निषेधाचे नवे मार्ग

1
26

डॉक्टर मंडळी देखील सध्या वेगवेगळ्या कारणांनी संप करतात. डॉक्टरांनी ‘संप’ केल्याने नेमके काय साध्य होणार आहे? समाजामध्ये वैद्यकीय (डॉक्टरी) व्यवसायाची विश्वासार्हता कमी होत असताना, आम डॉक्टरांबद्दलची सद्भावना कमी होत असताना डॉक्टरांनी रुग्णांना सेवा देणे बंद करावे हे मला योग्य वाटत नाही. वैदयकीय व्यावसायिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे आणि त्यासाठी डॉक्टरांनी निषेधाचे सर्व कायदेशीर व नैतिक मार्ग वापरायला हवेत असेच माझे मत आहे. त्यामध्ये मोर्चा, उपोषण, निवेदने, कायदेशीर पावले, लोकप्रतिनिधी पातळीवरील जागृती अशा उपायांचा समावेश करता येईल. मात्र डॉक्टरांनी रुग्णांना सेवा देणे बंद करावे हे योग्य नव्हे. ते वागणे असे दाखवते, की वैद्यकीय व्यवसाय अन्य व्यवसायांसारखाच आहे; त्याला नैतिकतेचा आधार नाही! सर्वसामान्य माणसे ‘सर्वसामान्य कामगारांप्रमाणे वागताहेत हे डॉक्टर!’ असे आरोप जास्त प्रमाणात करणार. त्यामुळे डॉक्टरांबद्दल सद्भावना वाढणार की कमी होणार?

निषेध हे डॉक्टरांचे नजीकच्या पल्ल्याचे ध्येय आहे, पण विश्वासार्हता पुन्हा स्थापित करणे हे त्यांचे व एकूणच व्यावसायिक यांचे लांब पल्ल्याचे ध्येय असायला नको का?

डॉक्टरांना त्यांच्या रुग्णांमधील विवेक जागृत करायचा असेल आणि त्यांचा व्यवसाय खर्‍या अर्थाने मानवतावादी आहे असे दाखवायचे असेल तर राज्यभरच्या व्यावसायिकांनी एक आठवडा (किमान एक दिवस) त्यांच्या सर्वच्या सर्व सेवा निःशुल्क द्याव्यात. मी जर हॉस्पिटलात काम करणारा विशेषज्ञ डॉक्टर असेन तर मी माझे शुल्क न घेता उपचार करावे, शल्यक्रिया तशीच करावी. त्याने प्रत्येक रुग्णाला असे सांगावे, की तो त्याच्यासाठी समाजाचा प्रतिनिधी आहे. तो ती सेवा त्याचा (रुग्णाचा) विवेक जागृत करण्यासाठी निःशुल्क देत आहे. रुग्णाने किमान दहा लोकांना ‘असेही डॉक्टर आहेत’ असे त्या दिवसभरात सांगावे.

डॉक्टरांनी असे समजावे, की संपूर्ण महाराष्ट्रात, IMA ने medical camp घोषित केला आहे! एक रविवार असा ठरवावा, की ज्या दिवशी शहरातील डॉक्टरांचे गट करून त्यांनी त्यांच्या त्यांच्या विभागामध्ये खास medical camp घ्यावे. त्या दिवशी वैद्यकीय शंकासमाधानाचे कार्यक्रम आयोजित करावे. वैद्यकीय सेवा घेण्यासाठी येणार्‍या प्रत्येकाला व्यावसायिकांवरील हल्ल्यांचा आणि हिंसेचा निषेध करणारे पत्रक द्यावे; रुग्णांच्या त्यावर सह्या घ्याव्यात. व्यावसायिकाला आत्मशुद्धीचे समाधानही तसे करताना लाभेल. सर्व व्यावसायिकांनी त्यांच्या व्यवसायातील अपप्रवृतींचा तो निषेध करत आहे हे सुद्धा त्या निमित्ताने सांगितले पाहिजे. डॉक्टरांवर होणारे हल्ले सर्वसाधारणपणे कोणती व्यावसायिक मूल्ये पाळणार्‍या किंवा पायदळी तुडवणार्‍या व्यावसायिकांवर होतात त्याची पाहणीही व्हायला हवी.

रुग्णाला सेवा न देणे हे नकारात्मक आहे आणि ते प्रतिक्रियावादी (retaliatory, reactive) पाऊल आहे. डॉक्टराने निःशुल्क सेवा देऊन त्याचे मत समाजाला पटवणे हे सकारात्मक आणि proactive पाऊल आहे.

