‘प्रॅगमॅटिक्स’ – अध्याहृताचे भाषिक तत्त्वज्ञान

1
31
फ्रीडरिश लुडविरा गॉटलॉब फ्रेगे
फ्रीडरिश लुडविरा गॉटलॉब फ्रेगे

फ्रीडरिश लुडविरा गॉटलॉब फ्रेगे     अर्थाचे अनेक प्रकार असतात – वाच्यार्थ, लक्षणार्थ, गूढार्थ वगैरे. भाषेमधे म्हटलेले किंवा लिहिलेले वाक्य जरी एक असले, तरी वेगवेगळ्या परिस्थितींमधे आणि वेगवेगळ्या संदर्भांमधे त्या वाक्याचा अर्थ वेगवेगळा होऊ शकतो. दैनंदिन व्यवहारातल्या भाषेमधे असे घडतेच, पण जेव्हा प्राचीन धर्मग्रंथांमधे काय म्हटले आहे ह्याचा अर्थ लावण्याचा प्रश्न येतो, तेव्हा त्यांतल्या भाषेचे अर्थन नेमके कसे करायचे? हा प्रश्न गुंतागुंतीचा बनतो.

     भाषाशास्त्रामधला हरमेन्यूटिक्ससारखाच महत्त्वाचा आणखी एक प्रकार म्हणजे ‘प्रॅगमॅटिक्स’- प्रॅगमॅटिक्सच्या संदर्भामधे – गॉटलॉब फ्रेगेने त्याच्या भाषाविषयक तत्त्वज्ञानामधे अध्याहृताचे तीन प्रकार सांगितले आहेत. अध्याहृताचे भाषिक तत्त्वज्ञान असा करता येईल.

     अध्याहृत अर्थ म्हणजे वाक्यामधे लपलेला, उघडपणे न दिसणारा, ‘गर्भित’ (हिडन) असा अर्थ. मराठी भाषेमधे ‘लेकी बोले, सुने लागे’ अशी म्हण आहे. म्हणजे बोलायचे एक, पण त्यामधून काही वेगळाच अर्थ निघतो, त्यातला हा प्रकार. असा गर्भितार्थ ज्यामधून निघतो, अशी वाक्ये भाषेमधे नेहमी बोलली जातात. भाषेच्या ह्या प्रकारच्या वाक्यांचा अर्थ लावायचे शास्त्र म्हणजे प्रॅगमॅटिक्स. उदाहरणार्थ, ‘देवकीला मुलगा झाला आणि तिच्या नवर्‍याने त्या मुलाला रातोरात गोकुळात पोचवले’. याचा सरळ अर्थ (वाच्यार्थ) उघड आहे. पण त्या सरळ अर्थामधे आणखी एक बारीक अर्थ लपलेला आहे. तो म्हणजे देवकीचे लग्न झालेले होते, हा त्यामधे असलेला, पण उघडपणे न सांगितला गेलेला आणि उघडपणे न दिसणारा, दडलेला अर्थ आहे. देवकीचे लग्न झालेले असल्याखेरीज तिचा नवरा असणार नाही आणि तिला मुलगाही होणार नाही, हे व असे सर्व या वाक्यामधे उघडपणे सांगितले गेलेले नसतानाही समजू शकते. अशा अर्थालाच अध्याहृत अर्थ म्हणतात.

     अध्याहृत अर्थाला देखील स्वत:चा अर्थ (कॉण्टेण्ट) असतो, हे ओघाने आले आणि त्या अर्थाला विविध पैलूदेखील असू शकतात. अर्थ हा एकच शब्द मी इथे एकाच वाक्यामधे किती वेगवेगळ्या अर्थांनी वापरला, बघा!

     अध्याहृत अर्थ समजून घेण्याची आपल्याला इतकी सवय झालेली असते, की तो कुणी आपल्याला समजावून सांगायची गरज वाटत नाही आणि जर कुणी त्यातला अर्थ मुद्दाम सांगायचा प्रयत्‍न केला, तर आपण म्हणतो ‘त्यात काय? हे तर उघडच आहे’! पण मूळ वाक्य बघितले, तर त्यात ते उघड नसते.

