बहामनी राज्य

_Bahmani_Rajya_1_0.jpg

अब्दुल मुजफ्फर अल्लाद्दिन हसन बहमन शहा हा बहामनी सत्तेचा संस्थापक. त्याने राज्यकारभारास सुरुवात केली 1347 मध्ये. तो हसन गंगू या नावाने इतिहासात प्रसिद्ध आहे. तो जफरखान या नावानेही ओळखला जातो. इराणचा प्राचीन राजा बहमुन याचा तो वंशज, म्हणून त्याला बहमन शहा हे नाव मिळाले अशी आख्यायिका आहे. त्याने दिल्लीचा सुलतान मुहंमद तुघलक याच्या सेनेचा पराभव केला. तुघलक याची सत्ता दुबळी झाली आहे असे पाहून दक्षिणेतील अनेक मुसलमान सरदारांनी स्वतंत्रपणे राज्यकारभार सुरू केला होताच. त्यांनी इस्माइल मख नावाच्या सरदाराला सुलतानपद दिले. त्यांची ती बंडाळी मोडून काढण्यासाठी मुहंमद तुघलक मोठी फौज घेऊन दक्षिणेत गेला. त्याने इस्माइल मखचा दौलताबादजवळ पराभव केला. पण त्याला गुजरातेत बंड त्याच वेळी उद्भवल्यामुळे तिकडे जावे लागले. त्याची काही फौज दक्षिणेत सिंदतन येथे राहिली. तेव्हा सरदार हसन गंगू याने त्या फौजेचा पराभव केला. तेव्हा इस्माइल मखने सुलतानपद सोडले. सर्व बंडखोर सरदारांनी हसन गंगूला सुलतान म्हणून निवडले. त्याने स्वत:ला दक्षिणेचा सुलतान म्हणून जाहीर केले आणि त्याची राजधानी गुलबर्गा येथे नेली. त्याने गुलबर्गा, कल्याणी, बिदर या क्षेत्रात राज्यविस्तार केला. बहमन शहाची सत्ता उत्तरेस मंडूपर्यंत, दक्षिणेस रायचूरपर्यंत, पूर्वेला भोंगीरपर्यंत व पश्चिमेला दाभोळपर्यंत प्रस्थापित झाली होती. त्याने त्याच्या राज्याचा कारभारही व्यवस्थित लावून दिला.

बहमन शहानंतर त्याचा मुलगा मुहम्मद शहा- पहिला सत्तेत आला (1357-1375). त्याने कपाय नायकांकडून गोवळकोंडा ताब्यात घेतला. राज्याचे चार प्रांतांत (तरफांत) विभाजन केले. त्यामुळे प्रशासनास व्यवस्थित रूप आले. मुहम्मदानंतर मुजाहिद शहा, मुहम्मद शहा – दुसरा हे सत्ताधीश सत्तेत येऊन गेले. त्यानंतरचा फिरोजशहा बहामनी (1397-1422) हा महत्त्वाचा होय. फिरोजशहाने परकीय अमीरांना दरबारात स्थान दिले. त्याचा अनेक भाषांचा अभ्यास होता. त्याला खगोलशास्त्रात विशेष रूची होती. त्याने दौलताबादजवळ वेधशाळा निर्माण करून, हिंदूंना मोठ्या प्रमाणात प्रशासनात जागा दिल्या. त्यानंतर अहमद शहा-प्रथम (1422-1426) सत्तेत आला. त्याने बहामनींची राजधानी गुलबर्ग्याहून बिदरला हलवली. त्यानंतर अल्लाद्दिन- दुसरा (1436-1458), हुमायुन (1457ते1461), निजाम शहा (1461-1463) , मुहम्मद शहा- तिसरा (1463 -1482), महमुद शहा (1482 ते 1518) सत्तेत आले. पण महमूद गवाँ या, सुलतानाच्या प्रधानमंत्र्याचा प्रशासनावर प्रभाव होता. त्याने साम्राज्याचा विस्तार करत असतानाच बिदरचा शैक्षणिक केंद्र म्हणून विकास केला. तसेच, इराक, इराण यांच्याशी सांस्कृतिक संबंध दृढ केले. पण त्याचा बळी दरबारातील सत्तास्पर्धेत गेला (1482). त्यानंतर बहामनी साम्राज्य पाच राज्यांत विभागले गेले (बिदरची बरीदशाही, अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, बेर/वऱ्हाडची इमादशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही ही ती पाच राज्ये होती). त्यांच्यामध्ये कधी सहकार्य, कधी लढाई अशा गोष्टी चालत राहिल्या. त्यांपैकी निजामशाही प्रबळ ठरली व दीर्घकाळ टिकली.

