देवानंद लोंढे – शून्यातून कोटी, कोटींची उड्डाणे

6
81

हिंगणगाव या छोट्याशा खेडे (तालुका कवठे महांकाळ, जिल्हा सांगली ) गावाचे नाव उद्योगक्षेत्रात गाजत आहे ते देवानंद लोंढे या तरुण उद्योजकामुळे.

गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकताना त्याला मिलिंद सगरे हा मित्र मिळाला. त्यानंतर गावातीलच ‘नारायण तातोबा सगरे हायस्कूल’ येथे शिक्षण घेतल्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरमधील गारगोटी येथील ‘आय.सी.आय.’ (इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल अँड रुरल इंजिनीयरिंग) मध्ये प्रवेश मिळाला. तेथील वसतिगृहात राहण्या-जेवणाचीही सोय झाली. देवानंद नाशिक येथे नोकरी करत असताना त्याची तेथे स्नेहल या मराठा समाजातील तरुणीची भेट झाली आणि त्यांचा आंतरधर्मीय मंगलपरिणय झाला.

हिंगणगाव येथील माळरानावर ‘लक्ष्मी जिनींग अँड प्रोसेसिंग’ नावाची संस्था कापडमिल चालवत होती. ती शासकीय अनुदानातून चालणारी मिल काही काळाने बंद झाली. बँकेच्या कर्जात बुडालेली मिल बँकेने ताब्यात घेतली. संस्थेवर कर्ज व व्याज मिळून वीस लाख रुपये झाले होते. ती मिल लिलावात निघाली. देवानंद यांनी मिल विकत घेतली. त्यांनी अनुप जेटिया या मित्राच्या सहकार्याने (हँड ग्लोव्हज् ) लोकरी हातमोजे निर्माण करण्याचा कारखाना काढला.

पाश्चात्य व पौर्वात्य प्रगत देशांत हातमोज्यांना खूप मागणी आहे एवढ्या माहितीच्या आधारे त्यांनी ही झेप घेतली व नंतर कष्ट अपार घेतले. अनुप जेटिया व देवानंद त्यासाठी चीन देशातील शांघाय येथे पोचले. त्यांनी तेथील अनेक कंपन्या फिरून पाहिल्या. त्यांना एका कंपनीने हातमोजे कसे बनवायचे याचे प्रशिक्षण दिले. तेथूनच त्यांनी एक मशीन खरेदी केले आणि त्यांच्या हिंगणगाव मुक्कामी आले.

ग्रामीण भागात हातमोजे बनवण्यासाठी महिला कर्मचाऱ्यांची आवश्यकता होती. सरपंच आणि महिला बचतगट यांच्याकडून प्रतिसाद मिळेना. घरचे काम व रोजंदारी बुडवून कोणी येईना, मग प्रत्येक कर्मचारी महिलेला प्रशिक्षण मजुरी म्हणून काही रक्कम (विद्यावेतन) ठरवली आणि नंतर चांगला प्रतिसाद मिळाला. तोवर पन्नास मशीन्स आयात केली होती आणि हातमोज्यांची कंपनी 5 मे 2008 रोजी सुरू झाली.

एप्रिल 2009 मध्ये बारा हजार हातमोज्यांचे जोड असलेला कंटेनर भरून हिंगणगावातून वाजत-गाजत मिरवणूक काढून निर्यातीसाठी जपानला निघाला. त्यानंतर दर महिन्याला ‘पयोद इंडस्ट्रीज’कडून हातमोज्यांचा एक कंटेनर निर्यात होत आहे.

‘पयोद इंडस्ट्रीज’मधील महिला कर्मचारी ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत अॅडव्हान्स म्हणून आगाऊ रक्कम घेतात, त्याचा देवानंद यांनी शोध घेतला तर त्या हिंगणगावात रानातील चिंचेची झाडे ‘बुक’ करतात व त्या झाडांवरील चिंचा काढून-फोडून, त्यातील बिया काढून गाभुळलेल्या चिंचा विकत असतात. त्यांना त्यातून पैसा मिळे. पुढे अशा चिंचांपासून पावडर, पेस्ट व सॉस बनवला जातो. जर तो उद्योग सुरू केला तर गावातील अनेक महिलांना अधिक फायदा होईल या दृष्टिकोनातून देवानंद यांनी ‘पयोद फूड प्रोसेसिंग युनिट’ उभारले. दरम्यान, ‘हँड ग्लोव्हज्’च्या मशीन गावातील शंभर घरांत वितरित केल्या आणि यंदा दोन हजार मशीन्स आयात करण्यात येत आहेत. ती घरोघरी पोचतील.

