नवदृष्टीचे आदिवासी पाड्यांवरील पोषण

‘नवदृष्टी’ ही ठाणे जिल्ह्यातील आदिवासींच्या आहार, आरोग्य व आर्थिक समस्यांवर प्रत्यक्ष पाड्यावर जाऊन काम करणारी सामाजिक संस्था आहे. संस्था १९९५ पासून या जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा व विक्रमगड भागातील एकशेदहा दुर्गम ठिकाणी कार्यरत आहे.

ठाणे जिल्ह्यातील अती दुर्गम आदिवासी पाड्यांमध्ये (वावर, वांगणी, रुइघर, बांगदरी) १९९४ च्या सुरुवातीला दोन आठवड्यांच्या कालावधीत शेकडो बालकांचे कुपोषणामुळे मृत्यू झाले आणि जव्हार आणि मोखाडा हे दोन तालुके जगाच्या नकाशावर आले. आफ्रिकेतील इथोपिया, युगांडातील कुपोषित मुलांशी तुलना होण्याइतकी त्यांची अवस्था दयनीय झाली होती. त्या अती दूर्गम पाड्यांमध्ये जेव्हा मृत्यूचा संहार चालू होता तेव्हा मुंबईमधील ‘निर्मला निकेतन’ या सामाजिक संस्थेच्या महाविद्यालयातील दहा विद्यार्थ्यांनी तेथे दोन महिने मुक्काम केला. त्यांनी आदिवासींना मदत करून त्‍यांना त्या प्रतिकूल परिस्थितीत पुनश्च जगण्याचे बळ दिले. मुंबईपासून एकशेचाळीस किलोमीटर अंतरावरील त्या गरीब, असहाय्य आदिवासी पाड्यांमध्ये रोगांचे थैमान चालू होते. लोकांना खाण्यास अन्न आणि घालण्यास कपडे नव्हते, अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवे या उद्देशातून ते दहा पदव्युत्तर विद्यार्थी पुढे आले होते. त्यांनी गरिबीमुळे गांजलेल्या, पिडलेल्या आदिवासींना नवीन दृष्टी, उमेद, उभारी मिळावी म्हणून १९९५ मध्ये संस्थेची स्थापना केली आणि ‘नवदृष्टी’चा जन्म झाला!

त्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीच्या काळात शेकडो पाड्यांमध्ये जाऊन, कुपोषित मुलांना आरोग्यसेवा उपलब्ध करून त्यांचे प्राण वाचवले. डॉक्टरांच्या साहाय्याने आरोग्य शिबीर घेणे, जंगलात वास्तव्यास असलेल्या मुलांना खांद्यावर घेऊन दहा-पंधरा किलोमीटर चालत डॉक्टरांकडे नेणे, शहरामध्ये फिरून रुग्णवाहिकेसाठी मदत मिळवणे, औषधे प्राप्त करणे, आदिवासींना अंधश्रद्धा व वैदूंपासून परावृत्त करणे, माता-बालकांना चौरस आहार देणे यासाठी अविश्रांत मेहनत घेतली. या कार्यामुळे ‘नवदृष्टी’ संस्था व त्यांचे विद्यार्थी-पदाधिकारी त्या हजारो आदिवासींना देवदूतांसारखे वाटू लागले. ज्या ठिकाणी चोहीकडे फक्त जंगल आहे, चालण्यास रस्ता नाही, वाहतुकीची सोय नाही, कुठलीही शासकीय सेवा नाही अशा ठिकाणी त्या विद्यार्थ्यांनी सुरुवातीच्या एका वर्षांत अथक काम केले. त्यांची ही कळकळच ‘नवदृष्टी’ स्थापन होण्यामागची प्रेरणा ठरली.

आरंभी संस्थेचा उद्देश कुपोषण दूर करणे, मुलांना योग्य वेळी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे असा होता. मात्र त्यानंतरच्यां काळात संस्थेने मुलांच्या आहारसमस्या, मातांचे आरोग्य, मुलींचे अल्पवयात लग्न, त्यांचे शिक्षण, पाड्याच्या सभोवतीची स्वच्छता, पिण्यास स्वच्छ पाणी, शेतीमध्ये आधुनिक बी-बियाणांचा वापर, महिला बचतगट, युवकांना प्रशिक्षण या महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित केले. त्यांनी शासनाच्या मदतीशिवायही कुपोषण व इतर आदिवासी समस्या दूर होऊ शकतात ही गोष्ट विविध प्रयोग आणि त्यांच्या‍ आंतरराष्ट्रीय परिषदांमधील सादरीकरणाच्या साह्याने सिद्ध करून दाखवली. म्हणूनच ‘नवदृष्टी‍’ ही संशोधन क्षेत्रात काम करणारी उल्लेखनीय संस्था ठरली आहे. डॉ. नागेश टेकाळे हे त्‍या संस्‍थेचे अध्‍यक्ष आहेत.