वारंगलच्या राजाने हसनगंगूला दिल्लीच्या सुलतानाच्या विरोधात लढण्यासाठी खूप मदत केली होती. तरीही हसनगंगूच्या वारसाने वारंगलवर स्वारी केली व कौलास आणि गोवळकोंडा किल्ला जिंकून घेतला. त्यानंतर तह होऊन बहामनी सुलतानाने बहामनी राज्याची गोवळकोंडा ही हद्द निश्चित केली. यापुढे बहामनी सुलतान वा त्याचे वारस वारंगलवर हल्ला करणार नाहीत असे वचन दिले. हा सामंजस्यकरार तब्बल पन्नास वर्षें टिकला. त्यामुळे विजयनगर साम्राज्य झपाट्याने विस्तारत होते त्या काळात वारंगल राज्याला त्यांच्यापासून संरक्षण मिळाले.

तुंगभद्रा दोआब, कृष्णा-गोदावरी त्रिभुजप्रदेश व मराठवाड्याचा प्रदेश हे भौगोलिक विभाग स्वतःच्या राज्याला जोडून घेण्यासाठी विजयनगरचे साम्राज्य व बहामनी सुलतान यांच्यात सतत युद्धे होत राहिली. कारण त्या प्रदेशामध्ये नैसर्गिक साधनसंपत्ती अमाप होती. कृष्णा-गोदावरी खोरे सुपीक होते. त्या नद्यांच्या काठांवर असलेल्या असंख्य बंदरांतून अंतर्गत व परदेशी व्यापार मोठ्या प्रमाणावर होत असे.

त्या दोन राजवटींमधील सततच्या युद्धांमुळे अनेक गंभीर परिणाम झाले. दोघांनाही प्रबळ सैन्यदल पदरी ठेवावे लागले. ती युद्धे आर्थिक, राजकीय व भौगोलिक सत्ता गाजवण्यासाठी होत होती. तरीही त्याला हिंदू -मुस्लिम असे धार्मिक स्वरूप येत असे. युद्धकाळात दोन्ही बाजूंनी युद्धप्रदेशात आर्थिक, सांपत्तिक व मनुष्यहानी अपरिमित प्रमाणात केली आहे. अमानुष जाळपोळ केली आहे. हिंदू-मुस्लिम सैनिक व सामान्य जनता यांची निर्दय कत्तल केली आहे. हिंदू-मुस्लिम युद्धबंदी मुले व स्त्रियांची गुलाम म्हणून खरेदी-विक्री झाली आहे. असे असूनही विजयनगरच्या देवराय प्रथमने हजारो मुस्लिम सैनिक सैन्यात नोकरीला ठेवले होते. तर फिरोझशहा बहामनीने त्याच्या राजवटीत खूप मोठ्या प्रमाणावर हिंदू प्रशासनिक अधिकारी व सेवक नोकरीत ठेवले होते.

फिरोझशहा बहामनीने हरिहर द्वितीयचा तुंगभद्रा खोर्या त पराभव केला. तहात हरिहरने खूप मोठी रक्कम फिरोजशहाला दिली. शिवाय त्याच्या मुलीचे फिरोझशहाशी थाटामाटात लग्न लावून दिले. त्या लग्नामुळे दोन्ही राज्यांमधील संघर्ष मात्र संपला नाही. पुढे देवराय प्रथमने 1419मध्ये कृष्णा-गोदावरी खोर्यारत फिरोझशहाचा दारूण पराभव केला.

विजयनगर व बहामनी राजवटींमध्ये सतत युद्धे होत असली तरीही आश्चर्यकारकपणे दोन्ही राज्यांमधील अंतर्गत सुरक्षा, कायदा, सुव्यवस्था व प्रशासन मजबूत होते. त्यामुळे सततची युद्धखोरी असूनही दोन्ही राज्यांत आर्थिक सुबत्ता होती, व्यापार-उदीम कला व संस्कृती यांची भरभराट होत होती.

