नाशिकचा चालताबोलता माहितीकोश – मधुकर झेंडे (Madhukar Zende)

0
60
_Madhukar_Zende_1.jpg

नाशिक महानगरपालिकेचे निवृत्त राजपत्रित अधिकारी मधुकर ऊर्फ अण्णा झेंडे हे ‘नाशिकचा माहितीकोश’ म्हणूनच परिचित आहेत. त्यांना नाशिक शहराच्या इतिहास-भूगोलाची संपूर्ण माहिती आहे. नाशिकविषयीचा नितांत आदर आणि प्रेम यांमुळे; तसेच, त्यांच्या सर्वसंचारी वृत्तीमुळे नाशिकच्या पराक्रमाची गाथा त्यांना मुखोद्गत आहे. त्यांची वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षीही ‘सावाना’ मध्ये (सार्वजनिक वाचनालय, नाशिक) चक्कर अनेकदा असते. ते ‘सावाना’चे भूतपूर्व अध्यक्ष आहेत.

झेंडे यांची आई त्यांच्या वयाच्या दहाव्या वर्षी वारली, विसाव्या वर्षी वडील. झेंडे लहानपणी बराच काळ आजीकडे राहिले. आजी टाकसाळ गल्लीत सुकेणकर वाड्यात राहायची. वाड्याचे मालक तांबोळी पतिपत्नी धार्मिक वृत्तीचे होते. ते संस्कार झेंडे यांच्यावर झाले. कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर लवकर आली. त्यांना शिक्षणाला आठवीतच रामराम ठोकावा लागला होता. त्यांनी अनेक छोटेमोठे उद्योग केले. मोलमजुरी केली. गावात फिरून वर्तमानपत्रे विकली, फुगे विकले. ते दैनिक वेतनावर मुकादम म्हणून 1955-56 मध्ये नाशिक नगरपालिकेत काम करू लागले. ते ‘लोकमान्य नाट्यगृहा’च्या पायाभरणीच्या वेळी मुकादम होते. ते सांगतात, ”…..आणि नंतर त्याच नाट्यगृहाच्या मंचावर दीनानाथ मंगेशकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणानिमित्त लतादीदी आणि मंगेशकर कुटुंबीय, भालजी पेंढारकर, गोनीदां आणि संगीत दिग्दर्शक चित्रगुप्त हे सर्व उपस्थित राहिले. तो माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण होता!”

अण्णांचा स्वभाव लहानपणापासूनच चळवळ्या. अण्णा नाशिक नगरपालिकेत मुकादम म्हणून रोजंदारीवर काम करू लागले खरे, पण ते स्वबळावर राजपत्रित अधिकारी या पदापर्यंत चढत गेले व तेथून निवृत्त झाले. त्यांचे आईवडील मराठवाड्यातील गंगापूर या गावाहून नाशिकला 1930 च्या दरम्यान आले. अण्णांचा जन्म नाशिकचा. 8 नोव्हेंबर 1936 चा. त्यांचे वडील दादा मोलमजुरी करून कुटुंबाची देखभाल करत. पुढे, त्यांनी ठोकबंद फळविक्री दलाल म्हणून भद्रकाली मार्केटमध्ये लौकिक मिळवला.

अण्णांच्या बालपणी त्यांनी 1942 चे ‘चलेजाव आंदोलन’ पाहिले आहे. ते सांगतात, “स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब हिरे, गोविंदराव देशपांडे, वसंतराव नाईक, वि.चि. पवार या नेत्यांच्या प्रभावाखाली आणि दादासाहेब गद्रे यांच्या नेतृत्वाखाली अनेकजण आत्मसमर्पणाच्या भावनेने लढा देत होते. वि.चि. पवार हे माझ्या वडिलांचे भागीदार होते. त्यामुळे आमच्या दुकानात भाऊसाहेब हिरे, पंडित धर्मा पाटील, दादासाहेब बीडकर, गो.ह. देशपांडे नेहमी येत. गोविंदरावांच्या अमोघ भाषणशैलीमुळे महात्मा गांधींनी त्यांना ‘महाराष्ट्राची मुलुखमैदान तोफ’ असे म्हटले होते.”

