पंचवीस गावांना जोडणारी – समीक्षा लोखंडे

_Samiksha_Lokhande_1.jpg

समीक्षा लोखंडे या रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील ‘प्रकल्प प्रतिष्ठान’ या संस्थेच्या कार्यकर्त्या. त्यांनी पंचायतराज, महिला अत्याचार, स्त्री-भ्रूणहत्या, बचतीचे महत्त्व, ग्रामसभा या विषयांवर पथनाट्याद्वारे जनजागृती केली. समीक्षा मंडणगड तालुक्यातील कुंबळे गावच्या सरपंचपदीही अडीच वर्षे राहिल्या. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात गावात संयुक्त घरमालकी, गावातील पायवाटा-स्ट्रीट लाइट, ग्रामस्वच्छता यांसारखे उपक्रम यशस्वी रीत्या राबवले. गावातील महिलांना संघटित करून ग्रामसभेत त्यांचा ऐशी टक्के सहभाग वाढवला. तीच त्यांच्या कामाची पोचपावती म्हणता येईल.

समीक्षा या कुणबी समाजातील. त्यांचा जन्म २८ मार्च १९७९ रोजी झाला. समीक्षा यांचे शिक्षण बारावीपर्यंत मंडणगड तालुक्यात तळेघर येथील आंबेडकर कॉलेजमध्ये झाले. त्यांचे लग्न २००३ मध्ये झाल्यामुळे त्यांच्या शिक्षणात खंड पडला. त्यांची पुढे शिकण्याची इच्छा होती. समीक्षा यांची लग्नानंतरची पाच-सहा वर्षे संसार, मुले यांच्यात गेली. परंतु शिकण्याची इच्छा मावळली नाही. त्या सांगतात, “माझे पती संदेश यांनी कोठल्याही कामात आढेवेढे घेतले नाहीत, मला नेहमीच प्रोत्साहन दिले.” समीक्षा मंडणगड येथील सावित्रीबाई फुले शिक्षणसंस्थेतून ‘ग्रामविकास’ विषयात बी.ए. २०११ साली झाल्या.

समीक्षा यांचे वडील सहदेव करावडे हे शिक्षक. त्या शिक्षकी संस्कारात वाढल्या. समीक्षा सांगतात, “माणूस जन्माला येऊन सोबत काही घेऊन जात नाही. ते जगणे त्या काळात दुसऱ्याच्या अडचणी कमी करता आल्या तर सार्थकी लागते. म्हणून मी राहत असलेल्या कुंबळे गावातून कामाला सुरुवात केली. ग्रामीण भागातील महिला वर्तमानपत्र वाचत नाहीत ही गोष्ट गावातील ‘महिला मंडळा’त काम करत असताना ध्यानात आली. मी महिलांना वर्तमानपत्रांतील बातम्या वाचून दाखवून त्याबद्दल माहिती देऊ लागले. त्यांच्या काही गोष्टी ऐकू लागले. त्यामुळे महिलांबद्दल आत्मीयता निर्माण झाली. महिलांना त्यांनी त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळूनही समाजाकडून हवा तो सन्मान मिळत नाही. त्यांना कौटुंबिक स्तरावरही दुय्यम स्थान दिले जाते. ओळखीच्या महिला त्यांची अशी दु:खे मला सांगू लागल्या. मी ती ऐकल्यानंतर व्यथित होऊन अत्याचारात पिचलेल्या अशा महिलांना मदत करू लागले.”

