नको तो धर्म? का नको बरे?

0
32
विल्यम लॉबडेल
विल्यम लॉबडेल

     हा जानामाना पत्रकार ‘मी धर्म सोडला आणि तो सोडल्यामुळे माझ्या मनाला शांती लाभलीअसे ठासून सांगतो. अनेक लोक मन:शांती प्राप्त करून घेण्याचा मार्ग म्हणून, एक उपाय म्हणून, धार्मिकतेकडे वळतात. पण हा माणूस तर चक्क धर्म सोडल्यामुळे मन:शांती मिळाली असे म्हणतो!

     माझ्या आयुष्यामधे लहानपणी, ‘धर्मया शब्दाशी माझी पहिलीवहिली ओळख झाली, ती साने गुरुजींच्या प्रार्थनागीतामधून. तेव्हा ठाण्यामधे एका शाळेमधे दर रविवारी साने गुरुजी कथामाला असायची. तिथे छानछान गोष्टी सांगितल्या जायच्या. गोष्ट सांगितली जाण्यापूर्वी साने गुरुजींचे खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ हे प्रार्थनागीत म्हटले जायचे. त्यामध्ये धर्म हा शब्द पहिल्यांदा माझ्या कानांवर पडला…

एका प्रथितयश अमेरिकन पत्रकाराला गवसलेला निधर्मीपणा!

      अमेरिकेत न्यू यॉर्क शहरातल्या मॅनहॅटन विभागामधे क्रमांक ३० चा रस्ता आणि ईस्ट रिव्हरच्या काठावर युनायटेड नेशन्स (यूनो) ची इमारत आहे. तिथेच, खालच्या बाजूला सुंदर प्रार्थनामंदिर आहे. ते सर्व धर्मांच्या लोकांना खुले आहे. तिथे अनेक धर्मांच्या मिळून, एकत्रितपणे अशा सामुहिक प्रार्थना करण्याचे कार्यक्रम ‘टेम्पल ऑफ अण्डरस्टॅण्डिंग’ संस्थेतर्फे होतात. एके काळी जवाहरलाल नेहरू, राजेंद्रप्रसाद, सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्यासारख्या मोठ्या लोकांनी ‘टेम्पल ऑफ अण्डरस्टॅण्डिंग’ या संस्थेचे विश्वस्त म्हणून काम पाहिले. त्यानंतर, गेली अनेक वर्षे तेथे डॉ. करणसिंग विश्वस्त होते.

     या संस्थेच्या सहकार्याने, सतरा वर्षांपूर्वी अमेरिकेतल्या, खरे तर न्यू यॉर्कमधल्या शैक्षणिक क्षेत्रातल्या आम्ही काही मंडळींनी एकत्र येऊन ‘न्यू यॉर्क इण्टरफेथ काउन्सिल’ नावाची संस्था काढली. मी या संस्थेचा संस्थापक सदस्य आहे आणि या संस्थेतर्फे गेली अनेक वर्षे झालेल्या विविध कार्यक्रमांच्यामधे मी हिंदू धर्मांचे प्रतिनिधित्व केले आहे. न्यू यॉर्क विद्यापीठामधून तत्त्वज्ञानाच्या वरिष्ठ प्राध्यापक या पदावरून निवृत्त झालेल्या प्रा. डॉ. सिस्टर आयलीन स्टोरी ह्या आरंभी अध्यक्ष होत्या. त्या प्राध्यापक असण्याबरोबरच कॅथलिक ख्रिस्ती ननदेखील होत्या.

विल्यम लॉबडेल     विल्यम लॉबडेल नावाच्या धर्मविषयातील पत्रकाराने लिहिलेले ‘लूझिंग माय रिलिजन’ हे पुस्तक माझ्या वाचनात आले, तेव्हा मला आश्चर्याचा धक्का बसला! विल्यम लॉबडेल हा पंचवीस वर्षे पत्रकारिता केलेला मुरब्बी पत्रकार माणूस. त्याने ‘लॉस एंजेलिस टाइम्स’ या प्रसिद्ध वृत्तपत्राच्या धर्मविषयक पुरवणीचा संपादक म्हणून अनेक वर्षे काम केले. त्याला कॅलिफोर्निया राज्य पातळीवरचे आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय पातळीवरचेसुद्धा अनेक पुरस्कार मिळाले. असा हा जानामाना पत्रकार ‘मी धर्म सोडला आणि तो सोडल्यामुळे माझ्या मनाला शांती लाभली’ असे ठासून सांगतो. अनेक लोक मन:शांती प्राप्त करून घेण्याचा मार्ग म्हणून, एक उपाय म्हणून, धार्मिकतेकडे वळतात. पण हा माणूस तर चक्क धर्म सोडल्यामुळे मन:शांती मिळाली असे म्हणतो!

