प्रेरणा देशपांडे- स्त्रीजागृतीला सीता-द्रौपदीचा आधार!

14
28
_Prerana_Deshapande_1.jpg

नाशिकच्या वकील सौ. प्रेरणा देशपांडे या ‘मी द्रौपदी बोलतेय’ हा दीड तासांचा स्वलिखित प्रयोग रंगमंचावर साकारतात. त्यांनी ‘द्रौपदी’चे सुमारे तीस प्रयोग गेल्या दोन वर्षांत सादर केले ते स्त्रीवादी दृष्टिकोनातून. प्रेरणा यांचा व्यवसाय अॅडव्होकेट आणि नोटरी असा आहे. त्यांनी त्यातही ‘राष्ट्र सेवा दला’चे संस्कार, स्त्रीवादी दृष्टिकोन, संवेदनशीलता ही त्रिसूत्री धरून ठेवलेली आहे. प्रेरणा यांना ‘विनयभंगा’चा कायदा समजावताना ‘द्रौपदी’चे उदाहरण आठवले. त्यांना ती सीतेहून अधिक ‘सणसणीत’ वाटते, कारण ती राजसभेत प्रश्न विचारते, “मला पणाला लावण्याचा अधिकार तुम्हाला कसा मिळाला? कुंती कुमारी माता, त्यामुळे मला पाच पांडवांत द्यायला त्यांना काही वाटले नसावे का?”

प्रेरणा यांनी द्रौपदी मांडताना तिची सांगड आधुनिक काळाशी घातली. त्यांनी स्त्रीवादी विचारातून ‘नियोग’ अभ्यासला. कुंतीचा हेतू पांडवांचा एकोपा मोडू नये हा असावा असे म्हणत त्या हेतूला आरपार पारखून घेतले. इरावती कर्वे, दुर्गा भागवत, अरुणा ढेरे यांनी अभ्यासलेल्या द्रौपदीचा सखोल अभ्यास केला.

प्रेरणा यांनी पाच पांडवांची वैशिष्ट्ये द्रौपदीच्या नजरेतून मांडली आहेत. युधिष्ठिराची धार्मिकता, भीमाचा भाबडेपणा व संवेदनशीलता, अर्जुनाचे शौर्य व धैर्य आणि नकुल-सहदेवांच्या पुरुषी सौंदर्याला असलेली स्त्रीच्या मार्दवाची झालर… द्रौपदी म्हणते, “अष्टावधानी नरोत्तम अर्जुन माझा खराखुरा पती. कारण माझा विवाह त्याच्याशीच झाला होता.”

ती म्हणते, “मी माझ्या पाचही पुत्रांना सगळ्या पांडवांना ‘तात’ म्हणण्यास शिकवले. काका नाही.’’

“कर्ण मला वेश्या असे म्हणून ज्येष्ठ मंडळींसमोर कुत्सितपणे हसला. दात विचकून म्हणाला, ‘पाचांची असलीस काय आणि एकशेपाचांची असलीस काय…’’

“दुर्योधनापेक्षा, खरे तर, माझ्या पतींनीच माझी विटंबना जास्त केली. मी प्रेम देऊनही प्रत्येकाने दुसरा विवाह केला.’’

“मी माझ्या पाचही पतींच्या भावना कायम जपल्या. खरे तर, मीच त्यांची दास्यातून मुक्तता केली होती; मात्र त्यांना त्याची कधी आठवणही करून दिली नाही. मात्र माझ्या मनात माझा विनयभंग झाल्याची जखम जन्मभर ठसठसत राहील. शरीरावर झालेले घाव एकवेळ भरून निघतील, पण अंत:करणात खोल झालेली जखम कशी भरून येणार? मी माझे दु:ख प्रथमच आज तुमच्याजवळ उघड केले आहे.”

प्रेरणा देशपांडे द्रौपदी साकार करतात तेव्हा थक्क व्हायला होते. त्या ती भूमिका कमालीच्या सकस भाषेत, ओघवत्या शैलीत, अत्यंत अलवारपणे उभी करतात. मान्यवरांनी तो प्रयोग वाखाणला आहे. त्यांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. प्रेरणा यांची द्रौपदी पाहताना केवळ बायकांचे नव्हे तर पुरुषांचेही मन हेलावते. त्यांच्या सदसद्विवेकबुद्धीला ठेच पोचते; आणि तेथेच त्यांचा हेतू साध्य होतो. प्रश्न निर्माण होतो, की द्रौपदीचे कालातीत असणे हे समाजाचे यश की अपयश? त्यांनी हे प्रयोग सेन्सॉर करून घेतले आहेत. त्या कार्यक्रमास अविनाश बाबा चिटणीस यांचे दिग्दर्शन अाहे. वरुण भोईर व भूषण भावसार हे संगीतासाठी मदत करतात.