दरम्यान, मंडणगड तालुक्यात ‘संकल्प प्रतिष्ठान’ नावाची संस्था रूपेश मर्चंडे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाली. समीक्षा ‘संकल्प प्रतिष्ठान’च्या कामात २०१२ पासून सक्रिय झाल्या. त्यांना प्रणिता जंगम, मुनिरा पठाण, अंकिता लोखंडे, अंकिता बैकर, भारती शिंदे व भाग्यश्री लोखंडे यांसारख्या सहकारी लाभल्या. समीक्षा यांनी त्यांच्या मदतीने व्यसनाधीनता, स्त्री-भ्रूणहत्या, दारूबंदी, महिला अत्याचार या प्रश्नांवर बोट ठेवले. त्यांनी सरपंचपदी असताना, २०१४-१५ साली महिलांसाठी सभागृह अनंत गीते यांच्या खासदार फंडाच्या निधीतून बांधून घेतले. तसेच, त्यांनी महिलांच्या संघटनातून दारूबंदीसाठी लढा उभारला. तेव्हा त्यांना गावातून, पुढारी-राजकारणी लोकांकडून विरोध झाला. गावातील महिलांना मानसिक त्रास, धमक्या दिल्या गेल्या. दारूबंदी मतदानप्रक्रियेद्वारे व्हावी असे शासनाच्या ठरावानुसार अभिप्रेत आहे. पण प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी ग्रामपंचायतीत पन्नास टक्के महिला अनुपस्थित राहिल्या. समीक्षा यांचा दारूबंदीचा ठराव चार मते कमी पडल्याने अपयशी ठरला!

समीक्षा यांना सरपंचपदाच्या कार्यकाळात ‘कोरो’ची २०१३-१४ या वर्षाची फेलोशिप मिळाली. त्यांनी फेलोशिपसाठी ‘पंचायतराज’ हा विषय निवडून लोकांना शासनाच्या योजनांच्या संदर्भात, ग्रामपंचायत व पंचायत समिती या पातळीवर कारभार कसा चालतो याबद्दल माहिती देण्यास सुरुवात केली, ‘पंचायतराज’मधील ‘सरपंच समिती’चे महत्त्व पटवून दिले. ग्रामपंचायतीला मार्गदर्शन व नियंत्रित करावे यासाठी १९७५ साली कायद्यात दुरुस्ती करून सरपंचांच्या समितीची तरतूद करण्यात आली. सरपंच समिती पंचायत समिती स्तरावर काम करते. समिती सरपंचांना येणाऱ्या अडचणींवर चर्चा, ग्रामपंचायतीस मिळालेल्या ग्रामीण विकासकामांवर देखरेख व नियंत्रण अशी कामे करते. मंडणगड तालुक्यात बावन्न ग्रामपंचायती आहेत. पण तालुक्यात पंचायत समिती नव्हती. समीक्षा यांनी ‘संकल्प प्रतिष्ठान’च्या सहकार्याने सरपंच समितीसाठी प्रयत्न सुरू केला. त्यांनी महिला सरपंचांची बैठक घेऊन त्या विषयाचे गांभीर्य लक्षात आणून दिले. मग तालुक्यातील सर्व पुरुष आणि महिला सरपंच यांनी बैठक घेण्याचे ठरवले. परंतु त्या बैठकीला केवळ पंधरा सरपंच उपस्थित राहिले. त्यानंतर रूपेश मर्चंडे व समीक्षा लोखंडे यांनी सरपंचांच्या घरोघरी जाऊन भेटी घेतल्या. त्यानंतरच्या बैठकीला पस्तीस सरपंच उपस्थित राहिले. त्यातून ‘सरपंच समिती’ निर्माण होऊन तिच्यावर दहा सरपंचांची नियुक्ती करण्यात आली. समिती स्थापन झाली, तरी तिच्या बैठका व्हाव्या यासाठीही खटपट करावी लागली. अखेर, सर्व सरपंचांची बैठक झाली. बैठकीत चर्चा झाल्यामुळे ग्रामविकासात पदाधिकारी आणि प्रशासन यांचे नियोजन योग्य पद्धतीने झाले. मंडणगाव तालुका पातळीवरील बावन्न सरपंचांचे संघटन झाले. ते यश समीक्षा व ‘संकल्प प्रतिष्ठान’ यांच्या एकत्रित प्रयत्नाचेच ठरले.