संस्थेचे आदिवासी भागातील कार्यक्षेत्र वसुरी मालेपाडा (विक्रमगड), कडुचीवाडी (ता. मोखाडा) आणि दाभेरी (ता. जव्हार) या तीन ठिकाणी आहे.

‘नवदृष्टी’च्या साह्याने आदिवासी भागात चाळीस महिला बचतगट विविध क्षेत्रांत काम करतात. संस्था तरुणवर्ग, शाळा सुटलेले विद्यार्थी यांच्यासाठी भारत सरकारच्या ‘मानव संसाधन आणि विकास’ या मंत्रालयातमार्फत विविध प्रकारच्या रोजगार निर्मितीच्या योजना राबवते. आदिवासी तरुणांनी स्वत:च्या पायावर उभे राहवे यासाठी संस्थेचे प्रयत्न सतत चालू असतात. ‘नवदृष्टी’ आजमितिस पन्नास हजारांपेक्षा जास्त आदिवासींच्या संपर्कात राहून कार्य करत आहे.

संस्था सध्या आदिवासी बालक, स्त्रिया, मुली, प्रसुत व गरोदर माता यांच्यासाठी आरोग्य आणि आहार या संदर्भातील विविध प्रकारच्या संशोधनावर आधारित नव्या उपक्रमांवर जास्त भर देत आहे. हे नवीन प्रयोगशील, सोपे, सुटसुटीत उपक्रम आदिवासींना त्यांच्याच भागात सहज उपलब्ध होणाऱ्या शेती व इतर साहित्यातून राबवता येऊ शकतात. हे उपक्रम शासनाबरोबरच इतर सामाजिक संस्थांनी प्रत्यक्ष पाड्यास भेट देऊन पाहावेत, त्यांचे अनुकरण करावे व आदिवासींचे प्रश्न स्थानिक पातळीवर त्यांच्याच मदतीने कसे सोडवता येतील हे समजून घ्यावे या दृष्टीने प्रयत्न केले गेले आहेत. शासनाच्या विविध योजना व मदत यांशिवाय आदिवासी स्वत:च्या पायावर सक्षमपणे उभा राहावा, तरच त्याचा विकास होऊ शकतो हे ‘नवदृष्टी’चे मुख्य ध्येय आहे.

संस्थेने मोखाडा तालुक्यातील दारूच्या आहारी गेलेल्या कडुचीवाडी गावात संपूर्ण दारुबंदी घडवून आणली आणि मुलांना कुपोषणाच्या विळख्यातून सोडवले. तो संघर्ष सहा महिने चालू होता. त्या चळवळीत स्त्रियांचा फार मोठा सहभाग होता. अहिंसेच्या मार्गाने चालवलेल्या त्या. चळवळीचे २००६ मध्ये दरबन, दक्षिण आफ्रिका येथे सादरीकरण झाले.

जव्हार तालुक्यातील रुइघर व बोपदरी या दुर्गम पाड्यांत २००८ साली इडली, डोसा, अप्पम हे दाक्षिणात्य पदार्थ आदिवासी महिलांच्याच सहभागातून तयार करण्यात आले. या आहाराचा आदिवासी बालकांचे कुपोषण दूर करण्याच्या कार्यक्रमात वापर करण्यात आला. या प्रयोगास अमेरिकेत शिक्षण घेत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी आर्थिक मदत केली.

संस्‍थेने अंगणवाडीत संतुलित आहाराबरोबरच वैज्ञानिक खेळणी आणि इतर शैक्षणिक साहित्याचा वापर केला असता, कुपोषण तर दूर होतेच त्याचबरोबर मुलांच्या बुद्ध्यांकामध्येही वाढ होते हे सप्रयोग सिद्ध केले. त्‍या प्रयोगास २००७ साली अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांनी मुद्दाम भेट देऊन आर्थिक मदत केली.

२०११ साली जव्हारजवळच्या लोंभारपाडा या दुर्गम ठिकाणच्या तीस कुपोषित मुलांचे अंगणवाडीमार्फत खास तयार केलेली ‘नाचणी-भगर’ पौष्टिक बिस्किटे देऊन कुपोषण दूर करण्यात आले. आदिवासींनी शेतात पिकवलेल्या धान्यांचा वापर करून तयार केलेली ही बिस्किटे मुलांचे आरोग्य कसे सृदृढ करू शकतात हे शासनास दाखवण्यासाठी त्‍या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रयोगासाठी एस.एन.डी.टी.च्या आहारशास्त्राच्या चार विद्यार्थिनींनी प्रत्यक्ष पाड्यावर जाऊन काम केले. ‘अंकूर बीज उत्पादन कंपनी, नागपूर’ यांच्या मदतीने आदिवासी शेतकऱ्यांना बी वाटप आणि भाजीपाल्यांचा प्रसार यशस्वी पद्धतीने राबवण्यात आला.

