पंडित उल्हास कशाळकर – रागदारी ख्यालाचा दरबार

carasole

आलापीतल्या कणकणातील, लयकारीच्या क्षणाक्षणातील आणि तानेच्या अग्निबाणातील अभिजातता साक्षात अनुभवायची असेल तर दर्दी रसिकांनी गाणे ऐकावे ते पं. उल्हास कशाळकर यांचे!

इन्स्टण्ट, फास्टफुडच्या जमान्यात अस्सल तूपलोण्याच्या खाण्याशी इमान राखणारी खवय्यांची जी जातकुळी आहे तशीच घराणेदार, तालमीचे गाणे ऐकणा-या रसिकांची आहे. त्यांना उल्हासजींचे गाणे ही पर्वणी आहे.

कशाळकरांचे गाणे कसे आखीवरेखीव, नेटके! सुरेख बांध्याच्या सुस्वरूप तरुणींने छान साडी नेसावी तसे. एका स्वरावरून दुस-या स्वरावर उगीच टपकणे नाही. प्रेक्षकांनी टाळ्या पिटेस्तोवर उगीच ‘सा’ लावून धरणे नाही. अनाहूतपणे सरसर ताना घेणे नाही. तालमीचा खजिना गाठीशी असल्यावर असल्या सवंग चमत्कृतींत कोण रमेल?

‘रसिकासांठी गावे लागते’ या सबबीखाली मैफिलीत भजन-नाट्यसंगीताचा मसाला भरणा-या गायकांचा तुटवडा नाही. पण पु.लं. नी म्हटल्याप्रमाणे,‘एखादा जातिवंत कवी फक्त कवितेशी इमान राखून असतो’ तद्वत, कशाळकरांनी फक्त रागदारी ख्यालाचा दरबार भरवला आहे. त्यांच्या गाण्यात घराणेदार गायकी राखूनही सुखावणारी कलात्मकता आहे. रंजकतेसाठी तडजोड नाही, तरीही श्रोत्यांना खिळवून ठेवायची ताकद आहे. त्याचे कारण उच्चारण, आवाजाचा लगाव व त्यांनी प्राप्त केलेली तालीम!

किराणा घराण्याला पहिला तगडा आवाज कै. पं. भीमसेन जोशी यांनी दिला, तर ग्वाल्हेर घराण्याला पहिला रसाळ, रंजक आवाज कशाळकरांनी दिला. उल्हास यांनी ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर, घराण्याच्या पारंपरिक उच्चारणात साफ बदल केला आहे. ते स्वत:च्या लगावात, उच्चारणात घराणेदार गायकी पेश करतात. त्यामुळे त्यांच्या गाण्यावर कुठलाही शिक्का बसलेला नाही.

ते ‘करत हो’सारखी ग्वाल्हेरची खास बंदिश गातात तेव्हा त्यांच्या गाण्यात अधिक काहीतरी गवसले असे वाटते. झापडबंद श्रोत्यांना एखाद्या बंदिशीत आग्रा घराण्याचे काम चालले आहे याचा पत्ताही लागणार नाही. त्यांना आपण आधुनिक काळात गातोय याचे भान आहे.

कशाळकरांचे गाणे ‘उपज’ अंगाने फुलत जाणारे आहे. एखाद्या डहाळीला पालवी फुटावी, विस्तारावी आणि नंतर त्याचा डेरेदार वृक्ष व्हावा तसे! तालाच्या गोफात ओवलेल्या शब्दसुरांच्या गज-याची महेक रसिकांना झिंग आणणारी आहे. आवर्तनात कधी वर जायचे-कधी खाली यायचे याची ‘समझ’ विलक्षण आहे. राग, ताल, सूर, लय… सारे काम कसे हातात हात गुंफून चाललेले. ते लाजबाब कामगत करून अशा खुबीने सम गाठतात की जबाब नही! कारण कै.पं. गजाननबुवा जोशी यांच्यासारख्या लयदार, बुजूर्ग गायकाची त्यांना मिळालेली भारदस्त तालीम आणि कै. पं. राम मराठे यांचे संस्कार. संस्कार व सहवास यांच्याशी एकरूप झालेल्या, भारतीय अभिजात संगीताचा उलगडा तालमीशिवाय होतच नाही. गजाननरावांनी नेमक्या वेळी केलेल्या गहि-या संस्कारांमुळे कशाळकरांनी अनेक घराण्यांच्या चांगल्या गोष्टी डोळसपणाने उचलल्या. गाता गाता, गजाननबुवा बोलून जात ‘हे राजाभैया, या केसरबाई’ हे मास्तर, हे फैयाझखॉ साहेब’… गुरूने केलेले संस्कार कानांनी-मनाने-डोळ्यांनी अंत:करणात झिरपतात आणि त्यावर तल्लख बुद्धीने प्रतिभेचे परिष्करण करून ‘परफॉर्मन्स’ दिला जातो तेव्हा उल्हास कशाळकर घडतो.

