Home व्यक्ती पांडुरंग पुंगाटी यांचा डॉक्टर होण्याचा लढा!

पांडुरंग पुंगाटी यांचा डॉक्टर होण्याचा लढा!

_Pandurang_Pungati_2.jpg

आदिवासी मुलाचा डॉक्टर होण्यासाठी लढा आणि शहरी गरीब मुलाने शिक्षणासाठी घेतलेले कष्ट यांमध्ये महदंतर आहे. डॉक्टर म्हणजे काय ते माहीत नसलेल्या आईचा मुलगा पांडू पुंगाटी याने डॉ. प्रकाश आमटे यांना अहोरात्र रूग्णांची सेवा करताना बघितले आणि त्यांच्याच प्रोत्साहनाने डॉक्टर झाला. तो शैक्षणिक प्रवास विलक्षणच आहे. त्यानेच तो कथन केला आहे: –

तोयामेट्टा हे माझे जन्मगाव महाराष्ट्र व छत्तीसगड यांच्या सीमेवर आहे. अत्यंत मागासलेले, तेथे पाचसहाशे लोकवस्ती असेल. कोसरी नावाच्या भातासारख्या पदार्थाबरोबर प्राण्यांच्या मांसाचे तुकडे खाणे हे आम्हा लोकांचे जेवण. तेथील लोकांना ‘बडामाडीया’ किंवा ‘हिलमाडीया’ म्हणतात.

माझी आई आजारी असताना, आम्हाला प्रकाश आमटे यांच्या हॉस्पिटलविषयी माहिती मिळाली. आम्ही थोडेफार सामान घेऊन हेमलकसाला पोचलो. आई बरी झाली आणि तेथेच बांधकामावर जाऊ लागली. बाबा आमटे यांनी माझ्या आईकडे माझ्या शिक्षणासाठी आग्रह धरला. आईनेसुद्धा ते मनावर घेतले. आईच्या निर्णयाचा तो क्षण माझ्या जीवनातील टर्निंग पॉईंट ठरला! मी भामरागडच्या आश्रमशाळेत जाऊ लागलो. तेथील शिक्षक मला माडिया भाषेत बाराखडी समजावून सांगत. माझे शिक्षण तेथे सातवीपर्यत झाले. माझी रवानगी पुढील शिक्षणासाठी आनंदवन वरोरा येथे झाली. तेथे मला वसतिगृहाच्या शिस्तीत वागण्याची सवय लागली. माझे दहावीपर्यत शिक्षण तेथेच झाले. बाबा आमटे यांनी आनंदनिकेतन हे कॉलेज वरोरा येथे सुरू केले. तेथे प्रवेश घेतला. मंदा (आमटे) वहिनींनी मी कॉलेजला अनवाणी जाऊ नये म्हणून मला चपला दिल्या.

मी कोणतीही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर बाबांना भेटण्यास जात असे. त्यांना भेटले की मला प्रेरणा मिळत असे. मी डॉ. प्रकाश आमटे यांना रूग्णांशी आपुलकीने वागताना, वीज नसताना टॉर्चच्या प्रकाशात शस्त्रक्रिया करताना पाहिले आहे. तो संस्कार माझ्या मनावर मोठा आहे. त्यांच्या कामगिरीतील थ्रिल आणि रूग्णांच्या चेहर्‍यावरील समाधान या गोष्टी मला लहानपणापासून खूप आकर्षित करत असत. तेव्हाच मी ‘डॉक्टर व्हायचे’ ही खूणगाठ मनाशी बांधली होती. पण तो अभ्यास झेपणे माझ्यासाठी फार अवघड होते. मी अभ्यासाला सुरूवात इंग्रजी डिक्शनरी घेऊन एकेका शब्दाचा अर्थ लावत केली. बारावी पार पडली. वेगवेगळ्या वैद्यकीय कॉलेजचे फॉर्म भरले. शेवटी आयुर्वेद शिक्षणासाठी प्रवेश मिळाला. मी नाराज झालो, पण मला थोड्याच दिवसांत नागपुरातील शासकीय डेण्टल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. मनाची तयारी तेथे जाण्याची केली, त्याच सुमारास मला मुंबईहून मेडिकलसाठी कॉल आला. मी बाबा-प्रकाशभाऊ- वहिनी या सर्वांच्या प्रेमळ प्रोत्साहनामुळे मुंबईला शिक्षणासाठी जाण्याचे पक्के झाले. कोठारीकाका नावाच्या गृहस्थांना मुंबई थोडी परिचयाची होती. त्यांनी हाताला धरून मला मुंबईत नेले. मी सायन मेडिकल कॉलेजला प्रवेश घेतला.