डॉक्टरांनी त्यांच्या सेवेमुळे समाधानी असलेल्या रुग्णांना आवाहन करायला हवे, की रुग्णांनी ऐन आणीबाणीच्या वेळी वैद्यकीय व्यावसायिक त्यांच्या मदतीला कसे आले त्यांचे अनुभव सलग आठवडाभर त्यांच्या त्यांच्या समाजमाध्यम गटांमध्ये पसरावे. डॉक्टरांनी सर्व प्रसार माध्यमांना आवाहन करावे, की त्यांनी ‘मी आणि आमचे डॉक्टर’ किंवा ‘कुटुंबाचे डॉक्टरकाका’ अशा विषयांवर वृत्तकहाण्या (newsfeatures) लिहाव्यात, संवादसत्रे (talkshow) घडवून आणावीत. काही जमावांनी दुःख व राग आततायीपणे व्यक्त केला म्हणून तो मार्ग सर्वांनी घ्यायचा का हा choice आहे.

समाजमाध्यमांमध्ये प्रसृत करण्यात आलेल्या खच- पत्रकानुसार गावागावांमध्ये डॉक्टर्स सेवाबंदी करत आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी विशेष पथके तयार करण्याची सूचना आहे. तसेच, ह्या कामबंद निषेधामध्ये सहभागी न होणार्‍यांसाठी असहकाराची गर्भित धमकीसुद्धा आहे. संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी इतके भावनिक व्हावे आणि विवेकाला तिलांजली द्यावी हे खूप दुःखदायक आहे.

डॉक्टर मंडळींचे ध्येय डॉक्टर्स आणि समाज ह्यांच्यातील कटुता कमी करणे हे असायला हवे. गढूळ झालेले समाजमन अधिक गढूळ करायचे आणि वैद्यकीय व्यवसायाबद्दलच्या नाराजीला अधिकच खतपाणी घालायचे ह्यामुळे डॉक्टरांची विश्वासार्हता पुन्हा येणार आहे का? उलट, डॉक्टर त्यांनी निःशुल्क सेवा दिल्याने प्रतीकात्मकपणे पण थेट कृतीतून समाजाला हे दाखवू शकतात, की डॉक्टरांसाठी ‘आर्थिक लाभ’ हा एकमेव हेतू असणार नाही. तसेच, डॉक्टर त्यांच्या ‘सेवाव्रताशी’ प्रतारणा करू इच्छित नाहीत. डॉक्टर डॉक्टरी व्यवसायावर झालेल्या शारीरिक हिंसेची प्रतिक्रिया जर अप्रत्यक्षपणे हिंसा करूनच करणार असेल तर त्यांनी त्यांच्या व्यवसायाला उन्नत आणि परिपक्व असा व्रत-व्यवसाय का म्हणावे? त्यांची इच्छा त्यांचा व्यवसाय हा सामाजिक विवेकाचा मापदंड असावा अशी आहे आणि त्यांनी त्यांच्या कृतीतूनच ती ठामपणे व्यक्त करायला हवी.

ता.क.- मी लेख लिहिला त्या दिवशी सकाळपासून ‘walk the talk’ ह्या न्यायाने तीसहून अधिक रुग्णांना विनाशुल्क तपासले. प्रत्येकाला माझ्या वागण्याचे कारण सांगितले. माझे विचार समजावून सांगणारे निवेदन दिले. त्या सर्वांचा feedback विलक्षण सकारात्मक होता. सर्वच रुग्णांनी मला सांगितले, की तुमचा मार्ग अभिनव भावला. काही जणांनी माझ्यासोबत फोटो काढले, काही जण पाया पडले आणि प्रत्येकाने तो अनुभव त्याच्या जवळच्या प्रत्येकासोबत share करण्याचे आश्वासन दिले. माझा निषेधाचा आवाज अनेकांपर्यंत प्रभावीपणे पोचला. रात्रीपर्यंत मी अजून तीस रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोचेन. मी काम थांबवले असते तर त्यामधून माझ्या व्यवसायाबद्दलची सद्भावना तर साठ कुटुंबांपर्यंत पोचली नसतीच, पण माझ्याबरोबर त्या सर्वांच्या डॉक्टरांसंदर्भातील गप्पाही झाल्या नसत्या.

– डॉ. आनंद नाडकर्णी

anandiph@gmail.com

(आरोग्य संस्कार – एप्रिल २०१७ वरून उद्धृत)

About Post Author

1 COMMENT

  1. डॉ.साहेब या कसायी व्यवसायात…
    डॉ.साहेब या कसायी व्यवसायात आपले सारखे देवदूत फार कमी आहेत.ह्याचात त्यांचा पण काही दोष नाही हे सगळे शिक्षणाचे बाजारीकरणामुळेनिर्माण झालेले आहे.धन्यवाद

Comments are closed.