भारतीय दलित उद्योग संघटना ‘डिक्की’च्या माध्यमातून मुंबईत भरलेल्या प्रदर्शनात देशभरातील अनेक नामांकित उद्योगसमूहांचे प्रतिनिधी आले होते. त्यात ‘टाटा’ उद्योग समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी ‘पयोद इंडस्ट्रीज’च्या स्टॉलला भेट दिली. ते आनंदित झाले. त्यांच्यामुळे टाटांच्या देशभरातील उद्योगसमुहात ‘पयोद’चे हातमोजे वापरले जात आहेत. त्याशिवाय ‘फोर्बस’, ‘मार्शल’ आदी कंपन्यांनी ते उत्पादन स्वीकारले आहे.

हिंगणगावात सध्या ‘पयोद इंडस्ट्रीज’च्या माध्यमातून हातमोजे व ‘फूड प्रोसेसिंग युनिट’ कार्यान्वित आहे. यामुळे घराघरांत गॅस शेगडी, टी.व्ही., सीडी प्लेअर, सॅटेलाइट केबल कनेक्शन आले. त्यामुळे शहरात आणि हिंगणगावात फरक काय राहिला? देवानंद यांनी ‘हिंगणगाव पयोद सार्वत्रिक वाचनालय’ सुरू केले असून तेथे पाच हजार पुस्तके आहेत. दैनिक वर्तमानपत्रे येत असतात. या वाचनालयाचा गावकरी लाभ घेतात.

देवानंदच्या या कर्तबगारीला पार्श्वभूमी होती ती शिक्षणाची व त्यानंतर त्यांनी धाडसाने घेतलेल्या अनुभवांची व गावविकासासाठी असलेल्या तळमळीची. देवानंद लोंढे हे रूरल अँड सिव्हिल इंजिनीयरिंगची पदवी असलेले उद्योजक. त्यांनी उद्योजक होण्याआधी अठरा वर्षे आपत्ती व्यवस्थापनातील तज्ज्ञ म्हणून परदेशात काम केले होते. युनिसेफ, ऑक्सफॅम, रिलीफ इंटरनॅशनल अशा मान्यवर संस्थांसाठी सल्लागार म्हणून त्यांचा सहभाग गुजरात भूकंप, राजस्थान दुष्काळ, कारगील युध्दानंतर करण्यात आलेले आपत्ती व्यवस्थापन अशा महत्त्वपूर्ण कामांत होता. त्यातूनच आपण जगातील वेगवेगळया भागात आपत्ती निवारणासाठी काम करतो, मग आपल्या गावाच्या भल्यासाठी कधी काम करणार? हा विचार त्यांच्या मनात वारंवार येऊ लागला आणि एका क्षणी, देवानंद यांनी परदेशातून त्यांच्या गावात परत येण्याचा निर्णय घेतला.

देवानंद लोंढे यांना यशस्वी उद्योगपती म्हणून ‘आयबीएन-लोकमत’चा प्रेरणा पुरस्कार मिळाला आहे.

देवानंद लोंढे, 9822191233 

बबन लोंढे

(वृत्तरत्न सम्राट, 26 मे 2014 अंकातील लेखावरून उद्धृत)

About Post Author

6 COMMENTS

  1. छान.

    छान.
    माझा मित्र देवानंद याची कहाणी अनेकांना प्रेरणा देणारी आहे. त्याचे कष्ट, ध्यास, वेगळा कल्पक विचार करण्याची वृत्ती कौतुकास्पद आहे. त्याची पत्नी स्नेहल हिने दिलेली साथही तितकीच महत्वाची आहे.
    त्याची क्षमता पाहता त्याला अजून खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे.
    त्यासाठी शुभेच्छा.

  2. खेडेगावातिल देवानंद ने
    खेडेगावातील देवानंदने शहरातील उच्च विभूशित मुलांना जमले नाही असे अतुलनिय काम केले.

  3. देवानंदजी आपला प्रवास आजच्या
    देवानंदजी आपला प्रवास आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.
    आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा
    युवा शक्ती फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य

  4. क्षेत्रातउभारणीकदेवानंदजी ने…
    क्षेत्रातउभारणीकदेवानंदजी ने खरोखरच एक नव अध्याय जोडला असे देव-आनंद गावा गावात घडले तर एक नवि क्रांति उदयास येईल आणि खेडी स्वयंपुर्ण होईल
    माझ्या तर्फे व माध्यम यशस्वी परिवारा तर्फे देवानंदजी आणि पयोद टिमला पुढिल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
    दिपक नागो यंगड
    यशस्वी परिवार यवतमाळ

Comments are closed.