     पुस्तकाच्या सुरूवातीला, तो तरूणपणामधे त्याच्या समोर उभ्या ठाकलेल्या अनेक यक्षप्रश्नांची माहिती करून देतो. त्याच्या मैत्रिणी, त्याच्या पहिल्या बायकोपासून झालेला त्याचा घटस्फोट- मग एका मैत्रिणीला विवाहबाह्य संबंधातून झालेले मूल, त्याची अतिकष्टाची आणि कमीत कमी पगाराची नोकरी- त्यामधेदेखील त्याचे घसरणीला लागलेले करियर, आणि एकंदरीतच, आयुष्यामधे भेडसावणार्‍या असंख्य अडचणी… तेव्हा त्याचा मित्र त्याला सुचवतो, की तुझ्या जीवनामधे धर्माची कमतरता आहे. तू कॅथलिक ख्रिस्ती धर्मांची दीक्षा घे, म्हणजे तुला मन:शांती मिळेल.

     त्याच्या लहानपणीच्या धार्मिकपणाच्या आठवणी, खरे तर त्याला नकोशा वाटत होत्या. आईवडिलांबरोबर चर्चला जाणे त्याला मुळीच आवडत नसे. आईवडिलांनी अमुक करू नको, तमुक करू नको, नाहीतर देव शिक्षा करील असे सतत सुनावल्याने, असा शिक्षा करणारा देव मला मुळीच नको अशी त्याची लहानपणापासून व तरूणपणी देखील, अनेक वर्षे ठाम धारणा झालेली होती, पण इलाज नाही म्हणून आणि मित्राच्या आग्रहास्तव तो ‘बॉर्न अगेन’ कॅथलिक ख्रिस्ती बनला आणि दर रविवारी चर्चमधे जाऊ लागला. तोपर्यंत विसरलेल्या बायबलमधल्या गोष्टी पुन्हा ऐकण्यात त्याला आनंद आणि स्वारस्य वाटू लागले आणि सुरुवातीची काही वर्षे, तो त्यात रमलादेखील. त्यानंतर त्याने ख्रिस्ती धार्मिक ‘रिट्रीट’ कार्यक्रमांना जाण्यास सुरुवात केली. अशा अनेक कार्यक्रमांनंतर, एका ‘रिट्रीट’मधे त्याला दैवी प्रकाश दिसला! प्रकाश प्रेमाने ओतप्रोत भरलेला होता आणि त्या प्रकाशाने त्याचे हृदय भरून वाहत आहे असा अनुभव त्याला आला असे तो सांगतो.

     त्या प्रकाशमय अनुभवानंतर त्याच्या मनास शांती मिळू लागली आणि ‘लॉस एंजेलिस टाइम्स’मधे त्याला पत्रकाराची चांगली नोकरी मिळाली. त्याचे करियरदेखील सुधारू लागले. अमेरिकेत धर्म या विषयावर – १९९० च्या सुमाराला – फारशी पत्रकारिता होत नाही याचे वैषम्य त्याला वाटू लागले. मग एक दिवस त्याला साक्षात्कार झाला, की आपणच असे लेखन करावे! म्हणून तो नोकरी सांभाळून, शिवाय दुसर्‍या एका प्रकाशन संस्थेकरता पार्ट-टाइम धर्मविषयक स्तंभलेखन करू लागला. आश्चर्य असे, की त्यानंतर त्याकाळी पूर्णपणे सेक्युलर म्हटल्या जाणार्‍या ‘लॉस एंजेलिस टाइम्स’ने स्वत:च धर्मविषयक पुरवणी काढण्यास सुरूवात केली. त्याला त्या नव्या पुरवणीत शिरकाव मिळाला. त्या निमित्ताने, तो धार्मिक क्षेत्रातल्या बुजूर्ग लोकांच्या सहवासात येऊ लागला. त्याबरोबरच धार्मिक क्षेत्रामधे काम करणार्‍या शेकडो नव्हे-हजारो लोकांशी त्याचा निकटचा परिचय होऊ लागला. अमेरिकेतल्या धार्मिक क्षेत्रातल्या बारीकसारीक घडामोडींची माहिती त्याच्यापर्यंत पोचू लागली.

