फिल्म सोसायटींचे काम संपलेले नाही

0
43

-किरण क्षीरसागर

     बालगंधर्व बहुतांश प्रेक्षकांना आवडला आहे. त्‍यात बालगंधर्वांना ऐकलेल्‍या, त्‍यांची जादू काही प्रमाणात अनुभवलेल्‍या जुन्‍या माणसांची संख्‍या लक्षणीय आहे. चित्रपटात बालगंधर्वांबद्दलच्‍या कथा-कहाण्‍या ओझरत्‍या स्‍वरूपात येतात. अनेकांना आपण कधीकाळी ऐकलेल्‍या गोष्‍टी चित्रपटात पाहणं आनंददायक वाटतंय. आनंदाच्‍या या लाटेत चित्रपटातून बालगंधर्वांना समजून घेणं ही बाब बाजूलाच पडते. ‘गंधर्वांचा काळ पुन्‍हा एकदा ..

     बालगंधर्व बहुतांश प्रेक्षकांना आवडला आहे. त्‍यात बालगंधर्वांना ऐकलेल्‍या, त्‍यांची जादू काही प्रमाणात अनुभवलेल्‍या जुन्‍या माणसांची संख्‍या लक्षणीय आहे. चित्रपटात बालगंधर्वांबद्दलच्‍या कथा-कहाण्‍या ओझरत्‍या स्‍वरूपात येतात. अनेकांना आपण कधीकाळी ऐकलेल्‍या गोष्‍टी चित्रपटात पाहणं आनंददायक वाटतंय. आनंदाच्‍या या लाटेत चित्रपटातून बालगंधर्वांना समजून घेणं ही बाब बाजूलाच पडते. ‘गंधर्वांचा काळ पुन्‍हा एकदा डोळ्यांसमोर आला’ या गोष्‍टीवरच सगळे समाधान पावल्‍यासारखे वाटतात. ही बाब त्‍या चित्रपटासाठी आणि त्‍यातून तयार होणा-या बालगंधर्वांच्‍या प्रतिमेसाठी मारक ठरते. त्‍याचा तटस्‍थतेने किंवा थोड्या चिकित्‍सकपणे विचार करण्‍याची कुणालाच आवश्‍यकता भासत नाही. जी माणसं हे करू पाहतात, त्‍यांच्‍यावर ‘समीक्षक’ असा उपहासपूर्वक शेरा मारला जातो. त्‍यामुळे चित्रपट आणि प्रेक्षक यांच्‍यात अर्थपूर्ण दुवा तयार करण्‍याचा समीक्षकांचा प्रयत्‍न दुर्लक्षिला जातो. बालगंधर्वांच्‍या कहाणीत असलेली शोकांतिका, निर्मात्‍यांनी बालगंधर्व चित्रपटात दाखवलेला चकचकाट, त्‍यांनी केलेल्‍या तथाकथित रिसर्चच्‍या कहाण्‍या यांच्‍या आवरणाच्‍या खाली जर चित्रपटकर्त्‍यांना आपले अपुरे प्रयत्‍न झाकायचे असतील, तर ही गोष्‍ट चित्रपट आणि प्रेक्षकांवरही अन्‍याय करणारी आहे.

     ‘प्रभात चित्र मंडळ’ आणि ‘थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम’ या संस्‍थांनी 8 जून 2011 रोजी दादर माटुंगा कल्‍चरल सेंटर येथे ‘बालगंधर्व’ चित्रपटावर खुली चर्चा आयोजित केली होती. या चर्चेस चित्रपटाचे प्रतिनिधी म्‍हणून निर्माते नितीन देसाई, दिग्‍दर्शक रवी जाधव आणि संगीतकार कौशल इनामदार ही मंडळी हजर होती. आरंभी फिल्‍म सोसायटी चळवळीचे प्रतिनिधी आणि आम प्रेक्षक यांनी चित्रपटाची सकारात्‍मक व नकारात्‍मक अशा दोन्‍ही बाजूंनी चर्चा केली. चर्चेचा समारोप करताना नितीन देसाईंनी, आम्‍ही चित्रपटात बालगंधर्वांनी वापरलेल्‍या मूर्ती, वस्‍तू यांचा कसा वापर केला याची वर्णने ऐकवली आणि ते ऐकून पाठी बसलेल्‍या आजी त्‍यांचे कौतुक करत होत्‍या. जर या गोष्‍टींनी चित्रपट अर्थपूर्ण होत असेल, तर चित्रपटात कथावस्‍तूऐवजी गंधर्वांच्‍या वस्‍तूंचेच चित्रण करावे!

     चित्रपटातून बालगंधर्व कलाकार म्‍हणून जर समजत नसतील, तर त्‍या चित्रपटाला अर्थच काय उरला? केवळ बालगंधर्वांचे नाव आणि प्रसिद्धीचा झगमगाट यांच्‍या जोरावर चित्रपट गर्दी खेचतोय. जुन्‍या आठवणींचे रिफ्लेक्‍शन याच्‍यापलीकडे वयोवृद्ध प्रेक्षकांच्‍या या चित्रपटाकडून कोणत्‍याच अपेक्षा नसल्‍याचे जाणवते आणि तरूणांना इतिहासातले आपल्‍यापर्यंत आजवर न पोचलेले काहीतरी नवे पाहायला मिळाल्‍याचा आनंद आहे. ही मर्यादित अपेक्षा घातक वाटते. प्रेक्षकांच्‍या या मानसिकतेचा फायदा घेउन चित्रपट निर्मिण्‍याचा चुकीचा पायंडा पडण्‍याचीही भीती वाटते. प्रेक्षक, विशेषतः आम्‍ही तरूण, मोठ्या प्रमाणात थिएटरमध्‍ये किंवा डाऊनलोड करून चित्रपट पाहतो. परंतु आम्‍हां तरूणांत चित्रपटाबद्दलची सजगता आढळत नाही. सभोवतालचा वेगवान काळही आम्‍हाला तेवढा विचार करण्‍याची संधी देत नाही. अशा वेळी प्रेक्षक घडवणे ही फिल्‍म सोसायटींवर फार मोठी जबाबदारी पडते. त्‍यांनी फेस्टिव्‍हल्‍सचे सत्‍यनारायण दरवर्षी घालून चालणार नाही. चित्रपटांमध्‍ये प्रेक्षकांचा सहभाग वाढण्‍याच्‍या दृष्‍टीनेही फिल्‍म सोसायटींनी प्रयत्‍न करणे आवश्‍यक आहे.

-किरण क्षीरसागर
9029557767

Thinkm2010@gmail.com

{jcomments on}

About Post Author

Previous articleदिलीप दोंदे यांचा सागर पृथ्‍वी प्रदक्षिणेचा पराक्रम
Next articleआम्‍ही धारावीला पोहोचलो!
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.