     तर, न सांगतादेखील समजणे ही ‘प्रॅगमॅटिक्स’मधली खरी गंमत आहे. फारतर या बाबतीत आपण असे म्हणू शकतो, की “समझनेवाले समझ रहे है, ना समझे वो अनाडी है!”

     अर्थ लावण्याच्या बाबतीत आणखी वेगळा प्रकारदेखील असतो. तो म्हणजे भाषेतले ‘लॉजिक’ समजून घेऊन त्या ‘लॉजिक’वरून अर्थ लावणे हा होय. उदाहरणार्थ – १. सर्व माणसे केव्हातरी मरतात, २. सॉक्रेटिस माणूस आहे. या दोन वाक्यांच्या वरून काढलेला तिसरा अर्थ म्हणजे ‘सॉक्रेटिस केव्हातरी मरणारच!’ पण या अर्थाला अध्याहृत अर्थ असे म्हणत नाहीत, याला ‘लॉजिकल डिडक्शन’ किंवा ‘लॉजिकल इन्फरन्स’ असे म्हणतात. यामधे जर १ आणि २ ही दोन्ही वाक्ये खरी असलील, तर तिसरे वाक्य खरे ठरते आणि त्याच्या खरेपणावरून त्या वाक्याचा अर्थ लावला जातो. अशा अर्थ लावण्याला ‘लॉजिकल एण्टेलमेण्ट’ असे म्हणतात. म्हणजे अर्थाच्या बाबतीत तिसरे वाक्य हे अगोदरच्या पहिल्‍या व दुस-या वाक्यांचे शेपूट (टेल) असते.

     समजा, मी असे म्हटले, की अ. रामाने लंका जिंकली, आणि मग त्याच्या उलट असेही म्हटले, की ब. रामाने लंका जिंकली नाही. तर या दोन वाक्यांमधले अ हे वाक्य बरोबर आहे आणि ब हे वाक्य चुकीचे आहे, हे तर उघड आहे. पण इथे, रामाने खरोखर लंका जिंकली की नाही हा प्रश्न नाही. इथे, ही दोन वाक्ये केवळ व्याकरणातल्या दोन प्रकारांची उदाहरणे म्हणून दिली आहेत. तर ही दोन वाक्ये परस्परविरोधी आहेत हे उघडच आहे. पण जरी ही दोन वाक्ये परस्परविरोधी असली आणि त्यांतले एक बरोबर आणि दुसरे चुकीचे असले, तरी या दोन्ही वाक्यांच्या पाठीमागे तिसरेच एक विधान अध्याहृत आहे. ते म्हणजे राम नावाचा कुणीतरी थोर पुरूष पूर्वी होऊन गेला, हे होय.

     कारण जर राम नावाचा कुणी पूर्वी होऊन गेलेलाच नसेल, तर अ आणि ब या दोन्ही वाक्यांना अर्थ राहात नाही. मग ती वाक्ये बरोबर असोत किंवा चुकीची असोत. तेव्हा या दोन्ही वाक्यांचा खरेखोटेपणा तपासून पाहण्याकरता, खरेखोटेपणाची अशी तपासणी करण्यापूर्वीच, आपल्याला राम नावाचा कुणी होऊन गेला हे गृहित धरावे लागते. आणि असे गृहित हे अध्याहृत असते. ते अशा दोन वाक्यांमधे सांगितलेले नसते. अर्थात प्रश्न वरील दोन वाक्यांचा नाही, तर त्या दोन्हींच्या पाठीमागे अध्याहृत काय आहे त्याचा आहे.

     हा झाला फ्रेगेने म्हटलेला अध्याहृताचा पहिला प्रकार. आपण त्याला ‘गृहितावर आधारलेले अध्याहृत’ असे म्हणुया.

