नरेंद्र दातारचा स्वयंभू स्वर-ताल!

1
22

पंडित नरेंद्र नारायण दातार हे नाव उत्तर अमेरिकेत साऱ्या भारतीय संगीतप्रेमींना उत्तम परिचयाचे आहे. सर्वजण त्यांना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे नामवंत, प्रथितयश गायक आणि समर्थ गुरू या नात्याने ओळखतात.

त्यांचा जन्म ८ जून १९६० रोजी मुंबई येथे झाला. नरेंद्र लहानपणापासून बुद्धिमान. त्याची शैक्षणिक जीवनातील गुणवत्ता वाखाणण्याजोगी ठरली. त्याला सर्व विषयांत गती होती. तथापी, गणित हा त्याचा हातखंडा विषय. त्याला कानपूरच्या आय.आय.टी.मधील पाचही वर्षे गुणवत्ता शिष्यवृत्ती (मेरिट स्कॉलरशिप) मिळाली होती.

नरेंद्राचा त्याच्या शैशवापासून कल संगीताकडे होता. तो त्याच्या तीन-साडेतीन वर्षांच्या वयात आकाशवाणीवरील गाणी ऐकताना डबा पकडून ताल धरत असे. ते पाहून मी त्याच्यासाठी तबला-डग्गा जोडी विकत घेतली. खेळणे किंवा खाऊ दिल्याने मुलाला जेवढा आनंद होतो त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक आनंद बाल नरेंद्रला त्यावेळी झाला होता! तेव्हापासून नरेंद्र तबला वाजवू लागला. त्यावेळी, खाली एक-दोन जाड उशा घेऊन बसल्याशिवाय त्याचा हात तबल्यापर्यंत पोचतदेखील नसे. त्याची वडील बहीण सुगंधा गात असे. त्या बालकलाकारांचा कार्यक्रम आकाशवाणीवरही झाला होता. योगायोगाने, तेथे पंडित यशवंतराव केरकर उपस्थित होते. त्यांनी नरेंद्रच्या तबलावादनाचे कौतुक केले होते.

नरेंद्र चांगला गाऊ शकतो या गोष्टीचा पत्ता मात्र आम्हाला उशिरा लागला. तो राजा शिवाजी विद्यालयामध्ये (किंग्ज जॉर्ज हायस्कूल) शिकत असताना एके दिवशी मुख्याध्यापक सौ. वाघ यांचा घरी निरोप आला, की नरेंद्रला एका गायनस्पर्धेसाठी शाळेतर्फे पाठवायचे आहे, तरी त्याच्याकडून गाणे बसवून घ्यावे. घरी सर्वांनाच आश्चर्य वाटले! नरेंद्र त्या स्पर्धेत ‘एकतारी संगे एकरूप झालो, आम्ही विठ्ठलाच्या भजनांत न्हालो’ हा अभंग गायला आणि बक्षिस घेऊन आला!

नरेंद्र तेव्हापासून गाऊ लागला (त्याचे तबलावादन चालू होतेच) आणि स्पर्धांतून बक्षिसे मिळवू लागला. पुढे मीरा केळकर यांनी त्यास पंडित वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे नेले. त्यावेळी त्याचे वय तेरा-चौदा वर्षांचे होते. वसंतरावजी स्वत: त्याला ‘गुरु समर्थ’ विद्यालयात शिकवत असत. त्यावेळी त्याच्या वर्गात त्याच्याबरोबर पंडित रमण किर्तने, पंडित रघुनंदन पणशीकर इत्यादी विद्यार्थी होते. आरती अंकलीकर याही त्या वेळी वसंतरावांकडे शिकत होत्या. नरेंद्रने गायन हेच जीवनाचे ध्येय करावे असे वसंतरावांचे मत होते.नरेंद्रची कुशाग्र बुद्धी, तीव्र ग्रहणशक्ती-तितकीच तीव्र स्मरणशक्ती, प्रयोगशीलता, दमदार गोड स्वर, तालावरील हुकूमत आणि तरल कल्पनाशक्ती यांमुळे वसंतरावांना तसे वाटे. तसे झाले असते तर नरेंद्राचे स्थान शास्त्रीय संगीतात किती उच्च असते असा विचार त्याचे वडील म्हणून माझ्या मनात आल्याशिवाय राहत नाही.

