पावसचे स्वामी स्वरूपानंद

14
351
_Swami_Swarupanand_1.jpg

स्वामी स्वरूपानंद यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील पावस या गावी 15 डिसेंबर 1903 रोजी झाला. त्यांचे जन्मनाव रामचंद्र विष्णू गोडबोले. त्यांचे प्राथमिक शिक्षण पावस येथे, तर माध्यमिक शिक्षण रत्नागिरी येथे झाले. ते पुढील शिक्षणाकरता मुंबईला ‘आर्यन एज्युकेशन सोसायटी’च्या आंग्रेवाडीतील विद्यालयात गेले. त्यांचे वाङ्मयविशारद पदवीचे शिक्षण पुण्याच्या ‘टिळक महाविद्यालया’त झाले. त्यांच्यावर घरातील सांप्रदायिक वातावरणामुळे पारमार्थिक संस्कार लहानपणापासून झाले होते. ते अलौकिक बुद्धिमत्तेमुळे विविध विषयांत पारंगत होत होते. रामचंद्रांना संस्कृत विषयात रस होता. एकीकडे त्यांचे आध्यात्मिक ‌विषयांचे वाचन, श्रवण, मनन, निदिध्यास सुरू होते, तर दुसरीकडे त्यांच्या शैक्षणिक जडणघडणीच्या काळात पारतंत्र्याच्या जोखडाखाली सापडलेल्या भारत देशात स्वातंत्र्याचे वारे वाहत होते. तरुणाई नवचैतन्याने भारून गेली होती. तशात त्यांनीदेखील गांधीजींच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश सत्तेच्या विरुद्ध असहकार आंदोलनात भाग घेतला. त्यांनी शाळा सोडली.

स्वामी स्वरूपानंद यांनी महात्मा गांधींच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन पावसमध्ये जनजागृतीचे काम हाती घेतले. त्यांनी राष्ट्रोद्धारासाठी तरुणांना स्वावलंबनपूर्वक राष्ट्रीय शिक्षण देण्याची गरज ओळखली. स्वरूपानंद यांनी ‘स्वावलंबनाश्रम’ नावाची शाळा 1923 साली स्थापन केली आणि त्यातून तरुणांना बहुविध व अभिनव शिक्षण देण्यास सुरुवात केली. विद्यार्थी स्वावलंबनाश्रमाकडून शैक्षणिक प्रगतीबरोबर अष्टपैलू व्हावा यासाठी तळमळीने प्रयत्न केले जात होते. विद्यार्थ्यांना सूतकताई, हातमागावर खादी विणणे या व्यावसायिक कौशल्याबरोबर मल्लखांब, लाठी चालवणे, व्यायाम, खेळ, लेझीम यांचे शिक्षण दिले जात होते. तसेच, स्वरूपानंदांनी गावातील सार्वजनिक उत्सवातील हीन अभिरुची कमी व्हावी (जसे – नाट्य, गाणी, नाच, तमाशा) यासाठी राष्ट्रीय मेळे, प्रवचने यांसारखे कार्यक्रम सुरू केले. त्यात तरुणांना सहभागी करून घेतले. त्यांनी स्वत: राष्ट्रभक्तीपर, प्रबोधनपर गाणी व संवाद लिहिले. उदाहरणार्थ,

बालका कोपू नका ।
ग्रामवासी सज्जनांनो बोल माझे आयका ।
ग्राम्य गीते लावण्या ही योग्य का देवापुढे? ।
बंद व्हावे कामुकांचे नाच वेडेवाकडे ।।
याचसाठी लावल्या का भोवतीच्या दीपिका ।
जाणुनी घ्या कोण होते कृष्ण-गोपी-राधिका ।

_Swami_Swarupanand_2.jpgस्वरूपानंदांच्या अशा प्रयत्नांमुळे उत्सवांतील अपप्रकार थांबले. तसेच, समाजामध्ये प्रबोधन होऊन राष्ट्र व धर्म यांविषयीचे सद्विचार रुजण्यास मदत झाली.

