देशभक्त डॉ. कृ. भि. अंत्रोळीकर

1
34
carasole

स्वातंत्र्याच्या रणसंग्रामात दक्षिण कसबा पेठेतील अनेक दिग्गजांनी त्यांच्या प्राणाची बाजी लावून आपला ठसा उमटवला आणि देश स्वतंत्र झाला. त्याच पेठेतील देशभक्त डॉ. कृ. भि. अंत्रोळीकर यांनी त्यांच्या जाज्वल्य देशप्रेमाने सोलापूरच्या इतिहासात त्यांचे नाव अजरामर केले आहे.

डॉ. कृष्ण भीमराव तथा भाऊकाका अंत्रोळीकर हे थोर देशभक्त, स्वातंत्र्यलढ्यातील आघाडीचे नेते आणि निष्णात डॉक्टर होते. त्यांचा जन्म ११ डिसेंबर १८९७ रोजी अंत्रोळी (ता. दक्षिण सोलापूर) येथे झाला. प्राथमिक शिक्षण विंचूर आणि सोलापूर येथे झाले. त्यांनी तळेगावच्या समर्थ विद्यालयातून मॅट्रिक झाल्यानंतर पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पुढे त्यांनी एम. बी. बी. एस. होण्यासाठी मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. गांधीजींच्या विचारांनी भारावून गेलेल्या डॉ. अंत्रोळीकरांनी शिक्षण अर्धवट सोडून स्वातंत्र्यचळवळीत उडी घेतली. परंतु थोरले बंधू व साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांनी समजूत घातल्यावर त्यांनी एम.बी.बी.एस.ची परीक्षा देऊन ते १९१२ साली डॉक्टर झाले व सोलापुरात आले.

ते सोलापुरात आल्यावर त्यांची कामगारांमधील जनजागृतीच्या कार्यातून राजकारणास सुरुवात झाली. ब्रिटिश सरकारने मार्शल लॉ च्या काळात अटकसत्र सुरू केले, त्यावेळी डॉ. अंत्रोळीकर भूमिगत झाले. त्यांच्याविरुद्ध पकड वॉरंट काढण्यात आले. त्यांचे घर आणि शेती, सर्व जप्त करण्यात आले. ते मार्शल लॉ उठवल्यानंतर कोर्टात हजर झाले. त्यावेळी त्यांना चौदा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. परंतु लगेच, गांधी-आयर्विन करारानुसार त्यांची सुटका करण्यात आली. ते सुटका होऊन परत आले, तेव्हा त्यांच्या स्वागताची सभा सोलापुरात झाली. त्यावेळी बारा हजार लोक उपस्थित होते. पुन्हा लगेच, त्यांना १९४२ च्या ‘चले जाव’च्या चळवळीतील सहभागाबद्दल अटक झाली. स्वातंत्र्यानंतर मुंबई राज्याच्या मंत्रिमंडळात आरोग्यमंत्री म्हणून त्यांचे नाव निश्चित करण्यात आले होते, पण पक्षात मतभेद नको म्हणून त्यांनी डॉ. गिल्डर यांचे नाव सुचवले. डॉ. अंत्रोळीकर महाराष्ट्र काँग्रेसचे चिटणीस अनेक वर्षे होते. अखिल भारतीय काँग्रेसचे सदस्य तसेच संयुक्त महाराष्ट्र समितीचे उपाध्यक्ष होते. ‘इंटक’च्या स्थापनेत खंडूभाई देसाई, गुलजारीलाल नंदा व डॉ. अंत्रोळीकर यांचा मोठा वाटा होता.

त्यांचे पुत्र मोहन कृष्ण अंत्रोळीकर हे काँग्रेसच्या माध्यमातून क्रियाशील आहेत. त्यांच्या पत्नी सुजाता अंत्रोळीकर जिल्हा मध्यवर्ती बँकेत बारा वर्षे संचालक होत्या. पुढची तिसरी पिढीही तिच्या परीने सामाजिक कार्यात सक्रिय आहे.

देशभक्त कृ. भि. अंत्रोळीकरांनी स्वातंत्र्यासाठी कार्य करणाऱ्या क्रांतिकारकांनाही मदत केली. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील प्रसिद्ध असलेल्या मिरत कटाची पहिली गुप्त बैठक सोलापुरात अंत्रोळीकरांच्या घरात झाली होती. त्यावेळी ब्रिटिश कम्युनिस्ट नेते हॉकिन्स फिलिप्स फ्रॅड आणि चार्लस् हे गुप्तपणे सोलापूरला आलेले होते.

त्यांनी पं.जवाहरलाल नेहरुंनी १९२९ साली स्थापलेल्या ‘यूथ लीग’ची शाखा सोलापुरात सुरू केली. हुतात्मा अ. रसूल कुर्बान हुसेन स्वत:ला अंत्रोळीकरांचे शिष्य म्हणवून घेत, तर हुतात्मा जगन्नाथ शिंदे हे त्यांचे विश्वासू सहकारी होते. पं. नेहरूंशी त्यांचा परिचय १९३० साली पुण्याला ‘यूथ लीग’च्या अधिवेशनात झाला व तो शेवटपर्यंत टिकून राहिला.

■ सोलापुरात जगन्नाथ मोरेश्वर सामंत वकील व क्रांतिकारक कमलाकर सुमंत यांच्या प्रेरणेतून स्वातंत्र्यचळवळीत सहभाग.

■ १९२७ साली लक्ष्मी-विष्णू गिरणीत डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली संप. त्यामुळे महिन्याची शिक्षा. १९२८ साली पहिली गिरणी कामगार संघटना स्थापन.

■ मार्शल लॉ मोडण्यातील सहभागाबद्दल चौदा वर्षांची शिक्षा.

■ आयुष्याची दहा वर्षे तुरुंगात आणि तीस वर्षे ब्रिटिश सरकारच्या साम्राज्याशी लढण्यासाठी सार्थकी लागली.

(मूळ लेख दैनिक ‘लोकमत’)

About Post Author

1 COMMENT

  1. maharashta shasnane 13…
    maharashta shasnane 13 august 1949 roji k. b. antrolikar yanchya adhextekhali bhatkya vimukt jamatinchya samajik v aarthik stithicha aadava ghenya sathi 9 sadhasyanchi ek samiti stapan keli
    tya samiti badal vachayala awadel

Comments are closed.