दोन अनुभव

0
144

समाजाच्‍या दोन बाजू दाखवणारे अनुभव एकाच आठवड्यात आले. आपण कोणत्‍या बाजूचे हा सद्यकालात महत्‍त्‍वाचा प्रश्‍न आहे. सर्वसाधारणपणे असे म्‍हणता येईल, की सकारात्‍मक प्रयत्‍न सुरू केली, तर तिला सकारात्‍मक प्रतिसाद येतो. सध्‍या सर्वत्र बकाल गोष्‍टी प्रसृत करण्‍याकडे कल दिसत असताना समाजात घडणा-या सकारात्‍मक घटना-विचारांना प्राधान्‍याने स्‍थान द्यायचे आणि त्‍याद्वारे समाजधारणेला गती द्यायची, हा ‘थिंक महाराष्‍ट्र’चा संकल्‍प आहे. नव्‍या वर्षात त्‍याला दुजोरा देत आहोत.
एका स्‍नेह्याने मुंबई उपनगरातील हकिगत सांगितली. त्‍यांच्‍या परिचिताकडे ही घटना घडली. सत्‍यघटना. लग्‍न झाल्‍या निमित्‍ताने या व्‍यक्‍तीने लॉकरमधून सासू, दोन सुना, यांचे नव्‍वद तोळ्याचे सोन्‍याचे दागिने घरी आणून ठेवले. काही कारणाने घरच्‍या सर्व मंडळींना तातडीने बाहेर जावे लागले. लग्‍न दुस-या दिवशीच होते. परंतु, तेवढ्या तासा-दिडतासाच्‍या घरी कोणी नसण्‍याच्‍या अवधीत ते दागिने चोरीला गेले. लग्‍नघरात एकच कल्‍लोळ माजला. स्‍वाभाविकच मंडळीत पोलिस ठाण्‍यात तक्रार नोंदवून आली. आठवडाभर पोलिस ठाण्‍यात चकरा झाल्‍या. अखेरीस मंडळींना उलगडा झाला तो असा, की पोलिस निरीक्षकांना दहा-पंधरा टक्‍के रक्‍कम मिळाली तरच ते चोरीच्‍या मालाचा शोध घेतील!

योगायोग असा, की अण्‍णा हजारे यांचे आंदोलन गले काही महिने तीव्र होत आहे; एवढेच नव्‍हे तर त्‍यांचे बीएमएमआरडीए मैदानावरील उपोषण चालू असताना ही घटना घडली.
आता दुसरी घटना. लोकसत्‍ता वर्तमानपत्रात 30 डिसेंबर 2011 रोजी प्रसिद्ध झालेले हे पत्र.

‘माझा भाऊ ब्रिजेश याची किडनी फेल झाल्‍यामुळे त्‍याला मूत्रपिंड बदलाची शस्‍त्रक्रिया आवश्‍यक ठरली. त्‍याच्‍या पत्‍नीने स्‍वतःची किडनी देण्‍याची तयारी दाखविली, तरीही ऑपरेशनसाठी लागणारा काही लाखांचा खर्च आम्‍हाला झोपणारा नसल्‍याने आम्‍ही मुख्‍यमंत्री निधीतून आर्थिक मदतीसाठी मंत्रालयात अर्ज केला. पाठपुराव्‍यासाठी मी मंत्रालयाच्‍या सहाव्‍या मजल्‍यावर मुख्‍यमंत्री कार्यालयात पोहोचलो. तेथील एका अधिक-याला भेटून भेटून मदतीची गरज सांगितली. त्‍यांनी हे काम बघणारे अधिकारी फळणीकर यांना फोन केला. मी नाशिकला परतलो तो असा विचार करूनच की मुख्‍यमंत्र्यांकडे अर्ज केला, पण हे काम झाले तरी किती काळ लागेल आणि प्रत्‍यक्षात हातात पैसे किती मिळतील… मात्र पुढच्‍याच आठवड्यात पेशंटच्‍या नावाने रुग्‍णालयाकडे पंचवीस हजारांचा चेक जमा झाल्‍याचे समजले! आजकाल सरकारी कामे कशी होतात हे नव्‍याने सांगायला नको. पण ‘तसे’ काहीही न घडता काम झाले. याच प्रकरणासाठी मुंबईच्‍या सिद्धीविनायक ट्रस्‍टकडेही अर्ज केला होता. पंधरा दिवसांतच फोन आला की चेक घेऊन जा. माझ्यासारख्‍या सामान्‍य माणसांना हे दोन्‍ही अनुभव धक्‍का देणारे पण आनंददायी आहेत.’

– गणेश माळी, नाशिक.

दोन वेगवेगळे अनुभव आपल्‍यासमोर एका आठवड्यात आले. आपण कोणत्‍या बाजूचे हा सद्यकालात महत्‍त्‍वाचा प्रश्‍न आहे. सर्वसाधारणपणे असे म्‍हणता येईल, की सकारात्‍मक प्रयत्‍न सुरू केली, तर तिला सकारात्‍मक प्रतिसाद येतो. सध्‍या सर्वत्र बकाल गोष्‍टी प्रसृत करण्‍याकडे कल दिसत असताना समाजात घडणा-या सकारात्‍मक घटना-विचारांना प्राधान्‍याने स्‍थान द्यायचे आणि त्‍याद्वारे समाजधारणेला गती द्यायची, हा ‘थिंक महाराष्‍ट्र’चा संकल्‍प आहे. नव्‍या वर्षात त्‍याला दुजोरा देत आहोत.

– संपादक

thinkm2010@gmail.com

About Post Author

Previous articleसत्यदेव दुबे आणि राजकारण
Next articleआपली उपकरणं!
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.