पाण्यासाठी ध्येयवेडा – संभाजी पवार

2
49
carasole

संभाजी पवार हे साताऱ्यामधील बिचुकले गावचे रहिवासी आहेत. त्यांची जमीन तेथे आहे. ते बी.ए. झालेले आहेत. पण त्यांचे किराणा मालाचे दुकान साताऱ्यात आहे. त्यामुळे ते तेथेच स्थायिक आहेत. बिचुकले गावात पाण्याचे दुर्भीक्ष्य होते. पिण्यासाठी पाणीपुरवठा टँकरने एक-दोन बंधाऱ्यांतून केला जाई. शेतीसाठी पावसावर अवलंबून राहवे लागे. रोजंदारीचा प्रश्न होताच. पोटापाण्यासाठी लोक स्थलांतर करत.

संभाजी सांगतात, बिचुकले गावाला पाच एकरांचा डोंगराळ भाग लाभला आहे. सहा किलोमीटरचा ओढा गावाच्या जवळून वाहतो. गावाच्या खालच्या बाजूस धरण आहे. त्या धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला होता. त्यामुळे ते धरण पावसात लगेच भरत असे. पावसाने ओढ घेतली, की धरणातील पाणी ओसरून जाई. संभाजी यांची त्यांचे मित्र प्रशांत कणसे, सुरेश पवार यांच्यासमवेत गावासाठी काहीतरी करावे यावर चर्चा नेहमी होई. त्याच दरम्यान, त्यांनी डॉ. अविनाश पोळ यांची ‘जलसंधारण’ व ‘श्रमदान’ या विषयांवरील व्याख्याने ऐकली. संभाजी पवार यांच्या वाचनात पोळ यांच्या श्रमदानाच्या कामाबद्दलचे वर्तमानपत्रांतील लिखाण आले होतेच.

संभाजी व प्रशांत लोकांना जलसंवर्धन व श्रमदान यांचे महत्त्व पटावे म्हणून अविनाश पोळ यांना गावी घेऊन आले. त्यांनी त्यांचे व्याख्यान आयोजित केले. अविनाश पोळ यांनी गावाला लाभलेला डोंगरी भाग पाहिला. त्यांनी डोंगराचा चांगला उपयोग होऊ शकतो हे ग्रामपंचायतीच्या लक्षात आणून दिले. संभाजी पवार यांचा गावातील जलसंवर्धनाच्या कामानिमित्ताने पोळ यांच्याशी संपर्क वाढला. त्यांनी व प्रशांत कणसे यांनी पोळ यांच्या ‘अजिंक्यतारा श्रमदान मित्रसमूहा’च्या माध्यमातून काम सुरू केले.

संभाजी जलसंधारणाचे काम तानाजी पवार, विलास पवार, चव्हाणमामा, विठ्ठल बापू, अमर पवार अशा मोजक्या मंडळींना बरोबर घेऊन सुरू केल्याचे सांगतात. लोकांना काम चांगले आहे हे पटत होते, पण एकमेकांतील राजकीय वितुष्टामुळे लोक सहभागी होत नव्हते. काही लोक वेळ नाही म्हणून कामापासून लांब होते. तरीसुद्धा लोक आठवड्याच्या दर शुक्रवारी वेळ मिळेल तसे जमत असत. जे हजर असतील त्यांना घेऊन श्रमदानातून बंधाऱ्यातील गाळ काढण्याचे काम करत. डोंगरावर टप्प्याटप्प्याच्या अंतरावर लुज बोल्डर लावून बांध टाकण्याचे काम करत. त्यांनी श्रमदानातून गावाचा घाणेरडा झालेला तलाव गाळ काढून सुशोभित केला. त्यांचे गावासाठीचे नि:स्वार्थी काम पाहून राजकारण निष्प्रभ होत गेले. सारा गाव जलसंधारणाच्या मोहिमेत सक्रिय झाला. बंधाऱ्यांची पाणी धारणक्षमता जलसंधारणाच्या कामानंतर वाढली. सरकारच्या मदतीने व लोकवर्गणीतून जवळजवळ बारा बंधारे बांधून त्यांच्या रुंदीकरणाचे व खोलीकरणाचे काम केले गेले. त्यामुळे गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. शेतीसाठी बारमाही पाणी उपलब्ध झाले आहे. हंगामी पिकांबरोबर रब्बी पिके घेतली जाऊ लागली. पाणी ज्यांना जास्त लागते अशी घेवडा, सोयाबीन, बटाटा, वाटाणा यांसारखी पिके पावसाळ्यात घेतली जातात. रब्बी पिकांमध्ये गहू, ज्वारी, हरभरा, कांदा अशी पिके घेतली जातात. ऊस व आले यांची शेतीही मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे गावात आर्थिक सक्षमता आली आहे. तेथील कांदा बंगळुरू बाजारपेठेत जातो. शेतकऱ्यांच्या हाताला काम मिळाले. गावातच रोजगार उपलब्ध होऊ लागला. त्यामुळे लोकांचे शहरांकडे होणारे स्थलांतर काही प्रमाणात कमी झाले.

