पेशवाईतील अनाचार!

0
39
_Peshvaitil_Anachar_1.jpg

जमाखर्च हा एखाद्या पुस्तकाचा विषय होऊ शकतो का? तुमच्या-आमच्यासारख्या सामान्य माणसांना जमाखर्चाची उबळ अधूनमधून येते, पण ती फार दिवस टिकत नाही. उद्योग व व्यापार करणाऱ्या संस्था आणि राज्यकर्ते यांना जमाखर्चाच्या वह्या नियमित ठेवाव्या लागतात व त्यांचे महत्त्व बराच काळ टिकणारे असते. मात्र हिशोबांच्या वह्यांचे पुस्तक निघणे सर्वसामान्य माणसाला असंभव वाटेल.

पण ‘पेशवाईच्या सावलीत’ हे पुस्तक जमाखर्चाच्या वह्यांचे आहे. ‘बदलापूर’कर्ते ना. गो. चापेकर यांची विविध विषयांवरील पुस्तके प्रसिद्ध आहेत (एडमंड बर्कचे चरित्र, गच्चीवरील गप्पा, वैदिक निबंध, पैसे, समाज नियंत्रण, साहित्य समीक्षण, निवडक लेख).

‘पेशवाईच्या सावलीत’ या पुस्तकात जमाखर्चाच्या वह्या संपादन करून त्यावरून त्यावेळच्या सामाजिक जीवनावर प्रकाश कसा पडतो, ते लेखकाने दाखवले आहे. द.वा.पोतदार यांनी या पुस्तकाला पुरस्कार लिहिला आहे. त्यात त्यांनी चापेकरांपूर्वी ते काम (हिशेबाच्या वह्या व अस्सल स्वरूपात त्या जमा करून अभ्यासण्याचे काम) न्या. रानडे यांनी सुरू केले होते, पण फार अभ्यासक त्या कामी पुढे आले नाहीत असे नमूद केले आहे.

पुस्तकातील मजकूर अस्सल असला -म्हणजे जमाखर्चाच्या नोंदी अधिकृत असल्या तरच त्यावरून सामाजिक परिस्थितीसंबंधी निष्कर्ष काढणे शक्य होते. लेखकाने त्याबाबत खात्री दिली आहे. पुस्तकातील माहिती ‘शिल्लक बंद जमाखर्ची लिखाणा’तून घेतली असल्याने तिची सत्यता ‘शंभर नंबर कासाची भरेल’ यात मात्र शंका नाही.’ लेखकाने ज्या प्रस्तावनेत ही खात्री दिली आहे ती प्रस्तावना जवळजवळ ऐंशी पृष्ठांची आहे आणि त्यात जमाखर्चाच्या नोंदीवरून काढू शकले जातील/काढता येतील, असे निष्कर्ष बहुतांशी दिले आहेत. चापेकरांनी पुस्तकाची मर्यादाही मोकळेपणाने सांगितली आहे. ते म्हणतात, “या पुस्तकाला ऐतिहासिक महत्त्व नसले तरी सामाजिक, व्यापारी, धार्मिक व भाषिक इतिहास लिहिणाऱ्याला ‘पेशवाईच्या सावलीत’ मध्ये विपुल सामग्री मिळण्यासारखी आहे.”

अकरा प्रकरणांच्या या पुस्तकात पेशव्यांची माहिती, महसूल, राज्यव्यवस्था, न्यायव्यवस्था, सावकारी व्यवहार, सामाजिक, धार्मिक, औषधविषयक, भाषिक अशा विविध अंगांनी नोंदी व त्यावरील काही निष्कर्ष आहेत. ते वाचले, की वाचकाची मते पेशवाईसंबंधीची बरीचशी ढवळून निघतील. नमुन्यादाखल येथे काही नोंदी व निष्कर्ष उद्धृत केले आहेत…

