नामदेव माळी : मुलांच्या सृजनशीलतेला साद (Namdev Mali)

2
101
-heading

नामदेव माळी यांची ओळख प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील अभ्यासू, कल्पक, प्रयोगशील गटशिक्षणाधिकारी आणि लेखक म्हणून महाराष्ट्रात सर्वदूर आहे. ते शिक्षण विषयात कळकळीने आणि आस्थेने लिहीत असतात. एक सरकारी अधिकारी असा संवेदनाशील? असे एक नवल त्यांच्याबद्दल असते. नामदेव माळी रचनावादी शिक्षण, शिक्षकांसाठी कार्यप्रेरणा आणि जाणीवजागृती यासंबंधी कार्यरत आहेत.

सांगली जिल्ह्यातील विसापूर (ता. तासगाव) हे नामदेव माळी यांचे गाव. त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबातील. त्यांनी त्यांचे शिक्षण शेतमजुरी व पडेल ते काम आणि कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या ‘कमावा आणि शिका’ योजनेतील कामे करत पूर्ण केले. ते शिक्षक म्हणून नोकरीला रत्नागिरी जिल्ह्यातील पैसाफंड विद्यालयात लागले. 

त्यांना लिहिण्या-वाचण्याचा लळा महाविद्यालयात शिकत असताना लागला होता. ते कथालेखन, कथाकथन करत. त्यांना त्यांच्या स्वत:च्या जगण्यानेच कोणासाठी लिहायचे, बोलायचे ह्याचे भान दिले. त्यांनी लिहिलेले ‘शंभर टक्के निकाल’, ‘आभाळदानी’, ‘तरवाड’ हे कथासंग्रह आणि ‘खरडाटणी’, ‘छावणी’ ह्या कादंबऱ्या हे लेखन प्रसिद्ध आहे.

नामदेव माळी यांची धारणा स्वीकारलेले काम स्वत:च्या आनंदासाठी पूर्ण क्षमतेने आणि प्रामाणिकपणाने करत राहवे ही आहे. त्यांनी शिक्षकाची नोकरी करत असतानाच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू केला होता. त्यातून त्यांची नियुक्ती गटशिक्षणाधिकारी म्हणून झाली. त्यांनी त्या पदावर रुजू होतानाच ‘त्यांना स्वत:ला समाधान मिळेल असे काम त्या पदाच्या माध्यमातून करायचे’ असे ठरवले. त्यांच्या कामाची प्रेरणा खेडोपाडी असलेल्या सरकारी शाळांमध्ये शिकणारी मुले हीच ठरली. ते ‘मला माझ्या मुलांचा आणि शिक्षकांचा अभिमान आहे’ असे म्हणत शाळांतील मुले आणि शिक्षक यांच्यात मिसळून जात. मुलांच्या जेवणाच्या सुट्टीत स्वत:च्या शबनममधील जेवणाचा डबा घेऊन मुलांबरोबर शाळेच्या व्हरांड्यात मांडी घालून जेवणारा असा अधिकारी लाभणे विरळा! साहजिकच, ते जेथे जातील तेथे शिक्षकांच्या कामाचा उत्साह दुणावला जाई. शिक्षकांना त्यांचे सहकारी मानणारा हा अधिकारी, शिक्षकांना त्यांचा भाऊ, मित्र वाटतो. त्यातच माळी यांना त्यांच्या कामात मिळालेल्या यशाचे गमक आहे. ते शिक्षकांना विश्वासात घेतात, त्यांच्या विचारांचा आदर करतात. त्यातून त्यांनी ‘गीतमंच’, ‘धडपड मंच’ अशा उपक्रमांतून शिक्षकांना प्रेरित केले. 