‘सुनहरी यादें’ हा प्रमिला दातार यांचा गायनवृंद त्यावेळी गाजत होता. त्यांनी त्यात गाण्यासाठी नरेंद्रास आग्रहाने बोलावून घेतले. ‘सुनहरी यादें’मध्ये सुगम चित्रपटगीतांबरोबर शास्त्रीय संगीतावर आधारलेली काही गीते असत. तशी गीते ही ‘सुनहरी यादें’चे खास वैशिष्ट्य होते. दातार यांच्या चमूमध्ये केवळ नरेंद्र ही निमशाशास्त्रीय गीते गात असे. नरेंद्रची ‘लागा चुनरी में दाग’, ‘झनक झनक तोरी बाजे पायलिया’ इत्यादी गीते महाराष्ट्रात सर्वत्र गाजली होती.

नरेंद्रने कित्येक स्पर्धांतून प्रथम क्रमांकांची पारितोषिके मिळवली आहेत. त्यांतील विशेष उल्लेखनीय म्हणजे आकाशवाणीच्या अखिल भारतीय स्पर्धेतील प्रथम पारितोषिक. ते पारितोषिक त्याला चित्रपट संगीत दिग्दर्शक नौशाद यांच्या हस्ते मिळाले. त्या पारितोषिकामुळे त्याला ऑडिशन टेस्टशिवायच आकाशवाणीवरील गायनाची ‘बी’ ग्रेड देण्यात आली होती. संगीत दिग्दर्शक कै. वसंत देसाई यांच्या स्मरणार्थ झालेल्या संगीत स्पर्धेत नरेंद्रला शास्त्रीय आणि सुगम या दोन्ही विभागांत प्रथम क्रमांक मिळाला होता.

नरेंद्र दातारनरेंद्रला कित्येक सन्मान मिळाले आहेत. त्याने राजा शिवाजी विद्यालयातर्फे अनेक स्पर्धांत यश मिळवले होते, म्हणून शाळेने त्याला शाळा सोडताना खास सुवर्णपदक दिले होते. विद्यालयाने त्या विद्यालयास पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, १९९० साली त्या विद्यालयात शिकून पुढे नाव मिळवलेल्या निवडक माजी विद्यार्थ्यांचा सत्कार कुसुमाग्रज यांच्या अध्यक्षतेखाली केला होता. त्या यादीत रियर अॅडमिरल आवटी, सुनील गावसकर इत्यादी नामवंत होते. त्यांत नरेंद्रचेही नाव होते. त्या यादीतील नरेंद्र हा सर्वांत लहान होता.

नरेंद्र बारावी झाल्यानंतर १९७७ साली कानपूरच्या आय.आय.टी.त गेला. तेथून त्याने १९८२ साली बी.टेक्. ही पदवी घेतल्यानंतर दोन वर्षांनी, १९८४ साली तो कॅनडात न्यू ब्रन्सविक युनिव्हर्सिटीत आला. तेथून तो कॉम्प्युटर ग्राफिक्स या विषयातील एम.एस्सी. ही पदवी घेऊन टोरांटोस पोचला. तेव्हापासून तो  टोरांटो येथेच आहे.

नरेंद्रच्या जीवनातील गायक आणि गुरु हा कालखंडही टोरांटोस कॉम्प्युटर क्षेत्रातील नोकरीबरोबर सुरू झाला. त्याला १९८९ साली ‘शास्त्री इंडो-कॅनेडियन इन्स्टिट्यूट’तर्फे उच्च शास्त्रीय संगीताच्या अभ्यासासाठी एक वर्षाची शिष्यवृत्ती मिळाली. त्याने वर्षभर भारतात राहून वसंतराव यांच्याकडून तालीम घेतली.