प्रेरणा कोपरगावमधील कान्हेगाव-साखरवाडी या गावच्या. त्यांचे माहेरचे नाव कुंदा कुवर. त्यांचे वडील कारखान्यात नोकरीला होते. त्यांच्यावर लहानपणी नाथ पै, मृणाल गोरे, जॉर्ज फर्नांडिस, मधु दंडवते, किशोर पवार अशा समाजवादी नेत्यांच्या संस्कारांचा गहिरा परिणाम झाला. प्रेरणा पाच-सहा वर्षांच्या असताना, मोठ्या बहिणीबरोबर हट्टाने सेवा दलाच्या दहा दिवसांच्या शिबिराला 1964 साली हजर राहिल्या होत्या. नंतर शाखेत नियमित जाऊ लागल्या. त्यांचे वक्तृत्व आणि अभिनय हे दोन्ही गुण तेव्हापासून व्यक्त होऊ लागले. ‘नवरंगसाधना विविध कलादर्शन’ निर्मित गणेशोत्सवातील सहभाग असो वा तालुका-जिल्हा पातळीवरील वक्तृत्वस्पर्धा असो त्यांना पारितोषिक-पुरस्कारांची दाद मिळत राहिली. प्रेरणा यांनी ‘मी बाई आहे म्हणून; पुरुष असते तर?’ या विषयावरील निबंधस्पर्धेत 1980 च्या दशकात भाग घेतला; पण तो विचार निबंधापुरता मर्यादित राहिला नाही. तो त्यांच्या आचारजाणिवांत भिनत गेला.
त्यांची निवड अकरावीत असताना दिल्लीला ‘विश्व युवक केंद्रा’च्या लीडरशिप ट्रेनिंग कोर्ससाठी झाली. दरम्यान, त्यांची ओळख धुळ्याच्या सेवा दलाचे काम करणाऱ्या पद्माकर देशपांडे या युवकाशी झाली. दोघांनी लग्न करण्याचे ठरवले. दोघांचे लग्न बाबा आढाव, यदुनाथ थत्ते यांच्या पुढाकाराने सत्यशोधक पद्धतीने झाले. पद्माकर देना बँकेत नोकरीला लागले. दोघे येवल्यात राहत असत. प्रेरणा यांचे शिक्षण चालूच होते. त्या राज्यशास्त्र घेऊन श्रीरामपूरच्या कॉलेजमधून बीए झाल्या. त्यांचा वैचारिक आदर्श येवल्याचे रणजीत परदेशी हे प्राध्यापक होते. त्यांनी मालेगावहून एमए पूर्ण केले. त्यांना कॉलेजच्या पहिल्या वर्षी मुलगा झाला. त्या एमएला असताना मुलगी झाली. त्यांची वाटचाल घर-संसार सांभाळत, शिक्षणासाठी आडवे-तिडवे प्रवास करत सुरू होती. त्यांनी मालेगावला शिकत असताना, सोमवंशी वकिलांच्या प्रोत्साहनाने वकिलीचा अभ्यास करण्याचे ठरवले. त्या मालेगावला विधी महाविद्यालयात प्रवेश घेऊन अभ्यासाला लागल्या. पण पद्माकर देशपांडे यांची बदली गुजरातमध्ये मेहसाणा येथे झाली. कुटुंबाची रवानगी तिकडे झाली. प्रेरणा गुजराती भाषा शिकू लागल्या. पण करण्यासारखे हाती फारसे काही लागत नव्हते. तेवढ्यात यदुनाथ थत्ते त्यांच्याकडे जणू कार्यदूत होऊन आले; म्हणाले, “काय करतेस हल्ली?” त्यांनी प्रेरणा यांची गाठ अहमदाबादच्या इलाबेन भट यांच्याशी घालून दिली. त्या बायकांसाठी काम करणारी संस्था चालवत. तेथे ‘युथ व्हॉलेंटिअर’चे पद रिक्त असल्याचे कळले. त्यासाठी त्या मुलाखतीला गेल्या. त्यांनी मुलाखत हिंदीत दिली. प्रश्न असा होता, की निवड झाल्यास खेडोपाड्यांतील गुजराती बायकांशी संवाद कसा साधाल? प्रेरणा यांचे उत्तर होते, की “महाराष्ट्रीय, गुजराती या प्रादेशिकतेपूर्वी बाई ही बाई असते; आणि तिचे प्रश्न भाषेपलीकडून डोकावतात!”

