव ज्या संत/आचार्य मंडळींच्या सहवासात आले त्यांची यादी या ग्रंथात आहे. तसेच, एक हजार तीनशेऐंशीपर्यंतच्या रहस्यकथांच्या पुस्तकाची यादी आहे. त्यांनी काही ललित पुस्तकेही लिहिली आहेत, त्यांची माहितीही या ग्रंथात दिली आहे. एक विशेष योग म्हणजे बाबुरावांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी आलेला संबंध. त्यावेळी बाबासाहेब त्यांचे शिक्षण संपवून मुंबईला नुकतेच आले होते. त्यांनी त्यांच्या पत्नीबरोबर परळला एका चाळीत बिऱ्हाड केले होते. त्यांच्या शेजारीच अर्नाळकरांचे मित्र राहत असल्यामुळे बाबुराव तेथे जात असत. त्यावेळी त्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या चेहऱ्यावरील ज्ञानाचे तेजोवलय जाणवत असे. आंबेडकर त्या वेळी जागतिक राजकारणावर बोलत. ते ऐकून सर्वजण आश्चर्यचकित होत. त्यांच्याविषयी सर्वजण आदराने बोलत, असे त्यांनी नमुद केले आहे.

मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना बाबुरावांच्या लिखाणाचे व उत्स्फूर्तपणाचे कौतुक होते, त्यांनी बाबुरावांना पनवेलजवळ पंधरा एकर जमीन देऊ केली होती. पण बाबुरावांनी कोठल्याही सरकारी योजनेचा कधी फायदा घेतला नाही. त्यांची वृत्ती निरीच्छ होती.

‘निवडक बाबुराव अर्नाळकर’ हा सतीश भावसार यांचा कागदाच्या डबल क्राऊन आकाराचा सातशे पानांचा ग्रंथ ‘राजहंस प्रकाशना’ने प्रसिद्ध केला आहे. पुस्तकाला नाटककार महेश एलकुंचवार यांची प्रस्तावना आहे. बाबुराव अर्नाळकर यांचे व्यक्तिमत्त्व व लेखनपैलू यांविषयी कुमार केतकर, रत्नाकर मतकरी, अभिराम भडकमकर, अंबरिश मिश्र अशा दहा प्रसिद्ध वाचकांनी त्यांचे अनुभव लिहिले आहेत. लता मंगेशकर यांनीही अर्नाळकरांविषयी लिहिले आहे.

बाबुराव अर्नाळकर आणि मंगेशकर कुटुंबीयांमध्ये स्नेहबंध होते. ते शेजारी राहत. मुंबईत ग्रँटरोड पश्चिमेला एकोणिसाव्या शतकामध्ये नाना शंकरशेठ यांनी बांधलेले शंकराचे देऊळ आहे. त्या देवळाच्या परिसरात धर्मशाळा होती. ‘गंधर्व नाटक मंडळीं’चा मुंबई दौरा असेल तेव्हा त्यांचा मुक्काम त्या धर्मशाळेत असे. त्या देवळाशेजारी जी चाळ होती त्यामध्ये मंगेशकर कुटुंब त्यांच्या आरंभकाळात वास्तव्य करून होते. मंगेशकरांच्या शेजारी बाबुराव अर्नाळकर राहत होते. बाबुरावांची मुलगी उषा व लता मंगेशकर त्या वेळी लहानग्या होत्या. त्या दोघी एकत्रित गाणे शिकण्यास जात.

चित्रकार सतीश भावसार यांनी लता मंगेशकर यांच्याकडून त्यांच्या अर्नाळकरांबद्दलच्या आठवणी मागवल्या. त्यांनी पत्र पाठवून दोन दिवस उलटले असतील. तिसऱ्या दिवशी भावसार यांच्या घरचा फोन वाजला. भावसार यांची मुलगी, सानिकाने फोन घेतला. लता मंगेशकर बोलत होत्या. त्यांनी अभिप्राय लिहून ठेवला होता! सतीश भावसार व त्यांची मुलगी सानिका लता मंगेशकर यांच्या निवासस्थानी गेले. त्यांचे आगतस्वागत झाले. ‘निवडक बाबुराव अर्नाळकर’ या ग्रंथासाठी लता मंगेशकर यांनी अभिप्राय लिहिलेले पत्र भावसार यांच्या हाती दिले. त्या अभिप्रायात लिहिले आहे, की ‘रहस्यकथा लेखक बाबुराव अर्नाळकरांबरोबर आम्हा मंगेशकरांचा, खास करून आमची आई- माई- हिचा परिचय होता. तिच्यामुळे आम्हा भावंडांना बाबुरावांच्या रहस्यकथा वाचण्याची आवड निर्माण झाली. ‘धनंजय’, ‘छोटू’, ‘झुंझार’, ‘काळा पहाड’ या रहस्यकथा आम्ही वाचलेल्या आहेत. आपण निर्माण करत आहात त्या ग्रंथाला आम्हा मंगेशकर भावंडांच्या मनापासून शुभेच्छा!’

बाबुरावांची दहा पुस्तके निवडून ती या ग्रंथात छापण्यात आली आहेत. ‘चौकटची राणी’ (बाबुरावांचे पहिले पुस्तक), सुवर्णकाराचे रहस्य यांचा त्यात समावेश आहे.

प्रकाशक – राजहंस प्रकाशन

पृष्ठसंख्या – ७००

मूळ मूल्य : – ७००/-

सवलत मूल्य : ‌- ५००/-

भावसार हे व्यवसायाने चित्रकार असले तरी त्यांना लिहिण्याची ऊर्मी असून त्यांनी आणखी दोन कलाकारांच्या चरित्रांची जुळवाजुळव केली आहे.

प्रभाकर भिडे, ९८९२५६३१५४

२०१ मैत्री रघुकूल, भगतसिंग रोड, डोंबिवली (पूर्व)

About Post Author

3 COMMENTS

  1. Chan mahiti,,mi pan vachat…
    Chan mahiti,,mi pan vachat ase baburao anrakar,zubjar rao ye aathvale,

  2. 1000 ve pustak mi wachle…
    1000 ve pustak mi wachle aahe. acharya atre wrote editorial on his novel. kalapahad, zunzar all the time exciting role in novel. ajun athavte tar rahasyakatha lekhak popular hote.

  3. छान वाटतय वाचुन की खुप लोक…
    छान वाटतय वाचुन की खुप लोक अशी माहिती गोळा करुन पुस्तक लिहितात
    Best of luck

Comments are closed.