तबला हे नरेंद्रचे फर्स्ट लव्ह आहे. त्यापेक्षा ती त्याची सहजप्रवृत्ती आहे असे म्हणणे अधिक योग्य होईल. त्याने गायनाचे शिक्षण घेतले, पण तबल्याचे शिक्षण एक दिवससुद्धा कोठे घेतलेले नाही. तरीही तो बैठकीत गवयास तबल्यावर साथ करू शकतो. तालाचे पक्केपण हे त्याचे मोठे बलस्थान आहे. तो गातो तेव्हा त्याचा ताल तबलजींवर अवलंबून नसतो. गवयाच्या स्वराप्रमाणे नरेंद्रचा तालही स्वयंभू आहे.

तो शास्त्रीय संगीताबरोबर उपशास्त्रीय संगीत म्हणजे – नाट्यगीते, अभंग, भावगीते इत्यादी गातो. तो गीतरामायणही उत्तम प्रकारे सादर करतो. तो गुजराती, कानडी इत्यादी भाषांतील गीतेही गातो. त्याची कीर्ती कॅनडाच्या सीमा ओलांडून अनेक देशांत पोचली आहे. त्याची प्रत्येक बैठक वेगळी असते, म्हणजे त्याने एका बैठकीत गायलेले गीतच पुढच्या बैठकीत गायले तरी त्यात काही वेगळे असते. त्याचे कारण म्हणजे त्याचे चिंतन सतत चालू असते, त्याचे मन नवे काही सतत शोधत असते, तो प्रयोग सतत करत असतो.

नरेंद्रचे एक वैशिष्ट्य म्हणजे तो कमालीचा परफेक्शनिष्ट आहे. श्रोत्यांसमोर गीत किंवा अन्य गायनप्रकार सादर करण्यापूर्वी त्यावर पूर्ण प्रभुत्व संपादन केले पाहिजे या विषयी त्याचा आग्रह असतो. त्यात त्याला तडजोड खपत नाही. त्यासाठी निरलसपणे पुरेशी मेहनत करण्यावर त्याचा भर असतो. तोच त्याचा आग्रह त्याच्या शिष्यांबाबत असतो. त्यामुळे त्याचे शिष्य त्याच्या मुशीत तयार होऊन त्याच्यासारखे परफेक्शनिस्ट झाले आहेत.

टोरांटोमधील आर्ट लवीन हे त्याचे पहिले शिष्य. त्यानंतर गेल्या सव्वीस-सत्तावीस वर्षांत कितीतरी जणांनी त्याच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले आहे. डॉ. समिधा जोगळेकर ही त्याची शिष्या त्याच्याकडे गेली तेवीस-चोवीस वर्षे शिकत आहे. त्याच्याकडे शिकू इछिणाऱ्यांची प्रतीक्षायादी मोठी आहे. विद्यार्थी लांबलांबून त्याच्याकडे शिकण्यासाठी येत असतात. अनुजा पंडितराव ही साडेतीन-चार तासांचा, तीनशे-साडेतीनशे किलोमीटरचा गाडीचा प्रवास करून त्याच्याकडे शिकण्यासाठी येत असते!

गायनकलेचे सार्थक ती श्रोत्यांसमोर सादर करण्यात आहे. नरेंद्रने त्याचा ‘स्वरगंध’ हा गायनवृंद काही वर्षांपूर्वी सुरू केला आहे. त्याचे कार्यक्रम ठिकठिकाणी झाले आहेत. त्याच्या शिष्यांना तशी संधी मिळावी, त्यांना श्रोत्यांसमोर गाण्याचा अनुभव मिळावा यासाठी ते साधन आहे. उच्च अभिरुचीचे दर्जेदार, विविधांगी संगीत ऐकण्यास मिळण्याची ती श्रोत्यांना दुर्मीळ संधी वाटते. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या फिलाडेल्फिया येथील २००९ सालच्या अधिवेशनात ‘स्वरगंध’च्या कार्यक्रमात श्रोत्यांनी इतकी गर्दी केली होती, की सभागृहातील खुर्च्यांची आसने कमी पडली. मग श्रोत्यांनी जमिनीवर बसकण मारली. खुर्च्यांच्या रांगांमधील जागाही भरून गेली. जमिनीवरही बसायला जागा मिळेना तेव्हा काहींना उभे राहवे लागले. संयोजकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने विनंती करून जमिनीवर बसलेल्या सर्वांना सभागृहाबाहेर जाण्यास सांगितले व त्यांच्यासाठी ‘स्वरगंध’चा संपूर्ण कार्यक्रम दुसऱ्यांदा आयोजित केला. त्या दुसऱ्या कार्यक्रमाच्या दिवशी पहिल्या कार्यक्रमासारखी प्रमाणाबाहेर गर्दी राहू नये म्हणून सभागृहातील प्रवेशासाठी नियंत्रक ठेवावे लागले होते आणि श्रोत्यांची रांग बनवून, रांगेतील क्रमांकानुसार श्रोत्यांना सभागृहात प्रवेश देण्याची व्यवस्था करावी लागली होती.

