धनंजय पारखे – चित्रकलेतील सामाजिक कार्यकर्ता

carasole

सोलापूर जिल्ह्यात कुर्डूवाडी येथे राहणारे धनंजय व सुनीता पारखे हे कुटूंब सर्वसामान्य जीवनात स्वत:मधील असामान्यत्व जपणारे, प्रतिकूल परिस्थितीतही त्यांच्यापुरते न पाहता आजुबाजूच्या समाजालाही कवटाळू बघणारे आहे.

धनंजय अरुण पारखे यांचा जन्म 28 मे 1976 चा. कुर्डूवाडी इथला. त्‍यांच्‍या वडिलांचे नाव अरुण बाबुराव पारखे. वय चौ-याहत्तर वर्षे. ते रेल्वे वर्कशॉप, कुर्डुवाडीमधून सर्व्हिस पूर्ण करून निवृत्त झाले. आई निर्मलाबाई ही गृहिणी.

धनंजय पारखे यांचे शिक्षण अकरावीनंतर चित्रकलेच्या ए.टी.डी या दोन वर्षांच्या कोर्सचे एक वर्ष पूर्ण, दुसरे वर्षं अपूर्ण. सध्या व्यवसाय वॉलपेंटिंग. पत्नी सुनीता आणि दोन अपत्ये – धनश्री आणि ओम हे कुटुंब. धनंजय पारखे यांची व्यावहारिक ओळख एवढीच. पण त्यांच्या व्यक्तित्त्वाला काही अनोखे पैलू आहेत. म.म. देशपांडे यांच्या कवितेप्रमाणे,

‘सारा अंधारच प्यावा अशी लागावी तहान
एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण’

असे त्यांच्या वृत्तीचे वर्णन करता येईल.

धनंजयच्या हातातच कला आहे. त्यांना रंग आणि रेषा यांची उपजत जाण आहे. धनंजय यांनी चित्रकलेतील अधिकृत शिक्षण न घेताही, ते केवळ पाहून पाहून चित्रे, रेखांकने करत असत. वेड लागल्यासारखे स्केचेस करत बसत आणि एके दिवशी, त्यांच्या शाळेतील कलाशिक्षकांची नजर त्यांच्या चित्रकलेच्या वहीवर पडली! ते चमकलेच. त्यांनी या मुलाच्या हातात जादू आहे हे ओळखले. छोट्या धनंजयच्या पाठीवर पडलेली ती पहिली शाबासकीची थाप!

धनंजयने सातवी-आठवीत गायकवाडसर, उत्पादसर यांच्या मार्गदर्शनाखाली एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या परीक्षा दिल्या. धनंजय म्हणतात,”खेड्यात त्या दोन्ही शिक्षकांनी माझ्यातील कलेची ज्योत तेवती ठेवली.”

धनंजय यांना दहावीनंतर चित्रकलेतील शिक्षण घेण्याची इच्छा होती, पण वडिलांना त्यांची ती’नसती थेरं’ मान्य नव्हती. “चित्र काढून पोट भरतं का?” ते करवादायचे. त्यांच्या धाकाने धनंजय यांनी के.एन. भिसे आर्टस् कॉलेजमध्ये अकरावीला चाकोरीबद्ध आणि चाकरी देणा-या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला. पण अभ्यासात त्यांचे लक्ष लागेना. शेवटी, आईचा वशिला लावून त्यांनी वडिलांची परवानगी मिळवली आणि उस्मानाबादमधील गुरुकुल चित्रकला महाविद्यालय येथे ए.टी.डी. या दोन वर्षांच्या कोर्ससाठी प्रवेश घेतला. तेथे धनंजय यांना चित्रकलेचे विविध पैलू समजू लागले. ज्ञानाचा अफाट सागर समोर दिसत होता. भारतातील आणि जगातील चित्रकार, त्यांच्या विविध चित्रशैली, चित्रकलेतील विविध प्रवाह, चित्रे काढण्याची विविध माध्यमे, चित्रकलेचा इतिहास…! पण हाय रे, दुर्दैव! दुस-या वर्षी वडिलांचे मन पुन्हा बदलले. त्यांनी धनंजय यांना फीचे पैसेच दिले नाहीत!

धनंजय कॉलेज सोडल्यानंतर अस्वस्थ असायचे. मग वेगवेगळ्या गणेश मंडळांना भेटी देणे, ग्रामीण भागातील शाळांमध्ये जाणे, चित्रकला शिक्षकांशी संपर्क करणे, विविध चित्रकारांची आणि त्यांच्या कामाची माहिती मिळवणे, चित्रकलेची प्रदर्शने पाहण्यास जाणे अशा विविध कृतींमधून धनंजय पारखे त्यांच्या ध्येयापर्यंत जाण्याचा प्रयत्न करू लागले.

चित्रकलेच्या ध्यासाने धनंजय पारखे झपाटलेले होते, तर त्यांचे वडील धनंजय यांनी शिक्षण अपूर्ण सोडल्याने धनंजय यांच्यावर नाराज होते. वडिलांना वाटायचे, मुलगा त्यांचे ऐकत नाही, तो वाया गेला! ते धनंजय यांचा राग करत. त्यामुळे त्यांना टाळण्यासाठी धनंजय दिवसभर घराबाहेरच राहत.