समीक्षा यांनी त्यांच्या सरपंचपदाच्या कारकिर्दीत ग्रामसभेत ग्रामस्थांची शंभर टक्के उपस्थिती लावणे हा निकष ठरवला होता. त्यांच्या मते, ग्रामसभा यशस्वी झाली तर स्वयंरोजगार मिळेल. कारण ग्रामसभेत स्वयंरोजगाराच्या विविध योजनांद्वारे कामे मिळतात. लोकांना त्यांच्या उपस्थितीमुळे त्याची माहिती मिळते. समीक्षा यांनी महिलांचा राजकीय सहभाग वाढावा म्हणून विशेष महिला ग्रामसभेचे आयोजनही केले. त्यांनी कुंबळे गावात संयुक्त घरमालकी हा उपक्रम यशस्वीरीत्या राबवला. कुंबळे ग्रामपंचायतीतील पाच वाड्यांमधील साडेतीनशे कुटुंबांपैकी तीनशे कुटुंबांमध्ये घराच्या मालकीसंबंधात ‘८ अ’ कागदपत्रावर पतीसोबत पत्नीचे नाव लावले गेले. ग्रामपंचायतीत महिलांसाठी असलेल्या दहा टक्के निधीतून दीडशे घरांवर पत्नीच्या नावाच्या पाट्या लावण्यात आल्या. घरावर महिलांच्या नावे पाट्या लावण्याचे काम पन्नास टक्के, तर संयुक्त घरमालकीचे काम ऐंशी टक्के झाले आहे. समीक्षा यांच्या कामाची दखल घेऊन मुंबईच्या ‘साने गुरुजी संस्थे’ने त्यांना २०१३-१४ चा ‘यशस्वी स्त्री सरपंच’ पुरस्कार देऊन सन्मानित केले.

समीक्षा ‘संकल्प प्रतिष्ठान’च्या सहकार्याने मंडणगड तालुक्यातील पंचवीस गावांमध्ये सामाजिक कामे करत आहेत. त्या गावांतील महिलांची महिला ग्रामसभा-विशेष ग्रामसभा यशस्वी करणे, त्याचे महत्त्व स्त्रियांना पटवून देणे, प्रत्येक वाडीतील मंडळे-महिला बचतगट यांच्या बैठका घेऊन त्यांना भारतीय राज्यघटना-संविधान यांची माहिती देणे, त्यांचे अधिकार व हक्क यांची जाणीव करून देणे या विषयांवर जागृती करत आहेत. समीक्षा व ‘संकल्प प्रतिष्ठान’ यांच्या कामाचा परिणाम म्हणजे मंडणगड तालुक्यातील लोक त्यांच्या प्रश्नांवर बोलू लागले आहेत. त्या तालुक्यातील गावागावांत पाणीप्रश्न गंभीर आहे. प्रत्येक गावातील लोक त्यांच्या गावच्या ग्रामसभेत पाणीप्रश्नावर आवाज उठवत आहेत. उदाहरण द्यायचे झाले तर तिढे गावातील लोकांनी एकत्र येत, ग्रामसभेत पाणीप्रश्नावर आवाज उठवला. त्यावर ग्रामसभेत ठराव होऊन बेचाळीस लाख रुपये मंजूर झाले. त्यातून नळपाणी योजनेला सुरुवात झाली आहे. गोळवलीसारख्या गावात नद्या, पाखाड्या यांचे काम करण्यात आले आहे.

समीक्षा सांगतात, “माझे संबंध प्रत्येक गावाशी जिव्हाळ्याचे आहेत. प्रत्येक गावातून मिळणारे आपलेपण हीच माझ्या आयुष्याची पुंजी आहे. माझ्या कुटुंबामध्ये सासू, सासरे, पती व दोन मुले आहेत. त्यांचा माझ्या कामाला पूर्ण पाठिंबा आहे. सामाजिक कामासाठी ‘कोरो’सारख्या संघटनेकडून एक वर्षाची फेलोशिप मिळते. पण त्यानंतर काम करताना घरातून पैसे मागावे लागतात. त्यामुळे मानसिक कुचंबणा होते. अविरत समाजहिताचे काम करणाऱ्या महिलांना अशा संघटनांकडून आर्थिक मदतीचा ओघ सुरू राहवा असे वाटते.”

समीक्षा लोखंडे – ९८८१६३३७६७ / ९२०९०७७६१३

वृंदा राकेश परब

About Post Author

1 COMMENT

Comments are closed.