पुण्यातील तरुणांना घेऊन डॉ. सतीश राजमाचीकर काही उपक्रम राबवत असतात. त्यांचा आरंभ झाला तीन-चार वर्षांपूर्वी. राजमाचीकर यांनी सामाजिक भान असलेले लघुपट पुण्याच्या शाळा-कॉलेजांमधून दाखवण्यास आणि त्यासंबंधी चर्चा करण्यास त्यावेळी सुरुवात केली. त्यामधून अनौपचारिकपणे तरुण राजमाचीकरांशी जुडले गेले. राजमाचीकर अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचाराविरुध्द आंदोलनात सहभागी होते. त्यामधून त्यांच्या विचाराला टोक येत गेले. तरुणांना क्रियाशीलपणे विधायक आंदोलनात गुंतवणे हा त्यामधील महत्त्वाचा भाग होता. त्याच विचारातून ते पंधरा तरुणांना घेऊन प्रसाद देवधर यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाराप येथील प्रकल्पावर गेले. तरुणांनी तेथे आठवडाभर श्रमसंस्कारांचा अनुभव घेतला. त्यामधून राजमाचीकर यांच्या युवक संघटनाच्या व त्यांच्या क्रियाशीलतेच्या विचाराला दृढता प्राप्त झाली.
त्यातच दिल्लीमधील बलात्कारविरुध्द उत्स्फूर्त जनआंदोलन सुरू झाले आणि राजमाचीकर व तरुण यांनी पुण्यातील वेगवेगळ्या कॉलेजांसमोर तत्संबंधात गेट मीटिंग घेण्याचे ठरवले आहे. त्यासाठी त्यांनी ‘परित्राणाय’ नामक गटाची स्थापना केली आहे.
राजमाचीकर यांची भूमिका अशी, की दिल्लीतील बलात्काराची घटना निषिध्द आहे. त्या संबंधातील आंदोलनामधून जो कायदा तयार होईल व त्यानुसार जी कारवाई घडेल ती स्पृहणीयच होय. तथापी, दिल्लीतील जनआंदोलन ही चुणूक आहे. सध्या देशामध्ये विलक्षण अस्थिरता, अशांतता व म्हणून अस्वस्थता आहे. देशातील लोक रूढ व्यवस्थेला वैतागले आहेत. त्यांना पर्यायाचा शोध आहे. उलट, रूढ वेगवेगळ्या विचारसरणींमधून असा कोणताही पर्याय उपलब्ध होणार नाही याचीही जाणीव समाजाला झालेली आहे. लेखक, कलावंत व पंडित यांना तर ती झालीच आहे, म्हणून तर ते मूग गिळून शांत आहेत. अशा वेळी जनआंदोलनामधूनच तात्कालिक पर्याय उभे राहतील व त्यामधून दीर्घ स्वरूपाच्या नव्या व्यवस्थेची बीजे रोवली जातील. त्यासाठी छोट्या मोठ्या आंदोलनांना चालना देणे महत्त्वाचे आहे. राजमाचीकर सांगतात, की त्यांच्या संकल्पित गेट मिटिंग्ज हे त्या दिशेने एक पाऊल आहे.
डॉ. सतीश राजमाचीकर यांचा संपर्क – मोबाइल नं. ९८२३११७४३४
आशुतोष गोडबोले,
इमेल – thinkm2010@gmail.com