     येथपर्यंत, लॉबडेलने लिहिलेल्या पुस्तकाचा एक-तृतीयांश भाग संपतो. त्या पुढच्या उरलेल्या, सुमारे दोनशे पानांमधे लेखकाने वाचकांवर एकामागून एक बॉम्बशेल टाकण्याचा धोशा लावला आहे.

     नेमक्या त्या सुमाराला अमेरिकेत कॅथलिक ख्रिस्ती धर्मामधे धर्मगुरूंच्या समलिंगी लैंगिकतेचे आणि अश्लील वर्तणुकीचे पडसाद अमेरिकाभर आणि जगभरदेखील पडू लागले. त्यामधून प्रचंड वादळ उठले. पुस्तकाच्या पुढच्या दोन तृतीयांश भागामधे या वादळाची इत्थंभूत चर्चा आहे. यामधे अनेक वेगवेगळ्या धर्मगुरूंच्यावर भरले गेलेले खटले, त्यांवरच्या न्यायालयीन निर्णयांमधील बारकावे आणि त्यांतल्या प्रत्येक गोष्टीचा समाजावर होत असलेला परिणाम यांची सांद्यत चर्चा आहे. स्वत: पत्रकार असल्याने त्यातल्या सर्व घडामोडी बारकाईने सांगणारी हजारो कागदपत्रे, दस्तऐवज आणि चर्चच्या संग्रहामधली गुप्त कागदपत्रेदेखील त्याला उपलब्ध झाली. तरीदेखील हे सर्व चालू असताना त्याचे ‘एल.ए.टाइम्स’मधल्या धर्मविषयक पुरवणीचे लेखन आणि संपादन चालूच होते.

     या सर्व प्रकारामुळे त्याची धार्मिकता मात्र डळमळू लागली. त्याच्या धर्मश्रद्धेला तडा गेला आणि ती भेग दिवसेंदिवस अधिकाधिक रुंदावत चालली. मग एक दिवस, त्याने देवावर विश्वास ठेवण्याचे थांबवले आणि धर्म सोडला! त्यातच त्याला खरीखुरी मन:शांती मिळाली असे तो लिहितो.

     खरे तर, अमेरिकेतल्या ख्रिस्ती धर्मगुरूंचे लैंगिक खेळ, अनेक धर्मगुरूंनी लहान मुलांच्या बरोबर केलेले समलिंगी संभोग आणि ते उघडकीला आल्यावर घडलेले न्यायालयीन खटले वगैरे गोष्टींची चर्चा अमेरिकेतल्या मीडियामधे खूप झाली आहे. हे सर्व बघितल्यावर विल्यम लॉबडेलप्रमाणे देवाधर्माच्या बाबतीत भ्रमनिरास झालेले आणि त्या कारणाने देवधर्म सोडून दिलेले असे अनेक अमेरिकन असण्याची शक्यता आहे. तरीदेखील एक हिंदू म्हणून आणि त्यातही ‘न्यू यॉर्क इण्टरफेथ काऊन्सिल’चा संस्थापक सदस्य म्हणून मला या सर्व प्रकाराबद्दल विषाद वाटू लागला. हे काही बरे घडले नाही, असेच मला वाटत होते.

विल्यम लॉबडेल लिखित ‘लूझिंग माय रिलिजन’     विल्यम लॉबडेलचे पुस्तक वाचल्यावर मी त्याच्याशी सहमत होऊ शकलो नाही. मी एक हिंदू ब्राह्मण आणि जाज्वल्य हिंदू धर्मप्रेमी असलो, तरी मी येशू ख्रिस्ताच्या शिकवणुकीचा आदर करत आलो आहे.

     विल्यम लॉबडेलने केलेला हल्ला बर्‍याच प्रमाणात ख्रिस्ती धर्मातल्या मूलभूत शिकवणुकीवर नसून, ‘ऑर्गनाइझ्ड रिलिजन’बद्दल आहे. याला पाश्चात्य जगतामधे ‘ख्रिस्टे्ण्डम’ असे म्हटले जाते. येशू ख्रिस्ताची मूळ शिकवण आणि ख्रिस्ती धर्माचे ‘ख्रिस्टे्ण्डम’ म्हटले गेलेले व्यावसायिक ऑर्गनाइझ्ड स्वरूप या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत.

