‘दोस्ती का पैगाम’

_dosti_ka_paigam

माझा माणसाच्या उपजत चांगुलपणावर विश्वास आहे. प्रत्येक माणूस हा चांगला असतो किंवा चांगला असण्याचा प्रयत्न कायम करत असतो. अगदी लहान मुलेसुद्धा त्यांना ‘गुड बॉय’ म्हटले जावे म्हणून इंजेक्शन न रडता घेण्यासही तयार होतात; निदान तसा प्रयत्न करतात असा माझा बालरोगतज्ज्ञ म्हणून रोजच्या व्यवहारातील अनुभव आहे. मी आणि सविता (माझी पत्नी, जी सर्जन आहे) मुंबईजवळ बदलापूरला राहतो. तेथेच तीस वर्षांपासून वैद्यकीय व्यवसाय करतो. त्या तीस वर्षांत बदलापूर प्रचंड वाढले. आम्ही मुळात खेडेवजा त्या गावाचे शहरात रूपांतर होताना जवळून पाहिले. ते देशभरातील वेगवेगळ्या भागांतून पोटापाण्यासाठी स्थलांतरित होऊन आलेल्या माणसांच्या रेट्यामुळे घडले होते. ती वेगवेगळ्या मातृभाषा असलेली, वेगवेगळ्या जाती-धर्मांची माणसे एकत्र राहताना, एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होताना, एकमेकांचे सण साजरे करताना; त्याच प्रमाणे एकमेकांना अवघड प्रसंगी मदत करतानाही पाहिली. काही जणांनी त्यांच्या भाषेच्या नव्हे तर जातीच्या; किंबहुना धर्माच्याही पलीकडील जोडीदार निवडून आनंदाने संसार केलेले पाहिले आहेत. ते सगळे पाहत असताना माणसाच्या अंगभूत चांगुलपणावरचा, माणुसकीवरचा विश्वास वाढत गेला. असे लक्षात येऊ लागले, की सर्वसामान्य माणसे चांगली असतात, चांगली वागतात; पण जेव्हा काही लोक, त्यांचे हितसंबंध जपण्यासाठी, जोपासण्यासाठी त्यांना बहकावतात, तेव्हा त्या माणसांचे झुंडीत रूपांतर होते आणि मग ती एकमेकांशी भांडू लागतात. तसे हितसंबंधी लोक म्हणजे राजकीय किंवा धार्मिक पुढारी असू शकतात; पत्रकार, मीडियावाले, अतिरेकी देशभक्त, दहशतवादी लोक किंवा अगदी सैन्यसुद्धा सर्वसामान्य माणसांची वैयक्तिक, स्वाभाविक चांगुलपणाची मते बदलून त्यांचे एकमेकांचा द्वेष करणाऱ्या झुंडीत रूपांतर करू शकतात. अन्यथा कोणत्याही सामान्य माणसाला, दुसऱ्या व्यक्तीचे काही वाईट व्हावे असे वाटत नाही. अपघातात सापडलेल्या माणसाकडे पाहून कोणीही सामान्य माणूस हळहळतोच! मग अपघातात सापडलेल्या व्यक्तीचा धर्म, प्रांत, देश कोणताही असो!

हे ही लेख वाचा – 
फाळणी ते फाळणी – पाकिस्तानविषयक नवी दृष्टी
भारत-पाकिस्तान संबंधांचे भविष्य?
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे!

मला भारत आणि पाकिस्तान या दोन देशांतील जनतेच्या एकमेकांमधील नात्यांबद्दल नेहमी कुतूहल वाटत आले आहे. पाकिस्तानमध्ये जाऊन आलेल्या लोकांनी तेथील प्रेमळ आदरातिथ्याबद्दल बोललेले, लिहिलेले, वाचलेले, ऐकलेले असते. भारतीय लोकांनी गुलाम अली, मेहदी हसन, राहत फतेअली, शफाकत अमानत, अबिदा परविन या सगळ्यांना डोक्यावर घेतलेलेही सर्वांना माहीत आहे. मग हे शत्रुत्व येते कोठून? दोन्हीकडील सर्वसामान्य माणसांचे हितसंबंधी प्रभाव दूर सारले तर सारखीच भाषा, सारखीच कलासक्ती असणाऱ्या दोन्ही देशांतील लोकांमध्ये एकमेकांबद्दल असलेला आपलेपणा वृद्धिंगत करता येईल. ती जर लोकचळवळ होऊ शकली तर दोन्हीकडील राजकीय, धार्मिक पुढाऱ्यांना व इतर हितसंबंधीयांना त्या लोकचळवळीपुढे नमते घेण्यास भाग पाडता येईल.

