जगाबद्दलची नवी माहिती, नवी समज आपण कशा पद्धतीने गोळा करतो, त्यांचा संबंध आपल्या अनुभव-परिघाशी कितपत जोडू शकतो आणि त्यांच्या मदतीने आपल्या भोवतालात काय बदल घडवू शकतो, ह्यावर आपली परिस्थितीच नाही तर उत्क्रांती अवलंबून असते. माहिती ही सतत, अनंत हस्ते मिळत असते, जगण्याच्या ढोबळ किंवा प्राथमिक उद्दिष्टांसाठी आपण सर्वच जीव काही समज (माहिती) प्रयत्नपूर्वक वेचत असतो, पण त्यापुढे जाऊनही आपण सूक्ष्म संदर्भ, सूचक उदाहरणे आणि अप्रत्यक्ष संकल्पनांच्या वा भाववाचक नावांच्या महासागरात दिवसरात्र डुचमळत असतो. अशा विनासायास दिसणार्या खुणांचा अन्वय लावण्याचा प्रयत्न मी या सदरात करणार आहे. संपूर्णपणे व्यक्तिकेंद्रित असल्याने त्यात सार्वभौम, त्रिकालाबाधित असे काही बहुधा नसेलच, पण तरी अशा गोष्टींची निदान नोंद तरी व्हावी हा माझा हेतू साध्य होईल.
दिनकर गांगल हे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे मुख्य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्यांनी पुण्यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्यांनी आकारलेली ‘म.टा.’ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्यांना ‘फीचर रायटिंग’ या संबंधात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय (थॉम्सन फाउंडेशन) पाठ्यवृत्ती मिळाली आहे. त्याआधारे त्यांनी देश विदेशात प्रवास केला.
गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्यासारख्या व्यक्तींच्या साथीने ‘ग्रंथाली’ची स्थापना केली. ती पुढे महाराष्ट्रातील वाचक चळवळ म्हणून फोफावली. त्यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी ‘ग्रंथाली’च्या ‘रुची’ मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत ‘ग्रंथाली’ची चारशे पुस्तके त्यांनी संपादित केली. त्यांनी संपादित केलेल्या मासिके-साप्ताहिके यांमध्ये ‘एस.टी. समाचार’चा आवर्जून उल्लेख करावा लागेल. गांगल ‘ग्रंथाली’प्रमाणे ‘प्रभात चित्र मंडळा’चे संस्थापक सदस्य आहेत.
साहित्य, संस्कृती, समाज आणि माध्यमे हे त्यांचे आवडीचे विषय आहेत. त्यांनी त्यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि ‘स्क्रीन इज द वर्ल्ड’ अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना महाराष्ट्र सरकारचा ‘सर्वोत्कृष्ट वाङ्मयनिर्मिती’चा पुरस्कार, ‘मुंबई मराठी साहित्य संघ’ व ‘मराठा साहित्य परिषद’ यांचे संपादनाचे पुरस्कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल ‘यशवंतराव चव्हाण’ पुरस्कार लाभले आहेत.