निसर्गजाणीव देणारी संभाषिते

0
29
_Nisargajaniv_DenariSambhashite_1.jpg

‘कुतूहलापोटी’ असे सार्थ शीर्षक असलेले अनिल अवचट यांचे अडतिसावे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. ‘कुतूहलापोटी’मध्ये कुतूहल आहे ते मुख्यत्वे चराचर सृष्टीच्या गोष्टींविषयी. त्या लेखनात प्राणी, कीटक, बुरशी, बॅक्टेरिया यांसारख्या सूक्ष्म जीवांपासून विस्मयकारक मानवी शरीररचनेपर्यंत विविध माहिती आहे. ती रंजक आहे, चकित करणारी आहे; ती सांगण्याची शैली गुजगोष्टींची आहे – जणू जीवलगांचे गप्पाष्टक सुरू आहे. कसला आव नाही, कोठला पवित्रा नाही, काही सिद्ध करायचे नाही. लेखनात मुद्दे आहेत; गुद्दे नाहीत. उच्चरवात काहीच नाही. शब्द साधे आहेत. भाषा सोपी आहे. पण कथनाची लयबद्धता मात्र त्यात आहे. ती शब्दशिल्पे सर्जनशील, संवेदनशील कलाकाराने घडवलेली आहेत. त्यामुळे वाचक हळुवारपणे आत ओढला जातो. माहितीचा एकेक पापुद्रा उलगडत गाभ्यापर्यंतचा हा प्रवास! तो गाभा आहे जीवसृष्टीच्या आकलनाचा. निसर्गाचे विस्मयकारक, थक्क करून सोडणारे अंतरंग उलगडून दाखवण्याचा. माहितीच्या जंजाळातून पलीकडे जाणारा, जीवसृष्टीच्या चिरंतन अस्तित्वाला कारणीभूत असणाऱ्या तत्त्वांचा मागोवा घेणारा, प्रत्ययकारी अनुभूती देणारा प्रवास. निसर्गाच्या, सृष्टीच्या विविध घटकांतील परस्पर सामंजस्य, साहचर्य, सहकार्य, परस्परावलंबित्व यांचे अनोखे दर्शन घडवणारी सहलच जणू! या लेखनातून लाभते एक निसर्गजाणीव. प्रख्यात तत्त्वज्ञ लेखक फ्रिटजॉफ काप्रा त्याचे वर्णन ‘बिलाँगिंग टू द युनिव्हर्स’ असे करतो, ती जाणीव! मी या चराचर सृष्टीचा एक अविभाज्य भाग आहे, माझी नाळ या सर्वांशी जोडली गेलेली आहे, मानवी अस्तित्व हे स्वयंभू, स्वायत्त आणि स्वतंत्र नाही, ही ती निसर्गजाणीव. जाणीवजागृतीच्या अशा अनेक क्षणांची प्रचीती या लेखनात येते. नवअध्यात्मातील साक्षात्काराची अनुभूतिजन्य प्रचीती. लेखकाने उद्देश म्हणून तो स्पष्ट सांगितलेला नाही; पण परिवर्तनाच्या दिशेने वाचकाचा प्रवास होतोच. मानवकेंद्रीपासून सृष्टिकेंद्री विचारव्यूहापर्यंत जे विद्वत्प्रचुर तात्त्विक प्रतिपादनातूनही साध्य होण्याची शक्यता कमी ते अवचट यांच्या ‘अरबी रात्री’सारख्या गोष्टीवेल्हाळ, सोदाहरण, आर्जवी लेखनातून होऊ शकते. अवचट स्वतःमधील बदलाचे वर्णन करताना एके ठिकाणी म्हणतात, “निसर्गाला धरून कसे राहवे ते पक्ष्यांकडून शिकत आहे, एवढे शहाणपण समोर वावरतेय! ” झाडात बसलेल्या पक्ष्याला पाहून मन म्हणते, “मित्रा, माणसांना जाग येत आहे, येण्याची आशा आहे. तू निर्धास्त जग. माणूस असा शहाणा होईल, की तो झाडे तोडून तुमचा अधिवास कमी करणार नाही. उलट वाढवेल. तुमची शिकार करणे सोडून देईल. पाणथळ जागा तुमच्यासाठी राखून ठेवेल. त्यावर घरे बांधणार नाही. तू विचारशील, याला पुरावा काय? तर मी म्हणेन, किरण, प्रमोद, अमृता जर बदलू शकले, तर सगळे का बदलू शकणार नाहीत?”

