नेहा बोसची ओढ कलेची!

carasole

राधिक वेलणकरबाबत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर लिहिलेल्‍या लेखाला चांगला प्रतिसाद मिळाला. ‘जय महाराष्‍ट्र न्‍यूज’चे कार्यकारी संपादक प्रसन्‍न जोशी यांनी तो लेख आवडल्‍याचे जातीने कळवले. ते लिखाण करण्‍यामागील हेतू नवी पिढी परंपरागत जीवनचाकोरी सोडून आयुष्‍याच्या नवनव्‍या वाटा धुंडाळण्याचा प्रयत्‍न करत आहे हे अधोरेखित करणे हा होता. योगायोगाने राधिकाचा लेख प्रसिद्ध झाला त्याच दिवशी तशाच आणखी एका मुलीशी माझी भेट घडून आली.

नेहा बोस! वय वर्ष चोवीस. वडील मूळ बंगालचे तर आई महाराष्‍ट्रीयन. दोघेही इंजिनीयर म्‍हणून कार्यरत. घरात नेहा आणि तिचे आईवडील असे तिघेच. ते ठाण्‍याचे सुखवस्‍तू कुटुंब. नेहा वडिलांमुळे बंगाली, तर आईमुळे मराठी बोलते. तिच्‍या आईवडिलांची तिनेही आय.टी. इंजिनीयर व्‍हावे अशी इच्‍छा होती. नेहाच्‍या आईवडिलांनी मनोमन ‘नेहा इंजिनीयरिंगचा कोर्स करेल, त्‍यानंतर एम.बी.ए., मग ती पुढील शिक्षणासाठी परदेशी जाईल’ अशी आखणी करून ठेवली होती. नेहाला मात्र तिचे निर्णय इतरांनी घेऊन तिच्‍या आयुष्‍याची वाट ठरवून टाकावी हे रुचले नाही. ती आय.टी.च्‍या थर्ड सेमिस्‍टरच्‍या परीक्षांत सर्व विषयांत जाणीवपूर्वक नापास झाली. तिने कॉलेजमधून बाहेर पडून थेट टी.व्‍ही. जगतात इंटर्न म्‍हणून प्रवेश केला. तिचा तो निर्णय तिच्‍या आईवडिलांसाठी धक्‍कादायक होता.

नेहा चांगली वाचक आहे. ती फिक्‍शन, ड्रामा, साय-फाय आणि वास्‍तवाधारित लेखनाची चाहती आहे. तिच्‍या खाण्‍यापिण्‍याच्‍या निवडीत आरोग्‍याची काळजी असते. ती थोडेफार लेखन करते. तिला चित्रपट दिग्‍दर्शक होण्‍याची इच्‍छा आहे. तिने महाविद्यालयात असताना नाटकांमधून अभिनय केला आहे. तिला अभिनयाच्‍या बाबतीत काही करावे असेही वाटते. मात्र तिच्‍या आईवडिलांच्‍या मते टी.व्‍ही. किंवा चित्रपट हे क्षेत्र सुरक्षित नाही. तेथे टॉपचे लोक वगळले तर इतरांना सन्‍मान लाभत नाही. सर्वसामान्य कलाकारांना चांगले वागवले जात नाही. त्‍यामुळे त्‍यांनी तिच्‍या निर्णयाला पाठिंबा दिला नाही. नेहाला त्‍यांची मते नकारात्‍मक वाटतात. तिला त्‍यामागील त्‍यांचा विचार आणि काळजी समजू शकते. मात्र ती वास्‍तव स्‍वीकारून स्‍वतःच्‍या स्‍वप्‍नांचा पाठलाग करू इच्‍छिते. तिने क्राईम पेट्रोलसारख्‍या टी.व्‍ही. मालिकांमध्‍ये काम करताना कोठे शिकाऊ म्‍हणून तर कोठे लहान-मोठ्या विभागांमध्‍ये सहाय्यक म्‍हणून अठरा-अठरा तासांच्‍या हेक्‍टिक शेड्यूलमध्‍ये कामे केली आहेत. सध्‍या तिला ‘राकोश’ नावाच्‍या एका चित्रपटात कॉस्च्युम विभागात साहाय्यक म्‍हणून संधी मिळाली आहे. तिने नोकरी सोडून कलात्‍मक आनंदाच्‍या ओढीने ती संधी स्‍वीकारली. ती चित्रपटाच्‍या चित्रिकरणासाठी सध्‍या नागपूरला आहे.

नेहाला ती आणि तिचे आईवडील यांच्‍यामध्‍ये अंतर पडल्‍याचे जाणवते. तो दोन पिढ्यांच्‍या विचार आणि भावना यांमधील दुरावा आहे. तिचे आईवडील तिच्‍या सर्व गरजा पुरवण्‍यासाठी नेहमी हजर असतात. नेहाला कशाकरताच स्‍वतःचे पैसे खर्च करावे लागत नाहीत. तिला ती गोष्‍ट खटकते. तिला तिच्‍या निर्णयांची उत्तरे घरी द्यावी लागतात हे तिला आवडत नाही. ती म्‍हणते, की तिला घराबाहेर पडून वेगळे राहावेसे वाटते. ती म्‍हणते, “त्‍यामुळे मला माझी वाट स्‍वतंत्रपणे, कोणत्याही बंधनाशिवाय शोधता येईल.”

– किरण क्षीरसागर

About Post Author

Previous articleववा ग्रामस्थांची जलक्रांती
Next articleश्रीराम जोग – बहुरंगी नाट्यकलावंत
किरण क्षीरसागर यांनी ग्रॅज्‍युएशननंतर पत्रकारितेचे शिक्षण घेतले. त्‍यानंतर वृत्‍तसंस्‍था, दैनिक 'मुंबई चौफेर' आणि आकाशवाणी अशा ठिकाणी कामांचा अनुभव घेतल्‍यानंतर 'थिंक महाराष्‍ट्र'सोबत 2010 साली जोडले गेले. त्‍यांनी चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेतले असून त्‍यांचा 'डिपार्टमेन्‍ट', 'अब तक छप्‍पन - 2', 'अॅटॅकस् ऑफ 26/11', 'क्विन', 'पोस्‍टर बॉईज' अाणि 'शेण्टीमेन्टल' अशा व्‍यावसायिक चित्रपटांच्‍या संकलन प्रक्रियेत सहभाग होता. ते 'बुकशेल्फ' नावाचे पुस्तकांचा परिचय करून देणारे युट्यूब चॅनेल त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चालवतात. लेखकाचा दूरध्वनी 9029557767