प्रबुद्ध मूकनायक

-muknayak-ambedkar

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निरतिशय सुंदर लिखाण इंग्रजी भाषेइतकेच मराठीत केले आहे. ते ‘मूकनायक’ या साप्ताहिकाचे संपादक होते. ‘मूकनायक’ हे नावच मुळात शोषित आणि पददलित वर्गाचे अस्सल वर्णन करणारे आहे. शाहुमहाराजांनी ‘मूकनायक’ वृत्तपत्र सुरू करण्यासाठी आंबेडकर यांना प्रेरणा दिली आणि त्याचा पहिला अंक 31 जानेवारी 1920 रोजी प्रकाशित झाला. आंबेडकर ‘बहिष्कृत भारत’चे संपादन 13 एप्रिल 1927 रोजी तर,  ‘जनता’ या साप्ताहिकाचे संपादन डिसेंबर 1930 मध्ये करू लागले. आंबेडकर यांचे त्या तिन्ही साप्ताहिकांमधील लिखाण मूलग्राही आणि ज्वालामुखीच्या उद्रेकासारखे ज्वलज्जहाल आहे. त्यांनी लिहिले आहे, “बहिष्कृत लोक हे पशू नसून, उलट, ते आमच्याचसारखे तेजस्वी आणि न्यायप्रिय आहेत, हे त्यांना पटले म्हणजे त्यांच्यातील उच्छृंखल लोकही आमच्याशी लीनतेने वागू लागतील’, आंबेडकर यांची भाषा ही नितळ, सरळ आणि सोपी आहे. ‘मूकनायक’च्या 14 ऑगस्ट 1920 च्या अग्रलेखाचे शीर्षक आहे ‘सिंह प्रतिबिंब’. तो लोकमान्य टिळक यांच्या मृत्यूनंतर बरोबर चौदा दिवसांनी प्रसिद्ध झाला. त्या अग्रलेखात सिंहाने डोकावावे, तो काही योगायोग नव्हे. विशेष म्हणजे त्याच वर्षी सप्टेंबरमध्ये आंबेडकर लंडनला गेले आणि बॅरिस्टर व डॉक्टर ऑफ सायन्स पदवी मिळवून परतले. त्यांनी त्यांच्या त्या अग्रलेखातून सिंहाचे प्रतिबिंब हे त्याचे दुसरे रूप असते, तेही तितके प्रखर आणि प्रसंगी उग्र असते, हे दाखवून दिले आहे. ते अग्रलेखात म्हणतात, ‘साधारणपणे या धर्माचे एक ढोबळ तत्त्व असे आहे, की मनुष्य जन्माला आल्यापासून तो मरेपर्यंत त्याला या जगात मुख्यत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष असे चार पुरुषार्थ साधावयाचे असतात आणि तो कमीअधिक प्रयत्न प्रमाणात नित्यश: त्याप्रमाणे करत असतो. यापैकी पहिला वर्ग म्हणजे चारही पुरुषार्थ मिळवणाऱ्यांचा, पण त्यात तो क्वचितच यशस्वी होतो. दुसरा म्हणजे एक-दोन साध्य करणारा आणि तिसरा म्हणजे ज्याला एकही लाभत नाही तो आणि असाच काही एक न लाभलेला जो वर्ग तो बहिष्कृत वर्ग होय. कारण तो या धर्मातील अनिष्ट जातिबंधनाच्या रूढीने जखडला गेला असल्यामुळे यापैकी एखादा मार्ग मिळवण्यास त्याला मुळी वावच नाही.’ त्यांची बाजू अतिशय परखडपणे परंतु तत्त्वचिंतकाच्या भूमिकेतून पटवून देण्याएवढी हातोटी आंबेडकर यांच्याएवढी अन्य कोणामध्येही त्या काळात नव्हती. ‘धर्म या शब्दाचा खरा अर्थ कर्तव्य-कर्म हा न घेता फक्त धर्माच्या नावाखाली व्यवहारात ज्या चालीरीती आहेत, त्यांकडे पाहिल्यास त्यात त्या हतभागी समाजाचा दर्जा कोठे आहे तो पाहा,’ या शब्दांत ते त्यांच्या व्यथा मांडतात. जातिव्यवस्थेने त्यांच्या वर्गाला तुच्छ लेखले आणि त्यांचा छळ केला, आंबेडकर यांच्या मनातील कढ वाचकाच्या भावनेला स्पर्शून गेल्याशिवाय राहत नाही.  