बहामनी राजवटीने उत्तरभारत व दक्षिणभारत यांच्यात सांस्कृतिक पूल बांधला. तसेच, या राजवटीने इराण, तुर्कस्थान यांसारख्या पश्चिम आशियाई देशांशीही घनिष्ठ संबंध राखले. बहामनी राजवटीमुळे दक्षिणेत जी मुस्लिम संस्कृती निर्माण झाली, तिची उत्तरभारतातील मुस्लिम संस्कृतीपेक्षा वेगळी व स्वतःची निराळी वैशिष्ट्ये व मूल्ये होती. त्या संस्कृतीने बहामनी राज्याचे विघटन होऊन तयार झालेली पाच राज्ये व त्यानंतरच्या मुघलराजवटीवरही लक्षणीय प्रभाव टाकला. बहामनी राज्याचा कलिमुल्ला हा शेवटचा राजा (1524ते 1527) इसवी सन 1538 मध्ये मरण पावला व बहामनी वंशाचा अंत झाला.

बहामनी राज्य व नंतरच्या पाच शाह्या यांचे महाराष्ट्राच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. बहामनी वंशाची सत्ता पंधराव्या शतकात सबंध महाराष्ट्रावर प्रस्थापित झाली होती. बहामनी राज्यकारभारात परदेशी मुसलमानांचे वर्चस्व होते. त्या काळी, बरेच मुसलमान साधुसंत महाराष्ट्रात येऊन स्थायिक झाले. त्यांचाही प्रभाव महाराष्ट्राच्या जीवनावर पडला. पुढे, त्या राज्याची शकले होऊन पाच राज्ये झाली. खानदेशात फारुखी घराण्याचे राज्य होते. इसवी सनाचे सोळावे शतक त्या सर्व मुसलमानी राज्यांच्या आपापसांतील लढायांनी भरलेले आहे. विजयनगरच्या वाढत्या सामर्थ्यामुळे त्या राज्यांना शह बसला, पण सर्वांनी एक होऊन विजयनगरचा मोठा पराभव केला. त्यामुळे एक विशाल साम्राज्य नष्ट झाले आणि इतिहासाला कलाटणी मिळाली.

इसवी सनाच्या सतराव्या शतकात बरेच मराठे सरदार मुसलमानी दरबारात राहून कर्तबगारी दाखवू लागले. त्यांनी मुसलमानी राज्ये राखली व वाढवली. शहाजीराजे भोसले हा त्यांतील सर्वांत थोर पुरुष होय. त्याने निजामशाही व आदिलशाही या राज्यांची मोठी सेवा केली. तथापी ती मुसलमानी राज्ये मोगलांच्या आक्रमणापुढे टिकू शकली नाहीत

निजामशाही –तिमाप्पा बहिरू नामक एक ब्राह्मण विजयनगर येथे होता. तो मलिक हसन बहामनी साम्राज्याचा पंतप्रधान होता. तो त्याचा मुलगा मुसलमानांच्या हाती सापडल्यावर मुसलमान झाला. तोच मल्लिक नाइब निजाम-उल्मुल्क होय. त्याचा मुलगा मलिक अहमद निजामुल्क बाहरी हा होय. त्याने अहमदनगरची निजामशाही या राजवंशाची स्थापना 1490 मध्ये केली. त्याने शिवनेरी, लोहगड, चंदनवंदन, तोरणा वगैरे किल्ले जिंकून घेतले. तो प्रथम जुन्नर येथे राहत असे. पुढे, जुन्नर-दौलताबाद मार्गावर विंकर नावाचे जे खेडे होते, तेथे त्याने अहमदनगर म्हणून नवे शहर वसवले (1494). त्याने दौलताबादचा किल्लाही घेतला.