धनंजय पारखे यांना त्यातच समाजासाठी काही तरी केले पाहिजे असे वाटू लागले व त्या ओघात त्यांची1999 मध्ये सुनीता मोरे या मुलीशी ओळख झाली. सुनीता मोरे हीदेखील गरीब घरातील मुलगी होती. तिच्या डोक्यावरचे पित्याचे छत्र हरपले होते. तिची आई मोलमजुरी करून कशीबशी तिला सांभाळत होती. तिने सुनीताला दहावीपर्यंत शिकवले होते. पण त्या परिस्थितीत तिच्या लग्नाचे पाहणे आईला अशक्य होते. धनंजय यांनी ती सारी परिस्थिती जाणली आणि विचार केला… त्यांनी तिच्याशी लग्न केले तर तिला त्यांचा आधार होईल. त्यांनाही तिचे प्रेम मिळेल. पण सुनीता मराठा होती. दोघांच्याही घरून लग्नाला विरोध झाला. सुनीताच्या आईचे काही म्हणणे नव्हते, पण चुलते वगैरे इतर नातेवाईक यांनी तिला बोल लावला.

शेवटी, धनंजय यांनी सर्वांचा विरोध मोडून काढून सोलापूर येथील कोर्टात लग्न केले. त्यांच्या वडिलांनी तो विवाह स्वीकारला नाही. मुलांशी मात्र आजोबांचे चांगले नाते आहे असे सुनीता यांनी सांगितले.

लग्नामुळे धनंजय पारखे घरापासून स्वतंत्र झाले. उपजीविकेसाठी मिळेल ते काम करू लागले. मात्र संध्याकाळी घरी आले, की रेखांकन, पेंटिंग्ज, स्केचेस, भित्तिचित्रे, पोर्ट्रेट्स तयार करणे हे सुरूच राहिले. नंतर त्यांनी मित्रांच्या सहाय्याने वॉलपेंटिंग्जची कामे सुरू केली. दरम्यान, त्यांना दोन अपत्ये झाली – धनश्री (सध्या नववीत) आणि ओम (दुसरीत).

धनंजय आणि सुनीता, दोघांनाही सामाजिक कामाची आवड. चित्रकलेच्या माध्यमातून समाजसेवा करावी असे पारखे यांच्या मनाने घेतले आणि काही संस्थांमार्फत ते ग्रामीण भागातील मुलांमधील कलागुणांचा विकास साधण्यासाठी काम करू लागले.

पारखे यांचा स्वत:चा संसार ओढगस्तीचा. त्यात दोन मुलांचे शिक्षण. परंतु तरीही, पारखे दांपत्य स्वत:च्या खिशाला खार लावून चित्रकलेच्या क्षेत्रात काम करत आहे. मध्यंतरी, ऑगस्ट 2014 मध्ये त्यांनी श्री संत नरहरी सोनार बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून गणेशमूर्ती रंगभरण स्पर्धा आयोजित केली. त्यात दोनशेसत्तर मुलांनी नाव नोंदणी केली. एवढ्या मुलांना रंगवण्यासाठी गणेशमूर्ती द्यायच्या होत्या. पारखे कुटुंब कामाला लागले. पारखे यांनी सामान आणले, सुनीताने मूर्ती बनवल्या आणि त्यांचे मोफत वाटप मुलांमध्ये केले. स्पर्धा अपेक्षेपेक्षाही चांगली झाली. समाजाकडून चांगला प्रतिसाद मिळाला. स्थानिक वर्तमानपत्रांनी घटनेची विशेष नोंद घेतली, बातम्या झळकल्या. त्या आनंदात घरात किराणा सामानाला कात्री लागली. ह्या दु:खाचाही त्यांना विसर पडला. पारखे स्वत:हून संस्थांशी, शाळांशी संपर्क करतात. मुलांमध्ये चित्रकलेची आवड निर्माण व्हावी म्हणून त्यांच्याशी गप्पा मारतात. त्यांना चित्रे काढण्याला प्रेरणा देतात. समाज धनंजय व सुनीता या दांपत्याकडे आदराने पाहतो आहे तो त्यांच्या कामामुळे. त्यांच्या समाजासाठी धडपडण्याच्या तळमळीमुळे.

सुनीता महिलांमध्ये काम करते. ती महिलांच्या वैयक्तिक जीवनात जागृती यावी यासाठी ती बायकांशी कायम बोलत असते. ती म्हणते, “स्त्रियांमध्ये चांगले गुण असतात. पण त्यांना त्यांच्या विकासासाठी असलेल्या योजनांची माहिती नसते.” तशी माहिती देऊन महिलांना त्यांच्या हक्कांबाबत जागरूक करण्याचे काम सुनीता करते.

धनंजय पारखे यांना लोक ‘चित्रकलेतील समाज कार्यकर्ता’ म्हणून ओळखतात. परंतु पारखे यांची झेप मोठी आहे. त्यांना जवळच असलेले पारितेवाडी हे गाव दत्तक घ्यायचे आहे. तेथे वैयक्तिक आणि परिसर स्वच्छतेचे मूल्य रुजवायचे आहे, शिक्षणाचे महत्त्व पटवायचे आहे. गरीब आणि गरजू मुलांना, अपंग मुलांना शैक्षणिक साधने पुरवायची आहेत, आबालवृद्धांसाठी आरोग्याचे काम करायचे आहे. परितेवाडी सर्व दृष्टीने समृद्ध आणि सुसंस्कृत होईपर्यंत तेथेच काम करायचे असे पारखे यांनी ठरवले आहे. धनंजय आणि सुनीता खूप स्वप्ने पाहत आहेत. धनंजय अजून चाळीशीतही पोचलेले नाहीत, त्यामुळे त्यांचे तरुण वय स्वप्नांना साकार रूप मिळण्याबाबत प्रचंड आशावादी आहे.

धनंयज पारखे
7841053390

–  अंजली कुळकर्णी

About Post Author

3 COMMENTS

  1. lay lay lay lay lay lay …..
    lay lay lay lay lay lay …………………………………………………bhari.

Comments are closed.