प्रशांत कुचनकरची डॉक्टर्स टीम

_Prashant_KUchankar_1.jpg

डॉ. प्रशांत कुचनकर हा बीएएमएस झालेला तरुण. त्याने डॉक्टर झाल्यावर रूढ मार्गाने नोकरी वा दवाखाना टाकला नाही. त्याने योग-प्राणायाम-ध्यान व आध्यात्मिक विचार यांची जोड देऊन वेगळी उपचारपद्धत विकसित केली. प्रशांतने जीवनात निराशा, हताशा अनुभवणा-या रुग्णांचे त्यांना भावनिक आधार देऊन काउन्सिलिंग केले. त्याने प्रेम, जिव्हाळा, आपुलकी या त्रिसूत्रीच्या बळावर कित्येक मानसिक रुग्ण कमीत कमी औषधांचा वापर करून कमी खर्चात बरे केले आहेत. प्रशांतने समविचारी दहा डॉक्टरांचा समूह तयार केला आहे. प्रशांत त्यांना त्याची ‘डॉक्टर्स टीम’ म्हणतो. ‘डॉक्टर्स टीम’ सामाजिक बांधिलकीतून कुरखेडा-गडचिरोली व नागपूर येथे रुग्णसेवा करत आहे.

प्रशांतची त्याच्या स्वत:च्या आजारातून तशी घडण झाली आहे. प्रशांत आयुर्वेदाच्या शिक्षणासाठी चंद्रपूरसारख्या ग्रामीण भागातून नागपूरला आला. प्रशांतला ग्रामीण बोली, मध्यमवर्गीय राहणीमान यांमुळे आत्मविश्वास वाटत नव्हता. तो शहरी संस्कृतीला घाबरत होता. त्याच्यावर कॉलेजमध्ये रॅगिंग झाले. त्यानंतर प्रशांत स्टुडंट्स ऑर्गनायझेशनमध्ये सहभागी झाला, विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी लढू लागला. त्याने अन्यायाविरुद्ध आंदोलन केले. हळुहळू, त्याचा आत्मविश्वास बळावला. नंतरचा त्याचा आजार आणखी वेगळा होता. प्रशांतला समाजात, सरकारी व्यवस्थेत सर्वंकष सुधारणा व्हावी असे वाटत होते आणि तो त्याच व्यवस्थेचा भाग होऊ पाहत होता! त्याला मनातील त्या भावनिक द्वंद्वामुळे नैराश्य येऊ लागले. तो वैफल्यग्रस्त झाला. त्याचा परिणाम असा झाला, की प्रशांतला डोकेदुखी, अॅसिडिटी, ताण, रक्तदाब, अनिद्रा यांसारख्या आजारांनी घेरले. त्या दरम्यान, प्रशांतची वैद्यकीय शिक्षण व संशोधन यांच्या निमित्ताने ‘सेवांकुर’चे डॉ. अविनाश सावजी यांच्याशी भेट झाली. त्याला ‘सेवांकुर’, ‘आनंदवन’ व ‘निर्माण’ यांसारख्या संस्थांमध्ये रचनात्मक काम करणारी माणसे भेटली. तो डॉ. अभय बंग यांच्या कामाने प्रभावित झाला. प्रशांतने स्वत:ला विकसित करण्यासाठी विविध कलागुण आत्मसात केले. त्याने त्यातून शरीर व मन यांच्या स्वास्थ्याला पोषक अशी उपचारपद्धत विकसित केली. प्रशांतने त्या वेळी स्वत:ला विकसित करण्यासाठी जे प्रयोग केले, तेच तो रुग्णांवर करत आहे.

प्रशांतने ‘आपले आरोग्य आपल्या हाती’ हे ब्रीदवाक्य घेऊन गडचिरोली, चंद्रपूरसारख्या आदिवासीबहुल भागात डॉ. सतीश गोगुलवार यांच्या ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ या संस्थेत दोन वर्षें काम केले. त्याने तेथे विविध औषधींवर अभ्यासपूर्ण संशोधन केले व पारंपरिक वैद्यकीय व्यवस्था समजून व शिकून घेतली. प्रशांतने ताप, सर्दी, खोकला, अॅनिमिया, साथीचे रोग यांसारख्या आजारांवर आयुर्वेदिक काढ्यांचा उपयोग केला. त्याने सहका-यांच्या मदतीने काष्ठौषधींसाठी वनौषधी लागवड, औषधी निर्माण यांसारखे उपक्रम राबवले.