     त्यानंतर, दुसरे वेगळे उदाहरण बघुया. मी जर असे म्हटले, की ‘आम्ही सर्वजण नाटक बघायला गेलो खरे, पण थिएटरातल्या सर्व जागा भरलेल्या होत्या.’ तर अशा वाक्यामधेदेखील बरेच काही अध्याहृत आहे. पण त्यातली सर्वात महत्त्वाची अध्याहृत असलेली गोष्ट ही, की थिएटरातल्या खुर्च्यांची संख्या मर्यादित असते आणि नाटक काही कुणी उभा राहून, उभ्याउभ्या पाहत नसतो किंवा जमिनीवर बसून पाहत नसतो. पण त्यामधे थिएटरात जाऊन नाटक पाहण्याची रीत काय असते (म्हणजे सीट मिळाली पाहिजे वगैरे), ही सर्वांना माहीत असलेली अशी, सार्वत्रिक अनुभवाची बाब आहे. आणि ही बाब या वाक्यामधे सांगितलेली नसली तरी ती अध्याहृत आहे.

     हा झाला फ्रेगेने सांगितलेला अध्याहृताचा दुसरा प्रकार. आपण त्याला ‘सार्वत्रिक ज्ञानावर आधारलेले अध्याहृत’ असे म्हणुया. तिसरे, आणखी वेगळे उदाहरण असे. समजा, आपण विचारले, ‘तो का मेला?’ आणि कुणीतरी उत्तर दिले, की ‘त्याला कॅन्सर झाला होता’; तर हा प्रश्न आणि हे उत्तर एकमेकांशी संबंधित आहेत, हे खरेच; पण त्या प्रश्न आणि उत्तर अशा परस्परसंबंधामधे एक अध्याहृत दडलेले आहे. ते असे, की कॅन्सरसारखा दुर्धर रोग झाला की माणूस मरतो.

     मात्र हे विधान शंभर टक्के खरे आहे असे बिलकुल नव्हे. कारण कॅन्सर होऊन, त्यामधून सहीसलामत सुटून बरे झालेले ‘कॅन्सर सर्व्हायव्हर’ लोक असतातच! तरीसुद्धा सर्वसामान्यपणे विचारलेल्या प्रश्नाला दिले गेलेले उत्तर अगदी चुकीचे होते, असेही नव्हे. कॅन्सर झाला की माणूस मरण्याची शक्यता बरीच असते असा अर्थ आहे, आणि तो बरोबर आहे.

     हा झाला फ्रेगेने सांगितलेला अध्याहृताचा तिसरा प्रकार. आपण त्याला ‘शक्यतेवर आधारलेले अध्याहृत’ असे म्हणुया.

     हिंदू धर्मग्रंथांमधली अनेक वाक्ये या तीन प्रकारांमधे बसणारी अशी असतात. एकूणच, हिंदू धर्मग्रंथांमधला बाज (स्टाइल) हा ‘कमीत कमी आणि मोजक्या शब्दांत जास्तीत जास्त गहन तत्त्वज्ञान सांगायचे’ असा आहे. आणि कमीत कमी शब्दांत काही म्हणायचे झाले म्हणजे त्यात अनेक गोष्टी अध्याहृत असणार हेही ओघाने आले. तेव्हा हिंदू धर्मग्रंथांचा अर्थ लावताना त्यातल्या प्रत्येक वाक्यामधे अध्याहृत काय आहे आणि त्याचा अर्थ काय-संदर्भ काय वगैरे प्रश्नांचा विचार करावाच लागतो. आणि तो करताना गॉटलॉब फ्रेगेने दिल्याप्रमाणे ‘अध्याहृत’ या मूलभूत भाषातत्त्वाचे संशोधन करावे लागते.

     प्रॅगमॅटिक्स आणि लॉजिकल इन्फरन्स या दोहोंमधला मूलभूत फरक असा, की प्रॅगमॅटिक्सच्याद्वारे समजलेला अर्थ हा वाक्यामधे लपलेला, दडलेला अर्थ असतो; तो लॉजिकल इन्फरन्ससारखा, लॉजिक वापरून उघडपणे काढता येणारा अर्थ नव्हे. लॉजिकल इन्फन्समधे ‘लेकी बोले, सुने लागे’ असा प्रकार असत नाही, तर अगोदरच्या दोन वाक्यांच्या वरून तिसरे, पुढचे वाक्य काढलेले असते.

