नीळकंठ श्रीखंडे – भारताच्या अभियांत्रिकी विश्वातील कर्तृत्व

0
46
carasole

मुंबईचे ज्येष्ठ अभियंता, कन्सल्टिंग इंजिनीयर नीळकंठ श्रीखंडे हे भारताच्या अभियांत्रिकी विश्वातील कर्तृत्ववान व जबाबदार व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी त्यांच्या न्यायी, शांत, विनम्र व मितभाषी स्वभावाने अनेक चांगली माणसे जोडली. ते वयाच्या सत्‍त्‍याऐंशीव्या वर्षीही उत्साहाने व हिरिरीने नव्या गोष्टींना सहज सामोरे जातात. त्यांनी अभियांत्रिकी क्षेत्राबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक व सांगीतिक क्षेत्रांतही भरीव कार्य केले आहे. त्यामुळे त्या माणसात यंत्र आणि संस्कृती एकत्र नांदते असे म्हणतात. नीळकंठ श्रीखंडे यांनी डिझाइन, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, उड्डाणपूल, निवासी आणि औद्योगिक इमारती यांच्या उभारणीची अडीच हजारांहून अधिक कामे गेली पासष्ट वर्षें करून, अभियांत्रिकी क्षेत्रात त्यांचा वेगळा ठसा उमटवला आहे. तर मुंबईच्या सांस्कृतिक जीवनात रसिकतेचे मानदंड नकळत निर्माण करून ठेवले आहेत.

नीळकंठ श्रीखंडे यांनी ‘कन्सल्टिंग इंजिनीयरिंग’च्या पंचावन्न वर्षांच्या प्रदीर्घ अशा कारकिर्दीत स्ट्रक्चरल डिझाइन, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, दुरुस्ती आणि पुन्हा उभारणी, तांत्रिक लेखाजोखा (टेक्निकल ऑडिट) आणि गुणात्मक दर्जानिश्चिती अशा विषयांत भरघोस कामगिरी करून ठेवली आहे. त्याशिवाय, ते या विषयांचे प्रशिक्षण, मार्गदर्शन व सल्ला देण्याचे काम अनेक वर्षें करत आहेत. त्यामुळे त्या क्षेत्रात त्यांच्या नावाचा दबदबा आहे. त्यामुळे त्या क्षेत्रात त्यांच्या नावाचा दबदबा आहे.

नीळकंठ श्रीखंडे यांचा जन्म २० मे १९२९ रोजी मुंबईमध्ये झाला; पण वडील नागेशराव श्रीखंडे हे बेळगावला डिस्ट्रिक्ट जज असल्यामुळे त्यांचे बालपण बेळगावमध्ये गेले. श्रीखंडे त्यांच्या शाळेच्या आठवणी सांगतात : दत्तात्रय देसाई हे शिक्षक त्यांना घरी येऊन शिकवत. त्यामुळे श्रीखंडे यांचा शाळेचा पहिला दिवस म्हणजे त्यांच्या चौथीच्या परीक्षेचाच. ते शाळेचे वातावरण पाहून घाबरले. गणिताचा पेपर होता; पण त्यांना लिहिण्यास काहीच सुचेना. त्यामुळे ते आयुष्यातील पहिली परीक्षा नापास झाले. एवढा विचक्षण बुद्धिमत्तेचा विद्यार्थी नापास कसा झाला याचे देसाई शिक्षकांना आश्चर्य वाटले आणि वाईटही. त्यामुळे त्यांनी विशेष खटपट करून त्यांची एकट्याची परीक्षा घेतली. त्यात ते चांगल्या मार्कांनी पास झाले. नीळकंठ श्रीखंडे यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण बेळगावच्याच ‘बेयनॉन स्मिथ हायस्कूल’मध्ये झाले. ते मॅट्रिकला बेळगाव शहरात पहिले, तर केंद्रात दुसरे आले. श्रीखंडे यांनी बेळगावच्या ‘लिंगराज कॉलेज’मधून एफ.वाय. सायन्सपर्यंत शिक्षण घेऊन पुण्याच्या ‘फर्ग्युसन कॉलेज’मधून इंटर सायन्स केले. त्यानंतर श्रीखंडे यांनी १९४९ साली पुण्यालाच बी.ई. सिव्हिल ही अभियंता शाखेची पदवी घेऊन अभियांत्रिकी विश्वात प्रवेश केला.