‘नवदृष्टी’ने विविध क्षेत्रांत केलेल्या महत्त्वाच्या कामांची यादीच देता येईल. आदिवासी भागातील सहा वर्षे वयाखालील मुलांना नियमितपणे जीवनसत्त्व ‘अ’चा पुरवठा करणे, कुपोषण श्रेणी ३ व श्रेणी ४ यांवर लक्ष ठेवून नियंत्रण करणे, दोन वर्षांखालील कुपोषित मुलांमधील डायेरियल (हगवण) मृत्यू थांबवणे, मुलांना स्वच्छ पाणीपुरवठा करणे, आदिवासींच्या मदतीने जंगलामध्ये फळझाडांची लागवड करून त्यांचा आहारात समावेश करणे, प्रत्येक आदिवासीच्या घरामागे परसबागेची निर्मिती करण्यारस प्रोत्साहन देणे, मुली, गरोदर स्त्रिया व प्रसुत माता यांच्या शरीरातील लोहाच्या कमतरतेवर विशेष लक्ष देऊन नियंत्रण ठेवणे, लहान मुलांच्या अंगणवाडीमधून खेळणी व विज्ञानविषयक गोष्टींचा वापर करणे, आदिवासींसाठी प्रत्येक महिन्यात दोन आरोग्यशिबिरे घेणे, मोफत औषधवाटप करणे, महिन्यातून एक शिबीर फक्त डोळे तपासणीसाठी आयोजित करणे, कुपोषित मुलांना अंगणवाडीच्या माध्यमातून ताजा, सकस आहार पुरवणे, गरीब आदिवासी मुलांचा महाविद्यालयीन शिक्षणाचा खर्च उचलणे, वारली चित्रकला व लाकडी वस्तू यांच्या निर्मितीस प्रोत्साहन देणे, शाळा सोडलेल्या मुलींसाठी शिवणकलावर्ग सुरू करणे, आदिवासी शेतकऱ्यांना आधुनिक बी-बियाण्यांची मदत करणे, स्थानिक औषधी वनस्पतींचे संवर्धन करणे, आदिवासी आश्रम शाळांमध्ये विज्ञानप्रयोग दाखवणे व करून घेणे, आदिवासी मुलांसाठी ग्रंथालये सुरू करणे, संगणकशिक्षण आणि सौर ऊर्जेचा प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे प्रसार करणे अशी विविधांगी कामे संस्थेद्वारे केली जात आहेत.

संस्थेने लहान मुलांतील अंधत्वावर विशेष कार्य केले आहे. तसेच त्या दुर्गम भागात ‘बेअर फूट डॉक्टर’ची योजनाही राबवली. आदिवासी भागात सर्पदंशाने होणाऱ्या मृत्यूवर नियंत्रण आणण्यासाठी संस्थेने उपाययोजना राबवल्या होत्या.

‘नवदृष्टी ’ने आदिवासी भागात केलेल्या कार्यामुळे येथील अदिवासींना जगण्याची उमेद मिळाली आहे. म्हणूनच ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागातील हजारो आदिवासींच्या मुखातून ‘नवदृष्टी’चा उल्लेख अत्यंत गौरवाने होतो.

‘नवदृष्टी‘
१/१७, शेळके चाळ, डॉ.बाबासाहेब आंबेडकरनगर, पेस्तम सागर, पी.एल.लोखंडे मार्ग, चेंबर, मुंबई- ४०००८९.
डॉक्टर्स क्वार्टर, इमारत क्र.१, प्रकार ५, ब्लॉक ०६, का.रा.वि.यो. रुग्णालय, मुलुंड (प), मुंबई – ४०००८०.
९८६९६१२५३१, ०२२- २५६४६८७९
nstekale@redifmail.com

– डॉ. नागेश टेकाळे

About Post Author

Previous articleशेतकऱ्यांच्या आत्महत्या – एक आढावा
Next articleखारीचा वाटा केवढा?
डॉ. नागेश टेकाळे हे वनस्‍पतीशास्‍त्राचे निवृत्‍त प्राध्‍यापक आहेत. ते वनस्‍पतींचे औष्‍ाधी गुणधर्म आणि त्‍यांचा आयुर्वेदातील वापर यांविषयी संशोधन करतात. त्‍यांचा Ethonobotany हा आवडीचा विषय. त्‍यांनी 'आदिवासी समाजाचे आरोग्‍य' या विषयावर अभ्‍यास केला आहे. टेकाळे यांनी त्‍याविषयी अनेक पेपर प्रसिद्ध केले असून त्‍यांनी 'नक्षत्रवृक्ष' या विषयावर सत्‍तावीस अभ्‍यासलेख लिहिले आहेत. चीनमधील औषधी वनस्‍पतींच्‍या संवर्धन प्रक्रियेची माहिती मिळवण्‍यासाठी त्‍यांनी तीन वेळा त्‍या देशाला भेट दिली आहे. लेखकाचा दूरध्वनी 9869612531

1 COMMENT

Comments are closed.