अहमद निजाम शहा (1490-1510) याने राज्याचा विस्तार कोकणात चौल-रेवदंड्यापर्यंत, उत्तरेत खानदेशापर्यंत तर दक्षिणेत सोलापूरपर्यंत केला. त्यानंतर सत्तेत आलेल्या बुऱ्हान निजाम शहा- पहिला (1510-53) याचा विजयनगर, विजापूर, गोवळकोंडा यांच्या एकत्र सैन्याने पराभव केला, पण निजाम शहाने त्याची मुलगी चांदबीबी हिचा विवाह विजापूरच्या आदिल शहाशी करून राज्य वाचवले. पुढे, तालिकोट म्हणजे राक्षसतंगडी येथील जंगी युद्धात (1565) अहमदनगर, विजापूर, गोवळकोंडा हे शासक एकत्र आले व त्यांनी विजयनगर साम्राज्याचा पराभव केला. त्यानंतर मुर्ताजा निजाम शहा (1565-1588) सत्तेत आला. त्याने त्याच्या राज्यात बहामनी साम्राज्यातून निर्माण झालेले बरारचे राज्य विलीन केले. त्याच्यानंतर मीरान हुसेन, इस्माईल, बुर्हाान व इब्राहिम असे काही सत्ताधीश झाले. त्यांच्या वेळी राज्यात खूपच अंदाधुंदी माजली होती. अकबर बादशहाचा मुलगा मुराद जो गुजरातचा सुभेदार होता, त्याने अहमदनगरवर स्वारी केली व शहराला वेढा दिला. चांदबीबी विजापूरचा आदिल शहा याच्या मृत्यूनंतर (1594 साली) तिच्या माहेरी अहमदनगरला परत आली होती. तिने ती जात्याच शूर असल्याने मोठ्या शर्थीने शहराचे रक्षण केले. तिने मोगलांच्या सैन्याची कत्तल केली व त्यांनी पाडलेला तट रातोरात पुन्हा बांधून काढला. तेवढ्यात, विजापूरची फौज आल्यामुळे मुरादने तहाची बोलणी सुरू केली. चांदबीबीने त्याच्या मागणीप्रमाणे त्याला वऱ्हाड दिल्यावर तो वेढा उठवून निघून गेला. तिने मग 1595 मध्ये बहादूर शहा नामक मुलाला गादीवर बसवले (तो दिवंगत इब्राहिम निजाम शहाचा पुत्र) व स्वत: सर्व कारभार हाती घेतला. पण मुगलांनी पुन्हा निजामशाहीवर स्वारी केली आणि बरारचा ताबा घेतला. दरम्यानच्या काळात, सत्ता-संघर्षात चांदबीबीची हत्या झाली. मुगलांनी निजामशाहीतील अराजकाचा फायदा घेऊन अहमदनगरवर ताबा मिळवला (1600) व बहादूर निजाम शहास बंदी बनवले.
मुगलांनी निजाम शहास बंदी बनवले तरी निजामशाहीचे पतन झाले नाही. मलिक अंबरने त्याच्या नेतृत्वाच्या जोरावर मुर्तजा निजाम शहा- दुसरा यास गादीवर बसवून निजामशाहीस पूर्वप्रतिष्ठा प्राप्त करून दिली. तो निजाम शहाचा पेशवा बनला. त्याने 1610 मध्ये मुर्तजा निजामशहा – तिसरा यास गादीवर बसवले. त्याने त्याच्या ताब्यात मुगलांनी निजामशाहीतून जिंकून घेतलेले सर्व प्रदेश विजापूरच्या आदिल शहाच्या मदतीच्या जोरावर 1610 पर्यंत घेतले. महसूल प्रशासन व सामान्य प्रशासन यांची घडी बसवली. पण नंतर मुगलांनी निजामशाहीतील सरदारांना स्वत:कडे वळवले, विजापूरवर दबाव आणला व मलिक अंबरला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला. त्याचा मृत्यू 1623 मध्ये झाला. पण त्यामुळे निजामशाहीचे अस्तित्व संपले नाही. ती पुढे, स्वतंत्र भारतात, 1948 साली संपुष्टात आली.

विजापूरची आदिलशाही – विजापूरच्या आदिलशाहीची स्थापना युसूफ आदिलशहाने केली (इसवी सन 1490). त्याने विजापूरच्या आसपासच्या रायचूर, गोवा, दाभोळ, गुलबर्गा क्षेत्राचा ताबा घेऊन राज्याचा विस्तार केला. पण पोर्तुगीजांनी गोव्याचा ताबा 1510 मध्ये घेतला. युसूफ आदिल शहानंतर त्याचा मुलगा इस्माईल (1510-1534) गादीवर बसला. इस्माईल आदिल शहाने बिदरवर स्वारी करून बिदरच्या शासकास कैद केले व बिदरचा ताबा घेतला. त्याचा मृत्यू 1534 मध्ये झाला. त्यानंतर मल्लू आदिल शहा (1543-1535) व इब्राहिम- पहिला (1535-1558) हे सत्तेत आले. अली आदिल शहा पहिला (1558-1580) च्या काळात विजयनगर साम्राज्याचा बराच भाग विजापूरच्या ताब्यात आला. इस्माईल आदिल शहाची धार्मिक बाबींतील जिज्ञासा व त्याचे ज्ञान यांमुळे लोक त्याला सुफी संत समजत. त्याने मोठे ग्रंथालय उभारले होते व त्याची जबाबदारी वामन पंडितांवर सोपवली होती!