नीळकंठ श्रीखंडे यांनी सिव्हिल इंजिनीयर झाल्यानंतर सर्वप्रथम १९५० ते १९५३ या काळात त्या वेळच्या मुंबई प्रांताच्या ‘सार्वजनिक बांधकाम खात्या’च्या ‘डिझाइन डिपार्टमेंट’मध्ये सहाय्यक अभियंता म्हणून काम केले. त्यांची इंग्लंडला शिकण्यास जाण्याची इच्छा होती. ती संधी त्यांना १९५४ साली मिळाली. श्रीखंडे नोकरीनिमित्त इंग्लंडमध्ये स्टॅफोर्ड व लंडन येथे १९५४ ते १९५६ या दोन वर्षी वास्तव्यास होते. त्यांना तेथे चांगल्या-वाईट अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागले. तेही काळे-गोरे या वादात भरडले गेले. त्यांना इंग्लंडमध्ये राहण्यासाठी जागा मिळवताना चेहरा बघूनच नकार मिळे. तरीही, श्रीखंडे यांचे, त्या वास्तव्यादरम्यान अनेक चांगल्या माणसांशी ओळखी होऊन त्यांच्याशी शेवटपर्यंत व्यक्तिगत संबंध चांगले राहिल्याचे श्रीखंडे स्वत:च सांगतात. इंग्लंडमधून पुन्हा मायदेशी परतल्यावर ते ‘असोशिएटेड सिमेंट कंपनी लिमिटेड’मध्ये (एसीसी सिमेंट) नोकरीला लागले. त्यांची निवड आंध्र प्रदेशातील मंचेरिअल येथील सिमेंट प्लाण्टच्या उभारणीसाठी करण्यात आली. दिवसभर साइटवर काम करायचे. गोडाऊनमध्ये राहून गच्चीवर झोपायचे. तेथे प्राथमिक सुविधांचीही वानवा होती. त्यांच्या टीमने दोन वर्षे मंचेरिअलला राहून प्लाण्टसाठी मेहनत घेतली. मात्र, एकाही सिव्हिल इंजिनीयरला प्रमोशन मिळाले नाही. न्यायीवृत्तीच्या श्रीखंडे यांना ते खटकले. त्याबद्दल त्यांनी वरिष्ठांना जाब विचारला. त्यांनी त्यांच्या डिपार्टमेंटवर झालेला तो अन्याय सहन न होऊन ‘एसीसी कंपनी’चा राजीनामा दिला. श्रीखंडे यांच्या राजीनाम्यानंतर मात्र त्यांच्या म्हणण्यावर विचार होऊन अनेक जणांना प्रमोशन मिळाले! सुसंस्कृपणा व आत्मसन्मान हे गुण त्यांच्या तरुणपणातच असे प्रकट झाले व ते त्यांनी आयुष्यभर जपले.

नीळकंठ श्रीखंडे यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्यांनी ‘भाभा अणुसंशोधन केंद्र’ या संस्थेमध्ये दीड वर्षें कार्यकारी अभियंता म्हणून काम केले. तुर्भे येथे उभ्या राहिलेल्या अनेक इमारतींचे डिझाइन श्रीखंडे यांच्या हाताखालून गेले. लॅबोरेटरीज, वर्कशॉप, स्टोअर्स यांसारख्या बिल्डिंगचे काम सुरू व्हायचे होते. हाताशी स्टाफ कमी असल्यामुळे जबाबदारी मोठी होती. डिझाइन करणे, साइटवर काम पाहणे, ड्रॉइंग काढणे यांसारखी अनेक कामे करावी लागली असे श्रीखंडे सांगतात. ‘भाभा अणुसंशोधन केंद्रा’त सहायक अभियंता पाहिजे म्हणून जाहिरात देण्यात आली होती. त्यावर श्रीखंडे यांनी आक्षेप घेतला. कारण महाराष्ट्रात नवीन इंजिनीयर हा आधी पर्यवेक्षक अभियंता म्हणून कामाला लागतो. त्यानंतर उपअभियंता, मग सहायक अभियंता आणि शेवटी कार्यकारी अभियंता होतो, तर पंजाबमध्ये अभियांत्रिकीची पदवी घेतल्याबरोबर लगेच सहायक अभियंता या पदावर काम करता येते. त्यामुळे जवळजवळ दहा वर्षांची लीड दुसऱ्या कोणाला तरी दिली जाऊन हा महाराष्ट्रातील इंजिनीयर्सवर अन्याय आहे व तो त्यांना मान्य नाही असे त्यांनी वरिष्ठांना सांगितले. तेथेही त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी, नीळकंठ श्रीखंडे यांनी स्वत:च तेथेही नोकरीचा त्याग केला. या संस्थेतील अनुभव त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. त्यांच्या जीवनप्रवासात डॉ. होमी भाभा, जस्टिस बावडेकर, जस्टिस तुळजापूरकर, जयंत नारळीकर, आचार्य अत्रे यांसारखी मोठमोठी मंडळी त्यांना भेटली, ज्यामुळे जीवन समृद्ध होत गेल्याचे श्रीखंडे सांगतात.