प्रशांतने देशभरात विविध ठिकाणी हिंडून वेगवेगळ्या पद्धतीने उपचार करणार्‍या परंपरागत व आयुर्वेदिक वैद्यांकडे काही वर्षें काम केले; त्यांच्या आयुर्वेदिक उपचारपद्धतींचा अभ्यास केला. प्रशांत सांगतो, “मला माणसाच्या विविध व्याधींवर वेगवेगळे तज्ज्ञ डॉक्टर असावेत हे मान्य नाही.” त्याला वाटते, की माणसाला मध्यवर्ती ठेवून उपचार झाले पाहिजेत. माणसाच्या समस्यांचे मूळ त्याचे मानसिक अस्वास्थ्य आहे. रुग्णांच्या उपचारादरम्यान माझ्या लक्षात आले, की भावनिक कोंडमारा होणा-या व्यक्तींमध्ये थायरॉईड, डोकेदुखी, अॅसिडिटी, अस्थमा, स्त्रीरोग, अनिद्रा, हृदयरोग, रक्तदाब, डायबेटीस, नैराश्य, वैफल्य यांचे प्रमाण वाढते. मानसिक स्वास्थ्य बिघडल्यामुळे शरीरात विविध हानिकारक रसायने स्रवतात, आम्लाचे प्रमाण वाढते. त्याचा पचनसंस्थेवर विपरीत परिणाम होऊन वेगवेगळे आजार उद्भवू शकतात. त्यावर त्याने जेनेरिक औषधांच्या जोडीने योग-ध्यान-प्राणायाम, आध्यात्मिक विचार, सुसंवाद यांद्वारे रुग्णांवर उपचार केले. त्या उपचारपद्धतीने रुग्णांच्या शरीरस्वास्थ्यात लक्षणीय बदल जाणवले. डायबेटीस, थायरॉईड यांसारख्या आजारांचे रुग्ण तीन ते चार महिन्यांत ठणठणीत बरे झाल्याची काही उदाहरणे आहेत. आम्ही नैराश्य आलेल्या रुग्णांना आमच्या सोबत ठेवतो. त्यांना प्रेम, जिव्हाळा व आपुलकीची वागणूक दिली जाते. त्यामुळे त्यांच्यात सकारात्मक बदल दिसत आहेत. उदाहरण द्यायचे झाले, तर आमच्या टीममधील दहा तरुण डॉक्टरांपैकी एक म्हणजे डॉ. विराज गिते. विराज स्वभावाने हळवा. त्याच्यात नैराश्य ठासून भरलेले होते. खरेतर तो उपचारासाठी आला होता. ‘स्व’चे व समाजबांधिलकीचे भान आलेला हा तरुण डॉक्टर आता रुग्णसेवेत समर्पित झाला आहे.

डॉ. नम्रता कपुरे हीसुद्धा त्यांतील एक. तिला आत्मविश्वासाची उणीव, संभाषणकौशल्याचा अभाव यांमुळे नैराश्य आले होते. पण त्या उपचारपद्धतीने तिच्यात आत्मविश्वास वाढला. नम्रता आता विविध विषयांवर समुपदेशन करते.”

_Prashant_KUchankar_2.jpgसंस्थेचे काम गडचिरोलीपासून चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या कुरखेडा या गावातून १९८४ सालापासून सुरू झाले. संस्थेने आदिवासींच्या पारंपरिक औषधांवर काम केले आहे. संस्थेने पारंपरिक ज्ञानाचा आणि शास्त्राचा वापर करत वनौषधी तयार केल्या आहेत. संस्थेद्वारे जंगलसफारीतून वनौषधींची ओळख करून देण्यात येते. तसेच प्रशिक्षणार्थींना शिबिरांच्या माध्यमातून प्रात्यक्षिकाद्वारे शतावरी कल्प, वाताचे तेल, केश तेल, अडुळसा कल्प, कुडाच्या गोळ्या, बिब्बा मलम, भुईनिंब गोळी यांसारख्या आयुर्वेदिक औषधी तयार करण्यास शिकवण्यात येतात. संस्थेच्या त्या कामात गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांतील काही कार्यकर्ते जोडले गेले आहेत. संस्थेचे कुरखेड्यापासून सुरू झालेले ते आरोग्यव्रत दोनशे गावांपर्यंत पोचले आहे. संस्थेतर्फे सर्व उपचार पस्तीस रुपयांत करण्यात येतात.