पर्यावरणाची लढाई अवघड आहे हे लेखकाला माहीत नाही असे थोडेच आहे? पण तो ती लढण्यास हवी यावर ठाम आहे. माणूस ती कधीतरी जिंकेल. स्वतःला वाचवण्यासाठी का होईना, स्वार्थबुद्धीने का असेना, त्याला ती जिंकावीच लागेल, असा दुर्दम्य आशावाद अवचट यांच्या लेखनात वारंवार दिसतो. त्यांनी लेखनाला सामाजिक परिवर्तनापासून सुरुवात केली होती. ते त्यांची पूर्वअट म्हणून व्यक्तिगत परिवर्तनाकडे आता पाहत आहेत!

अवचट यांची भूमिका बदललेली नाही, तर उत्क्रांत झाली आहे. पुस्तकातील सर्व लेख माहितीपर आहेत हे खरे; पण त्या माहितीला वजन आले आहे, मूल्य प्राप्त झाले आहे ते माहिती मिळवण्याच्या व ती सांगण्याच्या खास अवचट पद्धतीने. त्यांना विषय भावला, त्यांनी त्यात आत उतरायचे ठरवले, की ते प्रथम शोध घेतात, त्या क्षेत्रातील गुरूंचा. त्या विषयांचे तज्ज्ञ, अभ्यासक, संशोधक, फील्डमध्ये काम करणारे कार्यकर्ते – त्याच्या जोडीला माहितीजाल. अवचट यांची रीतसर शिकवणी सुरू होते. यथावकाश त्यांचे गुरू त्यांचे मित्र होतात किंवा त्यांचे मित्र त्यांचे गुरू होतात. अवचट यांनी त्यांच्या वशीकरणाचे अनेक मंत्र प्रयत्नपूर्वक आत्मसात केले आहेत. त्यांच्याकडे त्यासाठी अनेक क्लृप्त्या आहेत. ते बासरी उत्तम वाजवतात. गाणी म्हणतात. त्यांच्याकडे स्वतःच्या रचना अभंगांपासून दोह्यांपर्यंत असतात. त्यांचा हातखंडा ओरिगामीतून विमानापासून बेडकापर्यंत काय म्हणाल ते करण्यापर्यंत आहेच. ते उत्तम चित्रकार आहेत, काष्ठशिल्पकार आहेत, छायाचित्रकार आहेत. त्यांचे ‘मुक्तांगणा’तील व्यसनमुक्तीचे काम आहेच; शिवाय, महाराष्ट्रभर पसरलेला त्यांचा मित्रपरिवार आणि चाहता वर्ग. ते स्वयंसेवक म्हणून साहाय्याला तत्पर असतात. त्यांना पुस्तके आणि संदर्भ-साहित्य यांची कमतरता कधी पडत नाही. सगळी ग्रंथालये त्यांना मुक्तद्वार असतात. त्यांच्या बाबतीत गुरूच शिष्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले असतात. म्हणजे त्यांच्याकडील माहितीच्या महापुराची कल्पना करता येऊ शकते.

अवचट यांचे वेगळेपण म्हणजे त्यांनी केलेली माहितीवरील प्रक्रिया. ती प्रक्रिया म्हणजे माहिती घ्यायची, ती मनात रुजू द्यायची, त्यातून निवड करायची, त्यांच्या विचारपरिप्रेक्ष्याला अनुरूप असेल तिला प्राधान्य द्यायचे. माहिती अनेक गाळण्यांतून, निकषांतून तावूनसुलाखून निघणार आणि मगच त्यांचा अवचट शैलीतील लेख तयार होतो. या पुस्तकात मधमाश्यांवर फार सुंदर लेख आहे. मधमाश्या फुलातील मध गोळा कसा करतात याचे रसभरीत वर्णन त्यात आहे. अवचटही माहितीचे कण-कण मधमाश्यांप्रमाणे जमा करतात, पण खरी गंमत पुढेच आहे. अवचट म्हणतात, “मधमाश्या त्या मधुरसावर ऊर्फ मकरंदावर काय प्रक्रिया करतात कोण जाणे; पण त्याचा मध तयार होतो. माणसाने एवढी प्रगती केली तरी त्याला मध प्रयोगशाळेत तयार करता आला नाही अजून.” अवचट यांच्याबद्दलही असेच म्हणता येईल. त्यांनाही सगळ्यांना उपलब्ध होऊ शकेल तीच माहिती मिळते; पण ते त्या माहितीवर अशी काय प्रक्रिया करतात, की त्यातून ‘अवचट’ शैलीतील मधुलेख तयार व्हावा! त्यांचे लेखन वाचणे हे वाचकाला बक्षीस असते. मधुमक्षिका स्वतःसाठी मध तयार करतात; इतरांसाठी नाही, अवचट लेखन स्वतःसाठी करत असतील की काय? जसे ते स्वतःसाठी बासरी वाजवतात, गातात आणि चित्रे काढतात !