दरम्यान, महाराष्ट्रातील सरकारी शाळांच्या दर्ज्यासंबंधी काही अभ्यासकांची त्यांच्या निरीक्षणानुसार प्रतिकूल मते माध्यमांतून समाजासमोर येऊ लागली होती. त्यातून सरकारी शाळांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन नकारात्मक होऊ लागला. सरकारी शाळांतील शिक्षणाविषयी निराशेचे वातावरण निर्माण झाले. सरसकट सगळे एकाच मापाने तोलले जाऊ लागले. त्याचा परिणाम मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी  त्यांच्या पूर्ण क्षमतेने राबणाऱ्या शिक्षकांवर होऊ लागला. शिक्षकवर्गात निराशा पसरली. संवेदनशील नामदेव माळी त्यांच्या अवतीभवती असणाऱ्या शिक्षकांमधील निराशेने अस्वस्थ झाले.-pustkachi-odh

गोरगरीब, कष्टकरी यांची मुले खेड्यापाड्यांतील सरकारी शाळांमध्ये असतात. त्यांच्यासाठी काम करणाऱ्या शिक्षकांची निराशा धोकादायक आहे, हे नामदेव माळी यांच्या लक्षात आले. त्यांना धडपडणाऱ्या शिक्षकांचा उत्साह वाढला पाहिजे, त्यांच्या कामातून इतरांना प्रेरणा मिळाली पाहिजे असे वाटू लागले. म्हणून त्यांनी सरकारी शाळांतील दुसरी बाजू समाजासमोर आणण्याचे ठरवले. त्यांनी महाराष्ट्रातील काही उपक्रमशील शाळांना भेटी दिल्या. त्या शाळांतील उपक्रम समजावून घेतले. त्या शिक्षकांनी जीव लावून उभे केलेले रचनात्मक काम जाणून घेतले. नामदेव माळी त्यातून मुलांना मिळणाऱ्या आनंददायी शिक्षणाने प्रभावित झाले. त्यांनी त्यांचे अनुभव ‘साधना’ साप्ताहिकात शाळाभेट ही लेखमाला लिहून व्यक्त केले. त्यातून ‘शाळा आहे आणि शिक्षणही आहे’ हे वास्तव समोर आले. साहित्य व शिक्षण क्षेत्रातील काही मान्यवरांनी त्या शाळांना भेटी दिल्या. अनेकांनी त्या शाळांना वेगवेगळ्या प्रकारची मदत दिली. त्या लेखमालेचे ‘शाळाभेट’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले. पुस्तकाला वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभला. शिक्षणक्षेत्रात उत्साह निर्माण झाला, सकारात्मक बदलाची सुरुवात झाली. ते पुस्तक शिक्षकांना कार्यप्रेरणा देण्यासाठी दीपस्तंभ ठरले आहे.

दरम्यान, नामदेव माळी यांची मिरज तालुक्याला बदली झाली. 2012-13 मध्ये सातारा जिल्ह्यातील कुमठे बीट रचनावादी शिक्षणाच्या प्रयोगाने महाराष्ट्रभर प्रकाशझोतात येऊ लागले होते. ज्ञानप्रबोधिनी, सृजन आनंद विद्यालय, ग्राममंगल, अक्षरनंदन ह्या प्रयोगशील खाजगी शाळांमध्ये रचनावादी शिक्षण अगोदरपासूनच सुरू झालेले होते. कुमठे बीटच्या शिक्षण विस्तार अधिकारी प्रतिभा भराडे यांनी त्या शाळांमध्ये जाऊन रचनावाद समजावून घेतला. त्यांनी मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी रचनावादी शिक्षण उपयोगी आहे हे जाणून कुमठे बीटमधील सरकारी शाळांमध्ये रचनावादी शिक्षणाचा प्रयोग अंमलात आणला. त्यातून शिक्षकांना त्यांच्या कामासाठी नवी दिशा गवसली. शिकवण्यापेक्षा मुलांचे शिकणे केंद्रस्थानी आले. नामदेव माळी यांनी मिरज तालुक्यातही तो प्रयोग करण्याचे ठरवले. त्यांनी प्रतिभा भराडे आणि कुमठे बीटमधील शिक्षक यांच्या मदतीने मिरज तालुक्यातील सर्व शाळांमध्ये रचनावादानुसार शिक्षण चालू केले. नामदेव माळी यांनी स्वत:ला त्या प्रयोगात झोकून देऊन काम केले. प्रत्येक मूल समजून घेऊन त्याच्या शिकण्याला गती देणारा तो प्रयोग मिरज तालुक्यात यशस्वी झाला. मुलांच्या गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षणासाठी कुमठे बीट आणि मिरज तालुक्यातील रचनावाद यांची चर्चा महाराष्ट्रभर होऊ लागली. तो प्रयोग राज्यभरातील शिक्षक, अधिकारी हे तेथे जाऊन समजावून घेऊ लागले. राज्याच्या शिक्षण विभागाने रचनावाद स्वीकारला!

