प्रसार व समाज माध्यमांच्या विळख्यातील लोकमानस

2
102

एकविसावे शतक हे माहिती–तंत्रज्ञानाचे आणि माध्यमक्रांतीचे म्हणून ओळखले जाते. त्या क्षेत्रातील प्रगतीमुळे संपूर्ण समाज माध्यमांनी प्रभावित आणि संकुचित बनत चालला आहे. संकुचित दोन अर्थांनी – समाज एकमेकांजवळही येत चालला आहे आणि त्याची दृष्टीही लहान, आत्मकेंद्री होत चालली का? अशी शंका येते. माध्यमे ही प्रारंभी समाजाच्या कुतूहलाचा, औत्सुक्याचा विषय ठरली. समाजाने गरज, क्रांती, प्रगती म्हणून त्या परिवर्तनाचा गौरव केला; परंतु तीच माध्यमे कुटुंबाची, समाजाची आणि पर्यायाने राष्ट्राची डोकेदुखी ठरत आहेत. माध्यमांची स्वैर हाताळणी आणि त्याचा विघातक, आत्मकेंद्री वापर जवळच्या काळात खूप मोठी जागतिक समस्या बनेल यात शंका नाही. त्यांवर काही बंधने घालता येतील का? की ती स्वनियंत्रण घालू शकतील?

माध्यमे गरज म्हणून वापरली तर त्यांचा विधायक वापर होऊ शकतो; परंतु माध्यमांच्या आहारी जाणारा समाज स्वकेंद्री बनत आहे. स्वरंजनाचे ते निरर्थक, वेळखाऊ व्यसन अत्यंत घातक आणि मानवी संवेदना व मानवाचा विवेक बधीर करणारे ठरत आहे. माध्यमांच्या अतिरिक्त व बेजाबदार वापराची अविवेकी काजळी मिटली नाही तर नजीकच्या काळात संपूर्ण तरुण पिढी आणि समाज मानसिक दृष्ट्या पंगू बनण्याची भीती वाटते. त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. अनेक मानसोपचार तज्ज्ञांनीही ती भीती वर्तवली आहे. भावनिक उन्माद, निराशा, डिप्रेशन, अस्वस्थता, चिडचिडेपणा, स्वमग्नता, मेंदुविकार, डोळ्यांचे विकार, मानेचे विकार या समस्यांबरोबरच माध्यमांच्या अविवेकी वापराने अनेकांना त्यांचे प्राण गमावावे लागले आहेत. माध्यमे ही माणसाच्या हातातील फक्त खेळणे नव्हे तर ती त्याचा बाह्य अवयव बनून गेली आहेत. माणसे मोबाईल, स्मार्टफोन कोठे विसरली तर अस्वस्थ होतात. त्या माध्यमांनी जीवनशैली; तसेच, त्यांचे आंतरिक व बहिर्गत असे विश्व प्रभावित झालेले आहे. त्या माध्यमांमध्ये फेसबुक, व्हॉट्सअॅप, ब्लॉग, ट्विटर, युट्युब, व्हिडीओ गेम इत्यादींचा समावेश होतो.