प्रशांत व दहा डॉक्टर्स हे मिळून ‘आनंदलोक होलिस्टिक सेंटर’ नागपूरमध्ये चालवतात. त्यांना त्यांच्या कामात पाच-सहा इंटर्न व दहा-पंधरा विद्यार्थी मदत करतात. ते सर्व स्वयंप्रेरणेने रुग्णसेवेत आले आहेत. त्यांचे काम रोज तीन, तर साप्ताहिक चार केंद्रांमार्फत चालते. ‘आनंदलोक’ची टीम एकत्र राहते. ज्या रुग्णांना सोबतीची गरज आहे अशांना त्यांच्या परिवारात सामावून घेतले जाते. त्यांचा भर प्रतिजैविक औषधांचा वापर न करता उपचार करण्यावर आहे. प्रशांतच्या टीमने जागेअभावी बस्ती, स्नेहन, वमन, विरेचन, योग, प्राणायाम, पंचकर्म व वनौषधी याद्वारे रुग्णांच्या घरी जाऊनही उपचार केले आहेत. ‘वमन’सारखी उपचारपद्धत वीस रुपयांपासून ते दोनशे रुपयांपर्यंत केली जाते, तर पंचकर्म शंभर रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंत केले जाते. संपूर्ण शारीरिक तपासणी व एक आठवड्याचे औषधोपचार एकशेतीस रुपयांत केले जातात. आर्थिक दुर्बल घटकांकडून मात्र त्यासाठी सत्तर रुपये आकारले जातात. ती आरोग्य केंद्रे चालवण्यासाठी नागपूरला आंतरभारती आश्रम संस्थेचे डॉ. भाऊ झिटे यांनी जागा उपलब्ध करून दिली आहे. ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ संस्थेने त्यांना कुरखेडामध्ये बांधकाम करून दिले. ‘आनंदलोक’ला कोणी दोन हजार, कोणी पाच हजार रुपये अशा देणग्या देतात. शिवाय, दिवसाला त्या केंद्रात किमान पन्नासएक रुग्ण तरी उपचारासाठी येतात. प्रत्येक रुग्णामागे दहा रुपये उपचार शुल्क घेतले जाते. आतापर्यंत तीस हजारांच्या वर रुग्णांनी त्या उपचारपद्धतीचा फायदा घेतला आहे. कुरखेडाच्या आरोग्य केंद्रासाठी महिन्याचा खर्च तीस ते चाळीस हजार, तर नागपूरच्या केंद्रासाठी तो पन्नास ते साठ हजार रुपये येतो. सर्व खर्च काढून वीस ते तीस हजार रुपये उरतात. त्या टीमला उरलेल्या त्या पैशांतून नागपूरमध्ये मोठे आरोग्य केंद्र बांधायचे आहे. त्यांचा मानस त्या ठिकाणी व्यसनमुक्तीपासून ते इन्फेक्शनपर्यंत सर्व आजारांवर उपचार उपलब्ध करून देण्याचा आहे. त्यांना लोकसहभागाची गरज केवळ उपचार नव्हे, तर आरोग्यव्यवस्था उभी करण्यासाठी वाटते.

प्रशांतचे ध्येय वेगवेगळ्या पॅथींचा अभ्यास करून रुग्णांना आपुलकीने, कमी खर्चात व कमीतकमी औषधींत तंदुरुस्त करणे हे आहे. तो त्यासाठी वनौषधींवर संशोधन करत आहे.

डॉ. प्रशांत कुचनकर – ८२७५४००२२०, tarun.seva@gmail.com

– वृंदा राकेश परब

About Post Author

3 COMMENTS

  1. मॅडम आपण खूप सुंदर आणि…
    मॅडम आपण खूप सुंदर आणि चांगल्या शब्दांत dr. प्रशांत याच्यावरचे विचार मांडलात. या लेखाचा उपयोग हा सर्वसामान्य माणसालाही होऊ शकतो, ज्याच्या मनात निराशेचा, आत्मविश्वासाचा न्यूनगंड असेल, असंच काहीतरी लोकांना, समाजाला उपयोगी पडेल असे लिहित जा, छान लेख लिहिलात ?धन्यवाद…?

  2. मॅडम आपण खूप सुंदर आणि…
    मॅडम आपण खूप सुंदर आणि चांगल्या शब्दांत dr. प्रशांत याच्यावरचे विचार मांडलात. या लेखाचा उपयोग हा सर्वसामान्य माणसालाही होऊ शकतो, ज्याच्या मनात निराशेचा, आत्मविश्वासाचा न्यूनगंड असेल, असंच काहीतरी लोकांना, समाजाला उपयोगी पडेल असे लिहित जा, छान लेख लिहिलात ?धन्यवाद…?

  3. very nice iwas traying to…
    very nice iwas traying to call dr, prashant today regarding my son streatment. but could not conect should i call tomarrow sir

Comments are closed.