स्वावलंबनाश्रमाचे कार्य 1927 पर्यंत सुरू होते, पण त्यानंतर इंग्रजांनी सर्व राष्ट्रीय शाळांवर बंदी आणली. सर्व शाळा एक-एक करत बंद होऊ लागल्या. स्वावलंबनाश्रम शाळेतील विद्यार्थ्यांची संख्याही सरकारी रोषाच्या भीतीने घटत गेली. विद्यार्थी नाममात्र उरले. त्यामुळे स्वरूपानंद स्वावलंबनाश्रम बंद करून उर्वरित विद्यार्थ्यांसह उच्च शिक्षणासाठी पुण्यास गेले. तेथे त्यांनी स्वावलंबनाने शिक्षण घेऊन वाङ्मयविशारद पदवी मिळवली. त्यांनी स्वत: कष्ट करत, अर्थार्जन करून विद्यार्थ्यांना शिकवले. त्यांनी कुशाग्र बुद्धी, सूक्ष्म अवलोकन, अवांतर वाचन, परहिताची कळकळ यांच्या जोरावर राजकारण, समाजकारण व शिक्षण या क्षेत्रांत काम करूनदेखील ते मनाने त्यापासून अलिप्त राहिले. स्वरूपानंद यांनी 1932 च्या मिठाच्या सत्याग्रहाच्या चळवळीत सहभाग घेतला, अनेक सत्याग्रही कोकणात दौरे काढून मिळवले. त्यामुळे त्यांना अटक होऊन तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यांची रवानगी पुण्याच्या येरवडा कारागृहात झाली. येरवड्यात स्वरूपानंद यांना आचार्य जावडेकर, एस. एम. जोशी, शंकरराव देव अशा विभूतींचा परिचय झाला. त्यांना त्यांचा सहवास लाभला. त्यांनी येरवड्यात मिळालेल्या एकांतवासाचा उपयोग ध्यानाच्या अभ्यासासाठी केला. तेथेच त्यांनी सद्गुरू स्तवनपर ‘नवरत्नहार’ या नऊ ओव्यांच्या काव्याची रचना केली. त्यांनी ते तुरुंगातून सुटल्यावर तो ‘नवरत्नहार’ त्यांच्या गुरुचरणी अर्पण केला.

