पुकार – तरुण संशोधकांना सुवर्णसंधी

0
32
images

Pukar‘‘पुकार युवा पाठ्यवृत्तीच्या माध्यमातून संशोधन करणे हा माझ्या दृष्टीने महत्त्वाचा अनुभव ठरला. कारण इथे फक्त अकॅडमिक रिसर्च करायचा नव्हता, तर गटाला बरोबर घेऊन सहभागाने संशोधन करायचे होते. अकॅडमिक रिसर्चच्या अनेक चौकटी मोडून त्याजागी नवे स्ट्रक्चर उभे करण्याच्या प्रवासात खूप मजा आली. खूप काही मिळाल्यासारखे वाटले. लोकशाही आणि सहभाग ही तत्त्वे सांभाळताना उडालेली धांदल गंमतीशीर होती. या प्रक्रियेत अनेक बरेवाईट अनुभव आले. पण ते आयुष्याला वळण देणारे होते.’’ – पल्लवी शिंदे.
‘‘एकट्याने चालणे जितके सोपे असते, तितकेच सर्वांना बरोबर घेऊन चालणे कठीण असते. युवा पाठ्यवृत्तीमध्ये काम करताना जाणवले, की एकट्याने चालणे सोपे असेलही, पण सगळ्यांनी मिळून प्रवास करण्यात एक वेगळीच मजा आहे.’ – मनोज टांक
‘‘पुकारच्या युवा पाठ्यवृत्तीसोबत दोन संशोधन प्रकल्पांत काम करण्याची संधी मिळाली. पहिल्या वर्षी युवा संशोधक आणि दुस-या वर्षी मुख्य संशोधक म्हणून काम केले. त्या काळात टेबलाच्या एका बाजूने या प्रकल्पांकडे बघण्याची संधी मिळाली. आता युवा पाठ्यवृत्ती समन्वयक म्हणून दुस-यांची प्रोसेस अधिक मजेदार व्हावी यासाठी प्रयत्न करतोय. हे काम जितके जबाबदारीचे तितकेच स्वत:चा दृष्टिकोन आणि समज विस्तारणारे असे आहे.’’ – कपिल चव्हाण
‘‘पूर्वी संशोधन म्हटले की वाटायचे, हे आपल्याला जमण्यासारखे नाही. पण ‘पुकार’च्या प्रक्रियेत सामील झाल्यापासून संशोधनाची गोडी लागली. इथे काम करताना तरुणांचे विचार, त्यांचा कल, त्यांच्या समाजाकडून असलेल्या अपेक्षा जवळून जाणून घेता आल्या. त्यामुळे अनेक विषय नव्याने अभ्यासता आले, समजून घेता आले.’’ -आम्रपाली दळवी