अण्णांनी शिक्षणाचा श्रीगणेशा 1941-42 मध्ये नवापुऱ्यातील नगरपालिकेच्या शाळा क्रमांक दोनमध्ये केला. झेंडे तालमीतही जायचे. त्यांची गणना उत्कृष्ट पैलवानात होई. दुसरीकडे, त्यांना ‘दिवाकरांच्या नाट्यछटा’ पाठ होत्या. ‘अफझलखानाचा वध’ या नाट्यप्रयोगात महाराजांनी वाघनखे काढण्यापूर्वीच महाराजांचा विश्वासू मावळा झालेल्या झेंडे यांनी न राहवून अफझलखानावर हल्ला केला. त्याची भूमिका करणारा प्रताप नेवासकर धाडकन फरशीवर कोसळला. झेंडे म्हणतात, “त्याच्या कानातून रक्त आले आणि मास्तरांचा हात काड्कन माझ्या कानाखाली वाजला.” अण्णांनी तो प्रसंग मोठ्या खुमासदारपणे एका लेखात लिहिला आहे. ते ओघवत्या शैलीत सहजपणे लिहितात; तसेच, सहज बोलतात, वावरतात, जगतात आणि माणसेच माणसे जोडतात. ते ‘आनंदविजय मेळ्या’त कथेकरीबुवाची नक्कल करत. त्यांनी स्वतःचा ‘रूपकमल मेळा’ 1951 साली स्थापन केला. त्यांचा त्याद्वारे त्या क्षेत्रातील मोठमोठ्या कलाकारांशी परिचय होत गेला. बालगंधर्वांच्या अखेरच्या काळात त्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी बापुसाहेब वावरे यांनी त्यांची गाजलेली नाटके जळका वाड्यात सादर केली, तेव्हा झेंडे त्यांना व्यवस्थेत मदत करत.

_Madhukar_Zende_2.jpgस्वातंत्र्यप्राप्तीनंतर नाशिकचे सांस्कृतिक जीवन झपाट्याने समृद्ध होत गेले. अ.वा. वर्टी, सोपानदेव चौधरी, गोपाळराव खरे, दादासाहेब पोतनीस, प्रभाकर गुप्ते, ब.चिं. सहस्रबुद्धे, आंबेकर अशा दिग्गजांच्या प्रयत्नांनी कुसुमाग्रजांच्या नेतृत्वाखाली ‘लोकहितवादी मंडळा’ची स्थापना 1950 साली झाली आणि सांस्कृतिक कार्याचा वेगळा प्रवाह नाशिकमध्ये सुरू झाला. नृत्य-नाट्य-संगीताच्या मैफली रंगल्या. तात्यासाहेब, वसंत कानेटकर, अ.वा. वर्टी, दत्ता भट यांच्या नाटकांनी नाशिकचे नाव उज्ज्वल केले. झेंडे सांगतात, “त्यापासून प्रेरणा घेऊन सांस्कृतिक क्षेत्रात आगळेवेगळे काम करण्याची जिद्द माझ्यात निर्माण झाली.”

झेंडे यांनी विविध प्रकारचे लेखन केले आहे. त्यांच्या ‘लोकरंजन कला केंद्रा’चे ‘तो स्वप्नपक्षी’ हे नाटक नाशिककरांच्या सतरा वर्षांच्या प्रयत्नांनंतर महाराष्ट्रात प्रथम आणि विक्रमी पुरस्कारप्राप्त ठरले. त्यांनी ‘नाशिक शहरातील चौकांचा इतिहास’ ही लेखमाला ‘दैनिक सकाळ’ मध्ये लिहिली. त्या लेखमालेचे संकलित केलेले पुस्तक प्रसिद्ध आहे. नाशिक नगरपालिकेच्या शताब्दीनिमित्त शहराचा आणि नगरपालिकेचा इतिहास सांगणारा ग्रंथ प्रकाशित करण्याचे ठरले, तेव्हा कुसुमाग्रजांनी माहिती संकलनाचे काम झेंडे यांच्यावर सोपवले होते. झेंडे यांनी नाशिकचा पुरता धांडोळा त्या निमित्ताने घेतला त्याचा त्यांना ‘चौकांचा इतिहास’ लिहिताना उपयोग झाला.

त्यांनी ‘प्रतिघात’, ’नरसिंहा, ‘तेजस्विनी’ या चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत. झेंडे नाशिकच्या भद्रकाली मंदिरात ग्रामदेवतेच्या अखंड होणाऱ्या कीर्तनमालेस जात. तेथे नियमित येणाऱ्या कौशल्या ऊर्फ कोकिळा परदेशी या राजपूत समाजातील मुलीवर त्यांचे प्रेम जडले. दोघांनी विवाह केला. त्या आता नाहीत. मात्र एका अवलियाला सांभाळण्याची त्यांची ताकद झेंडे यांना अजूनही पुरत आहे. त्या आयुर्विमा महामंडळाच्या प्रतिनिधी होत्या.