दरम्यानच्या काळात त्यांच्यात तीव्र मुमुक्षुत्व उत्पन्न झाले आणि त्यांना सद्गुरूकृपेची तळमळ जाणवू लागली. अशा वेळी, त्यांचे मामा केशवराव गोखले हे रामचंद्र यांना सद्गुरू गणेश नारायण ऊर्फ सद्गुरू बाबा महाराज वैद्य यांच्याकडे घेऊन गेले. त्यांना बाबा महाराजांचा अनुग्रह 1923 साली प्राप्त झाला आणि त्यांची वृत्ती निजानंदात रंगू लागली. त्यांनी नाथपंथाची दीक्षा घेतली. बाबा महाराजांनी अनुग्रहानंतर रामचंद्र यांचे नामकरण स्वरूपानंद असे केले. स्वरूपानंदांचे गुरू श्री बाबामहाराज हे श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या परंपरेतील नाथ सांप्रदायिक आत्मसाक्षात्कारी पुरुष होते. त्यांच्या अनुग्रहामुळे स्वरूपानंदांची आध्यात्मिक वाटचाल सुरू झाली. स्वरूपानंदांना गुरुकृपा लाभली व त्यासोबत त्यांचा संत साहित्याचा अभ्यास असल्यामुळे त्यांची आध्यात्मिक प्रगती वेगाने झाली. त्यांचे गुरू ज्ञानेश्वरीच्या हस्तलिखित प्रतीचे वाचन नित्य करत. ती प्रत जीर्ण झाली होती. स्वरूपानंद यांनी ज्ञानेश्वरी स्वहस्ताक्षरात लिहून ती प्रत गुरूंना अर्पण केली. त्यांना त्यांची आत्मस्वरूपाच्या अनुसंधानाची सोऽहं साधना सुरू असतानाच मलेरिया झाला. त्या आजाराने त्यांचा पिच्छा चार महिने पुरवला, अंगात उठायचे त्राण उरले नव्हते. त्यांना मृत्यू त्यांच्या अगदी समीप आल्याचे जाणवले. त्यामुळे त्यांच्या ठायी परमात्म्याबद्दल दृढतम भक्तिभाव निर्माण झाला. त्यांच्या भक्तिबळाने त्या चार महिन्यांच्या काळात काम-क्रोधादी भावना दग्ध झाल्या होत्या, त्यांना जीवदशा नष्ट होऊन आत्मप्रचीती प्राप्त झाली होती. त्यांनी अहंकाररूपी संसार-शत्रूला मृत्युपंथाला लावले होते. जणू त्यांचा पुनर्जन्म झाला होता! त्या काळातील त्यांचे अनुभव त्यांनी स्फूट काव्याच्या रूपात ‘अमृतधारा’ या काव्यसंग्रहात साकीबद्ध रचनेत मांडले आहेत. त्यांचे कामातील सहकारी डॉ. बाबा देसाई यांनी त्यांच्या आजारपणात त्यांची सेवाशुश्रूषा केली. हळुहळू त्यांची प्रकृती सुधारू लागली. त्यांची वृत्ती आत्मसुखात रंगू लागली, साधनेस पूर्णत्व आले. “मनुष्यमात्राने त्याच्या मूळच्या सच्चिदानंद स्वरूपाची जाणीव ठेवून सोsहंभावाने सर्व प्राप्त कर्तव्ये उत्साहाने, अनासक्त वृत्तीने व ईश्वरपूजन या भावनेने करावीत” हा स्वरूपानंदांचा उपदेश आहे. त्यांनी सोऽहं साधनेचा पुरस्कार केला. स्वामी स्वरूपानंदांची भेट पुढील काळात अनेक संतमहंतांनी व महत्त्वाच्या व्यक्तींनी घेतली. त्यामध्ये श्रीमत् परमहंस श्रीधरस्वामी (सज्जनगड), श्रीभालचंद्र महाराज (कणकवली), ग. वि. तुळपुळे (सांगली), म.म. दत्तो वामन पोतदार (पुणे), पांडुरंगशास्त्री गोस्वामी, टेंबे महाराज (राजापूर), जेरेशास्त्री (कोल्हापूर), शिवशाहीर ब. मो. पुरंदरे, पंडित भीमसेन जोशी, काणे महाराज (बेळगाव), राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी, राष्ट्रीय पंडित खुपेरकर शास्त्री, दयानंद बांदोडकर (गोवा), शशिकला काकोडकर, ख्यातनाम न्यूरोसर्जन डॉ. गिंडे, तसेच लाँगमनग्रीन आणि पेंग्वीन या इंग्लंडमधील नामांकित प्रकाशन संस्थेचे प्रमुख सर रॉबर्ट ऍलन व त्यांची पत्नी यांची नावे आवर्जून घ्यावी लागतील.

_Swami_Swarupanand_3.jpgस्वरूपानंदांनी त्यांच्या महासमाधीपर्यंत म्हणजे जवळजवळ 1934 ते 1974 असे चाळीस वर्षे वास्तव्य देसाई यांच्या घरात ‘अनंत निवास’मध्ये एका खोलीत केले. तेथेच त्यांना निर्गुण-निराकार श्रीमहाविष्णूच्या सगुण रूपाचा साक्षात्कार 1942 साली झाला. त्यांनी अनंत निवासमधील वास्तव्य काळातच ‘श्रीमत् अभंग ज्ञानेश्वरी’, ‘श्रीभावार्थगीता’, ‘श्रीअभंग अमृतानुभव’, ‘संजीवनी गाथा’ (अभंग संग्रह), ‘चांगदेव पासष्टी’ यांसारखे प्रासादिक अनुवादित ग्रंथ लिहिले. स्वामी स्वरूपानंद यांनी आयुष्यभर ज्ञानेश्वरीतील आध्यात्मिक विचार सुबोधपणे साधकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या त्या आध्यात्मिक कार्यामुळे भक्तांची गर्दी वाढू लागली. त्यांच्या भक्तमंडळींनी ‘स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ’ ट्रस्ट स्थापन करून त्यांचे विचार व कार्य यांचा प्रसार सुरू केला. मंडळातर्फे स्वरूपानंदांनी लिहिलेल्या ग्रंथांचे प्रकाशन करून ते भक्तांसाठी अत्यल्प किमतीत उपलब्ध करून दिले जातात. मंडळाने स्वामी मंदिर, उत्सव मंडप, भक्त निवास, आध्यात्मिक मंदिर आदी प्रकल्प साकारले आहेत. तसेच, मंडळाकडून ग्रंथ पारायण, शैक्षणिक मदत, वैद्यकीय मदत; तसेच, भक्तांना भोजन व प्रसाद असे उपक्रम राबवले जातात.