कदाचित, ते लिहिताना स्वतःही बोलत असावेत. ते त्यांच्या आत्मपर लेखनात किती आत आत वळू शकतात, स्वसंवेद्य हातात, ते वाचकांनी पाहिले आहे. ते येथेही लिहितात ते वाचकाच्या केवळ कानावर पडते असे म्हणायचे. अवचट यांची अनेक संभाषिते वाचकांना पुस्तकात ऐकण्याला येतात. वाचकांच्या मगदुराप्रमाणे, जीवनदृष्टीप्रमाणे प्रत्येकाला वेगवेगळी ऐकू येणारे उदाहरणार्थ, मधमाश्यांवरच्या त्यांच्या लेखाच्या शेवटी ते म्हणतात, ‘कोठे मधमाश्यांचं सहकार्य आणि परस्परावलंबन आणि कोठे माणसांची स्पर्धा आणि वैयक्तिक प्रगतीचा अतिरेक! कोठे त्यांच्या समूहासाठी प्राण देणाऱ्या कामकरी माश्या, तर कोठे पैशांसाठी काहीही विकण्यास तयार असलेली माणसे! कोठे अकार्यक्षम राणीलाही हटवू शकणारी त्यांची लोकशाही, तर कोठे कितीही आरोप सिद्ध झाले तरी सत्तेला चिकटून राहणारी मानवी राजकीय संस्कृती !”

कीटकांबाबतच्या लेखात ते म्हणतात, “ही छोटी मंडळी त्यांच्या जगण्यातून काय काय विलक्षण गोष्टी शिकवतात! त्यांना सहा पाय असतात; पण कायम तीन पायांवर स्थिर. जगातील ही सर्वात स्थिर अवस्था. कमीत कमी आधार; पण सर्वात कार्यक्षम स्थिरता कोठे, तर या तीन पायांवर! आटोपशीर जगण्याचे हे किती छान उदाहरण! हेही शिकुयात का? कमीत कमी गरजा आणि मनाची स्थिरता.” “कीटकभाऊ, जमेल का, आम्हाला हे? तो बघा, त्याची अँटेना हलवून सांगतोय, ‘जमेल, नक्की जमेल!’”

जीवनाकडे पाहण्याच्या निसर्गानुकूल, पर्यावरणस्नेही दृष्टीचे प्रतिबिंब अवचट यांच्या लेखनात असे विखुरलेले असते. वाचकांनी त्यांच्या शैलीत त्यात यथानुकूल बदल करावा, खरा आनंद त्याच्यात आहे, हा त्यांचा आग्रह येथे सहज रीत्या व्यक्त करतात. ते त्यासाठी फार उच्चरवात, अहमहमिकेने मांडणी करण्याचे आवर्जून टाळतात. पटले तर बघा, नाही तर तुमचे तुम्ही ठरवा. त्यासाठी ते वाचकांना वेठीस धरत नाहीत. ते वाचकापासून त्याला अनोख्या जगाच्या आश्चर्यकारक अंतरंगाचा उलगडा होत असताना वाचनाचा मिळणारा आनंद हिरावून घेत नाहीत.

डॉ.अभय बंग यांची छोटीशी, पण मार्मिक प्रस्तावना पुस्तकाला लाभली आहे. विद्यार्थ्यांनी हे पुस्तक अवश्य वाचले पाहिजे. अवचट यांचे पुस्तक रंजक, माहितीपर, आनंददायी आणि मूल्यभान जागृत करणारे आहे.

‘कुतूहलापोटी’ -अनिल अवचट
समकालीन प्रकाशन,
पृष्ठे – 200,
मूल्य – 190 रुपये

(लोकसत्ता, मे 2017 वरून उद्धृत)

– सदा डुम्बरे

About Post Author

Previous articleमराठी-उर्दू यांची नाळ जुळावी म्हणून…
Next articleरानडेआजींचे वय म्हणजे नुसताच आकडा
सदा डुम्बरे हे साप्ताहिक सकाळचे माजी संपादक आहेत. त्यांनी सकाळ समूहासोबत सदतीस वर्षे काम केले आहे. सदा डुम्बरे हे पुणे येथे राहतात. त्यांनी जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांची ‘प्रतिबिंब’, ‘दशकवेध’, ‘करके देखो’ ही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. ते ‘परिसर’ या पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. डुम्बरे यांना महाराष्ट्र शासनाचा ‘मराठी भाषेतील वाङ्मय निर्मितीतील राज्य पुरस्कार’ व सह्याद्री वाहिनीचा ‘रत्नदर्पण’ या पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. लेखकाचा दूरध्वनी 9881099012