पर्याय काय?

0
29

–  दिनकर गांगल

  अण्‍णा हजारे यांचा लढा तिव्र स्‍वरूप धारण करत असले तरी खरा प्रश्‍न त्‍याहून गंभीर आहे. जगात मंदीचे वारे वाहत असताना येणार्‍या काळात संधींची शक्यता कमी असणार आहे. अशा वेळी देशस्थिती मजबूत करण्यासाठी आवश्‍यक त्‍या योजना ना सरकारकडे आहेत, ना विरोधकांकडे. देशातील लोकशाहीचे धिंडवडे निघत आहेत. पण याच वेळी काही लहानमोठे प्रयत्‍नही केले जात आहेत. अभय बंग, र‍जनिकांत आरोळे, शशिकांत आरोळे, हे त्‍यामध्‍ये अग्रणी आहेत. समाजातील विधायक शक्‍तींची ओळख समाजाला करून देत लोकांनी त्‍यामध्‍ये सहभागी होण्‍यासाठी प्रयत्‍न करणे हाच ‘थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम’चा उद्देश आहे.


–  दिनकर गांगल

     अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला जनतेचा बर्‍यापैकी मोठा पाठिंबा मिळत आहे, याचे कारण लोकांचा सरकारवर विश्वास राहिलेला नाही. एका संवेदनाशील व्यक्तीचा सकाळीच एसएमएस आला, की या सरकारच्या राज्यात राहणेसुद्धा (जगणे) मला शरमेचे वाटत आहे! इतर काही देशांत याहून भीषण परिस्थिती आहे. त्यात इजिप्त, ट्युनिशिया आणि अमेरिका यांचादेखील समावेश आहे, इजिप्त व ट्युनिशिया या ठिकाणी अलिकडेच क्रांती घडून आली. वर्तमानपत्रांतील वेगवेगळ्या स्तंभांतून, लेखनांतून हजारे यांचे आंदोलन व सरकारची भूमिका ह्यांचे श्लेष काढले जात आहेत. क्रिया-प्रतिक्रिया आणि साद-प्रतिसाद असेच हे चालणार का? हे सत्य आहे की अण्णा हजारे यांच्याकडे आता चेंडू आहे आणि त्यामुळे सरकार बचावात्मक भूमिकेत आहे.

     परंतु प्रश्न याहून गंभीर आहे. जगात मंदीचे वारे वाहत आहेत आणि येणार्‍या काळात संधींची शक्यता कमी असणार आहे. अशा वेळी देशस्थिती मजबूत करण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. ती योजना सरकारकडे नाही, ना विरोधकांकडे. मनमोहन सिंग आर्थिक सुधारणांचा मंत्र जपतात, पण त्या सुधारणा राबवण्यासाठी सक्षम यंत्रणा त्यांच्याकडे नाही. राजकारण्यांच्या भ्रष्टाचारापेक्षा सरकारी प्रशासन अधिक चिंताजनक अवस्थेत आहे. कारभारयंत्रणेतील भ्रष्टाचाराने जनता नाडली गेली आहे. सरकारी अधिकारी पैसे खातातच, पण कामेदेखील करत नाहीत. पोलिस यंत्रणा तर त्यांच्या युनिफॉर्मपुरती उरली आहे. देशात जवळजवळ अराजक आहे, फक्त ते कोणत्यातरी मोठ्या घटनेमुळे आमलोकांना जाणवणार आहे.

     त्याहून चिंता वाटावी अशी गोष्ट म्हणजे देशातील विचारी व संवेदनाशील समाज आत्ममग्न होऊन बसला आहे. सध्याच्या देशस्थितीमध्ये प्रशासनावर वचक व पर्यायी विचार होताना दिसत नाही. त्यामुळे मनमोहन सिंग गेले तरी त्यांच्या जागी येणारा पंतप्रधान त्यांच्याहून मवाळ व क्रियाशून्य निघण्याची शक्यता आहे व कदाचित तो भ्रष्ट, गैरव्यवहारी आणि उद्दामदेखील असेल!

     तेव्हा, आंदोलनाच्या पातळीवर देशात जागृती घडत आहे हे इष्टच होय, पण विकार त्याहून खोलवर गेला आहे. तेथे अण्णा हजारे यांची मात्रा चालणार नाही. तळमळ, सचोटी, प्रामाणिकपणा इतपतच त्यांचे गुणविशेष आहेत. ते कौतुकास्पद होत. परंतु त्यामुळे प्राप्त परिस्थितीमधून मार्ग निघणे अवघड आहे. त्यासाठी देशभर चाललेल्या प्रयोगांची कास हवी. मेधा पाटकर यांच्या नर्मदा आंदोलनाबद्दल लोकांना आस्था असूनदेखील आणि लोकांचा त्यांचे व्यक्तिगत चारित्र्य व निष्ठा यांवर विश्वास असूनदेखील पाटकर निष्प्रभ झाल्या, कारण त्यांच्याजवळ पर्याय नव्हता व नाही. त्यांची संकल्पित तिसरी शक्ती कधी उभी राहू शकली नाही,

     देशात लोकशाही रुजली आहे. सध्या तिचे धिंडवडे निघत आहेत इतका नीतिशून्य, तर्कहीन, भ्रष्ट व अकार्यक्षम कारभार देशात आहे. पण त्याचवेळी छोटे छोटे प्रयोगही चालू आहेत. त्यांतील केवळ आरोग्यक्षेत्राचे उदाहरण घेतले तर रजनिकांत आरोळे यांनी सुरू केलेला खेड्यातील आरोग्य सुविधेचा प्रयोग किती वेगवेगळ्या अंगांनी, वेगवेगळ्या गावी वेगवेगळ्या व्यक्तींकडून पसरला गेला आहे! अभय बंग (गडचिरोली) व शशिकांत अहंकारी (उस्मानाबाद) हे त्यामध्ये अग्रणी आहेत. दुसरा, वेगळ्या क्षेत्रातील मेंढालेखाचा प्रयोग व त्याचा प्रभाव दोन आठवड्यांपूर्वीच या पोर्टलवर सादर केला.

     ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ला हेच साधायचे आहे. समाजात ज्या विधायक शक्ती आहेत, त्या समाजधारणेचे (सुधारणेचे नव्हे) प्रयोग करून राहिल्या आहेत. त्यांना दाद द्यायची आहे, जमेल तेवढे त्यामध्ये लोकांनी सहभागी व्हावे यासाठी त्यांना आवाहन करायचे आहे. ही वेळ विचाराधिष्ठित प्रयोगांची, कार्यक्रमाची आहे!

 – दिनकर गांगल – इमेल: thikm2010@gmail.com

दिनांक : 17-08-2011

{jcomments on}

About Post Author

Previous articleहल्ला संविधानावर !
Next articleचांगुलपणाचा प्रभाव
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.