देवाच्या नावानं…

0
133
'देवाच्‍या नावानं...' पुस्‍तकाचे मुखपृष्‍ठ
'देवाच्‍या नावानं...' पुस्‍तकाचे मुखपृष्‍ठ

'देवाच्‍या नावानं...' पुस्‍तकाचे मुखपृष्‍ठ युनिक फीचर्स ही उपक्रमशील संस्था आहे. संस्थेने वर्तमानपत्रांना फीचर्स-लेख पुरवणारा एक गट येथपासून दोन-अडीच दशकांपूर्वी सुरुवात करून, स्वत:चे मासिक, पुस्तके प्रकाशित करणारी पत्रकार मित्रमंडळी येथपर्यंत मजल मारली आहे. त्यांच्या ‘समकालीन’ ब्रँडचे वैशिष्ट्य संकल्पनेत व शीर्षकांत आकृष्ट करणारी पुस्तके हे म्हणता येईल. त्यांच्या ‘देवाच्या नावानं…’ या, सप्टेंबर २०१२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या संपादित पुस्तकाबद्दल तसेच कुतूहल जागे झाले होते. समाजात देवभक्तिभाव वाढत चाललेला दिसत असताना, या मंडळींनी देवाला कशा प्रकारे हाक घातली असेल बरे? असे म्हणून पुस्तक पाहवे-हाती घ्यावे असे पहिली जाहिरात नजरेत आल्या दिवसापासून वाटत होते.

 पुस्तक घडवले आहे झकास; त्याचे स्वरूप महाराष्ट्रातील दहा देवस्थानांचा शोधबोध असे आहे. सुहास कुलकर्णी व मनोहर सोनवणे यांनी ते संपादित केले आहे. त्यांना पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे, विशेषत: सुहास पळशीकर व राजेश्वरी देशपांडे या प्राध्यापक द्वयीचे सहकार्य लाभले आहे. ही सारी पुरोगामी मंडळी – धर्म, देव, परंपरा यांकडे चिकित्सकपणे पाहणारी. त्यांच्या वतीने, त्यांच्या विचारकल्पनेनुसार वेगवेगळे पत्रकार-लेखक शिर्डी, अक्कलकोट, शेगाव, पंढरपूर, तुळजापूर, त्र्यंबकेश्वर, शनी शिंगणापूर, सिद्धिविनायक या प्रस्थापित ‘देवांघरी’ गेले. त्यांनी इतिहास, भूगोल, देवस्थानाचे स्वरूप – त्याची सत्तासंपत्ती असा शोध घेतला व तो वेधक पद्धतीने मांडला असे या लेखनाचे स्वरूप आहे.

 ही दहाच देवस्थाने का निवडली? तर ‘एकतर महाराष्ट्रातील सर्वच्या  सर्व देवस्थानांची पाहणी या तर्‍हेने करणे शक्य होणार नाही व दुसरे म्हणजे त्यांच्या पाहणी-लेखनात तोच तो पणा येईल म्हणून’ असे त्याचे उत्तर आहे. दहा देवस्थानांच्या हकिगती वाचताना संपादकांचे हे उत्तर पटत जाते. लेखनामध्ये शनीच्या जागी त्र्यंबकेश्वर आला किंवा शेगावच्या जागी अक्कलकोट अवतरले तरी वस्तुनिष्ठ वाचकाला वर्णनांत फारसा फरक जाणवणार नाही; भक्ताला मात्र फरक नक्की पडेल! म्हणून तर भारतात तेहतीस कोटी ब्रँड आहेत! एवढेच नव्हे तर पुस्तकातील शेवटचा लेख दोन ‘प्रतिस्थानां’चा आहे. दोन्ही स्थाने पुण्याजवळ गेल्या पंधरा-वीस वर्षांत निर्माण झाली आहेत. एक प्रतितिरुपती व दुसरे प्रतिशिर्डी. दोन्ही ठिकाणी त्या त्या देवस्थानचे फ्रँचाइझ आहे. मात्र, त्यांचा मूळ स्थानांशी रॉयल्टी पद्धतीचा संबंध नसावा.

 संपादकद्वयांपैकी सुहास कुलकर्णी यांनी ‘निमित्ताने’ म्हणून पुस्तकास प्रास्ताविक लिहिले आहे व प्राध्यापक द्वयींपैकी राजेश्वरी देशपांडे यांनी प्रस्तावना. या दोन्ही लेखांमुळे पुस्तकास ‘भूमिका’ लाभते. देवळांचे भांडवलीकरण आणि समाज जीवनातील अस्थिरता – असुरक्षितता हे दोन मुद्दे दोन्ही लेखांमध्ये, देवळांच्या भरभराटीसंबंधात चांगले उलगडून मांडले गेले आहेत.

 सुहास कुलकर्णी यांनी गंमतीची गोष्ट म्हणून जी नोंद केली आहे ती मार्मिक आहे. ते म्हणतात, की “(देवस्थानच्या) या सार्‍या गदारोळात त्या गावातील व त्या देवस्थानातील दैवत मात्र निमित्तमात्र बनत जातं. तिथं घडणारे व्यवहार महत्त्वाचे बनत जातात. दैवताचं स्थान विचाराच्या व भावनेच्या केंद्रस्थानी असतं ते भक्ताच्या, पण बाकीच्या यंत्रणा मात्र त्या पलीकडे जाऊन व्यवहारात गुंतून पडलेल्या दिसतात. त्यामुळे भक्त देवस्थानात येतो, पण देवस्थान व संबंधित घटक मात्र सर्व व्यवहार ‘देवाच्या नावाने’ चालवताना दिसतात.”