नामदेव माळी यांनी मुलांनी स्वत: विचार करावा, चर्चा करावी, अनुभव घ्यावा, कृती करावी ह्या बाबींना प्राधान्य देणारी रचनावादी शिक्षणपद्धत तालुक्यातील शाळांमध्ये अंमलात आणत असताना आणखी एक उपक्रम हाती घेतला. तो होता मुलांच्या अभिव्यक्तीचा. मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासात त्यांची भाषा महत्त्वाची भूमिका बजावत असते. भाषा हे विचार करणे आणि व्यक्त होणे ह्यासाठी उत्तम माध्यम आहे. म्हणूनच मुलांना भाषाशिक्षणामध्ये ‘त्यांचे विचार, अनुभव, भावना, कल्पना इत्यादी परिणामकारक रीतीने व्यक्त करण्यासाठी आवश्यक ते लेखनकौशल्य प्राप्त व्हावे’ हे एक महत्त्वाचे उद्दिष्ट नमूद करण्यात आले आहे. ते ध्यानात घेऊन माळी यांनी मिरज तालुक्यात मुलांच्या अभिव्यक्तीचा उपक्रम हाती घेतला.

मुलांना त्यांच्या शालेय जीवनात साहित्याची गोडी लागावी, त्यांनी मुलांनी वाचते आणि लिहिते व्हावे म्हणून शिक्षकांना विश्वासात घेऊन त्या उपक्रमाचे महत्त्व आणि गरज विशद केले. शिक्षकांनी ते करण्यासाठी उत्साह दाखवला. त्यांच्यामुळे उपक्रमात जोम आला. मग माळी यांनी शिक्षकांचा ‘सृजन’ नावाचा एक गट कार्यरत केला. उपक्रमाची आखणी केली. स्वत: शाळांमध्ये फिरून मुलांना ऐकते, बोलते आणि वाचते केले. त्यांनी अनुभवलेखन, प्रसंगलेखन असे विषय देत मुलांना लिहिते केले. आवश्यक अशा लेखन कार्यशाळा आणि शिबिरे घेतली. ‘लेखक आपल्या भेटीला’ उपक्रमांतर्गत मुलांचा कृष्णात खोत, जी.के. ऐनापुरे, एकनाथ पाटील, गोविंद पाटील, बाळ पोतदार, अनंत भावे, गोविंद गोडबोले, भीमराव धुळूबुळू, शशिकांत शिंदे, अविनाश ओगले, दयासागर बन्ने या साहित्यिकांशी संवाद घडवून आणला. मुले आणि शिक्षक यांना लेखनासाठी मार्गदर्शन केले.

-mulanchi -odh‘मुलांनी त्यांच्या अनुभवावर नवीन रचना करावी’ ह्या रचनावादाच्या तत्त्वानुसार मुलांना त्यांचे स्वत:चे विचार, कल्पना मांडण्याची, लिहिण्याची संधी दिली. मुलांनी त्यांच्या सभोवतालचे लिहावे, अनुभवाचे आशयात रूपांतरण करावे, लिहीत असताना अनावश्यक भाग कोणता ते ओळखावे, योग्य शब्दांची निवड करावी, लेखनातून आटीव आशय व्यक्त व्हावा अशा बारीकसारीक बाबींसंबधी मुलांशी संवाद, मंथन होत राहिले. मुले नामदेव माळी यांच्या जवळ अशा संवादांतून येऊ लागली; लिहिलेले त्यांना दाखवण्यासाठी गराडा घालू लागली. एरव्ही साहेब शाळेत गेले, की मैदानातील मुले धावत गुरुजींकडे जातात, साहेब आल्याची वर्दी देतात. नामदेव माळी यांच्या बाबतीत उलटे झाले. ते शाळेत गेले, की मुले धावत त्यांज्याजवळ येऊ लागली. त्यांना हाताला धरून वर्गात नेऊ लागली. तो बदल शिक्षणक्षेत्रात खूप महत्त्वाचा आहे.