नरेंद्र स्वभावाने मृदू आणि नम्र आहे. त्याने आजवर कधी कोणासही दुखावलेले नाही. किंबहुना, उलट वागण्याने त्याने अनेक जीवाभावाचे मित्र जोडले आहेत. त्याला दोन बहिणी. वडील बहीण सुगंधा. ती विवाहानंतर मेधा फाटक झाली. ती सिडनी येथे असते. धाकटी बहीण स्वाती. ती विवाहानंतर स्वाती करंडे झाली. ती विदर्भात अमरावती येथे असते. मी, नरेंद्रचे वडील मुंबईस आयुर्विमा महामंडळात नोकरीस होतो. आई पद्मिनी (माहेरची स्नेहलता गोखले) यांनीच सर्व संसार आणि तिन्ही मुलांचे पालनपोषण, शिक्षण यांकडे लक्ष दिले.

सारे दातार कुटुंबच संगीतप्रेमी. आईने बालपणी पेटी वाजवण्याचे शिक्षण घेतले होते. त्या पेटी वाजवत. त्या भावगीते वगैरे थोडे गात. मलाही गायनाचा छंद होता. मी गीत-रामायण गात असे. माझेही पुष्कळ कार्यक्रम झाले आहेत. सुगंधा शास्त्रीय व सुगम, दोन्ही गाते. ती ऑस्ट्रेलियात गायनाचे कार्यक्रम करते, शिकवतेही. स्वाती भरतनाट्यम शिकली आहे. ती अमरावतीस भरतनाट्यमचे वर्ग चालवत असे. (करंडे कुटुंबीयांनी चिखलदरा येथे स्थलांतर केल्यामुळे ते वर्ग बंद झाले आहेत). तिन्ही मुले कलावंत असल्यामुळे मी गंमतीने म्हणत असतो, की – “मी कलावंत नाही; पण कलावंतांचा ‘बाप’ आहे!”

नरेंद्र दातारबफेलोचे डॉ. विनायक गोखले हे संगीताचे मर्मज्ञ जाणकार आहेत. नरेंद्रजींच्या गायन-शैलीसंबंधी ते म्हणतात –

नरेंद्र दातार यांच्या गायकीत प्रामुख्याने आग्रा आणि ग्वाल्हेर घराण्यांचा प्रभाव दिसतो. स्वरांचा पक्केपणा आणि राग-विचार ग्वाल्हेरप्रमाणे, तर तालाचा पक्केपणा ही आग्र्याची खासियत. रागाची बढत चालू असताना विलंबितपणे तालाचा सखोल विचार दिसतो. एका मात्रेत एक चतुर्थांश ते एक अष्टमांश एवढा सूक्ष्म तालविचार आणि लयपूर्णता दिसतात. त्यामुळे भरणा करताना स्वरांच्या श्रुती आणि मात्रा यांची लयपूर्णता प्रकर्षाने जाणवते. बऱ्याचदा ताल सांभाळताना स्वरांकडे दुर्लक्ष होऊ शकते आणि किराणा घराण्याप्रमाणे फक्त स्वरांकडे लक्ष दिले तर तालाचे महत्त्व दुय्यम होते. दातारांची स्वर-शुचिता आणि बंदिशीची स्थायी आणि अंगभूत लयपूर्णता विशेष वाखाणण्यासारखी आहे. स्वर आणि ताल यांचे हे संतुलन नैसर्गिक सहज असते. भल्या भल्या गवयांनादेखील ते सांभाळणे अवघड वाटते. दातार यांच्या गायनाचा मानबिंदू म्हणजे भावपूर्णता. ती थेट बाबूजींसारखी. त्यांच्याकडून गीत-रामायण ऐकताना त्या कवनामधील भाव ते अक्षरश: साकार करतात. असा त्रिवेणीसंगम असलेले त्यांचे गायन साहजिकच सुरुवातीपासून शेवटपर्यंत रंगते. निकोप मधूर असा निसर्गदत्त आवाज आणि अनेक वर्षांची साधना यांमुळे त्यांचे गाणे प्रासादिक व श्रवणीय असते.