स्वातंत्र्यानंतरच्या काळात वर्तमानपत्रे, आकाशवाणी व दूरदर्शन या माध्यमांतून माहितीची देवाणघेवाण, प्रबोधन, माहिती संप्रेषण व्हायचे. पेजर 1990 नंतर आले. त्यानंतर मोबाईल, विविध वाहिन्या आणि इंटरननेट यांचा बोलबाला वाढला. तेव्हा ती माध्यमे वापरणे सर्वाना परवडणारे नव्हते. काहींची ती गरज होती आणि ती प्रथमतः ‘स्टेटस सिम्बॉल’ म्हणूनही वापरली गेली. माध्यमे सर्वांच्या हातात 2000 नंतर आली; सर्वांना परवडणारी झाली. माध्यमांनी मोठी जागतिक बाजारपेठ तयार केली आणि समाजाचे मनोविश्वही व्यापून सोडले. त्यामुळे त्यांनी समाजाचे चलनवलन बदलून टाकले. माध्यमांमुळे माणसा माणसांतील विसवांद, गैरसमज, सामाजिक दुही, खोट्या माहितीचे व सवंग साहित्याचे प्रसारण असे दोष बळावलेले  दिसतात. माध्यमे अनियंत्रित आणि निरंकुश बनत आहेत. सत्यता, दर्जा, ज्ञान यांपासून विलग बनलेली माध्यमे मानवी जीवनाला कोणता आकार देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जगातील जवळजवळ सर्व देशांच्या राज्यघटनांनी त्या त्या देशांतील लोकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे. तो प्रत्येक व्यक्तीचा आधुनिक काळात मुलभूत अधिकार आहे. माध्यमांमुळे प्रत्येकाला त्याच्या मनातील भावना, विचार मांडण्याचे मोठे, जागतिक व्यासपीठ मिळाले आहे; ती गोष्ट गौरवास्पद आहे. परंतु त्याची दुसरी अविवेकी बाजू मात्र घातक आणि काळीकुट्ट आहे. त्या माध्यमांत ‘अभ्यासोनी प्रकटावे’ असे होत नाही. त्या ठिकाणी चाललेला तात्काळ असा क्रियावादी–प्रतिक्रियावादी यांच्यातील अतार्किक, विवेकशून्य संघर्ष उबग आणणारा वाटतो.

माध्यमांमुळे छुपे शीतयुद्ध मुक्त भांडवलशाही समाजव्यवस्थेत जाणवते. माध्यमे कोणाच्या तरी हातची बाहुले बनून गेली आहेत. ती प्रायोजित आहेत. त्यामुळे साहजिक त्यांच्यावर मालकांचा प्रभाव असतो. टीव्ही वाहिन्या, न्यूज चॅनेल्स त्यांची अहमहमिका, वाढती स्पर्धा रोज अनुभवत असतात. नैसर्गिक संकटे, दु:ख, समस्या, भक्तिभाव; एवढेच काय, युद्धजन्य भीषण प्रसंगांचेही माध्यमांत ‘इव्हेंट’ होऊ लागले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेला संघर्ष आणि त्याची माध्यमांत उमटलेली प्रतिक्रया पाहिली, की या पुढील जग व त्यांतील राष्ट्रसंघर्ष कोणत्या वळणावर असणार आहे याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. राष्ट्रहिताच्या अनेक गोपनीय गोष्टी या माध्यमांनी तर्कांच्या आधारे उघड केल्या आहेत. माध्यमांनी भारतीय वायू सेनेकडून अॅटॅक होण्याआधीच ती बाब उघड केली होती. तसे वार्तांकन आणि शक्यता वर्तवल्या जात होत्या. माध्यमांनीच ते युद्ध हाती घेतले की काय? अशी परिस्थिती त्या अभिनिवेशी ‘पोझ’मध्ये होती. माध्यमांचा लोकमानसावर प्रचंड प्रभाव आहे. त्यामुळे समाजमनही प्रभावित होते. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी त्याबाबत चिंतादेखील व्यक्त केली. ते म्हणाले, की ‘सरकारी भूमिका जनतेपर्यंत पोचवणे हे प्रसार माध्यमांचे खरे काम असते; परंतु टीव्ही वाहिन्या स्वतःच भूमिका ठरवू लागल्या आहेत.’ ते ‘अजेंडा सेटिंग’ खूप भयावह आहे. माध्यमे अव्वल स्थान टिकवण्यासाठी, शोधपत्रकारितेच्या नावाखाली धुमाकूळ घालत आहेत. त्याचे प्रखर दर्शन आणि बदलणारी पत्रकारिता 1980 च्या दशकात नाटककार तेंडुलकर यांनी ‘कमला’ नाटकात चित्रित केली होती. पण ते मुद्रणमाध्यम होते. त्यांचा वर्तमानपत्री बाज होता. त्याचे पुढील भडक चित्र त्या क्षेत्रात पाहण्यास मिळत आहे.