मधुकरअण्णांचा हरहुन्नरीपणा आणि कलागुण लक्षात घेऊन नाशिकच्या सांस्कृतिक जीवनाचा परिचय त्यांना करून दिला तो वसंत उपाध्ये, शरद बुरकुले, श्रीकृष्ण शिरोडे, प्रभाकरपंत वैशंपायन, श्री.प. सोहोनी यांनी. अण्णा निवडणूक लढवून नंतर ‘सावाना’चे अध्यक्ष झाले. पाठोपाठ त्यांची निवड वसंत व्याख्यानमालेच्या कार्यकारिणीवर झाली. ते ‘महाराष्ट्र राज्य ब्लाईंड असोशिएशन’च्या नाशिक शाखेचे मानद अध्यक्ष होते. ते अठ्ठयाहत्तराव्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटन आणि समारोप समितीचे प्रमुख होते. त्यांनी अनेक संस्थांमध्ये अनेक पदे भूषवली.

कार्यक्रमांच्या निमित्ताने मंगेशकर कुटुंबाशी निर्माण झालेली जवळीक हा झेंडे यांच्या हृदयीचा अनमोल ठेवा आहे. ते त्यांबद्दल भरभरून बोलतात. ‘सुरेल कला केंद्रा’च्या माध्यमातून 1960 च्या दशकात हृदयनाथ, मीना आणि उषा मंगेशकर संगीताचे कार्यक्रम सादर करत असत. नाशिकमध्ये आयोजित एका कार्यक्रमाच्या वेळी त्यांची हृदयनाथांशी ओळख झाली आणि ते ‘सुरेल’च्या टीममध्येच सहभागी झाले. त्यांनी नाशिकमधील कार्यक्रमांची व्यवस्था पाहिली.

_Madhukar_Zende_3.jpgएकदा लतादीदी सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गडावर आल्या होत्या. त्या परतताना नाशकात आल्या. झेंडे त्यावेळी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील दोन दिग्गजांच्या भेटीचे साक्षीदार ठरले. कुसुमाग्रज शिवाजी उद्यानाच्या मागे कॉम्रेड नरेंद्र मालुसरे यांच्या घरात राहत असत. झेंडे यांनी तेथे लता मंगेशकर यांची भेट तात्यासाहेबांशी घडवून आणली. त्यांनी तात्यासाहेबांना वाकून नमस्कार केला आणि म्हटले, “मी तुमच्या अनेक कविता गायल्या आहेत. तुमचे चरणस्पर्श करण्याची इच्छा होती. ते भाग्य मला लाभले.”

डॉ. वसंतराव गुप्ते यांनी ते नगराध्यक्ष असताना नगरपालिकेत ‘स्वागताधिकारी’ असे नवे पद निर्माण केले. झेंडे यांची नियुक्ती त्या नव्या जागेवर झाली. त्यांचे आणि नाशिकचे सांस्कृतिक जीवन बहरू लागले. जनसंपर्क वाढला. वृत्तपत्रांशी संबंध वाढले. झेंडे यांनी ‘देशदूत’ मध्ये ‘नगरसेवकाची ओळख’ हे सदर हाताळले. त्यांनी ‘साहित्य सुधारक’ ही पदवी परीक्षादेखील त्या काळात दिली. त्यांनी पुणे विद्यापीठातून हिंदी वृत्तपत्र विद्या प्रमाणपत्र परीक्षा दिली. त्यांनी विशेष प्रभारी अधिकारी, शिवाजी उद्यान पुनर्रचना अधिकारी म्हणून काम पहिले. ते ‘वीर सावरकर जलतरण तलाव, ‘कालिदास कलामंदिर’ यांच्या निर्मितीत प्रथम व्यवस्थापक होते.

त्यांच्या कारकिर्दीतील सगळ्यांत लक्षणीय आणि अभिमानास्पद काम म्हणजे चित्रपटमहर्षी दादासाहेब फाळके स्मारक आणि तथागत भगवान बुद्ध स्मारक. त्यांना त्याप्रसंगी फार मोठ्या संघर्षातून जावे लागले. त्यांनी 2000 साली निवृत्त झाल्यानंतर मानद अधिकारी म्हणून काम 2016 पर्यंत पाहिले. त्यांना आजवर राज्य आणि केंद्र सरकारच्या; तसेच, महानगरपालिकेच्या अनेक पुरस्कारांनी कार्यक्षम अधिकारी म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.

– अलका आगरकर-रानडे, alkaranade@gmail.com

About Post Author