‘पुकार’च्या संशोधन प्रवाहात सामील झालेल्या मनोज, पल्लवी, कपिल, आम्रपाली या तरुणांचे हे अनुभव युवा पाठ्यवृत्ती प्रकल्पाचे वेगळेपण अधोरेखित करतात.
इतरांपेक्षा वेगळे काहीतरी करण्यासाठी धडपडणार्‍या तरुणांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने २००५ साली अर्जुन अप्पादुराई यांनी ‘पुकार’ (Partners for Urban Knowledge, Action & Research) या संस्थेची स्थापना केली. महानगरी मुंबईच्या वैशिष्ट्यपूर्ण जीवनशैलीतील अनेकविध पैलूंवर संशोधन करून त्याचे दस्तऐवजीकरण करणे यावर ‘पुकार’चा मुख्य भर असतो. ‘पुकार’ने पाच वर्षांच्या लहानशा कारकिर्दीतच Sustainable Cities याविषयी विचारमंथन करणारी व समाजबांधिलकीच्या कामाला प्रोत्साहन देणारी उदारमतवादी संशोधन संस्था अशी ओळख निर्माण केली आहे.
संशोधनाचे काम फक्त तज्ज्ञ व्यक्तींपुरते मर्यादित न राहता तरुणांनाही त्यात सहभागी होता यावे यासाठी २००५साली मुंबईच्या ‘सर रतन टाटा ट्रस्ट ’च्या आर्थिक सहाय्याने ‘पुकार’ने युवा पाठ्यवृत्ती प्रकल्पाची सुरूवात केली. संशोधन प्रकियेचे वैशिष्ट्य असे, की त्यात आपला सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, तसेच राजकीय भवताल आणि स्वत:चे आयुष्य यांना केंद्रबिंदू मानून अठरा ते सव्वीस वयोगटातील तरुण-तरुणीनी, त्यांना भेडसावणार्‍या वा त्यांच्या मनात कुतुहल निर्माण करणार्‍या विविध विषयांवर संशोधन करून त्याची निरीक्षणे नोंदवण्याची संधी दिली जाते. स्वत:च्या परिसरात हे काम करत असल्यामुळे या तरुणांचे स्थानिक समाजाबरोबर सलोख्याचे संबंध प्रस्थापित होतात. त्यामुळे त्यांनी मिळवलेल्या माहितीला खोली प्राप्त होते. ती विद्यापीठातून केलेल्या संशोधनात सहसा आढळत नाही. प्रकल्पामुळे ज्यांना शालेय शिक्षणाची संधी मिळू शकत नाही अशा युवकांना समांतर शिक्षण मिळण्‍याची संधी प्राप्‍त होते.
मुंबईतील रात्राशालांचा मागोवा घेणारा पुकारचा संशोधन गटतरुण संशोधक घडवण्याच्या या प्रक्रियेत गेल्या चार वर्षांत मुंबईच्या दक्षिण टोकापासून ते पालघर आणि खोपोली अशा उत्तर टोकांपर्यंत राहणारे जवळपास एक हजारहून अधिक तरुण सहभागी झाले आहेत. मुंबईतील जैवविविधता नेमकी कितपत टिकून आहे? स्त्री-पुरुषांमध्ये लिंगभेदापलीकडे जाणारी मैत्री शक्य आहे का? ‘रात्रशाळा:शक्यता आणि समस्या’ , गिरणगावचे नागरीकरण आणि गुन्हेगारीकरण, मालवणी विभागातील अर्ध्‍यावर शालेय शिक्षण सोडावे लागणार्‍या मुलांचे जीवन, बंबईकर- बाहेरच्या व्यक्‍तींना उमजलेली नगरी, लोकल गाड्यांमधील लेडीज डब्यातील गाडी-संस्कृती, मुंबईच्या जैवविविधतेचा नागरी तरुणाईवरील प्रभाव, मुंबईजवळील निमशहरी भागातील विद्यार्थ्‍यांचा चित्रपटाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, मराठी नाटक व प्रेक्षक यांच्यातील नातेसंबंध, रेल्वेपरिसरात काम करणा-या अंध फेरीवाल्यांच्या समस्या, नाका कामगार- एक दुर्लक्षित कष्टकरी अशा महानगरी मुंबईच्या वैशिष्ट्यपूर्ण जीवनशैलीतील बहुविध पैलूंवर प्रकाश टाकून त्याचे रीतसर दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे.
तरुणांनी निवडलेल्या संशोधन विषयांवर नजर फिरवली तर मुंबई शहरात राहणा-या तरुण-तरुणींच्या मनात स्थानिक प्रश्नांबद्दल किती उत्सुकता तसेच काळजी एकवटली आहे हे लक्षात येऊ शकेल. त्यातील विशेष म्हणजे संशोधकांचा त्या त्या विषयाशी अतिशय जवळचा संबंध असतो. कोळी जमातीची मुले, उपहारगृहात काम करणारी मुले, तसेच अंध व्यक्ती, बांधकाम मजुरांपासून ते अगदी नाका कामगारापर्यंत सर्वजण ‘पुकार’च्या मदतीने संशोधकाच्या भूमिकेत शिरून त्या विषयाच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न करतात. असे असले तरी ‘पुकार’च्या संशोधन प्रक्रियेतले गांभीर्य कमी होत नाही. कारण संशोधनात जमा झालेल्या माहितीचे विश्लेषण आणि संश्लेषण तज्ज्ञ अभ्यासकांकरवी करवून मगच अंतिम निष्कर्ष काढले जातात. हे निष्कर्ष सर्वसामान्य लोकांपर्यंत सोपेपणाने पोचावेत यासाठी ध्वनिफिती, लघुपट, भित्तिचित्रे, पुस्तिका अशा रूपात त्यांचे प्रदर्शन मांडले जाते. प्रदर्शनातील माहिती मराठी, इंग्रजी आणि हिंदी अशा तिन्ही भाषांमध्ये असते.
पुकारच्या संशोधन प्रकल्प प्रदर्शनाला भेट देताना नंदिता दासयुवा संशोधक घडवणे एवढ्यावरच ‘पुकार’चे काम संपत नाही, तर युवा पाठ्यवृत्तीअंतर्गत केलेल्या संशोधनावर प्रत्यक्ष कृती करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी तरुणांना ‘अशोका व्हेंचर’ , ‘प्रवाह’ , ‘अनलिमिटेड इंडिया ’ अशा स्वयंसेवी संस्थांशी जोडून देऊन त्यांच्या संशोधनाला मूर्तरूप देण्याचा प्रयत्न ‘पुकार’मार्फत केला जातो. काही तरुणांनी त्यांच्या निष्क़र्षातून निघालेल्या मुद्यांवर समाजात प्रक्रिया घडवून आणणारे प्रकल्पसुद्धा सुरू केले आहेत. यासंदर्भात
निकिता केतकर आणि तिच्या टिमचे उदाहरण नमूद करावेसे वाटते. त्यांनी ‘रात्रशाळा:शक्यता आणि समस्या’ या विषयावर संशोधन (२००६) सुरू केले. जे निष्कर्ष समोर आले त्यावर प्रत्यक्ष काम करण्यासाठी गटातल्या तरुणांनी ‘मासूम’ नावाची संस्था वर्षअखेरीस स्थापन केली. एडलगी फाउंडेशनने आर्थिक मदतीचा हात पुढे केल्याने त्यांच्या कृतीला बळकटी मिळाली. ‘मासूम’ रात्रशाळेतील मुलांच्या मूलभूत सोईसुविधांच्या पूर्ततेतून त्यांचा सर्वांगीण शैक्षणिक विकास साधण्याचा प्रयत्न गेल्या वर्षांपासून मुंबईतल्या दोन रात्रशाळांमध्ये करतेय. विद्यार्थ्‍यांसाठी व्यावसायिक मार्गदर्शनाबरोबर पालकांसाठी कार्यशाळा आयोजित केल्या जातात.