मी मुंबईला आलो तेव्हा बाबा आजारी होते. त्यांची पेसमेकरची शस्त्रक्रिया करावी लागली होती. त्यांनी शुद्धीवर आल्यावर पहिला प्रश्न विचारला, ‘पांडूला मेडिकलला अॅडमिशन मिळाली का?’ माझ्या शिक्षणाचा ध्यास माझ्यापेक्षा आमटे कुटुंबीयांनीच घेतला होता. त्यांची माझ्यावर असणारी माया आणि त्या सर्वांचे आश्वासक शब्द मला नेहमी प्रेरणादायी ठरले. त्यांची आलेली प्रेमळ पत्रे मनाला सुखावून जात व नवी उर्मी देत असत.

अडचणी मुंबईत अनेक आल्या. त्या सर्व वेळी चार माणसे सतत माझ्यासोबत होती- मिलिंद सरनोबत, नरेंद्र मेस्त्री, दिलीप हेर्लेकर आणि प्रकाश दाते. त्यांनी मला खूप मदत केली. मिलिंद सरनोबत यांच्या प्रयत्नांमुळे हॉस्टेलवर राहण्यास जागा मिळाली. माझ्या मित्रांनी व मी मिळून एकत्र जेवणाचा डबा सुरू केला. त्यामुळे पोटाचा प्रश्नही सुटला. माझी जेवणाची सोय काही दिवसांनी गोरेगाव येथील आदिवासी हॉस्टेलवर झाली.

मला कॉलेजमध्ये शिकवलेले मेडिकलच्या पहिल्या वर्षी काहीच कळत नसे. मी त्यावर्षी नापास झालो.  आत्महत्येचे विचार मनात येऊ लागले. तशा वेळी डॉ. प्रकाश आमटे यांची आठवण येई. ते जंगलात राहून कंदिलाच्या किंवा टॉर्चच्या प्रकाशात उपचार करू शकतात, शस्त्रक्रियासुद्धा करू शकतात, मग आपण सर्व सोयीसुविधा असूनही शिक्षण का घेऊ शकत नाही असे वाटे. माझा शिक्षण पूर्ण करायचेच हा विचार पक्का होत गेला. मी दुसर्‍या वर्षी पास झालो.

माझी कॉलेजमध्ये मैत्री विशेष कोणाशी झाली नाही. मीही स्वत:ला वाचनात अडकावून घेतले. माझे एम.बी.बी.एस चे शिक्षण पूर्ण झाले. मी उन्हाळ्याच्या सुट्टीत हेमलकसा येथे जाऊन प्रकाशभाऊंचे काम जवळून पाहत असे. त्यामुळे मला प्रॅक्टिकल ज्ञान होई. माझी मास्टर्स डिग्रीसाठी शल्यचिकित्सा शाखेला प्रवेश घेण्याची इच्छा होती. त्या प्रवेशप्रक्रियेत काहीतरी समस्या निर्माण झाली. म्हणून मी त्याच कॉलेजमध्ये ‘डिप्लोमा इन चाईल्ड हेल्थ’ (डीसीएच) हा दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला.

हा माझा सगळा शैक्षणिक प्रवास फक्त आमटे कुटुंबीयांमुळे यशस्वीपणे व सुलभ रीतीने होऊ शकला. त्या कुटुंबाने माझ्याकडे लक्ष दिले नसते तर कदाचित मी सुद्धा लंगोटी लावून, पाठीशी कुर्‍हाड अडकावून जंगलात फिरत बसलो असतो. डॉ. प्रकाश आमटे यांनी मला मानसपुत्र मानले. म्हणूनच मी शिक्षण संपल्यावर आमच्या माणसांच्या सेवेत रूजू होण्याचे ठरवून हेमलकसाला परतलो. तोपर्यंत मी फक्त ‘पांडू’ होतो. पण आता गावकर्‍यांनी मला ‘पांडुरंग’ केले. आयुष्याची घडी बसवण्यात ज्या मातेची प्रमुख भूमिका होती, जिने बाबांच्या सांगण्यावरून मला हालअपेष्टा काढत शिकवले त्या आईला ‘मी डॉक्टर झालो’ म्हणजे काय झालो ते समजावून सांगता येत नव्हते. तिला “भाऊ जे काम करतात तसे काम करण्याचे शिक्षण मी घेतले” असे सांगितल्यावर लगेच समजले.

