फ्रान्सिस दिब्रिटो यांचा सृजनाचा मळा

1
24
carasole1

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी निसर्गातून मिळालेला अनुभव संवेदनशील मनाने घेतला व त्यातून त्यांचा ‘सृजनाचा मळा’ फुलवला. ‘सृजनाचा मळा’ हा त्यांचा ललित लेखसंग्रह आहे. त्यात बावीस लेख आहेत. दिब्रिटो यांच्या लेखनातील ठळक विशेष म्हणजे ते वाचकमनाशी प्रसन्नपणे सहज बोलतात. कधी कधी, वाचकांचे सांगाती होतात तर कधी कधी, वाचकांना आधार देणारे होतात. तेथे खेड्यातील जीवन आणि शहरातील जीवन असा वरवरचा भेद उरत नाही. मानवी जीवनाची भावलय त्यांतून सापडते; जगण्याला नवा अवकाश मिळतो.

त्यांचे खेड्यातील जीवन खेड्यापुरते राहत नाही. ते विश्वाचे ठरते म्हणून त्यांना खेड्यातील पहाट प्रफुल्लित वाटते; शेतमजुरांच्या घामातून रानाला गंध येतो, चाफ्याचा गंध हा त्यांच्यासाठी भावनांची गाथा असतो. त्यांना ‘स्नेहसदन’च्या प्रार्थनालयातील वारीचे शिल्प जीवनाची भातुकली वाटते, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा आनंदमेळा कोजागिरीचा नृत्यरंग वाटतो. जेव्हा डोळे बंद होतात, तेव्हा मनाचे डोळे उघडतात. उघड्या डोळ्यांना जे दिसत नाही, ते अनंतत्वाच्या वाटेवरील प्रकाशलेणे लख्ख दिसते. कोकिळेचा स्वर ‘अश्वत्थ’ वाटतो. पहाट फुटताच प्रभू हळुहळू येतो. त्याला ऐकण्यासाठी लोक आतुर होतात, कारण त्यांच्या शब्दांना परतत्त्वाचा स्पर्श झालेला असतो. लेखक म्हणतो, जे सुंदर असते ते शांततेत जन्माला येत असते. काटेसावरीच्या झाडातून माणसाला खूप काही शिकता येते. लहानपणीच्या छोट्याशा धड्यात आलेला मेघदूताचा संदर्भ लेखकमनात पक्का रुजतो. तो मेघ पावसाने भरलेला, जेव्हा सृष्टीला तरुण करतो, तेव्हा मेघ आणि वृक्ष यांच्यांतील अनामिक ओढ अज्ञाताची शिदोरी ठरते. आम्रवृक्षाची सावली आधार असते. फळे उतरवल्यानंतर झाडाचे पहिले फळ देवाला देतात. त्याला देणे म्हणजे सत्त्व अर्पण करणे. त्यामुळे आभाळाची प्रसन्नता मनाला जाणवते.

इटालीमध्ये वसंताची चाहूल मार्चमध्ये येते. ब्रिटनमध्ये ती मे महिन्यात येते. त्या संदर्भात दिब्रिटो यांनी स्कॉटलंडमधील आठवण दिलेली आहे. तेथील सूर्योदयात फांदीतून येणारी उन्हे फुगड्या खेळत होती. झाडांच्या गर्दीतून पसरलेले ते किरण म्हणजे पावाच्या कापावर लावलेले पिवळेजर्द लोणी वाटते. ती प्रतिमा नवी आहे. त्यापुढे त्यांनी लिहिलेली ओळ म्हणजे, नवजात बालकाच्या कांतीचे ते पिवळे तांबूस ऊन त्याच्यासारखेच सुकुमार वाटत होते.

दिब्रिटो एका दृश्याची वेगवेगळी भावरूपे जेव्हा अनुभवतात, तेव्हा संस्कृतीतील फरक ते दोन शब्दांत सांगतात. पाश्चिमात्य संस्कृतीप्रमाणे त्यांचे आभाळ, ग्रह, तारे, सूर्योदय आणि सूर्यास्त यांना एकाकीपणाचा शाप आहे, पूर्वेकडील सूर्योदय गायीच्या गळ्यातील घुंगरांच्या नादाप्रमाणे मनाला भारावून टाकतो. मंदिरामधून काकड आरतीचे सूर प्रसन्नता देतात. दिब्रिटो यांचा मुक्काम इंग्लंडच्या वास्तव्यात ‘बेनेडिक्टाइन’ मठात आठ दिवस होता. त्यावेळी मठवासी ग्रेगोरियन संगीताचे सूर आळवत होते.