बिचुकले गावाची लोकसंख्या पंधराशेपस्तीस आहे. बिचुकले गावाला मानव, पशुधनासाठी, शेती व उद्योगधंदे यांचा वापर यांसाठी ४८३.६१ कोटी लिटर पाण्याची आवश्यकता असते. त्यांपैकी ३१९.८५ कोटी लिटर पाणी उपलब्ध झाले आहे. म्हणजे १६३.७६ कोटी लिटर पाणी कमी पडते. तो तुटवडा भरून काढण्यासाठी जलसंवर्धनाचे प्रयत्न सुरू आहेत. संभाजी पवार यांना, ‘शेतीसाठी बारमाही पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पाण्याचे योग्य व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. पीकपद्धत बदलली पाहिजे. पिकाला पाणी देण्याच्या पद्धती बदलल्या पाहिजेत,’ असे वाटते.

संभाजी यांनी स्वत:च्या मालकीच्या शेतजमिनीपैकी सुमारे सात एकर जमिनीत आंबा, नारळ, चिकू, सीताफळ यांची बागायती शेती केली आहे. दोन-तीन एकरांमध्ये शेवगा, हरभरा, ज्वारी, गहू, ऊस, कांदा, सोयाबीन अशी पिके घेतली आहेत. संभाजी स्वत: ती मेहनत करतात. त्यांना त्यांच्या कुटुंबाची साथ त्या कामात मिळाली आहे.

सामुदायिक पातळीवर गावासाठी इतर काही उपक्रम लोकसहभातून राबवण्यात आले आहेत. गावात चार वनराई बंधारे बांधण्यात आले. साडेचारशे दगडी बांध श्रमदानाच्या माध्यमातून बांधण्यात आले आहेत. त्यामुळे डोंगराच्या मातीची झीज कमी झाली आहे. पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लोकांना संडास बांधून दिले गेले आहेत. त्यामुळे बिचुकले गाव हागणदारीमुक्त झाले आहे. ग्रामपंचायतीतर्फे सोलार सिस्टिम बसवण्यात आली आहे. सरपंच साधना पवार यांनी तो उपक्रम राबवला. त्यातून वीज बचतीला चालना दिली गेली आहे.

गावातील मुले स्पर्धा परीक्षेत मागे राहू नयेत यासाठी मुंबईत राहणारे गावातील लोक व ग्रामस्थ यांनी मिळून वाचनालय सुरू केले आहे. साडेतीनशेच्या आसपास महत्त्वपूर्ण पुस्तके वाचनालयात उपलब्ध आहेत. वाचनालय समृद्ध व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गावात आरोग्य शिबिर व ग्राम स्वच्छता अभियान दर चार-सहा महिन्यांनी राबवण्यात येते.

गावात सेंद्रीय शेतीचा गट निर्माण करण्यात आला आहे. त्या गटाच्या माध्यमातून सेंद्रीय शेतीवर लोकांचे प्रबोधन करण्यात येते. गावाच्या विकासकार्यात सरकारबरोबरच अनेकांचे सहाय्य लाभले. त्यात मुंबईच्या ‘केअरिंग फ्रेंड्स’ निमिषभाई शहा यांनी सलग समतल चरासाठी एक लाखाची मदत केली. तसेच, मेहता ब्रदर्सनी वृक्षारोपणासाठी सीताफळाची तीनशे झाडे गावातील शेतकऱ्यांना दिली. राज्यसभा खासदार अनु आगा यांच्या फंडातून पासष्ट लाखांचा निधी गावाला मिळाला. त्यातून चार नवीन बंधारे बांधले गेले आहेत.