     विल्यम लॉबडेल याचा हल्ला धर्माच्या मूलभूत शिकवणुकीवर नसून धर्मसंस्थेवर म्हणजे ऑर्गनाइझ्ड रिलिजनवर आहे हे या पुस्तकामधे स्पष्ट दिसते. धर्मसंस्था म्हटली की तिला श्रद्धावान धर्मनिष्ठ लोकांच्या कळपाचे (काँग्रिगेशनचे) स्वरूप येते. आणि कळप म्हटला म्हणजे त्याला कुणीतरी नायक असतो. शिवाय, असे अनेक कळप एकत्र येऊन त्या कळपांचा मोठा कळप बनतो. असेच आणखी मोठे, त्याहून मोठे कळप तयार होत जातात. या प्रक्रियेमध्ये त्यांच्या नायक लोकांच्यामधे अधिकाराची घडवंची (हायरार्की) तयार होते.

     पण संस्था म्हटली म्हणजे नियम आले आणि त्याबरोबर अपरिहार्यपणे नियम मोडणारेदेखील आले. त्यातही कुठले नियम जरा सैल आणि कुठले कडक, हेदेखील सर्व आले. तसेच, त्यात कनिष्ठांची लाचारी, वरिष्ठांची दडपेगिरी हे देखील सर्व आले. त्याचे पर्यवसान धार्मिक भ्रष्टाचारामधे सुद्धा होणारच!

     लॉबडेल याच्या पुस्तकामधे हे सर्व प्रकार प्रकर्षाने दिसतात. वरिष्ठांनी कनिष्ठांचे अपराध आणि गैरप्रकार कुठल्या पातळीपर्यंत पाठीशी घालायचे असा प्रश्न त्याला पडू लागतो. कारण धर्मोपदेशकांनी लहान मुलांशी समलिंगी संभोग करून त्या मुलांचे मानसिक आरोग्य उध्वस्त केल्याची अनेक उदाहरणे त्याला दिसू लागतात. त्यातही एड्स झालेल्या काही धर्मोपदेशकांनी अशा समलिंगी संभोगाच्या द्वारे काही लहान मुलांना एड्सची लागण देऊन, त्या मुलांचे आयुष्य बरबाद करून, एड्समुळे ती मुले मेल्याची उदाहरणेदेखील तो पाहतो. आणि इतके सर्व होऊनदेखील अशा धर्मगुरूंना ‘सीक्रसी’ व ‘कॉन्फिडेन्शियलिटी’ च्या नावाखाली चर्चने पाठीशी घातल्याचे तो जेव्हा पाहतो तेव्हा त्याची झोपच उडते!

     कळपगिरी न करता, धर्मसंस्था न उभारता देखील धर्म अस्तित्वात राहू शकतो का? धर्माला कळपाचे स्वरूप न देतादेखील धर्मातली मूलतत्त्वे जिवंत राहू शकतील का? हा खरा इथला मूलभूत असा प्रश्न आहे. पण दुर्दैवाने, विल्यम लॉबडेलने या पुस्तकामधे या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला नाही. प्रस्तुत पुस्तक लिहिताना तो फक्त पत्रकार राहिला आहे; विचारवंत झालेला नाही, ही या पुस्तकाच्या लेखनामधली मोठी उणीव आहे.

     धर्माची जेव्हा संस्था बनते. तेव्हा तिच्यामधे वरील सर्व दोष येणार आणि ते फक्त ख्रिस्ती धर्मात येतात असे नव्हे, तर जगातल्या सर्व धर्मांची तीच गत आहे. पण असंघटित असा, संस्थाविरहित असा धर्म बनवता आला पाहिजे. पण मग तो ‘रिलिजन’ या अर्थाने धर्म असू शकणार नाही. तो ‘धारयति इति धर्म’ एवढाच असेल. त्यात नियम असतील, पण बंधने असणार नाहीत, बंधनांच्या ऐवजी कर्तव्ये असतील. त्यात सत्य असेल, पण असत्याला थारा असणार नाही. त्यात उच्च-नीचता किंवा वरिष्ठ-कनिष्ठ असा भेदभाव नसेल.