_Prerana_Deshapande_2.jpgनोकरी मिळाली. काम सात खेड्यांत करायचे होते. प्रेरणा यांनी महिला मंडळे, युवक मंडळे यांच्यामार्फत काम सुरू केले. चर्चासत्रे, स्पर्धा यांच्या माध्यमातून महिला संघटन सुरू केले, क्रिकेट स्पर्धा घेतल्या, योगासन शिबिरे घेतली. फळफळादी प्रशिक्षण केंद्र, म्हशी सांभाळण्याचे शिक्षण यांसाठी सरकारी योजनांची मदत घेतली. तिकडे रब्बारी लोकांची वस्ती जास्त आहे. त्यांच्या दुग्धव्यवसायाला ते प्रशिक्षण पूरक ठरले. प्रेरणा यांनी ती नोकरी दोन वर्षें केली. दरम्यान, ‘डिस्टन्स ट्रेनिंग कोर्स इन यूथ वर्क’ हा कॉमनवेल्थ यूथ डिप्लोमा पूर्ण केला.

पद्माकर देशपांडे यांची बदली पुन्हा नाशिकला झाली. तोवर नाशिकला कुसुमताई पटवर्धन यांनी ‘महिला हक्क समिती’ स्थापन केली होती. तेथे प्रेरणा यांचा संपर्क वाढत गेला. त्यांना जाणवू लागले, की महिला समस्या खऱ्या अर्थी सोडवणे असतील तर वकील व्हायला हवे. त्यांचे मालेगावला एलएलबीचे पहिले वर्ष पूर्ण झालेले होते. त्यांनी परीक्षा दिली. मग नाशिकमधून एलएलबी पूर्ण केले.

त्यांचा नाटक-एकांकिकांमधील अभिनय दरम्यानच्या काळात चालू होताच. त्यांनी ‘अस्मिता संवर्धन मंडळीं’च्या ‘कोण म्हणतो टक्का दिला’, ‘घाशीराम कोतवाल’, ‘काका किशाचा’, ‘खेळिया’ यांमधून विविध भूमिका साकारल्या; हिंदी एकांकिकांमधूनही काम केले. त्यांची राम डवरी या निर्मात्यांशी ओळख झाली. त्यांना चित्रपटातील भूमिकांनी हाक दिली आणि तिकडेही प्रवेश झाला. प्रेरणा यांची भूमिका असलेला पहिला चित्रपट 1991 मध्ये प्रदर्शित झाला – ‘संसार माझा सोन्याचा’. त्यांनी नंतर चार-पाच चित्रपटांतून काम केले. त्यांनी ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ या चित्रपटात जनाबाईंची भूमिका केली. त्यांच्यावर एक गाणे चित्रितही झाले आहे. अभिनय ही त्यांची आवड होती आणि वकिली ही महिला समस्यांसाठी निवड होती. दरम्यान, ग्राहक कायदा आला. ग्राहक संघटनेच्या त्या पदाधिकारी झाल्या. त्यांनी इतर संस्थांमध्येही अनेक पदांवर काम केले.

प्रेरणा यांच्या लक्षात आले, की कायदा केवळ वकिलांना समजून कसे भागेल? तो ज्यांच्यासाठी आहे त्या सर्वसामान्य माणसांना समजावून सांगायला हवा. समाजाने महिलांना कर्तव्ये सातत्याने समजावली आहेत. तिला कायद्यानुसार मिळालेल्या हक्कांची माहिती करून द्यायला हवी. त्यांनी त्यासाठी अभिनयाचा आधार घेण्याचे ठरवले. महाविद्यालयांतून, संस्थांतून त्या महिलाविषयक कायद्यांची माहिती देऊ लागल्या. त्यांना किरकोळ कारणासाठी किंवा संशयाने बायकोला टाकून देता येत नाही हे सांगताना ‘सीता’ आठवली. त्या सौ. सीता रामचंद्र सूर्यवंशी अशा नावाने ‘परित्यक्ता’ सीतेची कथा, कायदा समजावताना सांगू लागल्या. त्यांनी ‘सीता’ साभिनय एकपात्री सादर केली. ‘मी राणी कशी झाले?… वनवास… राम… रावण… रामाने माझा त्याग केला… त्याने ‘त्याग’ केला की मला टाकले? कायद्याने सीतेला कसा न्याय मिळाला असता? आधी रावणाला काय शिक्षा झाली असती? हिंदू विवाह कायदा कलमान्वये रामाविरुद्ध किती केसेस दाखल करता आल्या असत्या? नंतर घटस्फोटाचा दावादेखील करता आला असता…’ प्रेरणा यांचा विरोध रामाला नाही, त्या मर्यादापुरुषोत्तम रामाचे एकपत्नीत्व, त्याचा पराक्रम मान्य करतात आणि तत्कालीन घटनांची आजच्या युगाशी सांगड घालतात. प्रेक्षकही त्यावर सुंदर प्रतिक्रिया देतात.