इब्राहिम आदिल शहा- दुसरा हा वयाने लहान असताना सत्तेवर आला. त्याने बिदर राज्याचा ताबा 1619 मध्ये घेतला. तो गरिबांना मदत करत असल्यामुळे त्याला ‘अवलबाबा’ म्हणत. त्याला संगीतात रूची होती. त्याने स्वत: ‘किताब ए नौरस’ या संगीतावरील ग्रंथाची निर्मिती केली. इब्राहिम आदिल शहा याच्यानंतर मुहम्मद आदिल शहा (1627-1656) सत्तेत आला. त्याच्यानंतर अली आदिल शहा- दुसरा (1656-1672) व सिकंदर (1672-1686) हे सत्तेत आले. मराठ्यांची आक्रमणे, दरबारातील राजकारण व मुगलांचे औरंगजेबाच्या नेतृत्वाखालील आक्रमक धोरण यामुळे विजापूरचे राज्य विभागले गेले. औरंगजेबाने विजापूर राज्याचा ताबा 1686 मध्ये घेतला.

बरीदशाही (1492-1656)– बरीद घराण्याची सत्ता बहमनी वंशाचा अंत झाल्यानंतर राजधानी बीदर येथे चालू राहिली. कासीम बरीद हाच 1492 पासून खरा सत्ताधीश होता. त्याचा मुलगा अमीर बरीद याने 1504 पासून 1549 पर्यंत सत्ता गाजवली. मात्र बहामनी सुलतान 1538 पर्यंत नामधारी राजे राहिले होते. अमीर बरीदनंतर मात्र अली बरीद याने शहा हा किताब धारण केला. पण अहमदनगरच्या निजाम शहाने त्याच्या राज्याचा बराच भाग जिंकून घेतला. अली बरीद शहानंतर इब्राहिम (1562-69), मग त्याचा धाकटा भाऊ कासीम बरीद -दुसरा (1569-72) व नंतर त्याचा मुलगा मिर्झा अली यांनी बीदर येथे राज्य केले. ते राज्य हळूहळू लयाला गेले व 1656 साली मोगलांचा दक्षिणेकडील सुभेदार औरंगजेब याने बीदरचा किल्ला व शहर हस्तगत करून बरीदशाही नष्ट केली.

इमादशाही (1484-1572)- फत्तेउल्ला इमाद शहा हा मूळचा तेलंगी ब्राह्मण विजयनगरचा रहिवासी होता. तो मुसलमान झाल्यावर त्याला वऱ्हाडची सुभेदारी व इमाद-उल्मुल्क ही पदवी मिळाली. तो 1484 मध्ये स्वतंत्रपणे कारभार पाहू लागला. पण तो त्याच वर्षी, मरण पावला. पुढे अल्लाउद्दीन इमाद शहा (1484-1527), दर्या इमाद शहा, बुऱ्हाण इमाद शहा यांनी तेथे राज्य केले. बुऱ्हाण शहा वयाने लहान असतानाच गादीवर आला होता. त्या वेळी तोफलखान नामक सरदाराने सर्व अधिकार बळकावला. पण 1572 साली मुर्तझा निजाम शहाने वऱ्हाडवर स्वारी करून इमाद शहा व तोफलखान यांना ठार मारले आणि वऱ्हाडचे राज्य निजामशाहीला जोडले.