टोरांटोचे रायाजी बिडवे हे नरेंद्रजींना नित्य संवादिनीची साथ करत असतात. ते संगीतात मुरलेले आणि अनुभवी आहेत. ते स्वतंत्र स्वररचनाही करतात. नरेंद्रच्या गायनशैलीविषयी ते म्हणतात –

गायकाने उत्तम रसिक असणे आवश्यक आहे. नरेंद्र हा मर्मज्ञ रसिक आहे. त्याला गायनाच्या सर्व अंगांची – सूर, ताल, लय, सादरीकरण, मांडणी, बढत या सर्वांची उत्तम समज आहे. तो स्वत: तबला वाजवत असल्यामुळे आणि त्याचबरोबर आवर्तन शिकवण्याच्या वसंतराव कुलकर्णी यांच्या पद्धतीमुळे, नरेंद्र तालाच्या खेळात तरबेज आहे. तालात मजेत निश्चिंतपणे फिरू शकत असल्यामुळे तो बैठक सहजपणे रंगवू शकतो.

‘बृहन् महाराष्ट्र मंडळा’च्या वॉशिंग्टन येथील अधिवेशनांत त्याचा जोगकंस इतका रंगला होता, की असा जोगकंस भारतातही ऐकायला मिळेल किंवा नाही, याची शंका वाटते.

माझ्या निरीक्षणाप्रमाणे नरेंद्र हा वसंतरावांचा सर्वोत्तम शिष्य आहे. त्याने गुरुजींनी शिकवलेले गाणे उत्तम प्रकारे जतन केले आहे. नरेंद्रच्या आवाजाला अप्रतिम फिरत आहे आणि त्याची तान स्पष्ट, दाणेदार व स्वच्छ आहे. मला स्वत:ला अनेक वेळा नरेंद्राची तान ऐकताना फार मोठ्या गवयांच्या तानांची आठवण होते. तानेचा कण कण इतक्या स्वच्छपणे ऐकायला मिळणे कठिण आहे. नरेंद्र सुगम संगीत गातो, तेव्हा त्याच्या गायनांत रंगतदार व कल्पक स्वरयोजना आणि हरकती दिसून येतात. बाबूजींच्या पश्चात, नरेंद्रचे गीत-रामायण बाबूजींच्या गीत-रामायणाच्या सर्वांत जवळचे आहे असे मला वाटते. नरेंद्रचे नाट्य-संगीतही विशेष आकर्षक आणि प्रभावी आहे.

नरेंद्रची ग्रहणशक्ती तल्लख आहे. माझ्या एका गाण्याची चाल केवळ एकदा ऐकून, नरेंद्रने बैठकीत सर्व बारकाव्यांसह ती उत्तम प्रकारे म्हटली होती. त्याचप्रमाणे माझ्या काही रचना त्याने विलक्षण तन्मयतेने व प्रभावीपणे गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आहे, भारावून टाकले आहे.

ना. भा. दातार
27 गिलिंगहॅम स्ट्रीट, स्कारबरो,
ओंटॅरिओ, M1B 5X1, कॅनडा
फोन (416) 217 – 8101
ndatar@gmail.com

About Post Author

1 COMMENT

Comments are closed.