मला माझ्यापरीने अशा लोकचळवळीसाठी जे करता येईल ते करायचे होते. मग मी गझल लिहिण्यास शिकलो. जमेल तशा गझला उर्दू/हिंदीमध्ये भारत-पाक़िस्तान संबंधांवर लिहिल्या, चाली लावून बसवल्या. माझा तो सगळा खटाटोप चालू होता तेव्हाच ‘रोटरी’तर्फे मुंबईहून पाकिस्तानात ‘पीस मिशन’ नेण्याचे ठरत होते. आम्ही उभयतांनीही त्यात सहभागी होण्याचे ठरवले. आम्ही सरहद्दीपलीकडे जाऊन तेथील लोकांसमोर गझला गाणार होतो. तारखा ठरल्या, बुकिंगसाठी चेक्स देऊन झाले. पण त्यानंतरच्या पुढील आठवड्यातच बेनझीर भुत्तो यांची हत्त्या झाली आणि आम्हाला व्हिसा मिळणे शक्य झाले नाही. आमची मोहीम बारगळली! वाईट वाटले. मी ज्या काही गझला केल्या होत्या त्या रेकॉर्ड केल्या आणि ती सी.डी. कपाटात ठेवून दिली. त्या गोष्टीला काही महिने होऊन गेले आणि एक मजेशीर घटना घडली. मी पुण्याच्या ‘बाजा गाजा’ महोत्सवाला गेलो होतो. तेथे एका स्टॉलवर एका डॉक्युमेंटरीची डीव्हीडी पाहण्यात आली. त्याचे नाव होते- ‘खयाल दर्पण’. ती डीव्हीडी दिल्लीच्या ‘एकतारा’ या संस्थेने प्रकाशित केली होती. ती डॉक्युमेंटरी चित्रित आणि दिग्दर्शित केली _dosti_ka_paigamहोती युसुफ सईद नावाच्या दिल्लीला राहणाऱ्या एका व्यक्तीने. त्यांच्या संशोधनाचा विषय ‘ज्याला हिंदुस्तानी संगीत म्हणतात, त्याचे फाळणीनंतर पाकिस्तानात काय झाले’? हा होता. ते काही महिने पाकिस्तानमध्ये जाऊन राहिले, वेगवेगळ्या लोकांना भेटले, त्यांच्या मुलाखती घेतल्या, त्या चित्रित केल्या. त्यांनी त्या सगळ्याची एक सुंदर डॉक्युमेंटरी फिल्म केली, तीच ‘खयाल दर्पण’.

मी ती घरी येऊन अधाशासारखी पाहिली. त्यात माझ्या अपेक्षांपलीकडील बरेच काही होते. पाकिस्तानात फाळणीनंतर हिंदू देवदेवतांची नावे असलेल्या बंदिशी गाण्यावर, हिंदू देवांची नावे असलेले राग गाण्यावर बंदी आणली गेली, पण कलाकारांनी त्या दडपशाहीला झुगारून देण्याचे ठरवले. कलाकार रागांची नावे, परंपरेनुसार चालत आलेल्या बंदिशींचे शब्द हा कलेच्या इतिहासाचा भाग आहे, त्यात बदल करणे योग्य नव्हे अशी भूमिका घेऊन भांडले, भूमिगत झाले. ती गोष्ट ‘खयाल दर्पण’मध्ये सविस्तर आली आहे. मला युसुफ सईद यांची हितसंबंधीयांविरुद्ध उभ्या ठाकलेल्या त्या कलाकारांबद्दलची तळमळ जाणवली आणि वाटू लागले, की त्यांना आपली सी.डी. ऐकवली पाहिजे. त्यांच्या संस्थेचा (एकतारा) पत्ता ‘खयाल दर्पण’च्या डीव्हीडीवर होता. मी माझी सी.डी. तेथे कुरिअर करून ‘दोस्ती का पैगाम’ पाठवून दिला. पैगामबद्दलची पूर्वपीठिका विषद करणारे मेलसुद्धा लिहिले. मला फार काळ वाट पाहवी लागली नाही. त्यांचे दुसऱ्याच दिवशी उत्तर आले- ‘आम्ही ती सीडी प्रकाशित करू इच्छितो’ आनंद तर झाला होताच, पण मला आश्चर्याचा धक्का बसला होता. मी कळवले- ‘आमच्या कामात व्यावसायिक सफाईदारपणा नाही.’ त्यांचे लगेच उत्तर आले- ‘तीच तर तुमची सर्वांत मोठी जमेची बाजू आहे! सर्वसामान्य माणसाने मनापासून सामान्य माणसाला घातलेली ती साद आहे. ती सीडी आम्हाला आहे त्याच स्वरूपात प्रकाशित करायची आहे.