नीळकंठ श्रीखंडे यांनी राज्य सरकार, केंद्र सरकार आणि खासगी संस्था यांमध्ये नोकऱ्या केल्यावर त्यांना स्वत:चे काहीतरी करावे असे वाटले. त्यातूनच त्यांनी १९५८ मध्ये ‘एन. एन. श्रीखंडे’ ही कंपनी सुरू केली. त्यांची सुरुवातीची काही वर्षें अतिशय खडतर गेली. अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. के. जे. म्हात्रे या सीनियर आर्किटेक्टकडून बंगलोरमध्ये मिळालेले सिनेमा थिएटरचे काम श्रीखंडे यांनी अठरा-एकोणीस तास दिवसरात्र मेहनत घेऊन एका आठवड्यात पूर्ण केले. विश्वासराव चौगुले यांचा गोव्यातील प्रोजेक्ट, आयआर प्रेसिपिटेशन प्लाण्टचे स्ट्रक्चरल डिझाइन व टेंडर्सचे कामही त्यांना मिळाले. त्यांनी दीड-दोन वर्षांत अठराशे ड्रॉइंग तयार केली. त्यांनी चौगुल्यांबरोबर जवळजवळ पंचवीस वर्षें एवढा प्रदीर्घ काळ काम केले. श्रीखंडे यांनीच सिद्धिविनायक मंदिराचे कामही केले. तसेच, सी-लिंकचे काही अंशी काम त्यांच्या कंपनीने केले आहे. श्रीखंडे यांनी ‘इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीयर्स’ आणि ‘अमेरिकन काँक्रिट इंन्स्टिट्यूट’ या संस्थांचे फेलो म्हणूनही काम केले आहे.

नीळकंठ श्रीखंडे यांनी ‘श्रीखंडे कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड’ ही कंपनी१९७८ मध्ये स्थापन केली. ते त्या कंपनीचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून २००४ पर्यंत काम पाहात होते. आता, त्यांचे दोन्ही चिरंजीव रवींद्र व राजीव त्या कंपनीचा कार्यभार सांभाळतात. श्रीखंडे त्यांच्या कंपनीतून २००४ मध्ये निवृत्त होऊन गरज असेल तेथे मुलांना मार्गदर्शन करतात. नीळकंठ श्रीखंडे यांना शिकवण्याची आवड पहिल्यापासूनच असल्याने ते ‘रचना संसद महाविद्यालया’त पदव्युत्तर आर्किटेक्चर विद्यार्थ्यांसाठी ‘काँट्रेक्ट मॅनेजमेंट’ हा विषय शिकवतात. श्रीखंडे अभियांत्रिकी क्षेत्रातील काही लवादांवर काम करण्यात व्यग्र आहेत. उच्च न्यायालयाने त्यांची नेमणूक यामधील काही बाबींवर केली आहे. श्रीखंडे ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी (पुणे)’ या संस्थेचे कौन्सिलिंग मेंबर म्हणून नऊ वर्षें काम पाहत होते, ते त्या संस्थेचे लोकल मॅनेजमेंट मेंबर आहेत. ते ‘दादर-माटुंगा कल्चरल सेंटर’चे अध्यक्ष म्हणून, वांद्रे येथील ‘संगीत सभे’चे अध्यक्ष म्हणून, ‘अरुणोदय वॉकर्स असोसिएशन’चे सक्रिय सभासद व ‘सोमवार मंडळा’चे सक्रिय कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत.

त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यात २००० मध्ये ‘इंडियन अॅशुरन्स स्ट्रक्चरल इंजिनीयर्स अवॉर्ड’, २००७ मध्ये ‘इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक स्टडिज (नवी दिल्ली)’ यांचा ‘उद्योगरत्न’ पुरस्कार, महाराष्ट्राचे ‘इंडियन काँक्रीट इन्स्टिट्यूट’चे ‘लाइफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड’ यांचा समावेश आहे. नीळकंठ श्रीखंडे अविरत उत्साह, अखंड व्यग्रता आणि नियोजनबद्ध कार्यप्रणाली याचा आदर्श म्हणून जनमानसात प्रसिद्ध आहेत.

– वृंदा राकेश परब

About Post Author