बसंतबहार, संपूर्ण मालकंस, पूरवी ललतपंचम अशा, हुकूमत मिळवलेल्या रागांत त्यांची बिकट, अवघड लयकारी चाललेली असताना श्रोत्यांची अवस्था मात्र अवघडलेली नसते. तानेची जातकुळी नागमोडी, पण सौष्ठवपूर्ण. लयीला आरपार कापत जाणारी, सूराचा कण न् कण लख्ख दाखवणारी दाणेदार तान ऐकणे हा थरारक अनुभव असतो. लयकारी म्हणजे तालाची आदळआपट नव्हे. तालाशी कुस्ती-झटापट नव्हे. कशाळकरांना लयीला अलगद स्पर्शत, मात्रांवर शब्दांचे नाजूक आघात करत तालाला पेलणे सहजसाध्य झाले आहे.

पंडित उल्‍हास नागेश कशाळकर यांचा जन्म 14 जानेवारी 1955 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा गावी झाला. त्यांचे शिक्षण M.A.(L.L MUSIC). कशाळकरांचे प्राथमिक शिक्षण त्‍यांच्‍या वडिलांकडे झाले. त्यांना संगीताचे सुरुवातीचे शिक्षण व्यवसायाने वकील असलेल्या व ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा वारसा लाभलेल्या त्याच्या वडिलांकडून, नागेश दत्तात्रेय कशाळकर यांच्याकडून मिळाले. नागेश कशाळकर हे उल्‍हास लहान असताना त्‍यांना ग्रामोफोनवर वेगवेगळ्या गायकांनी गायलेल्‍या भीमपलास, यमन, शुद्ध कल्‍याण या रागांच्‍या बंदिशी एकवत असत. त्‍याचे संस्‍कार उल्‍हास कशाळकर यांच्‍यावर होत असत. त्‍यांच्‍या वडिलांनी वेगवेगळ्या नावाजलेल्‍या गायकांच्‍या गाण्‍यांशी उल्‍हास यांची ओळख करून दिली. सोबत त्‍यापैकी कुणाकडून कोणता गुण आत्‍मसात करावा याचे स्‍वातंत्र्यही दिले. नागेश कशाळकर यांनी संगीतावरील काही पुस्‍तकांचे लेखन केले आहे.
उल्‍हास कशाळकर यांनी नागपूर विद्यापीठातून सर्वोच्च गुण मिळवून संगीताच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात सुवर्णपदक मिळवले. त्याच दरम्यान त्यांनी राजाभाऊ कोगजे आणि पी. एन. खर्डेनवीस यांचेकडे संगीताच्‍या अभ्यासास सुरुवात केली. उल्‍हास कशाळकर यांना ‘बालगंधर्व नाट्यसंगीत स्‍पर्धे’त भरघोस यश मिळाले. त्यामुळे त्‍यांचे नाव ज्याच्‍या त्‍याच्‍या तोंडी झाले. हा मुलगा नाट्यसंगीत क्षेत्रात भरीव कामगिरी करेल असे भाकित अनेकांनी वर्तवले. कशाळकर यांना भारत सरकारची शिष्‍यवृत्‍ती मिळाल्‍यानंतर त्यांची राम मराठे यांच्‍याकडे आग्रा घराण्‍याची तालिम सुरू झाली. राम मराठे हे उत्तम ख्‍याल गायक होते. कशाळकर यांनी त्‍यांच्‍याकडे विशेष करून ख्‍याल गायकीचे धडे घेतले. त्‍यानंतर त्‍यांनी गजाननबुवा जोशींकडून ग्वाल्हेर घराण्याची तालीम मिळवली. जयपूर गायकीतील निष्णात गवई निवृत्तीबुवा सरनाईक, दत्तात्रेय विष्णू पलुसकर तथा बापुराव पलुसकर, मास्तर कृष्णराव, कुमार गंधर्व या मंडळींचा उल्हास कशाळकरांच्या गायकीवर प्रभाव आहे.

