नलिनी तर्खड मध्यप्रदेशातील माळवा पट्टयातून आल्या. त्या पदवीधर होत्या. खानदानी आकर्षक चेहरा ही त्यांची जमेची बाजू होती. त्यांचा आवाजही चांगला होता, परंतु त्यांनी गायनाची तालीम घेतलेली नव्हती. दिग्दर्शक मोहन भावनानी त्यांना मुंबईला सिनेमात काम करण्यासाठी १९३०च्या सुमारास घेऊन आले. त्यांनी त्यांच्या ‘वसंतसेना’ या मुकपटात नलिनीला दुसऱ्या नायिकेची भूमिका दिली. मुख्य ‘वसंतसेना’ इनाक्षी रामा रावने रंगवली होती.
जे.के. नंदा ‘वसंतसेना’मध्ये नलिनी बरोबर भूमिका करत होता. ते नलिनी यांच्या शालीन वागण्या-बोलण्यामुळे प्रभावित झाले. त्यांना लाहोरच्या ओरिएण्टल पिक्चर्स निर्मित ‘पवित्रगंगा’ चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची संधी मिळताच त्यांनी नलिनी तर्खड यांना त्यात नायिकेची भूमिका दिली.
नलिनी यांना चित्रपटात काम केल्यामुळे घरच्या कर्मठ कुटुंबियांचा विरोध आणि रोष पत्करावा लागला. त्यांचे नातलग त्यांना दुरावले. नलिनी पुण्याला आल्या. व्ही. शांताराम यांनी त्यांची निवड ‘प्रभात’च्या ‘अमृत मंथन’मध्ये राणी मोहिनीच्या भूमिकेसाठी केली. नलिनी यांचा तो पहिलाच बोलपट. चित्रपटाचे नायक माधव गुप्त यांची भूमिका करणारे सुरेशबाबू माने हे हिराबाई बडोदेकरांचे बंधू. ते सुरेल व पट्टीचे गायक होते. सुमित्रेच्या भूमिकेत शांता आपटे होत्या. त्याकाळी पार्श्वगायन पद्धत अस्तित्वात आली नसल्याने नलिनी यांना त्यांची गाणी स्वतः म्हणणे भाग होते. नलिनी गायिका-अभिनेत्री नसल्या तरी संगीतकार केशवराव भोळे यांनी त्यांच्याकडून चांगली गाणी बसवून घेतली. मुंबईच्या ‘कृष्ण’ सिनेमागृहात ‘अमृत मंथन’ची हिंदी आवृत्ती एकोणतीस आठवडे चालू होती. ‘अमृत मंथन’ने हिंदीत रौप्य महोत्सव साजरा करण्याचा मान भारतात सर्वप्रथम मिळवला. ती गोष्ट १९३४ ची!
प्रेक्षकांनी ‘चंद्रसेने’चेही जोरदार स्वागत केले. ‘प्रभात’चा हिंदी भाषेतील ‘रजपूत रमणी’ केशवराव धायबरांनी दिग्दर्शित केला होता. त्यात मानसिंहाची भूमिका रंगभूमीवरील नट नानासाहेब फाटक यांनी केली, तर तारामतीच्या भूमिकेत नलिनी तर्खड होत्या. वास्तविक, नलिनी तर्खड यांनी ‘रजपूत रमणी’मध्ये फार सुंदर भूमिका केली होती. त्यांनी मीरेची पदेही मोठ्या भक्तीभावाने गायली होती, पण चित्रपट अपयशी ठरला.
त्या चित्रपटानंतर, केशवराव धायबर यांनी नलिनी तर्खड यांच्याशी विवाह केला. धायबर यांनी प्रभात फिल्म कंपनी ३१ मार्च १९३७ रोजी सोडली आणि पुण्याजवळ खडकीला ‘जयश्री फिल्म कंपनी’ स्थापन केली. त्यांची ‘जयश्री फिल्म कंपनी’ चालली मात्र नाही. नलिनी सुंदर पेंटिंग करत असत. त्यांचे प्रभुत्व इंग्रजी भाषेवरही होते. त्यांनी ‘जहागीरदार ऑफ पालिखाना’ ही कादंबरी इंग्रजीत लिहिली होती. नलिनी यांची फिल्मी कारकिर्द १९२९ ते १९३६ अशी जेमतेम सात वर्षांची, पण नलिनी यांच्यानंतरच सुशिक्षित, घरंदाज घराण्यातील तरुण मुली सिनेव्यवसायात प्रवेश करू लागल्या.
धायबर हे ‘प्रभात’चे एके काळचे भागीदार. ते तेथेच १९४५ मध्ये, ‘लाखाराणी’च्या निर्मितीच्या वेळी नोकरीला होते. नलिनी तर्खड ‘लाखाराणी’च्या नायिकेचा, मोनिका देसाईचा कपडेपट सांभाळत होत्या! चित्रपटक्षेत्रात यशापयशाचे असे चढउतार अनेक पाहण्यास मिळतात.
– अरुण पुराणिक