दिब्रिटो यांचा प्रश्न माणसाला जिवंत फूल निर्माण करता येईल काय? हा महत्त्वाचा आहे. प्रत्येक झाडावरील फुले उगवतात, फुलतात, एकामागोमाग गळतात, झाडांची स्वप्ने होतात. त्यांचे रूप जितके लोभसवाणे, तितकाच त्यांचा राग लाजवाब. दिब्रिटो निष्कर्ष सांगतात : कोणतीही संस्कृती अशा त्यागावर उभी असते हे समजले तर युद्धे थांबतील.

दिब्रिटो यांच्या मते, प्रत्येक माणसात एक वृक्ष आणि एक पक्षी दडलेला असतो. वृक्षाप्रमाणे माणसाला मुळे फुटतात. ती भावनांच्या मातीत खोलवर रुजतात, परंतु माणसातील पक्षी त्याला एका जागी बसू देत नाही. तो त्याला विहार करायला लावतो. तो अनंत आकाशाचा वेध घेतो. एकार्थाने तो स्वत:ला शोधत असतो. म्हणूनच ‘जे पिंडी ते ब्रम्हांडी’ असे म्हणतात. मानवी जीवनाची परिक्रमा अशीच असते. डोंगर जसा स्थिर असतो, तेव्हा त्याला भेटलेला माणूस मूळचा राहत नाही. मात्र डोंगर त्याला मोठे करतो, आकाशाशी नाते जोडून देतो. तो चिमणा आधार ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ असा असतो. त्यातूनच दिव्यदूताच्या खुणा उमटतात. ‘शब्बाथ’ राणीचा दिवस साजरा होतो. येशूची ‘करुणा’ विशाल होते. जातिवंत माणूसपण सुदृढ बनते. हे व्यक्तित्व सृजनाचा मळा प्रसन्न ठेवते. दिब्रिटो यांचा मळा हा असा भरलेला आहे. त्यात जगण्याचे जे समंजस भान आहे, ते सर्वात्मक आहे.

फ्रान्सिस दिब्रीटो – ९४२२६६९८५२

– यशवंत पाठक

(मूळ लेख – गोमंतक, पणजी, रविवार, 20 जुलै 2014)

About Post Author

Previous articleमराठीतील न्याय
Next articleवेंगुर्ले नगर वाचनालय – १४२ वर्षांचे अविरत ज्ञानदान
यशवंत त्र्यंबक पाठक हे मराठीचे प्राध्‍यापक. ते पुणे विद्यापीठाच्‍या संत ज्ञानदेव अध्‍यासनात प्रमुख प्राध्‍यापक म्‍हणून कार्यरत आहेत. त्‍यांनी 'कीर्तन परंपरा आणि मराठी साहित्‍य' या विषयावर पुणे विद्यापीठातून 1978 साली पीएच. डी. प्राप्‍त केली. ते पीएच्. डीचे मार्गदर्शक म्‍हणून काम करतात. त्‍यांची ब्रम्‍हगिरीची सावली, नक्षत्रांची नाती, मैत्रीचा मोहोर, तुकारामांचे निवडक अभंग, समर्थांची स्‍पंदने अशी एकूण पंचवीस पुस्‍तके प्रकाशित झाली आहेत. त्‍यांनी अनेक पुस्‍तकांचे संपादन केले असून विविध गौरवग्रंथांमध्‍ये त्‍यांचे संशोधन लेखन प्रसिद्ध झाले आहे. पाठक यांना विविध पुरस्‍कांरानी सन्‍मानित करण्‍यात आले असून त्‍यांच्‍या चार पुस्‍तकांना महाराष्‍ट्र शासनाचे सर्वोत्‍कृष्‍ट वाड्ःमय पुरस्‍कार मिळाले आहेत. लेखकाचा दूरध्वनी 02591223250

1 COMMENT

  1. मला फादर दिब्रिटो यांच्या
    मला फादर दिब्रिटो यांच्या मराठी भाषाप्रेमाबद्दल कौतुक आहे अन् वाचकांशी संवाद साधत सांगायची त्यांची हातोटी खासच आहे. समाजसुधारणेची आग्रही तळमळ दुर्मिळ. सलाम.

Comments are closed.