स्वरूपानंदांचे पूर्वज गोविंदभट गोडबोले हे दहा पिढ्यांपूर्वी रत्नागिरीतील कासारवेली या गावातून पावसला आले. तेथे त्यांच्या चार-सहा पिढ्या भिक्षुकी करून राहिल्या. कालांतराने, गोडबोले घराण्याचा विस्तार झाला. स्वरूपानंद यांचे आजोबा परशुरामपंत हे शिक्षण खात्यात अधिकारी होते. परशुरामपंतांचे द्वितीय पुत्र विष्णुपंत व रखमाबाई यांच्या पोटी स्वरूपानंद यांचा जन्म झाला. विष्णुपंत यांचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले होते, पण तेही भगवद्चिंतनात रमले. स्वरूपानंद यांची आई रखमाबाई संसार व परमार्थ दोन्ही नेटका चालवत होत्या. स्वरूपानंद यांना दोन भाऊ व चार बहिणी.

स्वरूपानंद वयोमानानुसार शारीरिकदृष्ट्या दुर्बल होत गेले, पण त्यांचे आध्यात्मिक तेज त्यांच्या चेहऱ्यावर शेवटपर्यंत विलसत होते. स्वरूपानंदांनी 15 ऑगस्ट 1974 रोजी महासमाधी घेतली. त्यांच्या मूळ जन्मघराजवळ त्यांचे समाधी मंदिर बांधण्यात आले आहे.

संकलन – वृंदा राणे-परब

About Post Author

14 COMMENTS

  1. Thodkyat atishay sundar…
    Thodkyat atishay sundar mahiti Swami Swarupanand yanchi dileli aahe.Dhanyawad madam

  2. खूप छान माहिती….खरंच एक…
    खूप छान माहिती….खरंच एक स्वर्गीय आनंद….
    समाजातील दीन दुबळ्या लोकांना आधार व प्रेरणा…स्फूर्ती देणारे आहे…..

  3. ॐ卐ॐ माऊली नमोस्तुते संत…
    माऊली नमोस्तुते संत ज्ञानेश्वर
    प.पु.श्री साखरे महाराज यांचे व प.पु. श्री स्वामी स्वरूपानंद यांचे ज्ञानेश्वरी प्रबोधन हे मला खूपच आवडतं, ही माहीती पण अत्यंत आवडली आहे. //धन्यवाद \

  4. माहिती खूप छान आहे…
    माहिती खूप छान आहे. भक्तनिवासाचा फोन नं मिळाला तर उत्तम.

  5. स्वामींच्या विषयीची खूप छान…
    स्वामींच्या विषयीची खूप छान माहिती मिळाली.. अभंग ज्ञानेश्वरी च्या पठनात आधिक श्रद्धाभाव निर्माण होईल… ! मनःपुर्वक धन्यवाद ! ॐराम कृष्ण हरि I

  6. स्वामी म्हणे भावे
    ऐसी…

    स्वामी म्हणे भावे
    ऐसी गुरुदेवा !
    घडो तुझी सेवा
    निरंतर !!

  7. स्वामी स्वरुपानंद यांच्या…
    स्वामी स्वरुपानंद यांच्या जीवकार्याचा छान प्रकारे माहिती मिळते.वाचून आनंद झाला. धन्यवाद.

  8. अतिशय सुरेख माहिती.
    अतिशय सुरेख माहिती.

  9. छान, पुन्हा एकदा पवासला जाऊन…
    छान, पुन्हा एकदा पवासला जाऊन आल्याचे समाधान मिळाले

  10. खुप छान माहिती मिळाली…
    खुप छान माहिती मिळाली. स्वामिजिनां मन:पूर्वक नमस्कार.

  11. खूपच छान माहिती कधीच प्रयत्न…
    खूपच छान माहिती कधीच प्रयत्न केला नव्हता मी आत्ता कीर्तनाच्या आठ दिवशीय शिक्षण वर्गात शिकत आहे आम्हाला पूर्व्रांगासाठी स्वामींचा अभंग दिला आहे आणि महत्वाचे म्हणजे माझ्या माहेरचे गाव पावस आहे शिधये

Comments are closed.