मी भाऊंच्या मार्गदर्शनानुसार कामाला सुरूवात केली. वहिनींच्या मनात माझ्या विवाहाबद्दलचे विचार घोळू लागले. त्यांची नजर अंनिसच्या मासिकातील जाहिरातीवर पडली. ती जाहिरात एका विवाहेच्छु मुलीची होती. ती मुलगी उच्च शिक्षण घेतलेली, धर्मजात न मानणारी अशी होती. मी माझी हकीकत पुण्याला तिला भेटून सांगितली. तिला दुर्गम भागातील माझ्या कामाची कल्पना दिली. तिने होकार दिला व मी शीतलशी विवाहबद्ध झालो. तिने खरोखरच आनंदाने सर्व काही जुळवून घेतले आहे.

मी अधिक अनुभव मिळावा म्हणून संस्थेबाहेर पडण्याचे ठरवले. भाऊंनी मला मनापासून आशीर्वाद दिला. माझी नेमणूक गडचिरोलीतील कुरखेडा या गावातील उपजिल्हा रूग्णालयात झाली. मी जरी लहान मुलांचा डॉक्टर असलो तरी तेथे सर्व वयोगटांतील सर्व प्रकारचे रूग्ण उपचारासाठी येत. तेथून माझी बदली सोलापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात झाली. मी सरकारी नोकरी त्यानंतर सोडली व पुण्याला आलो.

मी पुण्यालाच गेली काही वर्षें आहे. ‘नवले मेडिकल कॉलेज’ येथे काम करतो. माझ्या ज्ञानाचा उपयोग समाजातील दुर्बल घटकांना व्हावा यासाठी अधिकाधिक प्रयत्न करतो. मला पाहून रूग्णाने सुरेख स्मित केले की तीच माझ्या कामाची पावती मला वाटते!

डॉ. पांडुरंग पुंगाटी, 9763115908, drpan.she@gmail.com

– हिनाकौसर खान

(‘आरोग्यसंस्कार -दिवाळी अंक २०१६ वरून उद्धृत)

About Post Author

Previous articleसमृद्ध आणि विविध परंपरांनी नटलेली सांगवी
Next articleनवभारत छात्रालय – दापोलीचे लेणे
हिनाकौसर खान-पिंजार या पुण्‍याच्‍या पत्रकार. त्‍यांनी दैनिक 'लोकमत'मध्‍ये अाठ वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी 'युनिक फिचर्स'च्‍या 'अनुभव' मासिकासाठी उपसंपादक पदावर काम केले. त्या सध्या 'डायमंड प्रकाशना'मध्ये कार्यरत अाहेत. हिना वार्तांकन करताना रिपोर्ताज शैलीचा चांगला वापर करतात. कथालेखन हा हिना यांच्‍या व्‍यक्‍तीमत्त्वाचा महत्‍त्‍वाचा घटक आहे. त्‍या प्रामुख्‍याने स्‍त्रीकेंद्री कथांचे लेखन करतात. हिना 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम'च्‍या 'नाशिक जिल्‍हा संस्‍कृतिवेध' 2016 मध्‍ये सहभागी होत्या. हिना यांनी तीन तलाक प्रथेविरोधात याचिका दाखल करणाऱ्या पाच महिलांना भेटून लेखन केले. त्यावर अाधारीत 'तीन तलाक विरूद्ध पाच महिला' हे पुस्तक 'साधना'कडून प्रकाशित करण्यात अाले अाहे. हिना 'बुकशेल्फ' नावाच्या अॉनलाईन उपक्रमाच्या संस्थापक सदस्य अाहेत. लेखकाचा दूरध्वनी 98503 08200

1 COMMENT

  1. Pandurang bhau…
    Pandurang bhau..
    aapali khari garaj gadchiroli madhe aahe…….
    punyatil kam jhale ki ya….

Comments are closed.

Exit mobile version