कुतुबशाही – गोवळकोंड्याचा सुभा म्हणजे बहमनी राज्याचा पूर्वेकडील भाग. महमूद गवाँ याने कुली कुत्ब-उल्मुल्क याला तेथे सुभेदार नेमले होते. तो इराणातून तिकडे आला होता व त्याच्या कर्तबगारीने सुलतान महंमद शहाच्या दरबारात वर चढला होता. त्याने कासीम बरीदचा अंमल सहन न झाल्यामुळे 1512 मध्ये गोवळकोंडा येथे राज्यकारभार स्वतंत्रपणे सुरू केला. तो पराक्रमी होता, त्याने त्याच्या राज्याचा पूर्व समुद्रापर्यंत विस्तार केला. त्याने विजयनगर, बरीदशाही व आदिलशाही यांच्याशी अनेक युद्धे केली व त्यांचा पराभव केला. त्याने 1543 पर्यंत चांगला कारभार केला. पण शेवटी, त्याचा खून झाला. मग त्याचा धाकटा मुलगा जमशीद याने तख्त बळकावले. तो 1550 साली मरण पावल्यावर त्याचा भाकटा भाऊ इब्राहिम त्या तख्तावर बसला. तो विजयनगरच्या रामरायाजवळ काही वर्षें राहिला होता. त्याची दोस्ती हुसेन निजाम शहा व इब्राहिम आदिल शहा यांच्याशीही होती. त्याच्या दरबारात व लष्करात बरेच मोठे सरदार वर चढले होते. पुढे सर्व मुसलमान शहांनी एक होऊन तालिकोट येथे विजयनगरचा पराभव केल्यावर त्यांचे आपापसांत झगडे झाले. इब्राहिम शहाने दक्षिणेतील अनेक हिंदू राजांचा पराभव केला. त्याने काही भव्य व सुंदर इमारती, मशिदी, तलाव व पाठशाळा बांधल्या. त्याच्या राज्यात व्यापाराची भरभराट झाली. तो न्यायी व कारभारात दक्ष होता. इब्राहिम शहा मरण पावल्यावर त्याचा तिसरा मुलगा महंमद कुली (1580-1611) हा तख्तावर बसला. त्याच्या दीर्घ राजवटीत लढाया पुष्कळ झाल्या, पण राज्यविस्तार मात्र झाला नाही. त्याने पुष्कळ वर्षें शांततेने कारभार केला, अनेक मशिदी व इमारती बांधल्या आणि भागानगर हे नवे शहर वसवले. त्याने राजधानीतही अनेक सुधारणा केल्या.

महंमद कुलीचा पुत्र अब्दुल्ला हुसेन (1611 ते 1658) यानेही दीर्घ काळ राज्य शांततेने केले. त्याचा वजीर मीर जुम्ला हा मोठा मुत्सदी म्हणून प्रसिद्ध होता. तो इराणमधून आलेला होता. औरंगजेब दक्षिणचा सुभेदार असताना त्याचा व मीर जुम्लाचा स्नेह जमला. पुढे, कुतुबशहाशी त्याचे बिनसल्यामुळे तो औरंगजेबाकडे गेला. त्याने मोगलांना सालीना एक कोट रुपये खंडणी देण्याचे कबूल केले. तो शेवटपर्यंत मोगलांचा ताबेदारच राहिला.

अब्दुल्ला हुसेनच्या मागून त्याचा जावई अबू हसन (1658-1686) गोवळकोंड्याच्या तख्तावर बसला. तो आळशी व विलासी असला तरी त्याने राज्यकारभार चांगला केला. त्याचा वजीर मदनपंत नामक एक ब्राह्मण होता. त्याने राज्यव्यवस्था चांगली ठेवली, पण सेनापती इब्राहिम खान याला त्याचे वर्चस्व सहन झाले नाही. औरंगजेब 1683 साली दक्षिणेत आला, तेव्हा इब्राहिम खान त्याला फितूर झाला. मदनपंत त्या वेळच्या गडबडीत मारला गेला. अबू हसन याने मोठी खंडणी देऊन मोगलांशी तह केला (1686). पण औरंगजेबाने त्याचे राज्य पुढील वर्षी खालसा करून त्याच्या राज्याला जोडले. अशा प्रकारे एकशे पंचाहत्तर वर्षें चाललेल्या कुतुबशाहीचा अंत झाला.

– संकलन – राजेंद्र शिंदे. त्यात भर घातली विद्यालंकार घारपुरे यांनी.

(स्रोत – संस्कृतिकोश (खंड सहावा) व महाराष्ट्र वार्षिकी 2014 भाग – एक आणि  ‘मध्ययुगीन भारत’ (लेखक के.मु. केशट्टीवार )

About Post Author