कार्ल हेन्रीच ब्लोच (१८३४ - १८९०) या चित्रकाराने काढलेले ‘सर्मन ऑन द माऊण्ट’ हे चित्र     येशू ख्रिस्ताचा संदेश मुळात प्रेमाचा संदेश आहे. त्याचे प्रसिद्ध ‘टेकडीवरचे प्रवचन’ (सर्मन ऑन द माऊण्ट) तर माझ्या मनाला नेहमीच भुरळ घालत आलेले आहे. त्यातले महत्त्वाचे वाक्य – ‘ब्लेस्ड आर दे मीक, फॉर देअर्स इज द किंग्डम ऑफ हेवन’ आणि तुकाराममहाराजांच्या अभंगातली ओळ – ‘जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा’ या दोहोंमधे साम्य आहे.

     तसेच, ख्रिस्ती धर्माच्या परंपरेमधे प्रचंड सेवावृत्ती आहे. त्यामधे रुग्णसेवेपासून ते इतर अनेक प्रकारच्या सेवांचा अंतर्भाव आहे. जगाच्या इतिहासामधे जी सेवावृत्ती जोपासली गेली, त्यातली बरीचशी ख्रिस्ती धर्मपंरपरेतून आली आहे.

     माझ्या आयुष्यामधे लहानपणी, ‘धर्म’ या शब्दाशी माझी पहिलीवहिली ओळख झाली, ती साने गुरुजींच्या प्रार्थनागीतामधून. तेव्हा ठाण्यामधे एका शाळेमधे दर रविवारी साने गुरुजी कथामाला असायची. तिथे छानछान गोष्टी सांगितल्या जायच्या. गोष्ट सांगितली जाण्यापूर्वी साने गुरुजींचे ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ हे प्रार्थनागीत म्हटले जायचे. त्यामध्ये धर्म हा शब्द पहिल्यांदा माझ्या कानांवर पडला.

     पुढे, तरुणपणी मला वेदवाङ्मयाबद्दल आकर्षण व प्रेम वाटू लागले आणि त्यातून मी प्रखर हिंदुत्वप्रेमी पण हिंदुत्ववादी नव्हे – प्रेमी असणे आणि वादी असणे यांत फरक आहे – बनलो. पण माझे ‘अमेरिकन हिंदुत्व’ भारतातल्या पारंपरिक हिंदुत्वापेक्षा वेगळे आहे आणि वेदवाङमयाचा मला भावलेला मथितार्थदेखील पारंपरिक अर्थापेक्षा वेगळा आहे.

     मला खूपदा असे वाटते, की गेली अनेक वर्षे अमेरिकेमध्ये मी इण्टरफेथ या क्षेत्रामधे जे कार्य केले, तो साने गुरुजींच्या, लहानपणी मनावर बिंबवल्या गेलेल्या प्रार्थनागीताचा अपरिहार्य परिणाम होता.

     विल्यम लॉबडेल जर कधी मला भेटला, तर न्यू यॉर्क इण्टरफेथ काऊन्सिलचा सदस्य या नात्याने मी त्याला सांगीन, की तू जरी देव आणि धर्म सोडलेला असलास, आणि तू स्वत: कॅथलिक ख्रिस्ती धर्मामधे पुन्हा गेलास किंवा न गेलास, तरीदेखील तू या पुस्तकाच्या जोडीला ख्रिस्ती धर्मातल्या येशू ख्रिस्ताच्या मूलभूत शिकवणुकीमधल्या चांगल्या गोष्टी सांगणारे आणखी एक पुस्तक लिही. कारण तू पत्रकार आहेस आणि लेखनामधे समतोल राखणे हे कुठल्याही पत्रकाराचे आद्य कर्तव्य आहे.

विल्‍यम लॉबडेल याचा ब्‍लॉग वाचण्‍यासाठी येथे क्लिक करा.

अनिलकुमार भाटे
निवृत्त प्राध्यापक
विद्यृत अभियांत्रिकी, संगणक विज्ञान, माहिती तंत्रविज्ञान आणि मॅनेजमेन्ट
एडिसन शहर, न्यू जर्सी राज्य, अमेरिका
इमेल : anilbhate1@hotmail.com

About Post Author