मुलांच्या कल्पनांना धुमारे तालुक्यातील शिक्षक, पालक आणि अधिकारी यांच्या प्रेरणेतून फुटले. मुले मोठ्यांनी चकित व्हावे असे लेखन करू लागली. मुलांचा तो प्रतिसाद बघून नामदेव माळी यांनी आणखी एका कामाची मुहुर्तमेढ रोवली. त्यांनी विद्यार्थी साहित्य संमेलन घेण्याचे ठरवले. सूत्रसंचालन, संमेलनाध्यक्ष, स्वागताध्यक्ष, मुलाखत अशा सर्व जबाबदाऱ्या मुलांना दिल्या गेल्या. ‘सब कुछ मुले’ असणारे महाराष्ट्रातील ते पहिले विद्यार्थी साहित्य संमेलन. ते यशस्वी झाले. मुलांना भरभरून आनंद देणाऱ्या त्या संमेलनाने विद्यार्थी साहित्य संमेलनाचा नवा पायंडा पाडला गेला. मिरज तालुक्यातील मुले दरवर्षी ते संमेलन यशस्वीपणे पार पाडतात. मुलांच्या लेखनकौशल्याची चुणूक संमेलनात दिसून येते.            

कविता, गोष्ट, अनुभवलेखन, प्रसंगलेखन अशा रूपातील मुलांचे लेखन पुस्तकरूपातही प्रसिद्ध झाले आहे. मुलांनी लिहिलेली ‘शाळकरी मुलांच्या कविता’, ‘किलबिल गोष्टी’ ही पुस्तके दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेने प्रकाशित केली आहेत. ह्या उपक्रमाने मुलांना आत्मबळ प्राप्त झाले. रानोमाळ भटकणाऱ्या पारधी समाजातील पवन आणि अभय पवार ही मुले किलबिल गोष्टींतून त्यांचे जगणे व्यक्त करता करता ‘लई शिकणार मी’ असा निश्चय करून पुढे जात आहेत.

सृजन आनंद विद्यालय, कमला निमकर बालभवन, खेळघर, आनंदनिकेतन अशा काही प्रयोगशील शाळा मुलांच्या लेखनाचे उपक्रम घेतात. नामदेव माळी यांनी तो उपक्रम जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये घेतला. त्या शाळा खेड्यापाड्यांत आहेत. तेथील बहुतांश मुलांना वाचण्याचाही कौटुंबिक वारसा नाही. माळी यांनी त्या मुलांना लिहिण्या-वाचण्यास प्रेरित केले. मुलांनीच बालसाहित्य लिहिणे हा प्रवाह सुरू झाला आहे. तो चळवळीचे रूप धारण करू पाहत आहे.

नामदेव माळी यांनी अशा लिहित्या मुलांचा शोध घेतला. त्यातून सांगोला तालुक्यातील सोनाली गावडे ह्या मुलीचे लेखन त्यांच्या हाती आले. सोनालीच्या लेखनातील जिवंतपणा त्यांना भावला. मग माळी यांनी सांगोला तालुक्यातील अशा मुलांना एकत्र आणून त्यांच्यासाठी लेखन कार्यशाळा घेतली. त्यांना लेखनासाठी मार्गदर्शन केले. त्यातून सोनाली गावडे हिची दैनंदिनी पुस्तकरूपात प्रसिद्ध झाली. सांगलीच्या सृजन प्रकाशनाने ‘माझी दैनंदिनी’ हे पुस्तक प्रकाशित केले. ग्रामीण भागातील, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या सोनालीची ती दैनंदिनी. अशा स्वरूपाची व पुस्तकरूपात प्रकाशित झालेली महाराष्ट्रातील ती पहिली दैनंदिनी असावी. इयत्ता सातवीत शिकणाऱ्या सोनालीच्या दैनंदिनीचा महाराष्ट्र राज्य शासनाने राज्य पुरस्कार देऊन गौरव केला आहे.