संभाजी यांचा डोंगरउतारावरून वाहून जाणारे पाणी अडवून जमिनीत मुरवावे, पडिक अवस्थेतील क्षेत्र उत्पादनक्षम व्हावे यासाठी सलग समतल चर मारण्याचा विचार आहे. त्यांना शेतीला पाणी कमी पडू नये म्हणून शेततळी बांधायची आहेत. वन्यप्राण्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. ते पाण्याच्या शोधात लोकवस्तीतही येतात. संभाजी यांनी वन्यप्राण्यांना पिण्यासाठी पाणी जंगलातच उपलब्ध व्हावे यासाठी वनतळी बांधायची योजना आखली आहे. त्यातून वन्यप्राणी जीवन वाचवण्यास मदत होईल. मातीचे ऐंशी नालाबांध गावात आहेत. त्यांतील गाळ काढून त्या बांधांचे रुंदीकरण व खोलीकरण करायचे आहे. त्यामुळे गाव जलसंपन्न होईल. पाऊस पडण्यासाठी झाडांची गरज आहे हे ओळखून वृक्षारोपणाची मोठी मोहीम हाती घेण्यात येणार आहे. त्या सर्व कामांसाठी निधी गोळा करण्याचे काम सुरू आहे.

संभाजी सहभागी असलेल्या ‘अजिंक्यतारा श्रमदान मित्रसमूहा’मध्ये चाळीस लोकांचा सहभाग आहे. डॉक्टर, वकील, बिल्डर्स, पोलिस, कृषी सहायक श्री. राऊत, ग्रामसेवक, प्रांत अजय पवार, सहकार खात्याचे सचिव विजय पवार असे सरकारी अधिकारी सर्व स्तरांतील लोक सहभागी झाले आहेत. अधिकारी लोक विधायक दृष्टिकोन ठेवून लोकांसाठी असे काम करू शकतात, तर आपण का नाही करू शकत असा प्रश्न गावकऱ्यांना पडला. त्यांना त्यांनीही त्यांच्या गावासाठी काहीतरी केले पाहिजे याची जाणीव झाली असे संभाजी सांगतात. त्यातूनच गावात लोकसहभागाची पद्धत पडली.

संभाजी अजिंक्यतारा ग्रूपबद्दल सांगतात, “अजिंक्यतारा ग्रूपमध्ये निसर्गाबद्दल जाण, प्रेम असलेल्या व्यक्ती भेटल्या. तेथे कोणी अधिकारी किंवा साहेब नसतो. प्रत्येक जण निसर्गाच्या ओढीतून चांगल्यासाठी धडपडत असतो. एखादे झाड सुकलेले दिसले तरी हळहळ व्यक्त होते. डोळ्यांत पाणी येते. असे अनोळखी निसर्गप्रेमी एकमेकांचे चांगले मित्र बनले आहेत. मित्र समूहाच्या माध्यमातून दर दिवाळीत न सांगता सगळे अजिंक्यतारा किल्ल्यावर भेटतात. श्रमदानातून किल्ल्यावर बांबूची भिंत उभारण्यात आली आहे. दोन हजार झाडे लावून त्यांपैकी नव्वद टक्के झाडे जगवली गेली आहेत. डोक्यावरून पाणी नेऊन झाडे जगण्यासाठी शिंपण केले जाई. लोकांचे धडाडीचे काम वाखाणण्याजोगे आहे. तो आदर्श इतर गावांनी घेतला, तर प्रत्येक गाव हरित व स्वच्छ ग्राम होण्यास वेळ लागणार नाही”.

‘अजिंक्यतारा श्रमदान मित्रसमूहा’कडून कोरेगाव तालुक्यातील तीस-चाळीस गावांमध्ये श्रमदान व जलसंधारण यांबाबत प्रबोधन सुरू आहे. जलसंधारणाचा उत्कृष्ट नमुना म्हणून जाखण, वेळू या गावांची नावे घ्यावी लागतील. ‘अजिंक्यतारा श्रमदान मित्रसमुहा’चा मानस संपूर्ण तालुका पाणीदार करण्याचा आहे.

“पाच-सात वर्षांपूर्वी सर्वसामान्य असलेली संभाजी ही व्यक्ती तिच्या कर्तृत्वाने घराघरात पोचली आहे. ते साताऱ्याहून गावाच्या कामासाठी दर आठवड्यात गावात येतात. कुणी निंदा, कुणी वंदा ते त्यांचे काम करत राहतात. संभाजी यांना गावात पाहिले, की काही जण लपून बसत. कारण संभाजी त्यांना श्रमदानाच्या कामाला जुंपतील असे वाटे. त्यातच संभाजी गावासाठी किती तळमळीने काम करतात, याची पोचपावती मिळते,” असे त्यांचे मित्र सुरेश पवार मिश्किलीने सांगतात. संभाजी पवार या ध्येयवेड्या अवलियाची गाव दुष्काळमुक्त व सुजलाम सुफलाम व्हावा अशी इच्छा आहे!

संभाजी पवार ९४२३३४२२६६

– वृंदा राकेश परब

About Post Author

2 COMMENTS

  1. पवार saheb धन्यवाद
    पवार saheb धन्यवाद

Comments are closed.