‘फलटण तालुका संस्कृती महोत्सव’ नावाचा आगळावेगळा ‘इव्हेंट’ संक्रांतीचा मुहूर्त साधून सोमवारी-मंगळवारी (16-17 जानेवारी) फलटणच्या ‘महाराजा मंगल कार्यालया’त साजरा होत आहे. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेची फलटण शाखा यांच्या सहकार्याने परिसंवाद – मुलाखती – गप्पा आणि स्थानिक समाजसंस्कृतीचे प्रदर्शन असे महोत्सवाचे स्वरूप आहे. त्याचे उद्घाटन आमदार रामराजे नाईक-निंबाळकर व ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांच्या उपस्थितीत सोमवारी, 16 जानेवारीला सकाळी साडेदहा वाजता होईल. हा कार्यक्रम ‘थिंक महाराष्ट्र’च्या युट्यूब चॅनेलवर लाईव्ह दाखवण्यात येईल.
ग्लोबल वातावरणात व आधुनिक लोकशाही मूल्यांच्या संदर्भात स्थानिक संस्कृतीचा वेध घ्यावा हा या महोत्सव आयोजनामागील मुख्य हेतू आहे. त्यातून पारंपरिक भारतीय मूल्ये आणि आधुनिक लोकशाही मूल्ये यांतील संगती-विसंगती ग्रामीण संस्कृती संदर्भात तपासून पाहिली जाणार आहे.
महोत्सवात चार चर्चात्मक कार्यक्रम होतील. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या वतीने सोमवारी, 16 जानेवारीला सकाळी 11 वाजता ‘युवा पिढी आणि लोकशाही मूल्ये’ हा परिसंवाद होणार आहे. त्या कार्यालयातर्फे समाजाच्या विविध स्तरांत ‘लोकशाही गप्पा’ नावाचा कार्यक्रम नियमित होत असतो. त्यांतील हे नववे पुष्प आहे. यावेळी प्रथमच हा कार्यक्रम तालुका स्तरावर जाऊन पोचला आहे हे त्याचे वैशिष्ट्य म्हणता येईल. महोत्सवातील अन्य कार्यक्रमांत ‘वेध स्त्रीजीवनाचा’, ‘मुलाखती -उद्योजकांच्या व संशोधकांच्या’ या विषयांवरील गप्पागोष्टींचा समावेश आहे. त्यामध्ये सुभद्राराजे नाईक-निंबाळकर, मंजिरी निंबकर, मधुबाला भोसले, अंजली कुलकर्णी, संजीवराजे नाईक-निंबाळकर, अनिल राजवंशी, दिलीपसिंह भोसले, सतीश जंगम, प्रसन्न रुद्रभट्टे हे सहभागी होणार आहेत.
महोत्सवाचा समारोप ‘स्थानिक मनोरंजनाच्या ग्लोबल हाका’ या विषयावरील गप्पागोष्टींनी होणार आहे. त्यात चित्रपट-दिग्दर्शक वसीमबारी मणेर, नाट्य अभ्यासक प्रा. अशोक शिंदे व शिक्षणतज्ज्ञ वैशाली शिंदे यांचा सहभाग आहे. त्यांना बोलते करणार आहेत प्रा. नितीन नाळे.
महोत्सवात दोन दिवस स्थानिक समाज संस्कृतीचे दर्शन घडवणारे प्रदर्शन मांडले जाईल. निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयातर्फे लोकशाही मूल्यांच्या व नागरिकांच्या हक्काच्या गोष्टी सांगणारे वेगवेगळे स्टॉल असतील. ‘कमला निंबकर बालभवन’ यांच्या प्रकल्पाचा स्टॉलही प्रदर्शनात असेल. त्यामध्ये फलटणच्या सामाजिक व सांस्कृतिक प्रश्नांबाबत शाळेने केलेल्या पाहणीतील निरीक्षणे दृश्यात्मक पद्धतीने मांडण्यात येतील. त्याखेरीज फलटण तालुक्यातील लेखक व कवी यांच्या प्रकाशित पुस्तकांचे दालन असणार आहे. त्याचे संयोजन महाराष्ट्र साहित्य परिषद, फलटण शाखेचे कार्याध्यक्ष महादेव गुंजवटे व प्रमुख कार्यवाह अमर शेंडे यांनी केले आहे.
‘थिंक महाराष्ट्र’च्या वतीने महाराष्ट्राच्या सुमारे पंचेचाळीस हजार खेड्यांतील माहिती संकलन करण्याचा प्रयत्न आहे. सध्या पाच तालुक्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यात फलटण तालुक्याचा समावेश आहे. ‘थिंक महाराष्ट्र’ची उद्घोषणा महाराष्ट्राची प्रज्ञाप्रतिभा व चांगुलपणा यांचे नेटवर्क ‘थिंक महाराष्ट्र-लिंक महाराष्ट्र’ अशी आहे.
———————————————————————————————-