‘युसुफ सईद यांच्या पुढाकाराने ‘एकतारा’कडून ‘दोस्ती का पैगाम’ प्रकाशित झाला. मला त्याच्या काही प्रती (वीस) पाकिस्तानात पाठवल्या गेल्याचेही सांगण्यात आले. मला आश्चर्याचे धक्के त्यापुढेच बसले. मला फेसबुकवर ‘फरजाद नबी’ नावाच्या व्यक्तीकडून फ्रेंड रिक्वेस्ट आली. मी त्या व्यक्तीला ओळखत नव्हतो. मी फेसबुकवर फरजाद नबींचा प्रोफाइल बघितला. ते लाहोरमधील सिनेदिग्दर्शक होते (त्यांचा पुढे ‘जिंदा भाग’ हा चित्रपट पाकिस्तानकडून ऑस्करसाठी पाठवला गेला).  मला फार आनंद झाला. मी फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली आणि त्यांना कळवले, I do not know you sir, but it simply means that our paigam has reached you! (‘मी तुम्हाला ओळखत तर नाही. पण आमचा ‘पैगाम’ बहुधा तुमच्यापर्यंत पोचला असावा’!) त्यांचे लगेच उत्तर आले. ‘हाँ जी, सर, पहुँच गया, बहुत शुक्रिया!’ मला माझ्या इंग्लंडमधील भावाने दुसऱ्या दिवशी ‘द न्यूज इंटरनॅशनल’ नावाच्या लाहोरहून प्रसिद्ध होणाऱ्या वृत्तपत्राच्या ई-आवृत्तीची लिंक पाठवली. त्यात ‘दोस्ती का पैगाम’बद्दल सविस्तर लेख आला होता. आमच्या सीडीच्या कव्हरवरील मजकुराचा आधार घेत एक मोठा लेख प्रसिद्ध करण्यात आला होता. मी त्याबद्दल धन्यवाद देण्याकरता युसुफ सईद यांना फोन केला. पण त्यांना तो लेख प्रसिद्ध झाल्याचे ठाऊकही नव्हते! तो लेख ज्याच्यापर्यंत आमचा ‘पैगाम’ पोचला _jawadekar_familyतशा कोणा पाकिस्तानी व्यक्तीने स्वत: नामानिराळे राहत ‘दोस्ती का पैगाम’ अधिकाधिक पाकिस्तानी लोकांपर्यंत पोचावा म्हणून लिहिला आणि प्रसिद्ध केला होता. पुन्हा, सर्वसामान्य माणसाच्या मनात वसणाऱ्या स्थलकालनिरपेक्ष निखळ चांगुलपणाबद्दलची ही पावती होती.

चांगुलपणा प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात असतोच. माणसाच्या अंतर्मनातील या चांगुलपणाची जाणीव प्रत्येकाला उघडपणाने असते असे नाही. आपल्या आणि सगळ्यांच्याच चांगुलपणाची जाणीव प्रत्येकाला करून देणे, बहकावणाऱ्या हितसंबंधी लोकांच्या आहारी न जाण्याइतपत आत्मभान प्रत्येकामध्ये निर्माण करणे हे आपण सुबुद्ध, संवेदनाशील माणसे यशस्वीपणाने करू शकलो तर बरेच प्रश्न सुटायला मदत होईल.

– योगेंद्र जावडेकर
yogendra_jawadekar@yahoo.co.in

About Post Author

1 COMMENT

Comments are closed.