रेल्वे परिसरात काम करणाऱ्या अंधांच्या जीवनकहाण्या सांगताना अंध तरुणांचा गटहर्षद जाधव यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील विविध उपनगरांत राहणार्‍या दृष्टिहीन मित्रमैत्रिणींच्या गटाने रेल्वे परिसरात विक्रेते म्हणून काम करणा-या अंध व्यक्तींच्या जीवनक्रमाचा अभ्यास केला. अंध व्यक्तींमधील सर्वात तळाच्या गटात असणार्‍या फेरीवाल्यांच्या जीवनाचा अभ्यास केला तर त्यांच्या समस्यांना जास्त चांगल्या प्रकारे भिडता येईल, असा विचार त्यामागे होता. सर्व संशोधक अंध असल्याने त्यांच्या कार्यपद्धतीवर ध्वनीच्या माध्यमातून काम करण्याचे बंधन आले होते. स्वत:चे काम ध्वनिफितींवरून डोळस लोकांना समजेल अशा लिपीत लिहून काढणे ही त्या गटासमोरची अडचण त्यांनी स्वत:च आपल्या डोळस मित्रांच्या साहाय्याने सोडवली. संशोधनादरम्यान त्या गटाने ‘अंध फेरीवाला हक्क परिषद’ आयोजित केली होती. त्यावेळी घडून आलेल्या चर्चेचा परिणाम होऊन रेल्वे प्रशासनाने सर्व स्थानकांवरील पोलिस स्टेशनांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली. त्यानुसार अंध फेरीवाल्यांना सहानुभूतिपूर्वक वागणूक देण्यात यावी अशी विनंती रेल्वे पोलिसांना करण्यात आलेली आहे. मुंबईच्या जीवनपद्धतीत ‘अर्थ’पूर्ण परिवर्तन घडवून आणण्यात ‘पुकार’ अप्रत्यक्ष रीत्या किती ठोस भूमिका बजावत आहे याची ही उत्तम उदाहरणे होत.
‘पुकार’ने धारावी, कोळीवाडा इथे ‘अर्बन टायफून’ या कार्यशाळेच्या आयोजनाच्या माध्यमातून स्थानिक रहिवाशांनाच संशोधन आणि कृती करण्यास प्रवृत्त केले. त्यातून त्यांचे विचार, अभिव्यक्ती, कला आणि नागरी प्रक्रिया यांचा अनोखा मिलाप होऊन रहिवाशांद्वारे परिसराबद्दल ज्ञानाची निर्मिती झाली.
‘पुकार’चे काम हे मुंबई आणि परिसरापुरते मर्यादित असले तरी संस्थेच्या कामाची मूळ संकल्पना समजून घेत स्थानिक प्रश्नांवर युवा संशोधक घडवण्याची चळवळ प्रत्येक शहरात, महानगरात उभी राहिली तर तरुणांच्या त्याचबरोबर समाजाच्या जडणघडणीत विधायक परिणाम घडून येतील, शहराच्या सक्षमीकरणास बळकटी प्राप्त होईल.
युवा पाठ्यवृत्ती प्रकल्पाची कार्यपद्धत

दरवर्षी मुंबई शहरातील विविध महाविद्यालयांतून, तसेच कम्युनिटी सेंटर्समधून साधारण चाळीस युवकांचे गट या संशोधन प्रक्रियेत सहभागी करुन घेतले जातात. त्यानंतर अडीच दिवसांच्या कार्यशाळेत त्या गटांना वर्षभरातील कामाच्या स्वरूपाची माहिती दिली जाते. प्रत्येक गटाच्या बैठकांना प्रकल्पाचे समन्वयक महिन्यातून एकदा उपस्थित असतात. प्रत्येक गटातील एक सदस्य प्रकल्पाच्या कार्यालयात येऊन इतर सदस्यांना आपल्या प्रक्रियेविषयी माहिती सांगतात. साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यात तरुणांचे गट एकाच वेळी कामाला सुरुवात करतात.
संपर्क
पुकार, 272, म्युनिसिपल टेनामेन्टस, शिवाजीनगर,

म्युनिसिपल वसाहत, खेरवाडी रोड, वांद्रे (पूर्व),मुंबई 400051,

दूरध्वनी : 022-65053599, इमेल – pukar@pukar.org.in , www.pukar.org.in
– आकांक्षा जाधव

About Post Author