तरुण व किशोरवयीन मुले आणि त्यांचे पालकही काही अंशी माध्यमांनी ग्रासलेले आहेत. त्या प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आहे. ते सर्व त्यांच्या हाती असलेले माध्यम कोणताही विचार न करता, अत्यंत बेजाबदारपणे वापरत आहेत. माध्यम कोणत्या वेळी, कोणत्या प्रसंगी व कसे वापरावे याचे कोणतेही भान आणि तारतम्य कोणालाही राहिलेले नाही. माध्यमांमुळे समांतर आभासी जग (आभासी प्रतिसृष्टी) निर्माण झाली आहे आणि आजची पिढी वास्तवापेक्षाही त्या आभासी जगात रममाण झालेली दिसते. माणसाने वास्तवापासून तुटणे, परात्म होणे हे चित्र भयावह आहे. मुले मैदानावरील खेळांऐवजी आभासी खेळात अडकली आहेत. मोबाईलवरील स्क्रीन हे त्यांचे प्लेग्राउंड बनले आहे. अफवांचे पीक माध्यमांतून पसरवले जात आहे. माध्यम हे काहींचे वेळ घालवण्याचे साधन बनले आहे तर अनेकांसाठी माध्यमे वेळखाऊ बनली आहेत. काही वृद्ध माणसेही त्याच्या आहारी जाताना दिसतात. कुटुंबकलह, पतिपत्नींमधील विसंवाद, अविश्वास व त्यातून निर्माण होणारे घटस्फोट ही समस्या… तिलाही समाजमाध्यमे कारणीभूत होत आहेत. इंटरनेट, युट्यूब यांतील माहितीची सत्यासत्यता पडताळली जात नाही. इंटरनेटवरील सर्व सत्य असते याची खात्री देता नाही. महाजालावरील माहितीच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. धार्मिक, जातीय, प्रांतीय तेढ माध्यमांच्या बेजबाबदार वापरामुळे वाढत आहे. त्यामुळेच माध्यमांच्या काळजीपूर्वक, विवेकी विधायक कामासाठी वापर होणे गरजेचे आहे. माध्यमे माणसाच्या विकासात्मक वाटचालीसाठी गरजेची आहेत. ती अनेक अडचणींवर मात करणारी आहेत. स्मार्टफोन मिनी कॉम्पुटर बनला आहे. कागदपत्रांची देवाणघेवाण, माहिती प्रसारण, प्रशासनिक व्यवहार आणि कामकाज माध्यमांमुळे सुलभ बनले. माध्यमे गरजेपुरती वापरणे आवश्यकच आहे. परंतु माध्यमे केवळ मनोरंजन आणि निरर्थक वृत्तीने वापरली गेली तर माणसाचे काळ, वेळ आणि मन यांचे गणित बिघडणार आहे. म्हणून माध्यमे अत्यंत विवेकी वृत्तीने वापरणे गरजेचे आहे; नाहीतर पुढील उमलती पिढी… तिचे भावविश्व, मनोविश्व आणि तिचे एकूण भावी जीवनच या सायबरविश्वात उध्वस्त होईल की काय अशी शंका येते. जगाच्या उंबरठ्यावर असलेल्या या समस्येला पाय फुटण्यापूर्वीच रोखले गेले पाहिजे. ते मानवी बुद्धीच्या विवेकी उपयोजनेनेच शक्य होईल.

डॉ.अशोक लिंबेकर 9822104873, ashlimbekar99@gmail.com
 

 

About Post Author

Previous articleहसत-खेळत शिक्षणाला आधार
Next articleकनकाडी (Kanakadi)
अशोक लिंबेकर हे वीस वर्षांपासून संगमनेर महाविद्यालयामध्ये आहेत. ते मराठी विभागाचे विभागप्रमुख आहेत. त्यांनी लिहिलेला 'दीप चैतन्याचा' हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. तसेच, लिंबेकर यांनी 'मुक्तसवांद' या साहित्यासंबंधी संस्थेची स्थापना केली आहे. ते विविध नियतकालिकांत लेखन करतात. ते संगमनेर येथे राहतात. 9326891567

2 COMMENTS

  1. अतिशय भयानक आणि परखड़ वास्तव…
    अतिशय भयानक आणि परखड़ वास्तव समोर ठेवले आहे तुम्ही

    @

  2. वास्तविक विष्लेषण
    वास्तविक विष्लेषण.

Comments are closed.