हे ही लेख वाचा –
दलित महिला परिषदेच्या अध्यक्ष – सुलोचना डोंगरे
आंबेडकर आणि मराठी नाटके

आंबेडकर ज्या जातिजमातींना अस्पृश्य म्हणून हिणवले जात होते, त्यांचा उद्धार करण्याएवढी पात्रता तथाकथित स्पृश्य मानल्या गेलेल्या उच्चवर्णीयांमध्ये नाही, असे सांगतात. ते ‘अस्पृश्यांचा उद्धार हा अस्पृश्यांनीच केला पाहिजे’ या विषयी आग्रही होते. त्यांची धडपड त्यासाठी त्यांच्या समाजाने उदासीनता सोडली पाहिजे आणि शिकले पाहिजे, उत्तमपैकी ज्ञान मिळवले पाहिजे आणि शैक्षणिक पात्रतेत पुढील रांगेत उभे राहिले पाहिजे, ही होती. त्यांनी त्यांच्या पक्षाचे आणि त्यांच्या मताचे नेते हे राजकारणासाठी भांडतात, पण त्यांना त्यांच्या समाजाच्या राजकीय अधिकाराचे अप्रूप नाही हे त्या काळात लिहिले होते. त्यांचे ते लिखाण वाचताना त्यांच्यातील द्रष्टेपणाची साक्ष पटते. त्यांचे ‘मूकनायक’मधील अग्रलेख हे विचारांनी स्पष्ट असले तरी त्यातील काही लेखन भावनाशील वळणानेही जाते. त्यांचे ‘बहिष्कृत भारत’ किंवा ‘जनता’ या वृत्तपत्रांमधील अग्रलेख आणि अन्य लेखन हे मात्र परखडपणातील शेवटचे टोक ठरतील. त्यांनी हिंदुमहासभेच्या अधिवेशनावर टीका केली आहे  ‘जनता’ साप्ताहिकात (8 जानेवारी 1936). त्याचे शीर्षक बोलके आहे-  ‘हिंदुमहासभा, का ठकांची बैठक?’ ते म्हणतात, ‘हिंदुमहासभेची अधिवेशने अधूनमधून केव्हा तरी होतात आणि त्यात सामील होणाऱ्या हिंदू लोकांची संख्या दोन-चारशेच्या वर सहसा जात नाही. पंडित मदन मोहन मालवीय यांनी ते ‘हिंदूंमधील अस्पृश्यतेचा रोग वर्षभरात घालवून दाखवतील’ असे त्या अधिवेशनात म्हटले होते. त्यावर आंबेडकर यांनी युक्तिवाद केला, की मालवीय यांनी अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी एक कोटीचा निधी उभारण्याची -muknayak-bahishkrutbharatकल्पना बोलून दाखवली होती आणि देशात प्रत्येकाने एक रुपया दिला तरी तेवढे पैसे जमू शकतील’, तेव्हा लोकसंख्या पस्तीस कोटी होती. आंबेडकर यांनी म्हटले, की दलित समाजाने एकत्र येऊन धर्मांतराची पहिली घोषणा 13 ऑक्टोबर 1935 रोजी केली आणि त्यासंबंधीची रूपरेषा निश्चित केली, म्हणून हिंदुमहासभेला ही उपरती झाली आहे. आंबेडकर फार खणखणीत लिहितात, तरी त्यात शब्दलालित्य असते – ‘मनुष्याच्या अंत:करणात जेव्हा लोकांचे अंकुर फुटू लागतात, तेव्हा ते अत्यंत आल्हादकारक वाटतात, परंतु तृष्णेचे जंगल माजवून जेव्हा ते त्याच्या अंत:करणाला पछाडते तेव्हा त्या जीविताचा समूळ विध्वंस होतो. आमची खात्री आहे, की कोणीही अस्पृश्य असल्या भिकेच्या तुकड्यावर टपून बसलेला नाही.’ आंबेडकर यांचे विचार मर्मभेदक आणि कर्तव्यकठोर आहेत. 
– (संकलित)

About Post Author