उल्हास कशाळकरांनी दूरदर्शन व आकाशवाणीवर अनेक कार्यक्रम केले असून आकाशवाणीच्या ठाणे येथील केंद्रात त्यांनी १९८३ ते १९९० च्या दरम्यान काम केले. त्यांनी १९९३ मध्ये कोलकाता येथील आय. टी. सी. संगीत संशोधन अकादमीत आचार्यपद स्वीकारले. ते तिथे ग्वाल्हेर घराण्याच्या गुरूपदावर कार्यरत आहेत. त्‍यांची ग्‍वाल्‍हेर घराण्‍यासोबत आग्रा आणि जयपूर या घराण्यांच्या गायनपद्धतींवर हुकूमत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शिष्य झाले आहेत व तयार होत आहेत ही महाराष्ट्राला अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यांनी राम देशपांडे, ओंकार दादरकर व शशांक मकतेदार असे शिष्य घडवले आहेत. कशाळकर यांना 2010 साली भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने सन्‍मानित करण्‍यात आले. त्‍याबद्दल ते म्‍हणतात, की भारत सरकारने अभिजात कलेचा केलेला हा गौरव आहे.

उल्‍हास कशाळकर यांना पाच भाऊ असून सगळे गायक आहेत. त्‍यापैकी अरूण हे आग्रा घराण्‍याचे सुप्रसिद्ध गायक आहेत, तर विकास हे संगीततज्ञ आहेत. कशाळकरांच्‍या पत्‍नी संजिवनी कोलकाता आकाशवाणीत असिस्‍टंट स्‍टेशन डिरेक्‍टर पदावर कार्यरत आहेत. संमिहन कशाळकर हा मुलगा. तो वडिलांकडेच गाणे शिकत असून कोलकात्‍याला एस.आर.ए.मध्‍ये शिष्‍यवृत्‍तीधारक आहे.

उल्हास कशाळकर अखिल भारतीय पातळीवरील ‘क्रिटिक असोसिएशन’च्या मानाच्या पुरस्काराने गौरवले गेले आहेत. त्‍यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार २००८ साली प्राप्‍त झाला होता. त्यांनी आजपर्यंत भारतात व परदेशांतील अनेक मोठ्या संगीत महोत्सवांत भाग घेतला असून, ते ऑस्ट्रेलियामधील बहुसांस्कृतिक महोत्सवात २००६ मध्ये, तर अ‍ॅमस्टरडॅम – भारत महोत्सवात २००८ मध्ये सहभागी झाले होते. त्यांच्या गायनाच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाल्या आहेत.

सुरेश तळवलकरांच्या तबलासाथीचे व उल्हास यांच्या गाण्याचे अद्वैत आहे. उल्हास याच्या गाण्याच्या प्रवासात तळवलकरांचा सहभाग मोठाच. सुरेश म्हणतात,“काही वर्षांपूर्वी उल्हासचे गाणे ऐकून लोक वाहवा म्हणायचे. आता आहाहा म्हणतात. दोन शब्दांतील फरक रसिकांना ठाऊक आहे. भारतीय अभिजात संगीत काळाबरोबर झेपावले आहे आणि कशाळकर हे त्याचेच निदर्शक आहेत.”

पं. उल्‍हास कशाळकर,
09331014516,
आयटीसी एसआरए, टॉलिगंज, कोलकत्‍ता, पश्चिम बंगाल.
www.ulhaskashalkar.com

– मकरंद वैशंपायन

Last Updated on 6th Oct 2017

About Post Author

2 COMMENTS

  1. पं. उल्हास कशाळकर यांच्या
    पं. उल्हास कशाळकर यांच्यासंबंधी माहिती असलेला लेख खूप आवडला. हा लेख संग्राह्य आहे असे मला वाटते.

Comments are closed.