 राजेश्वरी देशपांडे यांनी धर्म, धार्मिकता व धर्मश्रद्धा यांची तात्त्विक चिकित्सा करताना बरकतीच्या अर्थव्यवहाराची मांडणी केली आहे. त्यांनी सर्वसामान्य जनांची असुरक्षिततादेखील अधोरेखित केली आहे. त्या अखेरीस म्हणतात, “नव्या धार्मिकतेचे स्वरूप प्रकर्षाने व्यावसायिक, बाजारी बनले असले तरी लोक मात्र धार्मिकतेचा स्वीकार निरनिराळ्या कारणांनी करत असतात. आस्तिक्य आणि पावित्र्याची ओढ या भावनांची सरमिसळ तर त्यात झालेली असतेच; त्याचबरोबर, विशेषत: भांडवली समाजाचे वैशिष्ट्य असणार्‍या अस्थिरतेपासून, अस्वस्थतेपासून, गळेकापू स्पर्धेपासून मुक्ती – दिलासा – मन:शांती मिळवण्याचा एक मार्ग म्हणूनही लोक प्रकर्षाने धर्माकडे वळतात.”

 ‘देवाच्या नावानं…’ हे पुस्तक अशा तर्‍हेने विचारी जगात आधीच माहीत असलेली निरीक्षणे पुराव्यानिशी अधोरेखित करते. त्यामुळे पुस्तक आकर्षक वाटते, वेधक शैलीमुळे झपाट्याने वाचत जाता येते, वेगवेगळ्या देवस्थानांचे अनेक तपशील कळत जातात. मात्र पुस्तक त्याच पातळीवर राहते. सुहास कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात, “युनिक फीचर्स समकालीन सामाजिक घडामोडींचा वेध कसा घेत असते आणि त्यामधून त्यांचा अन्वयार्थ कसा लावला जातो” याचे वर्णन आहे. ‘देवाच्या नावानं…’मध्ये तो अन्वयार्थ, कुलकर्णी-देशपांडे-सोनवणे यांनी त्यांच्या लेखनात मांडला आहे तेवढ्याच उघड पातळीवर राहिलेला दिसतो. भक्ताच्या भाविकतेचा शोध त्याचे वर्तन, त्याचे विचार यांमधून घेणे शक्य आहे. श्रद्धा – अंधश्रद्धा याबाबतचा रूढ विचार व सध्याच्या अस्थिर जगातला विचार यांमध्ये महदंतर आढळते. एकेकाळी भक्ताची देवाशी ‘क्विड प्रो क्वो’ (देशपांडे म्हणतात देवाणघेवाणीची) अशी ‘रिलेशनशिप’ होती. म्हणजे ‘मी मारुतीला फेर्‍या घालीन, त्याने मला पास करावे / नोकरी द्यावी /प्रेयसीशी लग्न जमवून द्यावे’ वगैरे सारखी. पण माहोल बदलल्यागत वाटतो. सद्यकालात, एका बाजूला माणूस विश्वाच्या उत्पत्तीच्या अगदी जवळ जाऊन पोचला असताना, म्हणजे विश्वनिर्मितीचे गूढ उकलले जाण्याच्या नजीक असताना व दुसर्‍या बाजूला त्याच कारणाने तो तत्वज्ञान विरहित करमणुकीच्या जगात जगत असताना भक्त माणसे देवाशी ‘कम्युनिकेट’ करू इच्छितात. त्यांचा संबंध व्यक्तिस्वातंत्र्य, त्यामधून आलेले एकटेपण अशा विचारभावनांशी देखील जोडता येईल. श्रद्धा आणि भाविकता यांमधील फरकदेखील तपासून पाहता येईल. अशा तर्‍हेने आधुनिक संदर्भात या पुस्तकामधील निरीक्षणांची विचारचर्चा झाली असती तर त्यास सखोलता लाभली असती.

 ‘युनिक फीचर्स’च्या ‘शोधा’चा बाज पत्रकारितेचा (‘भांडाफोड नसली तरी’) असणे स्वाभाविक आहे. त्यांच्या प्रयत्नांस पुणे विद्यापीठाचा राज्यशास्त्र विभाग जोडला गेल्याने अपेक्षा अधिक तयार झाल्या. त्या प्रयत्नांत तत्त्वज्ञान विभागाचे सहकार्य अधिक समर्पक झाले असते.

देवाच्या नावानं…
संपादक – सुहास कुलकर्णी /मनोहर सोनवणे

समकालीन प्रकाशन
‘अमित कॉम्प्लेक्स’,  ४७४ सदाशिव पेठ,
पुणे ४११ ०३०, फोन (०२०) २४४७०८९६
samakaleen@gmail.com , पृष्ठे १८८ – मूल्य १८० रु.

– दिनकर गांगल

About Post Author

Previous articleमाघी गणेशाच्या नावाने…
Next articleसाऊण्ड ऑफ सायलेन्स
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.