-pustak-dainandiniनरेंद्र लांजेवार, पृथ्वीराज तौर, तृप्ती अंधारे, गोविंद पाटील, रवींद्र जंगम, मंजुषा स्वामी इत्यादी साहित्यिक, शिक्षक विद्यार्थ्यांना लिहिते करण्यासाठी पूर्वीपासून उपक्रम घेत आहेत. नामदेव माळी यांनी तो उपक्रम चळवळीत रूपांतरीत केला आहे. मिरज तालुक्यातील सारिका पाटील, गौतम पाटील, समृद्धी शेलार, तेजश्री पाटील, शिवानी चौगुले ह्या विद्यार्थ्यांचे कवितासंग्रह ‘छोट्या दोस्तांनी लिहिलेले साहित्य’ या उपक्रमात सांगलीच्या सृजन प्रकाशनाने प्रकाशित केले आहेत. त्या मुलांना लिहिण्याचा लळाच लागला आहे. ती मुले खेड्यापाड्यांतील जिल्हा परिषदेच्या शाळांतील आहेत. त्यांचे लेखन, त्यातून समोर येणारे त्यांचे भावविश्व आणि अभिव्यक्त होण्याची त्यांची शैली कसदार आहे. त्यातून सृजनशीलतेचा मळा फुलत आहे. आनंददायी शिक्षण, भाषा संवर्धन आणि अभिव्यक्ती यांसाठी आश्वासक रचनात्मक कार्य उभे होत आहे. शिकवून कोणी शिकत नसते; पण मुलांच्या अंगचे सुप्त गुण हेरून त्यांना अभिव्यक्तीची संधी देणे हे शिक्षकाचे कार्य आहे ह्या धारणेने नामदेव माळी यांनी त्यांच्यातील शिक्षकाला कायम जागते ठेवले आहे. त्यांनी ‘मुलांचे लेखन ही गांभीर्यपूर्वक करवून घेण्याची गोष्ट आहे’ हे तत्त्व पक्के करून त्यांची लेखन चळवळ आकाराला आणली आहे. त्या चळवळीतून पुढे आलेल्या गौतम पाटील ह्या इयत्ता सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला ‘गौतमच्या कविता’ ह्या कवितासंग्रहासाठी महाराष्ट्र राज्य शासनाचा प्रतिष्ठेचा ‘बालकवी पुरस्कार’ मिळाला आहे. ह्या पुरस्काराने मुलांच्या लेखन चळवळीला बळ मिळाले आहे.

मुले त्यांच्या भाव-भावना शब्दांत गुंफत आहेत. शिक्षक आणि पालक यांनी मुलांना अभिव्यक्तीसाठी उद्युक्त केले आणि त्यासाठी आवश्यक ते पाठबळ पुरवले तर किती सौंदर्यपूर्ण आणि आशयघन लेखन हाती येऊ शकते ह्याचा उत्तम नमुना नामदेव माळी यांच्या ह्या उपक्रमातून समोर आला आहे. नामदेव माळी म्हणतात, ‘हा उपक्रम म्हणजे मुलांना चांगला माणूस बनवण्याची पूर्वतयारी आहे.’ अभिव्यक्ती हा स्वातंत्र्याचा उद्गार आहे. म्हणून शालेय वयातच मुलांना अभिव्यक्तीची सवय लावण्यासाठी प्रयत्नरत असलेले नामदेव माळी यांचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. उद्याच्या निकोप समाजासाठी ती मूलभूत रुजवण आहे.  

 नामदेव माळी 8657252962/9423869404
namdeosmali@gmail.com 

संतोष जगताप 7768979580
santoshjagtaplonvire@gmail.com

About Post Author

2 COMMENTS

  1. मुलांच्या,शिक्षकांच्या…
    मुलांच्या, शिक्षकांच्या सृजनशीलतेला व मुलांना बोलके केलेत. आमच्यासाठी प्रेरणादायी आहे.

  2. सरजी, आपडले कार्य खरेच खुप…
    सरजी, आपडले कार्य खरेच खुप महान आहे. आपले विचार देशाच्या प्रगतीसाठी व मानव हितासाठी खुपच उपयुक्त आहेत.देशातील गोरगरीब विद्यार्थी जोपर्यंत चांगले सुशिक्षित होणार नाहीत तो पर्यंत खर्याअर्थाने देशाचा विकास होणार नाही. व माणूस सुखी होणार नाही. मुलांना घडवण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी खुप महत्त्वाच्या असतात , आणि नेमके तुम्ही त्याच हेरल्या आहेत . तसे मला आपल्याला जवळून पहाण्याचा भेटण्याचा योग आला होता इयत्ता1 ली बालभारती पाठ्यपुस्तक समीक्षा पुणे येथे. आपल्या हातून असेच चांगले कार्य होवो हीच सदिच्छा व आपणास पुढील कार्यास शुभेच्छा…मीरा परोडवाड जि. प केंद्र शाळा आर्वी ता.जि. धुळे.

Comments are closed.