प्रेरणा देशपांडे – prernadesh@gmail.com, 9422759748

– अलका आगरकर रानडे, alka.ranade@gmail.com

About Post Author

14 COMMENTS

  1. The real need to see the law…
    The real need to see the law n the culture n the relationship between them. Tried the best. Keep it up.

  2. खुप छान या पुढील प्रयोगास…
    खुप छान या पुढील प्रयोगास आमच्या शुभेच्धा

  3. अॅड.प्रेरणा देशपांडे नाशिक …
    अॅड.प्रेरणा देशपांडे नाशिक ह्यांचे अभिनय वक्तृत्व कला आणि क्रिडा क्षेत्रातील गुण लहानपणापासूनच शालेय जीवनात दिसू लागले होते त्यात साकरवाडी (सोमैया गोदावरी शुगर मिल्स) येथील शैक्षणिक व सांस्क्रूतिक वातावरण पोषक होते . मुलगी असूनही मुलांच्या बरोबरीने कोणत्याही क्षेत्रात सहभागी होण्याची उमेद जाग्रृत होती. परिस्थिती वर मात करून इच्छित गोष्ट मिळवायाचीच ही जिद्द तिच्याकडे लहानपणापासूनच आहे! आजही प्रथितयश अॅडव्होकेट व नोटरी असून सामाजिक बांधिलकी कायम तेवत ठेवली आहे. शालेय स्नेहसंमेलनाच्या “मर्चंट ऑफ व्हेनिस ” नाटकात पोटतिडीकेने न्यायाधीशासमोर शाॅयलाॅक विरुद्ध अंटानियोची बाजू मांडणारी आग्रही वकील आज प्रत्यक्षात प्रथितयश वकील म्हणून नावाजलेली व्यक्ती म्हणजे ॲड.प्रेरणा देशपांडे होय ! त्यांनी साकारलेली ” मी द्रौपदी बोलतेय् ” एकपात्री म्हणजे समस्त पीडित शोषित असहाय महिलांचा”आक्रोश ” जनमानसात मांडला आहे! जोश, शब्द फेक मनातील तळमळ ह्या
    बाबी सोसत अभिनयाने जाणवतात प्रेक्षकांच्या मनात स्फुल्लिंग ,पाठविण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत! त्यांना उत्तरोत्तर प्रगतीच्या खूप खूप शुभेच्छा !

  4. It’s a very good project …
    It’s a very good project . Wish you very congratulations. Nice to read the article.

  5. We as your colleguse are…
    We as your colleguse are proud of you.Not only maharashtra but whole india should think of you.
    SHARAD

  6. खुप सुन्दर आणि उपयुक्त…
    खुप सुन्दर आणि उपयुक्त माहिती आहे त्यातून समाजाला नक्कीच बोध घेता येइल

  7. Really very nice ..
    कामाच्या…

    Really very nice ..
    कामाच्या इतक्या व्यापातूनही तुम्ही खूप छान कार्य करताय…

    तुम्हाला खूप खूप शुभेच्छा..!

  8. व्वा, आपल्या दैनंदिन…
    व्वा, आपल्या दैनंदिन धकाधकीच्या आयुष्यातून वेळ काढून, आपल्या आवडत्या छंदाचा उपयोग आपण सामाजिक कार्यासाठी करीत आहात, खूपचा स्तूत्य उपक्रम आहे. आपणास पुढील वाटचालीसाठी अनेक अनेक शुभेच्छा.

  9. Very good presentation..I am…
    Very good presentation..I am working trust.our one project running only women.Gender campaign and sustainabily of women.Single women support.Free councilling centr.Domastic vielance
    So I was very appriciat of your presentation.

Comments are closed.