* बारा महिने काम करूनही अकरा महिन्यांचा पगार द्यायचा अशी वहिवाट होती.
* कारकुनाने जे सरकारी काम करायचे ते करण्याकरता त्याला ज्याचे काम असे तो पैसे देत असे. त्यास ‘कारकुनी’ म्हटले जात असे.
* कल्याणच्या सुभेदारालासुद्धा (रामराव अनंत) सुब्जेदारीचे पत्र आणण्यासाठी वीस हजार रुपये पेशवे सरकारास द्यावे लागले. त्यास ‘नजर’ असे म्हटले आहे. चार हजार रुपये नाना फडणीस, दोन हजार रुपये नारोपंत परचुरे, पन्नास रुपये लक्ष्मणपंत देशमुख. (या रकमा दोनशे वर्षांपूर्वीच्या आहेत. त्यावरून त्यांची ‘भयानकता’ ध्यानात यावी.)
* सडका केला अगर वाटेत बंदोबस्त ठेवला म्हणून त्याचा मोबदला या स्वरूपाने जकात घेतली जाणे आवश्यक आहे अशी समजूत नव्हती. जकात हे एक उत्पन्नाचे साधन मानले जात होते. घाटांची दुरुस्ती करत, पण अगदी जुजबी. (म्हणजेच लोकशाही महाराष्ट्र शासनात पेशवाईच चालते की!) मुंबईहून वाईस सुरण नेताना अर्धा आणा जकात द्यावी लागे.
* मनुष्यांची खरेदी-विक्री पेशवाईअखेरपर्यंत चालू होती. पुरुष खरेदी केले जात असत. ते बहुधा मुसलमान असत. कोणत्याही वयाच्या पोरीसोरी विकत घेता येत असत. त्यात शूद्र स्त्रियांचा भरणा असे. विकत घेतलेल्या वस्तूंप्रमाणेच ‘विकत घेतलेली माणसे’ गहाण ठेवता येत असत/ठेवली जात असत.

(आज हे वाचताना अंगावर काटा येतो. निग्रोंच्या गुलामगिरीबद्दल तत्कालीन अमेरिकन लोकांना दूषणे देणारी भारताची मराठी मान त्यामुळे खाली जाते. ‘पुराणकाळी आमच्याकडेही विमाने होती.’ असल्या विधानांच्या जातीचे हे विधान नाही हे लक्षात घ्यायला हवे.)

* इंग्रजांकडे चाकरी करणे हा दंडपात्र गुन्हा होता.
* प्रदक्षिणा घालण्याने पुण्य मिळते हा समज दृढ होता. लक्ष प्रदक्षिणा घालणे हे जिकिरीचे काम. ते इतरांकडून करवून घेतले जात असे. पिंपळाला एक लाख प्रदक्षिणा घातल्या तर हजारी चार आणे; पण मारुतीला अकरा हजार प्रदक्षिणा घातल्यास हजारी एक रुपया दर होता.

…अशा अनेक उद्बोधक, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी त्या पुस्तकात सांगितल्या आहेत. मात्र, ते वाचताना वाचकाचा भ्रमनिरास होऊ शकतो. याची मानसिक तयारी ठेवूनच त्या वाचाव्यात.
काय सांगावे, वाचकाने त्याच्या जमाखर्चाच्या वह्या पाच-दहा वर्षें प्रामाणिकपणाने लिहिल्या, तर त्याच्या वैयक्तिक आयुष्याचे प्रतिबिंब त्यात सामाजिक चालीरीतींबरोबर पडण्याची शक्यता आहे!

पेशवाईच्या सावलीत
लेखक – ना.गो. चापेकर,
प्रकाशक – ल.ना. चापेकर.
प्रकाशन – शके 1859(1937)
मूल्य – 4रुपये
भारत इतिहास संशोधन मंडळ पुरस्कृत ग्रंथमाला
पुष्प – 34

(लोकसत्ता, लोकरंग पुरवणी, 15 मार्च 2015 ‘विस्मृतीत गेलेली पुस्तके’ या सदरावरून उद्धृत)

– मुकुंद वझे

About Post Author