     संस्कृत भाषा मराठीपेक्षा अनेक बाबतींत अधिक श्रीमंत आहे. संस्कृतमधील प्रॅगमॅटिक्स हा या श्रीमंतीतलाच एक प्रकार. त्यातही विविध पैलू आहेत. त्यामधे लक्षणार्थ, गुढार्थ वगैरे अर्थांचे अनेक प्रकार आहेत. ‘गंगायाम घोष:’ या शब्दप्रयोगाचे सरळ भाषांतर ‘गंगेमधे घोष होत आहे’ असे आहे. पण या उघड दिसणार्‍या अर्थाच्या पाठीमागे किती अर्थ लपलेला आहे बघा.. की
     १. गंगा नदी आहे, २. त्या नदीतून पाणी खूप जोरात वाहत आहे, ३. त्या पाण्याचा जोराने खळखळाट होत आहे, आणि ४. तो गंगेतल्या जोराने वाहणार्‍या पाण्याचा खळखळाट आपल्याला घोषाच्या स्वरूपामधे ऐकू येत आहे.

गॉटलॉब फ्रेगे याने दिलेले अध्याह्रताचे वर्णन     ‘गंगायाम् घोष:’ या अवघ्या दोन शब्दांमधे इतका सर्व अर्थ सामावलेला आहे.

     दुर्दैवाची गोष्ट अशी, की संस्कृत काय किंवा मराठी काय, या भाषा प्रॅगमॅटिक्सच्या बाबतीत समृद्ध असूनदेखील आपल्याकडे प्रॅगमॅटिक्स या विषयावरचे संशोधन फारसे झालेले दिसत नाही. किंबहुना ‘भाषेचे तत्त्वज्ञान’ या प्रकाराच्या बाबतीत आपण भारतीय लोक कमी पडतो असे जाणवते.

     पण अभ्यासाच्या पाश्चात्य क्षेत्रामध्ये भाषेचे तत्त्वज्ञान हा प्रचंड मोठा समुद्र आहे. सव्वादोन हजार वर्षांपूर्वी प्लेटोअरिस्टॉटल यांसारख्या ग्रीक तत्त्वज्ञांपासून ते अलिकडच्या डेरिडासारख्या आधुनिकोत्तर (पोस्टमॉडर्न) तत्त्वचिंतकापर्यंत असंख्य तत्त्वज्ञांनी गेली दोन सहस्रके या समुद्रामधे सतत भर घातली आहे. त्यातलेच एक प्रमुख नाव म्हणजे फ्रीडरिश लुडविरा गॉटलॉब फ्रेगे. त्याने ‘अर्थ’ (जर्मन भाषेत झिन्न) आणि सूचकत्त्व (जर्मन भाषेत बेडॉयटुङ्‌ग) या दोन गोष्टींची चर्चा केली आहे. त्याच्या मते, अर्थ आणि सूचकत्व या दोन मूलभूत गोष्टी एकमेकांपेक्षा वेगळ्या आहेत आणि त्या जोडीने भाषेला अर्थ (मीनिंग) प्राप्त करून देतात.

     इथेसुद्धा अर्थ हा एकच मराठी शब्द दोन वेगवेगळ्या अर्थांनी वापरावा लागला आहे. झिन्न = सेन्स या अर्थी आणि बेडॉयटुड्ग = मीनिंग या अर्थी. सेन्स आणि मीनिंग या दोन शब्दांच्या अर्थांमधे फरक आहे. सेन्स ‘जाणिवेला जाणवतो’ आणि मीनिंग हा व्याकरणात असतो आणि म्हणून तो ‘बुद्धिगम्य’ असतो.

     तर झिन्न आणि बेडॉयटुड्ग हे दोन्ही एकत्र आले म्हणजे भाषेतल्या प्रकटीकरणाला (एक्सप्रेशनला) ‘ट्रूथ-व्हॅल्यू’ प्राप्त होते असे फ्रेगे म्हणतो, आणि मग या ‘ट्रूथ-व्हॅल्यू’चे लॉजिक गणितीय स्वरूपामधे मांडता येते.

डॉ. अनिलकुमार भाटे
निवृत्त प्राध्यापक
विद्यृत अभियांत्रिकी, संगणक विज्ञान,
माहिती तंत्रविज्ञान आणि मॅनेजमेन्टएडिसन शहर,
न्यू जर्सी राज्य, अमेरिका
इमेल : anilbhate1@hotmail.com

About Post Author

1 COMMENT

Comments are closed.